महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणूक किती सोपी-किती अवघड?

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, शताली शेडमाके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पहाटेचा शपथविधी झाला अन् राजकीय भूकंप पाहायला मिळाला. पण अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत सरकार स्थापन झालं.

अडीच वर्षं सरकार चालल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि मग मुख्यमंत्री झाले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनतेनी अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या.

या पाच वर्षांत महाविकास आघाडीतले दोन पक्ष फुटल्याने त्यांची ताकद कमी झाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला.

महाविकास आघाडीचे एकूण 30 खासदार निवडून आले. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यावर ही संख्या 31 वर गेली. तर महायुतीचे एकूण 17 खासदार निवडून लोकसभेवर गेले आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

महाविकास आघाडीची सद्यस्थिती, फोडाफोडीच्या राजकारणामुळे गेल्या दोन वर्षात बसलेला फटका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मविआची बलस्थानं आणि कमकुवत बाजू याबाबत महाराष्ट्रातील राजकीय निरीक्षक आणि पत्रकारांशी बोलून केलेलं हे विश्लेषण.

एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार

महाविकास आघाडीची सध्याची स्थिती काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना ( शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) उभे ठाकले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि एकूणच महायुतीची वाताहत झाली. तर, या विजयानं महाविकास आघाडीचं मनोबल वाढलं आणि आजही ते काही प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं.

दुसरं कारण म्हणजे महायुतीतील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काहीसा अडखळलेला दिसून येतो. या पक्षातल्या नेत्यांचा कल अजित पवारांची साथ सोडून महाविकास आघाडीकडे जात असल्याचं जाणवतं. त्यामुळे शरद पवारांची महाविकास आघाडीतील बाजू ही बळकट होताना दिसते.

नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याबाबत बोलताना लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणाले, “लोकसभा निकालानंतर काँग्रेसचं मनोबल वाढलं आहे. पण, हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेसलाही एक धडा मिळालाय की, महाविकास आघाडीमध्ये आपल्याला अन्य पक्षांशी जुळवून घेतलं तरच महाराष्ट्रासारख्या राज्यात आपण टिकू शकतो."

प्रधान म्हणाले की, "हरियाणाचा निकाल हा काँग्रेसच्या दृष्टीने जरी विपरित असला तरी महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते अतिउत्साहात होते. मात्र, हरियाणाच्या निकालानंतर ते जमिनीवर आले आहेत. महाविकास आघाडीच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक जमेचीच बाजू म्हणावी लागेल.”

"त्यामुळे एकीकडे शरद पवारांची बाजू मजबूत होताना दिसते, उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची स्थितीही बघावी लागेल, तब्येतीमुळे त्यांच्यावर काय बंधनं येतात? तब्येतीचा भावनिक मुद्दा तर उपस्थित करणार नाही ना? याकडेही बघावं लागेल. कारण उद्धव ठाकरे यांच्याबाबतची जी सहानूभुती आधी जनतेमध्ये होती ती कालांतराने काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे," असंही प्रधान यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीत फूट आणि समन्वय

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात दोन बड्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्या गेले. या पक्षफुटीच्या भूकंपाने महाविकास आघाडीचं समीकरण कोलमडलं.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत 40 आमदारांसह बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार बाहेर पडले तेव्हा शरद पवार हे देखील महाविकास आघाडीसोबत मजबूतीनं उभे राहिले.

पक्षफुटीचे हे धक्के पचवत त्यातून सावरत महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवला.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा मिळवत यश संपादन केले. यात काँग्रेसला 13, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या.

अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील काँग्रेसमध्ये गेल्यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची संख्या 14 झाली. ( नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे आता 13 खासदार आहेत.)

तर, महायुतीमध्ये भाजपला 9, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहेत. महायुतीचे असे एकूण 17 खासदार लोकसभेत आहेत.

याबाबत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख दीपक पवार म्हणाले, “शिवसेना पक्ष फुटला मात्र, त्या प्रक्रियेत ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा, निवडणूक आयोगाचा वापर करण्यात आल्याचे जे आरोप झाले त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जनतेची सहानुभूती मिळाली. ती तेव्हाही होती आणि आत्ताही आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलायचं झाल्यास या पक्षाच्या फुटीबाबत जनतेला दुहेरी शंका होती. शिवसेनेच्या फुटीबाबत लोकांना खात्री होती तशी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत वाटत नव्हती. पण एकंदरीत असं लक्षात आलं."

लाल रेष

या संबंधित बातम्याही वाचा -

लाल रेष

महाविकास आघाडीची कमकुवत बाजू

महाविकास आघाडीबाबत बोलताना दीपक पवार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेसमधील काहीजणांचा आत्मविश्वास प्रमाणाबाहेर वाढला आहे. जागा वाटपाची चर्चा करत असताना प्रमाणाबाहेर ते मागण्या करत आहेत का? आणि महाविकास आघाडीत ती मागणी करत असताना काही कच्चे दुवे राहतील का? अशी एक शक्यता काँग्रेसच्या आक्रमक वृत्तीमुळे तयार झाली आहे."

