कोरोना व्हायरस: शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदाराने या काळात पैसा लावावा का?

मुंबई शेअर मार्केट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

जगभरातले शेअरबाजार गेले काही दिवस घसरलेले आहेत. मुंबई शेअरबाजारात शुक्रवारी सकाळी ट्रेडिंगला सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. आज शेअर बाजाराचे व्यवहार 45 मिनिटांसाठी ठप्प करण्यात आले होते.

दुसरीकडे सेंसेक्समध्येही ट्रेडिंगच्या सुरुवातीला 3000पेक्षा जास्त पॉइंट्सची घसरणी झाली होती.

नेमकं काय घडतंय?

कोरोना व्हायरसचा उद्रेक जगभरातल्या 116 देशांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि याचा थेट परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर होतोय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

चीनमध्ये या उद्रेकाला सुरुवात झाल्यानंतर तिथे वुहान शहर, हुबेई प्रांतासह इतर काही प्रांतात प्रवासावर आणि कामकाजावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. परिणामी चीनमधून होणारी निर्यात घटली.

Presentational grey line
BBC
Presentational grey line

जगभरातल्या ज्या कंपन्या आपल्या कच्च्या वा तयार मालाच्या पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून होत्या, त्यांना याचा फटका बसला.

अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम?

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी सांगितलं, "या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधीच जागतिक अर्थव्यवस्था ही दोलायमानच होती. IMF, वर्ल्ड बँकसारख्या जागतिक संस्थांनी कमी विकास दरवाढीचे अंदाज व्यक्त केलेले होते. अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमधल्या ट्रेड वॉरमुळे अर्थव्यवस्था आणखीन गर्तेत जाण्याची शक्यता होतीच. त्यातच कोव्हिड -19मुळे ही पुढची वाट अधिक बिकट झालेली आहे."

"जागतिक अर्थव्यवस्थेत, विशेषतः उद्योग व्यवस्थेमध्ये चीनने त्यांचं महत्त्वं दाखवून दिलंय. कारण अनेक वस्तूंचे अनेक सुटे भाग हे चीनमध्ये बनतात. त्यामुळे जगात प्राबल्य असणारे अनेक हायटेक उद्योग चीनमधून होणाऱ्या पुरवठ्याशिवाय जगू शकत नाहीत. ग्लोबल व्हॅल्यू चेन्स म्हणजेच जागतिक मूल्य साखळीत व्यत्यय आलाय.

"स्मार्टफोन असो वा ऑटोमोबाईल आज कोणंतही फायनल प्रॉडक्ट जगात एका ठिकाणी बनत नाही. अनेक ठिकाणी त्यातले सुटे भाग बनतात आणि ते चीनमध्ये असेंबल होतात. त्यामुळे आज अर्थातच या सगळ्याचं अर्थशास्त्र बिघडलेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था चीनवर बऱ्यापैकी अवलंबून राहिल्याचे हे परिणाम आहेत."

भारतातल्या औषध उद्योगाला याचा मोठा फटका बसलाय कारण औषधं तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल - API (Active Pharmaceutical Ingredient) चीनमधून आयात केलं जातं.

शिवाय जगभरातल्या इटली, इराण, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका,युके, जपान, सिंगापूर, अशा अनेक देशांमध्ये या विषाणूचा मोठा संसर्ग झालाय आणि या देशांच्या अर्थव्यवस्थांवरही याचा परिणाम होणार आहे.

जगभरातलं उत्पादन क्षेत्र, निर्यात व्यवसाय, पर्यटन उद्योग यागळ्यावर याचा मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई शेअर मार्केट

फोटो स्रोत, Getty Images

अर्थव्यवस्थांवर परिणाम झाल्याने गुंतवणूकदार चिंतेत पडले आणि त्यांनी शेअरबाजारांतून आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी शेअर बाजार पडले.

भारतामध्येही संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतल्याने शेअर बाजार घसरला. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती, भारतामध्ये कोव्हिड -19मुळे झालेला पहिला मृत्यू ही कारणंही त्यामागे होतीच.

शुक्रवारी निफ्टीला लोअर सर्किट लागल्याने निफ्टीतलं ट्रेडिंग 45 मिनिटं बंद ठेवण्यात आलं.

पण त्यानंतर मात्र शेअर बाजारात पुन्हा तेजी पहायला मिळाली.

शुक्रवारचं ट्रेडिंग बंद होईपर्यंत मुंबई शेअरबाजाराने आपली घसरण भरून काढली.

जगभरातल्या शेअरबाजारांमध्ये एकमेकांमधल्या घसरणीचे पडसाद उमटत असतात. म्हणूनच मग दिवसाच्या सुरुवातीला आशियाई बाजारांत घसरण झाली असेल तर मग मुंबई शेअरबाजाराची सुरुवातही नरम होते.

