सुकन्या समृद्धी योजना : मुलीच्या भविष्यासाठी असे मिळू शकतात 71 लाखपर्यंत रुपये

सुकन्या समृद्धी योजना

फोटो स्रोत, Getty Images

'मुलगी प्रकाशमय पणतीसारखी असते' असं म्हणत भारत सरकारनं 'सुकन्य समृद्धी योजना' आणली. ही लघु बचत योजना आहे. मुलींसाठीची ही विशेष योजना आहे.

मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा फायदा होईल, असा उद्देश या योजनेत व्यक्त करण्यात आला आहे.

कधीही न चुकवता खातेदारानं या योजनेत पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर 71 लाख रुपये मिळू शकतात. शिवाय मुदतीनंतर मिळणारी रक्कम करविरहित असेल.

योजनेचे फायदे काय आहेत?

मुलींबाबत समाजाची मानसिकता आजही बदलली नाहीय. ही मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून, केंद्र सरकारनं 2015 साली जानेवारीत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' धोरण आणलं.

केंद्र सरकारची 'सुकन्या समृद्धी योजना' याच धोरणाची भाग आहे.

मुलींचा आर्थिक भार आई-वडील किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये, अशा उद्देशानं ही योजना आणण्यात आलीय. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करूनच शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा या योजनेत विचार करण्यात आला आहे.

योजनेसाठी कोण पात्र ठरेल?

मुलीच्या जन्मानंतर पहिल्या 10 वर्षातच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणं बंधनकारक आहे. खातेदार भारताचा नागरिक असणंही आवश्यक असून खातं केवळ मुलीच्या नावानंच उघडलं जाऊ शकतं.

एकच पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या मुलीच्या नावे दोन खाती उघडू शकतात. काही अपवादात्मक प्रकरणांमध्येच अपवाद मान्य केले जातील.

सुकन्या समृद्धी योजना

या योजनेसाठी 250 रुपयांसह खातं उघडावं लागेल. त्यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत त्या खात्यात रक्कम जमा करता येईल.

खातं उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे कधीही न चुकता या खात्यात पैसे भरणं आवश्यक आहे. अकाऊंट उघडल्याच्या 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपेल आणि त्याचे पैसे खातेदाराला मिळतील.

उदाहरणार्थ -

  • जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.

सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल.

फायदे काय?

आयकर कायद्याच्या 80-C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आलीय.

या योजनेमुळे गरीब कुटुंबांसह निम्न मध्यमवर्गीय, मध्यम वर्गीय आणि इतर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्यांना फायदा होईल. ही लाँग टर्म स्कीम आहे. त्यामुळेच वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे. पर्यायानं परत मिळणारी रक्कमही वाढते.

मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येईल.

मुलीच्या वयाच्या 21 वर्षांपर्यंत तुमच्या डिपॉझिटवर व्याज जमा होत राहतं. शिवाय, त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा त्यात पैसे भरू शकता.

मुलीच्या 21 व्या वर्षांनंतरही जर यातले पैसे काढले नाही, तर त्या पैशांवरील व्याज नियोजित दरानं वाढतच जातो.

मुलीचे आई-वडील किंवा पालक इतर ठिकाणी स्थलांतरित झाले, तर तिथे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ट्रान्स्फर करता येतं.

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं?

तुमच्या घराच्या जवळील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडता येऊ शकतं. तेथील कर्मचाऱ्याच्या मदतीनं तुम्ही खाते उघडू शकता. खातं उघडण्याआधी तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवरून त्यासंबंधीचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.

अर्जातील सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक ती महत्वाची कागदपत्र त्याला जोडावी लागतील. ओळखपत्र बंधनकारक आहे. मुलीचा आधार कार्ड, जन्मदाखला पत्ता म्हणून वापरता येईल.

ही सर्व कागदपत्रं अर्जासोबत जोडल्यानंतर ते पोस्ट ऑफिसकडे सुपूर्द करा.

बँक

फोटो स्रोत, Getty Images

अर्जासोबत खाते उघडण्याची किमान रक्कम द्या. ही रक्कम, रोख, चेक किंवा ड्राफ्टच्या स्वरूपात देऊ शकता.

या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा देण्यात आलीय. पोस्ट ऑफिस, खासगी व सार्वजनिक बँकेत यासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे.

