कोरोना व्हायरस : MPSC ची पूर्व परीक्षा लांबणीवर

कोरोना व्हायरस

कोरोनो व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता महाराष्ट्र सरकारनं 'लॉकडाऊन'चा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी नियोजित होती. ही परीक्षा सुधारित पत्रकानुसार 26 एप्रिल 2020 रोजी होणार आहे.

या परीक्षेसोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 3 मे 2020 रोजी नियोजित होती. ही परीक्षा आता 10 मे रोजी घेतली जाईल.

तसंच, "कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना विचारात घेऊन, परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगानं आयोगाकडून वेळोवेळी फेर आढावा घेण्यात येईल," असंही महाराष्ट्र लोकसभेवा आयोगाच्या उपसचिवांनी सांगितलं आहे.

या परीक्षांच्या तारखांमध्ये आणखी कोणते बदल झाल्यास तसं आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलंय.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 74 वर

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 74 वर पोहोचलीय. आज (22 मार्च) दिवसभरात राज्यात रुग्णांच्या संख्यात 10 नं वाढ झाली. यापैकी पुण्यात 4, मुंबईत 4, तर नवी मुंबईत 1 असे नवीन रुग्ण आज दिवसभरात आढळले.

तर मुंबईतील एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेनं पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा राज्यातील आकडा आता दोनवर पोहोचला आहे.

पुण्यात जे चार नवीन रुग्ण आढळले, त्यांबाबत गंभीर माहिती समोर आलीय. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी 41 वर्षीय महिला करोना बाधित आढळली, तिचे चार जवळचे नातेवाईक आज करोना बाधित आढळून आले.

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण आढळले आहेत?

जनता कर्फ्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यू लागू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांनी संख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेनंही या आवाहानला प्रतिसाद दिला आहे.

नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांनर रविवारी सकाळी शुकशुकाट दिसून आला. तसंच पेट्रोल पंपावरही नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून आली.

नाशिक शहरातील पेट्रोलपंप

फोटो स्रोत, BBC/pravin thakare

फोटो कॅप्शन, नाशिक शहरातील पेट्रोलपंप

मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकावर नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसून आली. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींनी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हायची गरज नाही.

दादर रेल्वे स्टेशन, मुंबई

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, दादर रेल्वे स्टेशन, मुंबई

नागपूरमधील रस्त्यांवर कुणीही फिरताना दिसत नाहीये.

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER

21 मार्च शनिवार-

महाराष्ट्रात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 64वर पोहोचली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, शनिवारी राज्यातली कोरोना रुग्णांची संख्या 12ने वाढली. 12 पैकी 8 जण मुंबईचे तर 2 जण पुण्याचे आहेत. एक रुग्ण यवतमाळ तर एक कल्याणचा आहे.

मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांनी परदेश प्रवास केला आहे. एकजण विमानतळावरील कर्मचारी आहे तर एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे.

यवतमाळच्या मात्र मुंबईत भरती झालेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केला आहे. कल्याण इथला कोरोना बाधित रुग्ण, दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबईचा इतिहास असलेल्या उल्हासनगर इथल्या तरुणीचा भाऊ आहे. तो स्वत: बहिणीसोबत दुबईला गेला होता.

पुण्यातील 25 वर्षीय तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंडचा प्रवास केला आहे. दरम्यान परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली 41 वर्षांची पुण्यातील महिला कोरोना बाधित आढळली आहे. या रुग्णाच्या माध्यमातून कम्युनिटी ट्रान्समिशन झाले आहे का याचा तपास केला जात असल्याचं आरोग्य यंत्रणेनं स्पष्ट केलं.

कोरोना
लाईन

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने आजपासून महाराष्ट्रातील चार मोठी शहरं - मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर - अंशतः बंद केली आहेत.

मुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पण 31 मार्च पर्यंत राज्यातल्या या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे.

शिवाय, काम बंद राहिलं तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये, आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.

कोरोना रुग्णांचा रेल्वेतून प्रवास?

16 मार्चला मुंबईहून जबलपूरला जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या (गाडी नं. 11055) बी 1 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

ते मागच्या आठवड्यात दुबईहून भारतात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याची सूचना केली.