आणि अमेरिकेत डाऊ जोन्स घसरला तर दुसऱ्या दिवशी जपानमध्ये ट्रेडिंग सुरू होताना त्याचा परिणाम पहायला मिळतो.

कच्चं तेल - शेअर बाजार आणि सोनं

या तीन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणूनच या तीनपैकी एकात जरी चढ-उतार झाले तरी त्याचा परिणाम इतर दोन गोष्टींवर होतो.

सध्या बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी.

ऑईल

फोटो स्रोत, Getty Images

उत्पादन कमी करावं का, यासाठी OPEC या तेल उत्पादन करणाऱ्या देशांच्या गटात असणाऱ्या आणि नसणाऱ्या अशा देशांत बोलणी झाली. पण एकमत झालं नाही.

परिणामी कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आणि 1991 म्हणजे गेल्या 29 वर्षांतल्या कमी भावावर आल्या.

कच्च्या तेलाच्या किंमती एका बॅरलसाठी 30 डॉलरपर्यंत आलेल्या आहेत.

साहजिकच याचा परिणाम जगभरातल्या तेल कंपन्यांच्या शेअर्सवर झाला आणि बाजार पडायला हातभार लागला.

एरवी गुंतवणूकदार आपले पैसे अशावेळी सोन्यात घालतात आणि सोनं महागतं.

पण गेले 2 दिवस सोन्याच्या किंमतीही भारतात कमी होतायत.

गेल्या दोन दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किंमती 2000 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावाने 10 ग्रॅमसाठी 45,000 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

पण शेअर्सप्रमाणेच सोन्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली.

सोनं - डॉलर - रुपया

भारतामध्ये आपण सोनं आयात करतो आणि यासाठी डॉलरमध्ये किंमत मोजली जाते.

म्हणूनच जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होतो, तेव्हा त्याचा परिणाम सोन्याच्या भावांवरही होतो.

शेअर बाजार

फोटो स्रोत, Getty Images

कारण अशावेळी एका डॉलरसाठी जास्त रुपये खर्च करावे लागतात आणि या परिस्थितीत सोन्यासाठी आपल्याला जास्त मूल्य मोजावं लागतं.

शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आहे रु.74.50

गेले काही दिवस रुपयाची घसरण होत असल्याने आणि सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत असल्याने सोन्याच्या भावांनी 45 हजारांची उच्चांकी पातळी गाठली होती.

याशिवाय ग्राहक सोनं खरेदी करतात तेव्हा त्यावर 12.5% आयात कर आणि 3% GST देखील द्यावा लागतो.

सामान्य गुंतवणूकदाराने काय करायचं?

शुक्रवारी मुंबई शेअरबाजार सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला.

पण त्याआधी सलग काही दिवस शेअरबाजारात घसरण सुरू आहे. दिग्गज कंपन्यांचे शेअर्स गेल्या दोन आठवड्यांत 15 ते 30 टक्क्यांनी घसरले होते.

गुंतवणूक सल्लागार अरूण लागू यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण असे उतार-चढाव मार्केटमध्ये होतच असतात. यापूर्वीही ते झालेले आहेत. सामान्य गुंतवणूकदाराने उलट शक्य असेल तर या काळात पैसा गुंतवावा. आपली क्षमता, धोका पत्करण्याची तयारी लक्षात घेऊन ही गुंतवणूक करावी. टिप्स आणि चर्चांवर विश्वास ठेवू नये. कोणाच्यातरी सांगण्यावरून गुंतवणूक करू नये. किमान 3 वर्ष गुंतवणूक कायम ठेवावी. कारण खाली गेलेलं मार्केट वर यायला वेळ लागतो.

"म्युच्युअल फंडचा मार्ग अशा वेळी सगळ्यात सुरक्षित. कारण इथे तज्ज्ञांची टीम आपल्यासाठी काम करते, अभ्यास करते. आपले पैसे इथे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये विचारपूर्वक गुंतवले जातात, ज्यामुळे एका इंडस्ट्रीतल्या कंपन्यांचे शेअर्स खाली गेले तरी त्याचा फार मोठा फटका बसत नाही. गुंतवणूक करताना ती एकाच माध्यमात करू नयेत. विविध पर्यायांमध्ये आपली गुंतवणूक विविध प्रमाणात असावी. म्हणजे एका गुंतवणूकीचं मूल्य कमी झालं किंवा फार परतावा त्यातून मिळाला नाही तरी त्यातून फार मोठं नुकसान होत नाही."

(गुंतवणुकीविषयी बीबीसी कुठलाही सल्ला देत नाही. स्वतःच्याच जोखिमेवरच गुंतवणूक करण्याचा अथवा न करण्याचा निर्णय घ्यावा.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)