योगेंद्र यादव यांचं भाषण रोखलं, माईक खेचला; अकोल्यात नेमकं काय घडलं? 'वंचित'नं काय म्हटलं?

फोटो स्रोत, Facebook/YogendraYadav
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'स्वराज इंडिया'चे प्रमुख योगेंद्र यादव यांच्या अकोला येथील व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये काही जणांनी गोंधळ घालून, तो कार्यक्रम बंद पाडल्याची घटना घडली.
या गोंधळावेळी जमावातून 'वंचित बहुजन आघाडी'च्या बाजूने घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ असलेल्या अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने हा गोंधळ घातला असल्याची चर्चा सुरू होती.
मात्र, सभेत जाऊन गोंधळ घालण्याची आमची भूमिका नसल्याचं पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू असताना काही लोकांनी त्यांना आरक्षणासहित इतर काही मुद्द्यावर प्रश्न विचारले. 'भाजपप्रमाणेच काँग्रेसही आरक्षण संपवत आहे का, याचे आधी उत्तर द्या', असा सवाल विचारत या लोकांनी योगेंद्र यादव यांचे हे व्याख्यान बंद पाडले, अशी माहिती आहे.
एकीकडे, दलित आणि मुस्लीम संघटनांच्या नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने या कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारले; तेव्हा आयोजकांनीच या प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना धक्काबुक्की केली, असा आरोप प्रश्न विचारणाऱ्यांपैकी एक असलेल्या सचिन शिराळे यांनी केला.
यासंदर्भात योगेंद्र यादव यांनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, "स्टेजवर उभे राहून डझनभर लोक ओरडत होते की, 'योगेंद्र यादव, उत्तर द्या.' मी बसल्या जागी हसतच म्हणत होतो की, मला बोलू तर द्या, मग मी उत्तर देऊ शकेन ना. मी विचार करत आहे की, ही कसली मानसिकता आहे? उत्तर तर हवय; मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये."
नेमकं काय घडलं?
'महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फोरम'तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'लोकशाहीचे संरक्षण आणि आपलं मत' असा या व्याख्यानाचा विषय होता.
'भारत जोडो अभियाना'चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव प्रमुख वक्ते होते, तर त्यांच्यासमवेत स्टेजवर या अभियानाचे महाराष्ट्र संयोजक उल्का महाजन आणि राष्ट्रीय सचिव संजय मंगला गोपळही उपस्थित होते.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी म्हटलं की, "हा मतदार जागृती मेळावा होता. माझं भाषण होईपर्यंत सभागृहात शांतता होती. संविधानविरोधी शक्तींना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार केले पाहिजे, या मांडणीला लोक सकारात्मक प्रतिसादही देत होते. त्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे, या भूमिकेवर निर्धारही व्यक्त करण्यात आला."
उल्का महाजन यांच्या माहितीला दुजोरा देत संजय मंगला गोपाळ म्हणाले की, "या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फोरम, अकोला आणि भारत जोडो अभियान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं.

हे महायुती सरकार लोकशाहीवर कशाप्रकारे घाला घालत आहे, हे लोकांना सांगण्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसांपासून असे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करत आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाविकास आघाडीला समर्थन द्या, असं सांगण्यासाठी अकोल्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता."
योगेंद्र यादव यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेजवर बसल्यानंतर एका व्यक्तीने येऊन एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरुर देईन, आपण निश्चिंत रहावं, असं उत्तर प्रश्नकर्त्यांना आपण दिल्याचं योगेंद्र यादव यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यांनी त्या चिठ्ठ्याही दाखवल्या.