याव्यतिरिक्त होम क्वारंटाईनची सूचना देण्यात आलेले दोन संशयित रुग्ण बंगळुरू ते दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करताना आढळले होते. त्यांना तातडीने रेल्वेतून उतरवण्यात आलं. संपूर्ण कोचचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

तसंच 13 मार्च रोजी दिल्लीहून रामगुंडमला जाणाऱ्या एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेले एकूण 8 प्रवासी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

महत्त्वाचे अपडेट्स

  • राज्यात पहिली ते आठवीची परीक्षा रद्द, 9वी आणि 11वीचे उरलेल पेपर 15 एप्रिल नंतर होणार.
  • महाराष्ट्रात 1,036 जण आयसोलेशन वॉर्डमध्ये - 971 जण निगेटिव्ह, 5 रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर, 2 चिंताजनक
  • टेस्ट लॅबची संख्या 3 वरून 8 वर येत्या 4 दिवसांत एकूण 12 सुरू होणार.
  • दररोज 2400 सँपल दररोज टेस्ट होतील.
  • मुंबईतील दुकानं एक दिवसाआड उघडणार.
  • नागपूरमध्ये पुढील 3 दिवस सलून बंद राहणार.
  • राज्यातील शाळा-कॉलेज, मॉल्स, पब, महत्त्वाची पर्यटन आणि धार्मिक स्थळं 31 मार्चपर्यंत बंद.

20 मार्च, शुक्रवार

दुपारी 12 वा - राज्यात लॉकडाऊन

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर हे आजपासून अंशतः बंद असल्याने रस्त्यांवर वर्दळ थोड्याप्रमाणात कमी झाल्याचं दिसलं.

मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अशी नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसून आली.

हायवे

फोटो स्रोत, ANI

नागपुरातही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागपुरात आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत.

तुकाराम मुंढे शहरात पाहणी करताना

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे शहरात पाहणी करताना

सकाळी 11 वा - महाराष्ट्रात आता 63 पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11ने वाढून 63वर गेली आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. "यापैकी पुण्यात एक तर मुंबईत 10 नवीन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आढळली. यात परदेशातून आलेले 8 जण आहेत, तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे."

महत्त्वाचे मुद्दे-

  • क्वारंटाईनसाठी 7,000 पेक्षा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायझर आणि इतर सुविधांसाठी सगळ्या महापालिकांना निधी देण्यात आला आहे.
  • राज्य सरकारनं घेतलेल्या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी करा, असे निर्देश सगळ्या संस्थांना देण्यात आले आहेत. मानवतेचा चेहरा समोर ठेवून अंमलबजाणी करावी.
  • रेस्टॉरंट, बँक सुरू राहतील तसंच औषधांची दुकानं सुरू राहतील. 
  • कोरोना चाचणीसाठी राज्यात 7 ठिकाणी लॅब कार्यरत आहे.
  • राज्यातील कोरोनाबाधित 63 रुग्णांपैकी 12 ते 13 जणांना संसर्गातून कोरोनाची लागण, उर्वरित परदेशातून आलेले
Presentational grey line

19 मार्च, गुरुवार

मुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

31 मार्चपर्यंत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय घोषणा केली -

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवरची दुकानं आणि व्यावसायिक प्रतिष्ठानं एकदिवसाआड बंद ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे मुंबईतल्या महत्त्वांच्या रस्त्यांवरची गर्दी कमी करता येईल अशी आशा मुंबई महापालिकेनं व्यक्त केली आहे.

उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. तर मुंबईतल्या 22 वर्षीय तरुणीलाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही तरुणी युकेवरून प्रवास करून आली होती. अहमदनगरमधील 51 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संबंधित व्यक्ती दुबईहून प्रवास करुन आली होती.

महाराष्ट्रातले काही विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंगापूरमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आहेत.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-

  • राज्यातील कोरोनाग्रस्त पेशंट्सपैकी 2 व्हेंटिलेटरवर, उर्वरित जणांची प्रकृती स्थिर. अलगीकरण, सोशल डिस्टन्सिंग हा या आजारातील महत्त्वाचा विषय आहे. त्यादृष्टीनं आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
  • एका एसटी बसमध्ये 50 ऐवजी 25 प्रवासी असतील, असा निर्णय आम्ही घेतला आहे.
  • मंत्रालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केवळ खासगी कंपन्यांना आम्ही 'वर्क फ्रॉम होम'ची सूचना केली नाहीये. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही सूचना करत आहोत.
  • गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका नेहमीच जास्त असतो. त्यामुळेच मुंबईतल्या लोकांना आम्ही सांगतोय, की गर्दी कमी करा.
  • ट्रेन बंद करणं हा शेवटचा उपाय असेल, पण त्याच्या आधी लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी विचार होतोय.
  • बाधित देशांमधून येणाऱ्या लोकांना सक्तीनं होम क्वारंटाईन करण्याचा विचार.
  • राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 49. मुख्यतः बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक. म्हणूनच मी स्वतः एअरपोर्टला जाऊन कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
Presentational grey line

