देवेंद्र फडणवीसांसमोर काँग्रेसच्या प्रफुल गुडधेंचे आव्हान, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी किती सोपी-किती अवघड?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
विदर्भावर झेंडा त्याची राज्यात सत्ता, असं समीकरण विधानसभा निवडणुकीत असतं. याच विदर्भातून राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, भाजपचे राज्यातले प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस येतात.
देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम ( नैऋत्य) नागपूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. 2009 पासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. यावेळी काँग्रेसनं या मतदारसंघातून काँग्रेसचे सचिव प्रफुल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. गुडधे कुणबी चेहरा म्हणून ओळखले जातात.
गेल्या पाच वर्षांत राज्यातली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. या बदललेल्या राजकारणात गेली पाच वर्षं देवेंद्र फडणवीसांचं नाव केंद्रस्थानी राहिलं. त्यामुळे ही 2024 ची विधानसभा निवडणूक ही फडणवीसांसाठी उमेदवार म्हणून कशी असेल?
फडणवीसांनी आतापर्यंत लढवलेल्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक त्यांना जड जातेय का? त्यांच्या दक्षिण पश्चिम (नैऋत्य) मतदारसंघाचं राजकीय गणित काय सांगतं?
फडणवीसांसमोर आव्हानं कोणती आहेत? त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत? या मुद्द्यांवर चर्चा करुया.
त्याआधी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची रचना, इथली जातीय समीकरणं आणि या मतदारसंघाचा इतिहास यावर एक नजर टाकू.

फोटो स्रोत, Getty Images
मतदारसंघाची रचना आणि इतिहास
वर्धा रोडवरील मिहानच्या पुनर्वसनात गेलेल्या शिवणगाव, सोनेगावपासून तर अंबाझरी तलावापासून मेडीकल चौकापर्यंत असं मोठं क्षेत्र दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतं. सुरुवातीला इथं पश्चिम नागपूर मतदारसंघ होता.
इथूनच देवेंद्र फडणवीस 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या अशोक धवड यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता.
2004 मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर 2008 मध्ये मतदारसंघाची पुनरर्चना झाली आणि दक्षिण-पश्चिम नागपूर असा एक नवीन मतदारसंघ तयार झाला.
तिथून 2009 पासून देवेंद्र फडणवीस सलग निवडून येत आहेत. 2009 मध्ये त्यांनी 27 हजार मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला होता.


2014 मध्ये त्यांनी 58 हजारांचं मताधिक्क्य घेत मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 2014 पर्यंत फडणवीसांच्या मताधिक्क्याचा आलेख चढता होता. पण, 2019 पासून या मतदारसंघात भाजपच्या मताधिक्क्यात घसरण झाली.
आशिष देशमुख यांच्यासारखा नवखा उमेदवार विरोधात असताना आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवली असताना देवेंद्र फडणवीसांचं मताधिक्य आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत 9 हजारांनी कमी झालं होतं. त्यांना फक्त 49 हजारांची लीड मिळाली होती.
आता 2024 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीतही फडणवीसांच्या मतदारसंघात नितीन गडकरींची लीड 32 हजार मतांनी कमी झाली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची चिंता वाढल्याची चर्चा आहे.
जातीय समीकरण फडणवीसांसाठी आव्हान?
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ ओबीसीबहुल आहे. त्यातही कुणबी मतदारांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ अनुसूचित जाती आणि ब्राह्मण मतदार येतात. तसेच सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे.
या मतदारसंघातला अनुसूचित जातीचा मतदार कधीच भाजपच्या बाजूनं नव्हता. हा मतदार काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. पण, कधी भारीप बहुजन महासंघ, तर कधी बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवारांमुळे दलित मतांचं विभाजन झालं.
2009 ला भारीप बहुजन महासंघ आणि अपक्ष उमेदवार असे दोघांनी मिळून जवळपास 20 हजारांच्या घरात मतं घेतली. 2014 च्या निवडणुकीतही बसपच्या उमेदवाराला 17 हजारांच्या घरात मतं पडली होती.