'बाबरी मशिदीचा पाडाव कुणी केला, या देशाला तोडण्याचं काम कुणी केलं?' अशा स्वरुपाचे प्रश्न त्या चिठ्ठीमध्ये होते, असे योगेंद्र यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मात्र, 'योगेंद्र यादव यांना अकोल्यात बोलू द्यायचं नाही,' हे आधीच ठरवण्यात आलं होतं, त्यातूनच हा गोंधळ घालून कार्यक्रम बंद पाडण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दिसत आहे की, योगेंद्र यादव यांनी आपल्या भाषणास सुरुवात करण्यापूर्वीच एक व्यक्ती स्टेजवर आली आणि तिने माईक खेचला.
त्या व्यक्तीमागून अनेक लोक स्टेजवरती चढले आणि त्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. त्यानंतरही कार्यक्रमाचे पाहुणे स्टेजवरच बसून राहिले होते.
यासंदर्भात योगेंद्र यादव म्हणाले की, "माझं नाव पुकारल्यावर एकाएकी लोक स्टेजवरती चढले. मात्र, आम्ही स्टेजवर बसून राहण्याचीच भूमिका घेतली. 'महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फोरम'च्या कार्यकर्त्यांनी आमच्या बचावासाठी आमच्याभोवती कडं निर्माण केलं. त्या छोट्याशा स्टेजवर न जाणो पन्नासहून अधिक लोक एकाएकी चढले होते.
कुणीही आम्हाला मारहाण केली नसली तरीही ते आक्रमकतेने चढाई करु पाहत होते आणि मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन बोलत होते.
एक वेळ अशी आली की त्या कमी जागेत चढलेला हा सगळा जमाव आमच्या अंगावर पडेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा पोलिसही आले आणि त्यांनी मला एका बाजूला नेलं."

आयोजक आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे परस्परविरोधी दावे
योगेंद्र यादव यांनी घडलेल्या घटनाक्रमाबाबत दिलेली माहिती आणि प्रश्न विचारणाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी दिलेली माहिती, यामध्ये विरोधाभास आहे.
प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांपैकी एक असलेले 'कलिंग मल्टिपरपज असोसिएशन'चे अध्यक्ष सचिन शिराळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला योगेंद्र यादवांनी समर्थन दिलं आहे, त्यासंदर्भात त्यांना आंबेडकरवादी म्हणून आम्ही प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली. आरक्षण समाप्त करण्याचे छुपं षडयंत्र आहे, असा आमचा आरोप आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारण्यासाठी गेलो होतो. यामध्ये काही आंबेडकरवादी आणि जमात-ए-इस्लामीचे कार्यकर्ते होते."
पुढे त्यांनी असा आरोप केला की, एका बाजूला योगेंद्र यादव आणि त्यांचे आयोजक आम्ही कोणत्याही पक्षाकडून नसल्याचे सांगतात तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला मतदान करा, असं सांगतात. अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत.
ते म्हणाले की, "उल्का महाजन आणि योगेंद्र यादव हे जर काँग्रेसचा प्रचार करणार असतील तर त्यांनी काँग्रेसचं नाव घेऊन यावं. 'महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फोरम' वगैरे नाव घेऊन का येतात? असा छुपा अजेंडा घेऊन हे लोकांची मानसिकता बदलायचा प्रयत्न करत आहेत. व्याख्यान आयोजित करुन हे महाविकास आघाडीला मतदान करा, असं सांगत आहेत. आम्ही प्रचारासाठी आलो आहोत, असे ते थेट का सांगत नाहीत?"