18 मार्च, बुधवार

पिंपरी चिंचवडमध्ये एका 21 वर्षीय तरुणाला, मुंबईतील एका महिलेला आणि रत्नागिरीमधील 50 वर्षिय व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवडमधील व्यक्ती फिलिपाइन्स, सिंगापूर, श्रीलंका असा प्रवास करुन आली आहे. तर मुंबईतील महिला अमेरिकेतून आली आहे. रत्नागिरीचा रुग्ण दुबईतून आला आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत राज्यातील परिस्थितीविषयी माहिती दिली. राज्यात 8 नव्या ठिकाणी कोरोना व्हायरसची चाचणी करण्याची सोय होणार आहे. त्यातील 3 केंद्रे उद्यापासूनच सुरु होतील असं त्यांनी सांगितलं.

KEM (मुंबई), कस्तुरबा रुग्णालयात दुसरं युनिट (मुंबई), बीजे मेडिकल कॉलेज (पुणे) या 3 ठिकाणी 1-2 दिवसांत चाचणी सुरू होणार. हाफकिन इन्स्टिट्यूट (मुंबई), जेजे हॉस्पिटल (मुंबई), औरंगाबाद, धुळे, मिरज, सोलापूरमधल्या सरकारी दवाखान्यांत 10-15 दिवसांत सुरू होणार अशी माहिती टोपे यांनी दिली

Presentational grey line

सकाळी 11 वाजता - टोपेंची ऑनलाईन पत्रकार परिषद

National Institute of Virology (NIV)ला भेट देऊन तिथे काय काम सुरू आहे, नवीन लॅबच्या व्हॅलिडेशनचं काम कसं सुरू आहे, याचा आढावा घेणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनाने ते ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत आहेत. महत्त्वाचे मुद्दे -

  • टेस्टसाठी काही किट्स कमी पडत आहेत. केंद्र सरकारला विनंती करू की त्यांनी अतिरिक्त किट्स खरेदी करावेत.
  • जे कोणी लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत, त्यांच्यासोबत दुजाभाव करणं किंवा माणुसकीला धरून नसलेलं वर्तन करणं हे निषेधार्ह.
  • हा आजार बरा होणारा आहे. त्यामुळे असं भयभीत होण्याची गरज नाही. त्यांना आयसोलेशनमध्ये नीट राहता यावं.
  • सध्या राज्यात 800 रुग्णांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 42 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर.
  • सरकारी कार्यालयातही 50 टक्केच कर्मचारी काम करू शकतील का, याचा विचार आम्ही करत आहोत. कारण त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. वर्क अॅट होमला प्राधान्य देण्याची गरज. पण अत्यावश्यक सेवा आम्ही बंद करणार नाही.
X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

Presentational grey line

सकाळी 9 वाजता - पुण्यात आणखी एक पॉझिटिव्ह

फ्रान्स आणि नेदरलँडहून परतलेल्या एका व्यक्तीला पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या 18 झाली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याची माहिती दिली आहे. आता महाराष्ट्रातल्या एकूण रुग्णांची संख्या 42 झाली आहे. तर भारतातल्या एकूण रुग्णांची संख्या 130 वर गेली आहे.

17 मार्च, मंगळवार

मुंबईतल्या कॉर्पोरेट सेक्टरने वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. 100 टक्के सर्व कपन्यांनी हे मान्य केल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हे सांगितलं आहे.

बँका, औषध, मनोरंजन क्षेत्रातल्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करू देण्याचा पर्याय दिला आहे. परिणामी मंबईतली खासगी कार्यालयं आता काही काळासाठी बंद राहणार आहेत.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

मास्क, पीपीईचे किट, व्हेंटिलिटर, आयसोलेटेड वॉर्ड संदर्भात पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. कपड्यांची दुकानं, दागिन्यांची दुकानं असे नॉन इसेंशियल उद्योग बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्या म्हणजे असंघटीत क्षेत्राच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणार, असं टोपे यांनी सांगितलं आहे.