हे बचत खातं अधिकृत बँकेत उघडलं जाऊ शकतं. तसंच, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खातं ट्रान्स्फर करण्यासंबंधी फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईनही उपलब्ध आहेत.

अटी आणि नियम काय आहेत?

जर सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात किमान रक्कम 250 रुपये डिपॉझिट केली नाही, तर अकाऊंट 'डिफॉल्ट अकाऊंट' म्हणून ग्राह्य धरला जाईल. मात्र, हे अकाऊंट 250 रुपये भरून पुन्हा सुरू करता येईल. मात्र, त्यासोबत अधिकचे 50 रुपये भरावे लागतील.

जिच्या नावाने अकाऊंट आहे, त्या मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: अकाऊंट हाताळू शकते. 18 वर्षांनंतर अकाऊंट मुदतपूर्वी बंदही करता येऊ शकतं.

अत्यंत महत्वाचं आणि तातडीचं कारण असल्यास अकाऊंटमधून आधीही पैसे काढता येऊ शकतात. मात्र, यासाठी काही नेमकी कारणंच ग्राह्य धरली जातील.

मुदतपूर्व अकाऊंट तेव्हाच बंद करता येईल, जर गंभीर आजाराचं कारण असेल किंवा वैद्यकीय गंभीर कारण असेल.

लोकांकडून या योजनेला प्रतिसाद कसा आहे?

सुकन्या समृद्धी योजनेला लोकांचा प्रतिसाद चांगला दिसून येतोय. विशेषत: पोस्ट ऑफिसमार्फत या योजनाचा चांगला प्रचार आणि प्रसार केला जातोय.

हा प्रसार केवळ पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्यांपुरताच केला जात नाहीय, तर अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच यांच्या माध्यमातून सर्वत्र केला जातोय.

"अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आम्ही या योजनेचे फायदे लोकांना पटवून देत आहोत," असं हैदराबादमधील विभागीय पोस्ट मास्टर जनरल पी. विद्या सागर रेड्डी यांनी सांगितलं.

शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थिंनींच्या पालकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यास सांगितली जातेय. ग्रामसभेदरम्यान सरपंच आणि त्या भागातील पोस्ट मास्टर यांच्या मदतीने योजनेची माहिती गावांमध्ये पोहोचवली जातेय.

सुकन्या समृद्धी योजना

फोटो स्रोत, ARIJIT MONDAL

"गावांमध्ये गरीब कुटुंब आहेत, ज्यांना त्यांच्या मुलींना शिकवणं सुद्धा कठीण होऊन बसलंय. त्यात मुलींच्या लग्नाचा खर्च म्हणजे त्यांच्यावरील ताण वाढवणारा प्रकार झालाय. मुलगी शिकत असेल तर तिला उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं.

सुकन्या समृद्धी योजना नेमकी याच गोष्टींचा उल्लेख करत, त्यातून मार्ग काढण्याची योजना आहे," असं विद्या सागर रेड्डी सांगतात.

सुकन्या समृद्धी योजनेचे जानेवारी 2015 ते जानेवारी 2021 दरम्यान 33 हजार 507 खाते एकट्या तेलंगणात उघडले गेले.

मुलींना 'शिकवणारी' योजना

"मी सरकारी शिक्षक म्हणून मंचिरयाल जिल्ह्यातील जन्नराममध्ये काम करतो. मला दोन मुली आहेत. मोठी मुलगी पाचवीत शिकतेय. तिच्या नावे मी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडलं.

2015 साली पंतप्रधानांनी सुकन्या समृद्धी योजनेचं लॉन्चिंग केलं, तेव्हा मला वाटलं की, योजना माझ्या मुलींसाठी उपयुक्त आहे. यात कुठलाच कर नाहीय. व्याजाचा दरही चांगला आहे. मुलींच्या शिक्षणासाठीही चांगली योजना आहे," असं दाडी मल्लेश म्हणाले.

तर खम्मम ग्रामीण भागातील खासगी लेक्चरर ए. नरसिंहराव म्हणतात की, "मला दोन मुली आहेत. मोठी मुलगी तीन वर्षांची आहे. मी तिच्या नावानं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडलं. तिचं लग्न आणि शिक्षण यासाठी या योजनेची मदत होईल, असा विश्वास वाटतो."

या योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800 266 6868 या मोफत नंबरवर संपर्क करू शकता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)