फोटो स्रोत, Sanjay M.G.
सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये स्टेजवर बसलेल्या पाहुण्यांभोवती जमावाची धक्काबुक्की आणि गोंधळ निर्माण झालेला पहायला मिळतो.
प्रश्न विचारण्याचीच भूमिका असेल तर ते शांततेत का विचारले गेले नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले की, "प्रश्न विचारण्यासाठी माईक हातात घेतल्यानंतर माईक बंद करण्यात आला. महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फ्रंटच्या आयोजकांनीच प्रश्न विचारणाऱ्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. योगेंद्र यादवांच्या आजूबाजूला जमलेले लोक हे त्यांचेच लोक आहेत. गर्दीचं नियंत्रण सुटलं तर तिला आटोक्यात आणता येत नाही. तिथेही तेच घडल्याने हा कार्यक्रम बंद पडला."
महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फोरमचे अकोला जिल्ह्याचे संयोजक आणि या कार्यक्रमाचे स्थानिक आयोजक नजीब रहमान खान यांनी म्हटलं की, "अविनाश काकडे, संजय मंगला गोपाळ आणि उल्का महाजन यांचं भाषण झाल्यावर योगेंद्र यादव यांचं भाषण होणार होतं. तत्पूर्वी एका व्यक्तीने येऊन माझ्या हातात प्रश्नांची चिठ्ठी दिली. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल, अशीच भूमिका योगेंद्र यादव यांनीही मांडली होती. मात्र, त्यांना बोलूच दिलं नाही. एक व्यक्ती स्टेजवर आला आणि त्याने थेट माईक खेचला. तुम्हाला प्रश्नोत्तरासाठी वेळ दिला जाईल, असं सांगूनही कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला."
यासंदर्भात योगेंद्र यादव म्हणाले की, "लोकशाहीवर किती मोठं संकट आहे, हे आपल्याला या सभेच्या माध्यमातूनच दिसून आलं. हे स्पष्ट आहे की, त्यांना मला बोलू द्यायचंच नव्हतं. बोलू दिलं तर आपलं नुकसान होईल, अशी काहींना भीती होती."
ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी सभागृहात झालेल्या घटनेचा व्हीडिओ 'एक्स'वरुन शेअर केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
वंचित बहुजन आघाडीने काय म्हटलं?
प्रश्न विचारणाऱ्या दलित-मुस्लीम नागरिकांमध्ये वंचितचेही काही कार्यकर्ते उत्साहाने गेले होते; मात्र, हा कार्यक्रम आमचा नव्हता, तर तिथल्या स्थानिक सामाजिक संघटनांनी राबवलेला प्रश्न विचारण्याचा हा उपक्रम होता, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.
यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, "तिथल्या स्थानिक काही दलित आणि मुस्लीम संघटना प्रश्न विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यात उत्स्फुर्तपणे आमचे वंचितचेही कार्यकर्ते होते. पण हा काही वंचितचा प्रोग्राम नव्हता. वंचितने हे ठरवून वा घडवून आणलेली गोष्ट नाही. स्थानिक पातळीवर काही पक्ष आणि सामाजिक संघटना जशा एकत्रित काम करतात, त्यातील कार्यकर्ते होते."
पुढे ते म्हणाले की, या कार्यक्रमात झालेला गोंधळ हा 'महाराष्ट्र डेमोक्रॅटीक फोरम'च्या आयोजकांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे झाला, अशी माहिती आम्हाला मिळाली असल्याचा दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केला.
ते म्हणाले की, "आयोजकांनी प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली."