कोल्हापूर अंबाबाई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच जोतिबा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

Presentational grey line

MPSC पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी रद्द होत असल्या तरी 5 एप्रिल रोजी होणारी MPSCची पूर्व परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.

MPSC एक पत्रक प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे.

व

तसंच 31 मार्च नंतर गरज पडल्यास त्याचा फेरआढावा घेऊन परिक्षेच्या वेळपत्रकाबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Presentational grey line

महाराष्ट्रात पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.

मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात 64 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. देशातल्या बळींची संख्या आता 3 झाली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 38 झाला आहे.

मृत व्यक्ती दुबईहून परत आली होती. सुरुवातीला त्यांना कुठलाही त्रास नव्हता. मात्र दोन दिवसांनंतर त्यांची तब्येत बिघडली, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पण हा मृत्यू कोरोनामुळेच झाला आहे का हे स्पष्ट झालं नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुढचे पंधरा दिवस आपल्या राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्व गोष्टी जनतेच्या हितासाठी करतोय, त्यामुळं जनता स्वत:हून पुढे येऊन सहकार्य करेल, याची खात्री असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. लॉक डाऊन करण्याची वेळ सध्या तरी आली नसल्याचंही उद्धव यांनी म्हटलं.

धार्मिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्मांच्या धर्मगुरू, स्वामी, मंदिर, मशीद यांना केलं. राजकीय कार्यक्रम, जत्रा, मेळावे या सगळ्यांना पायबंद घातला पाहिजे, असंही उद्धव यांनी म्हटलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

एसटी, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना साफसफाईच्या सूचना दिल्या असल्याचं सांगून स्वच्छता कशी करावी, याचं एकच डिझाईन असावी, ती राज्य सरकारकडून एसटी आणि रेल्वेला दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बस आणि लोकल बंद करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

क्वारंटाईनमध्ये राहणं काही आनंददायी गोष्ट नाहीय. पण आपण खबरदारी म्हणून तसं करतोय. ज्यांना क्वारंटाईनमध्ये जायचं नसेल, ज्यांना घरातच राहायचं असेल, तर भान राखावं लागेल, असा सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेशही विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित परीक्षा विभागांना कळवण्यात आलंय.

केवळ दहावी आणि बारावीचे उरलेले पेपर घेतले जातील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

कोरोनासंदर्भात राज्य सरकारची आढावा बैठक सोमवारी (16 मार्च) पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सूचना निवडणूक आयोगाला करण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचं टोपे यांनी सांगितलं.

Presentational grey line

16 मार्च- संध्या. 7.40 - दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उद्यापासून बंद

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये वाढत असल्यानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 17 मार्च 2020पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तसेच परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात न येता ऑनलाइन दर्शन घ्यावे, असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

16 मार्च- 4 वाजून 55 मिनिटं

सिद्धिविनायकाचं दर्शन काही दिवसांसाठी बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत सिद्धीविनायकाचं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टमार्फत घेण्यात आला आहे. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली.

कोरोना

अर्थात, ट्रस्टच्या वैद्यकीय सेवा मात्र सुरू राहतील, असंही बांदेकर यांनी सांगितलं.

Presentational grey line

16 मार्च- 4 वाजता

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

  • दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका या तीन देशांमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल. याआधी सात देशांमधून आलेल्या प्रवाशांना केलं जात होतं. आता या तीन देशांचाही समावेश करण्यात आलाय.
  • परदेशातून आलेल्या प्रवाशांचं 'ए', 'बी' आणि 'सी' असं वर्गीकरण केलं जाईल. ए प्रकारात स्पष्ट लक्षणं असलेल्या प्रवाशांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जाईल. बी प्रकारात डायबेटिस आणि हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या वयोवृद्धांना 14 दिवसांचं क्वारंटाईन केलं जाईल. सी म्हणजे लक्षणं नसलेल्या तरुणांना होम क्वारंटाईन केलं जाईल.
  • हँडवॉश, लिक्विड सोप, सॅनिटायझर्स ठेवण्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात.
  • मंत्रालयात भेटीसाठी येणाऱ्यांना रोखण्यात आलंय.
  • एपिडेमिक डिसिज कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी मानवतेच्या दृष्टिकोनातून व्हायला हवे, असंही बजावलं आहे.
  • पुण्यात रुग्णांची संख्या जास्त असली, तरी वेगळी अशी सूचना नाही. पुणेकरांना काळजी घ्यावी, एवढेच सांगतो. कुठल्याही स्थितीत हात वारंवार धुत चला. तसं केलं नाही, तर त्यातूनच व्हायरस पसरतो.
  • रेल्वेवर कोरोना व्हायरसशी संबंधित जाहिरात जनजागृती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
  • लॉकडाऊन करण्याचा कुठलाच निर्णय नाही. मात्र, लोकांनी घरी थांबावं, अशी विनंती आम्ही करतोय. वर्क फ्रॉम होमची विनंतीही आम्ही केलीये.
  • महाराष्ट्र स्टेज-2 वर आहे. आपण संसर्ग थांबवला नाही, तर स्टेज-3 वर जाऊ शकतो. त्यातून मोठा स्पाईक येऊ शकतो. त्यामुळं आपण नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय.
Presentational grey line