फोटो स्रोत, Getty Images
याउलट या मतदारसंघातल्या कुणबी मतदारांचा देवेंद्र फडणवीसांना नेहमीच पाठिंबा मिळत आला. पण, गेल्या 5 वर्षात इतकं चित्र बदललं की हाच कुणबी आणि ओबीसी फॅक्टर देवेंद्र फडणवीसांसाठी मोठं आव्हान बनलाय, असं नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांना वाटतं.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “2019 पर्यंत ओबीसींचा मुद्दा इतका चर्चेत नव्हता. पण, नंतरच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचं आरक्षण गेलं. परिणामी ओबीसींचं प्रतिनिधित्व कमी झालं. ओबीसींची जातगणनासुद्धा झाली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांत ओबीसी केंद्रस्थानी आला आहे. त्यात फडणवीस यांनी अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासारखे ओबीसी नेते टार्गेट केले असा आरोपही त्यांच्यावर केला जातो. त्यामुळे ओबीसी वर्गात समाज म्हणून एक नाराजी दिसतेय. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीची तुलना ही याआधीच्या इतर निवडणुकांसोबत होऊ शकत नाही. ओबीसींबद्दलचं बदलतं चित्र हेच या मतदारसंघात फडणवीसांसमोर मोठं आव्हान आहे.”
कुणबी नेत्यांना टार्गेट केलं असा जो आरोप फडणवीसांवर होतोय त्यामुळे इथल्या कुणबी समाजाचा रोष असल्याचं लोकसत्ताचे ज्येष्ठ राजकीय पत्रकार चंद्रशेखर बोबडे यांनाही वाटतं.
ते म्हणतात, पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला फटका बसला. हे ओबीसी समाज एकत्र आल्याचं चित्र होतं. दक्षिण पश्चिम नागपूरच्या कुणबी मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. पण, फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्याचा फायदा होतो का बघायला लागेल.”
फडणवीसांचं दलित मतदारांवर लक्ष?
दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ओबीसीनंतर अनुसूचित जातीचे मतदार आहेत. या भागात रामेश्वरीसारखा मोठा परिसर, रामबाग, जयताळा, एकात्मता नगर इकडे अनुसूचित जातींचे मतदार अधिक आहेत.
आता फडणवीसांनी या मतदारांवर लक्ष केंद्रीत केलेलं दिसतंय. कारण, त्यांच्या मतदारसंघातील 378 बूथपैकी जिथं अनुसूचित जातीचे मतदार अधिक आहेत अशा 100 बूथवर “देवेंद्रदूत” नेमले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येकी 20 बूथ असे 5 कोऑर्डीनेटर नेमले आहेत. देवेंद्रदूतच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांना काय समस्या आहेत? लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला का? देवेंद्र फडणवीसांबद्दल काय मत आहे? अशी माहिती विचारली जात आहे.
या समाजाची काही मतं वळवता आली तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवाय मतदाला न जाणारे लोक सुद्धा जागृत होऊन मतदानाला जातील त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढू शकतो. त्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. भाजपच्याच एका पदाधिकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
त्यानंतर आम्हीही रामेश्वरी भागांत राहणाऱ्या मतदारांसोबत संवाद साधला. याच परिसरातील पार्वती नगरमध्ये राहणाऱ्या अश्विनी ठाकरे सांगतात, आमच्या भागात देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून आलेलो आहोत, असं सांगत काही लोक फिरत आहेत. आमच्याही घरी दोन-तीन दिवसांच्या फरकानं दोन महिला येऊन गेल्या. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांबद्दल काय वाटतं? तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? घरात कोणी वयोवृद्ध आहे का? तुमच्या काही समस्या आहेत का? अशी माहिती विचारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
फडणवीसांसाठी उमेदवार म्हणून 2024 ची निवडणूक कशी असेल?
गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरण इतकी बदलली की त्यातून सर्वाधिक टीका, आरोप हे फडणवीसांवर झाले. त्यात त्यांना इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावंं लागलं. राजकारणात फडणवीसांचं डिमोशन झाल्याची चर्चा होती.
या सगळ्या बदलत्या चित्रानंतर फडणवीसांसाठी त्यांच्या मतदारसंघातली निवडणूक कशी असेल? तर सर्व निवडणुकांपेक्षा 2024 ची निवडणूक फडणवीसांना अवघड जाईल, असं लोकसत्ताचे ज्येष्ठ राजकीय पत्रकार चंद्रशेखर बोबडे यांना वाटतं.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “2019 ची निवडणूक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून लढले होते. मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढताना तुमचं एक वलय असतं. तुमच्या पाठीमागे एक लाट असते. त्यावेळी त्यांच्यासमोर आशिष देशमुख यांच्यासारखा नवखा उमेदवार होता. सगळ्या जमेच्या बाजू असताना फडणवीसांनी 1 लाख मताधिक्क्यानं निवडून येणं अपेक्षित होतं. पण, त्यांना साधे 50 हजारांच्या मताधिक्यही घेता आलं नाही. आता 2019 सारखी परिस्थिती नाही. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तर नाहीच. त्यांच्याविरोधात अँटी इन्कम्बन्सी सुद्धा आहे. तसेच इथलं जातीय समीकरण सुद्धा त्यांच्याबाजूनं नाही. कुणबी समाजाचा रोष दिसतोय. सगळ्या बाजू बघता त्यांच्यासाठी 2024 ची ही निवडणूक अवघड दिसतेय. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे.”