फोटो स्रोत, Facebook/Yogendra Yadav
वंचित बहुजन आघाडी या झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवते की समर्थन करते, या प्रश्नावर ते म्हणाले की, "लोकशाहीचा आवाज दाबला गेला वगैरे जसं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे, अगदी तसंच या प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांचंही काही म्हणणं आहे.
ज्या काँग्रेसचा हे प्रचार करत आहेत, त्यांच्या उमेदवारांमध्ये किती मुस्लीम असणार आहेत, अशा स्वरुपाचे त्यांचे प्रश्न होते. काँग्रेस आणि भाजप दोघेही आरक्षण संपवू पाहत आहेत, तर मग तुम्ही काँग्रेसला मत द्या, असं लोकसभा निवडणुकीवेळीही सांगितलंत आणि आताही सांगत आहात, याबाबत नेमकी भूमिका काय? हे सगळे प्रश्न योग्यच आहेत. त्यामुळे, हे प्रश्न विचारायला गेलेल्या सामाजिक संघटनांचा आम्ही निषेध कसा करायचा?"
प्रश्न विचारणे गैर नसले तरीही प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं जात आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, "आयोजकांनीच प्रश्न विचारणाऱ्यांची कळ काढली आणि धक्काबुक्की केली. त्यांना प्रश्न विचारु न देता दमदाटी करण्यात आली, यातूनच हा गोंधळ झाला आणि कार्यक्रम बंद पडला, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे."
आरक्षण आणि मुस्लीम समाजाच्या उमेदवारीवरुन प्रश्न
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
योगेंद्र यादव यांचा हा दौरा प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला समर्थन तसेच भाजप पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात होता.
मात्र, योगेंद्र यादव हे महाविकास आघाडीचा प्रचार करत मुस्लिमाची दिशाभूल करत असल्याचा आरोप या प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
तसेच लोकसभेत मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली गेली नाही, असाही प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. याशिवाय त्यांनी आरक्षणावरही प्रश्न विचारले, ज्याचे उत्तर यादव यांना देता आलं नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
तर दुसऱ्या बाजूला यासंदर्भात योगेंद्र यादव यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, "स्टेजवर उभे राहून डझनभर लोक ओरडत होते की, 'योगेंद्र यादव, उत्तर द्या.' मी बसल्या जागी हसतच म्हणत होतो की, मला बोलू तर द्या, मग मी उत्तर देऊ शकेन ना. मी विचार करत आहे की, ही कसली मानसिकता आहे? उत्तर तर हवय; मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये."
यासंदर्भात उल्का महाजन म्हणाल्या की, "माझं भाषण झाल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, असे म्हणत काही जण उभे राहिले. स्टेजवरील प्रत्येकाची मांडणी पूर्ण झाल्यावर सभेत उपस्थित प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल, असे सांगूनही हा गोंधळ घालण्यात आला. प्रश्न विचारणाऱ्यांची उत्तर ऐकून घेण्याची तयारीच नव्हती. हे गोंधळ घालणारे लोक कोण होते, त्यांना आम्ही ओळखत नाही."

प्रज्ञा पवार बीबीसी मराठीशी बोलताना काय म्हणाल्या होत्या?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
या घटनेसंदर्भात लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या फेसबुकवर निषेध व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लेखक रावसाहेब कसबे, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि लेखक यशवंत मनोहर यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीने आंदोलने केली होती.
तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेवर टीका केल्यानंतर प्रज्ञा दया पवार यांना ट्रोलिंगला सामोरी जावं लागलं होतं. त्यासंंदर्भातील सविस्तर भूमिका त्यांनी बीबीसी मराठीच्या मुलाखतीमध्ये मांडली होती.
आता त्यांनी अकोल्यातील घटनेवरुन वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख महिला कार्यकर्त्या असलेल्या अंजली आंबेडकर आणि रेखा ठाकूर यांना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, "मी अतिशय नम्रपणे जाहीर सवाल करते आहे.
कालची अकोल्याची घटना पाहता शत्रुमित्र विवेक नष्ट होताना तुम्ही गप्प का आहात? जे काही सुरु आहे त्याला तुमची मान्यता आहे, असं समजायचं का?"
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "मी उन्मेखून तीन स्त्रियांनाच प्रश्न विचारते आहे. (कारण वंचितच्या असुरक्षित आणि भयगंडाने ग्रस्त होऊन आक्रमक, अश्लाघ्य आणि विरोध करणारी जर स्त्री असेल तर तिच्या कंबरेखाली वार करणार्या पुरुष नेतृत्वाकडून किमान सभ्यतेचीही अपेक्षा नाही माझी.) सारासार विवेक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शहाणीव, मेत्ता, करुणा, शील याबाबतची किमान संवेदनशीलता अजून तुमच्या काळजात वसत असावी ही आशा बाळगून. कृपया तुमची भूमिका जाहीर करा." असेही आवाहन त्यांनी केले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