16 मार्च- 3.35वाजता

अफवा पसरवण्यांवर कारवाई होईल- पुणे पोलीस

दरम्यान, कोरोनाच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक मेसेजही फिरत आहेत. यातील अनेक मेसेजना वस्तुस्थितीचा आधार नाहीये. त्यामुळेच असे मेसेज थांबविण्यासाठी पुणे पोलिसांनी पावलं उचलली आहेत.

कोरोना व्हायरस संदर्भात अशासकीय माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केलं आहे. अशापद्धतीचा एक गुन्हा कोरेगाव पार्कमध्ये दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिसवे यांनी दिली.

देशभरातील कोव्हिड-19च्या रुग्णांची संख्याही सध्या 107वर गेली असून, दोन जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ एकट्या महाराष्ट्रात सुमारे तीस टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत कलम 144 लागू करून अनावश्यक गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच राज्यातील सर्व शाळा-कॉलेज आणि मॉल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोव्हिड-19 तपासणी देशातल्या सगळ्या नागरिकांना मोफत करण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर नजर

"कोरोना व्हायरस संदर्भात कुणी चुकीचे मेसेज वाठवत असतील, तर त्याचा शोध पोलिसांमार्फत घेतला जाईल आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल," असे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

"मास्क आणि सॅनिटायझरची 25 ते 30% मागणी वाढली आहे. या प्रश्नावर उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात मास्क आणि सॅनिटायझर MRP नुसार विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर आयुक्तांना ह्यासंबंधी अधिकार दिले. त्यानुसार, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

मार्च 16 - राज्यात रुग्णांची संख्या 37 वर

राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 37वर गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

मुंबईत 3 आणि नवी मुंबईत 1 नवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकूण आकडा 37 वर गेला आहे.

Presentational grey line

मार्च 15 - पुण्यात रुग्णांची संख्या 15 वर

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, "कालच्या पत्रकार परिषदेनंतर 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता पुण्यात एकूण 15 पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. या 5 पैकी 4 रुग्ण विदेशात गेलेले नव्हते. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे."

"आतापर्यंत 294 रिपोर्टचे सॅम्पल घेण्यात आले होते. त्यापैकी 15 वगळता बाकी निगेटिव्ह आले असून अजून 21चे रिपोर्ट येणे बाकी आहे," असंही ते म्हणाले.

Presentational grey line

मार्च 15 - राज्यात 32 पॉझिटिव्ह रुग्ण

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 झाल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यापैकी 9 मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल आहेत, तसंच 80 संशयित तपासणीसाठी आले आहेत.

त्यांनी सांगितलेले मुद्दे -

  • कोव्हिड-19 चा प्रमुख गुणधर्म हा आहे की, त्यामध्ये इंफेक्शन होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यावर आपण भर द्यावा. त्यामुळे सिनेमागृह, जिम, मॉल, संग्रहायल बंद करण्यात आले आहेत.
  • एमपीएससी बोर्डाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी विनंती सरकारने केली आहे.
  • साथ प्रतिबंधात्मक कायदा 1897 महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.
  • या कायद्याच्या माध्यमांतून जिल्हाधिकाऱ्यांना/आयुक्तांना खालील अधिकार दिलेले आहेत
  • सरकारी किंवा खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येईल.
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अधिकृत केलेल्या ठिकाणीच चाचणी होईल.
  • विलगीकरणाची सूचना न पाळणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना प्राप्त आहेत.
  • कोव्हिड-19 या आजारासंबंधी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध किंवा कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचे अधिकार
  • एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक आढळून आल्यास तिथे निर्बंध घालण्यात येतील.
Presentational grey line

मार्च 15 - संध्या 5.30: MPSCच्या सर्व परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात याव्यात, अशी सूचना महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

शूटिंग बंद

फोटो

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व मालिका आणि चित्रपटांचं चित्रीकरण 19 ते 31 मार्चदरम्यान स्थगित करण्यात आलं आहे.