एकनाथ शिंदे आणि शरद पवार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे आणि शरद पवार

दीपक पवार म्हणाले की, "शरद पवार यांच्या पक्षाकडे पाहिल्यास त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचं दिसून येतं. पण यातील बहुतांश जण हे अजित पवार गटातील किंवा भाजपमधील आहेत. मतदारसंघातील जागावाटप पाहता आपल्याला या जागेवरुन लढता येईल का? हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हे इनकमिंग झाल्याचं दिसून येते. हे त्यांचं तात्पुरतं स्थलांतर तर नाही ना? असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

तसेच, महायुतीने एक असा पायंडा टाकला आहे की सत्तेमध्ये जेवढे महत्त्वाचे घटक पक्ष आहेत, तेवढे उपमुख्यमंत्री आता होऊ शकतात. त्यामुळे उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांचा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री करता येणं शक्य आहे, कारण तसा पायंडा पडला आहे.”

लाल रेष
लाल रेष

लाडकी बहीणसारख्या योजनांचा काय परिणाम होईल?

महायुतीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय आणि दिलेल्या सवलती. त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांच्या मतांचं समीकरण ठरेल. आता याकडे जनता कसं बघते आणि त्यावर किती मत मिळतील यावर निवडणुकीची गणितं अवलंबून असणार आहेत.

याबाबत बोलताना संदीप प्रधान म्हणाले की, “या निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा महायुती कोणाचीही सत्ता आली तरी या सगळ्या योजना सुरू ठेवणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही, याची जाण प्रत्येकालाच आहे.

एकीकडे या सगळ्या योजना असताना तर दुसरीकडे राज्यात जे जातीय संघर्ष तीव्र झाले आहेत. ते ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी हे संघर्षसुद्धा या निवडणुकीतील मतदानात प्रभावशाली ठरणार आहेत.

"कारण मागास जाती किंवा आर्थिक प्रश्न असलेल्या जातींमध्ये प्रामुख्यानं हाच वर्ग आहे. त्यामुळे आर्थिक लाभ घेऊन त्यादृष्टीने ते मतदान करतात की आपल्या नेत्यांच्या दृष्टीनं मतदान करतात हे सुद्धा तपासावं लागणार आहे. कारण त्या-त्या समाजाचे नेते आपल्या लोकांवर प्रभाव टाकतीलच. त्यामुळे एखाद दुसरं अपवाद सोडलं तर या निवडणुकांत कोणी एक मोठ्या मार्जीनने निवडून येईल असे चित्र नसेल,” असं प्रधान यांना वाटतं.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

"महाविकास आघाडीत एकीकडे शरद पवारांचं मजबूत होणं दुसरीकडे काँग्रेसला हरियाणा निवडणुकांतून संदेश मिळणं, तिसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आजारपण याला शिवसेना भावनिक मुद्दा म्हणून तो वापरणार का? हा सगळा भागही येथे महत्त्वाचा आहे," असंही प्रधान म्हणाले.

संदीप प्रधान पुढे म्हणाले की, "महायुती ही सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळतो. त्या तुलनेत महाविकास आघाडीत तसा तणाव दिसून येत नाही. त्यांच्यातही अंतर्गत संघर्ष, असंतोष आहे तो कधीकधी दिसूनही येतो. पण त्यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे.

महायुतीमध्ये अनेक प्रभावशाली चेहरे आहेत, अनेक मतदारसंघात दोन-दोन मातब्बर नेते आहेत त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे."

याबाबत बोलताना दीपक पवार म्हणाले की, “महायुती ज्याप्रमाणे योजनांच्या नावाखाली पैसे देत आहे, या आर्थिक ताकदीला महाविकास आघाडी कशी पुढे जाईल हा ही एक कळीचा मुद्दा आहे.

लाडकी बहीणसारख्या योजना एकप्रकारे एक वित्तीय अराजकता निर्माण करणाऱ्या योजना आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या योजनेच्या नावाखाली पैसे दिले जात आहेत किंवा करण्याचं ठरतंय.

मात्र, पैशांच्या पलीकडे जाऊन महिलांसाठीच्या विविध कार्यशील योजना, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, सुरक्षितता, विकासात्मक योजनांसारखं नॅरेटिव्ह तयार करणंही महत्त्वाचं आहे. जनतेची मत वळवताना महाविकास आघाडीकडून त्याबाबत काहीतरी समांतर किंवा विश्वसनीय वाटेल असं काही तयार करण्याची गरज आहे.”

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असू शकतो?

याबाबत बोलताना संदीप प्रधान म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा कोणाच्या किती जागा निवडून येतात त्यावर ठरेल. असा कुठलाही चेहरा दिला जाऊ शकत नाही. कारण एखादा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी दिला आणि त्या पक्षाला तिसरं स्थान मिळालं, तर अशा परिस्थितीत मुख्यमंत्री झाला तरी सरकार अस्वस्थ राहील. त्यामुळे तशा पद्धतीची जोखीम ही महाविकास आघाडी किंवा महायुतीही घेईल असं मला वाटत नाही.” असंही प्रधान म्हणाले.

दरम्यान आज (15 ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे.

20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी काय कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)