पण, नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांचं मत वेगळं आहे. “फडणवीसांना या निवडणुकीत मेहनत घ्यावी लागेल पण त्यांच्यासाठी ही निवडणूक इतकी कठीण असेल असं वाटत नाही. कारण फडणवीसांचं राजकीय वजन जास्त आहे. त्याचा फायदा मतदानात होतो. त्यामुळे त्यांना तितकं अवघड जाणार नाही. पण, एक गोष्ट नक्की आहे की पटोले, वडेट्टीवार, मुनगंटीवार या विदर्भातल्या बड्या नेत्यांपेक्षा फडणवीसांना त्यांच्या मतदारसंघात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, फडणवीसांच्या मतदारसंघातली जातीय समीकरण त्यांच्यासाठी अनुकूल नाहीत”, असं श्रीमंत माने यांना वाटतं.
फडणवीसांसमोर महाविकास आघाडीमधून कोणाचं आव्हान असेल?
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिममधून काँग्रेसचे प्रफुल गुडधे असणार हे स्पष्ट झालं आहे. फडणवीसांनी बॅनर आणि विकासकामांच्या भूमिपूजनाच्या, लोकार्पणाच्या माध्यमातून प्रचार आधीच सुरू केला आहे.
काँग्रेसचे प्रफुल गुडधे या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. ते फडणवीसांविरोधात लढण्यासाठी इच्छूक होते त्यामुळं त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू केला होता.
प्रफुल गुडधे हे दक्षिण-पश्चिम मतदारसंघातल्या जयताळा परिसरातले रहिवासी आहेत. ते कुणबी असून इथल्या जातीय समीकरणात फीट बसतात. त्यांचं या मतदारसंघात नेटवर्कही आहे. शिवाय आधी याच मतदारसंघाचा भाग असलेल्या पश्चिम नागपूरमधून दोनवेळा भाजपचे आमदार राहिलेल्या विनोद गुडधे पाटलांची राजकीय परंपरा देखील प्रफुल गुडधेंच्या पाठीमागे आहे.
काँग्रेस हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार अशाही चर्चा होत्या. अनिल देशमुख किंवा त्यांचा मुलगा इथून लढवणार अशी चर्चा होती. पण मविआनं ही जागा काँग्रेसला दिली आहे.
आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती एकत्रितपणे काम करते यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करायचा असेल तर गुडधे आणि मविआ यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही.
फडणवीसांसमोरची आव्हानं आणि जमेच्या बाजू
जातीय समीकरणं हे फडणवीसांसमोरचं आव्हान आहे. शिवाय या मतदारसंघात सिमेंट रस्त्यांमुळे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्याच्या तक्रारी होत्या. तसेच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे या मतदारसंघातल्या शंकरनगरसारख्या वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या.
त्यामुळे या मतदारसंघातल्या सुशिक्षित आणि विचारपूर्वक मतदान करणाऱ्या मतदारांची नाराजी आहे. त्यांनी हे प्रकरण हायकोर्टापर्यंत लावून धरलं होतं. या मतदारांची नाराजी दूर करणं हे फडणवीसांसमोरचं आव्हान आहे.
पण, दुसरीकडे त्यांनी नागपुरात केलेली विकासकामं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. यात मानकापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेस, विमानतळ नुतनीकरण हे सगळे विकासाचे मुद्दे येतात. शिवाय फडणवीसांनी आणि भाजपनं केलेल्या कामाचा उल्लेख करत “धन्यवाद देवाभाऊ” असे मोठमोठे बॅनर नागपुरात लागले आहेत.
विकासकामं घेऊनच फडणवीस निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक जातीय समीकरणं विरुद्ध विकासकामं अशी लढली जाईल, असंही राजकीय जाणकरांना वाटतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