मुंबईत जमावबंदीचे आदेश

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत जमावबंदीसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

31 मार्चपर्यंत कोणत्याही स्वरूपाची सहल काढता येणार नाही.
फोटो कॅप्शन, 31 मार्चपर्यंत कोणत्याही स्वरूपाची सहल काढता येणार नाही.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 झाली आहे, तर देशात आकडा 107 आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

31 मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला.

31 मार्चपर्यंत कोणत्याही स्वरूपाची सहल काढता येणार नाही. खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सद्वारे कोणत्याही ठिकाणी जाण्यावर निर्बंध असेल. मुंबई दर्शनसह बिझनेस टूरही रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे

मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील जिम, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा, चित्रपटगृहं, नाट्यगृहं तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली होती.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना उद्धव ठाकरे यांनी या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं घेतलेल्या खबरदारींच्या उपायांची माहिती सभागृहाला दिली.

शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षांचं वेळापत्रक पुढं ढकलण्याबद्दल विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण आता सापडत आहेत. अशावेळी पुढचे काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्यानं परीक्षा आधी घेण्याऐवजी उशिरा घेतल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यानं बंद ठेवल्या जाणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नागपुरात दोन पॉझिटिव्ह

नागपूरमध्ये कोरोनाचे अजून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपूरमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.

नागपूर विधान सभा
Presentational grey line

14 मार्च - राज्य सरकारची तातडीची पावलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी काही तातडीची पावलं घेतली आहेत.

मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. शिंकताना किंवा खोकताना नाकावर रुमाल धरावा, कारण कोरोनाचा विषाणू त्या शिंतोड्यातून जात असतो. हात सातत्यानं स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं.

सर्व शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. दहावी, बारावी आणि विद्यापीठातील परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत.

राज्यातील शाळा, कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर मॉल्स पुढचे 15 दिवस बंद असतील, फक्त किराणा दुकान चालू राहतील.

IIT बाँबेमधील सगळे क्लास आणि सेंट्रल लायब्ररी 29 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच संबंधित प्राध्यापकांना विश्वासात घेऊन घरी जाण्याच्या सूचना IIT प्रशासनाने दिल्या आहेत.

Presentational grey line

14 मार्च - दु 3.30 वाजता: कोव्हिड-19 'अधिसूचित आपत्ती' जाहीर

भारत सरकारनं कोव्हिड-19च्या साथीला अधिसूचित आपत्ती जाहीर केलं आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना राज्य आपत्ती निवारण निधीतून विशेष मदत करण्यात येणार आहे.

यामध्ये, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारनं 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची राज्य सरकारनं निधार्रित केलेल्या पैशांमध्ये उपचार करण्यात येणार आहे.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाचा 'गुढीपाडवा मेळावा' रद्द केला आहे. त्यासंबंधीचं ट्वीट पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

त्यात लिहिलंय, "कोरोनाचं सावट गडद आहे, त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'गुढीपाडवा मेळावा' रद्द करत आहोत."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

"येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात," अशीही मागणी मनसेनं केलीये.

Presentational grey line

13 मार्च - कोरोनाच्या संशयितांचा हॉस्पिटलमधून पळ

कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांनी हॉस्पिटलमधून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पळ काढला.

पोलिसांनी तातडीनं शोध सुरू केला. चारही जण आपापल्या घरी आढळून आले. पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये परतण्याची विनंती केलीय.

मेयो रुग्णालयात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने या रुग्णांचा शोध सुरू केला.

हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कालच संध्याकाळी या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एकाची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. तर उर्वरित चौघांचे रिपोर्ट आज उपलब्ध होणार आहेत.

या चारपैकी तीन रुग्ण नागपुरातील आहेत तर एक रुग्ण चंद्रपूरचा आहे. या पाच संशयितांमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या घरी ही महिला काम करत होती. तर संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि सहकाऱ्याची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आल्याचे समजते. मात्र, या तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Presentational grey line

12 मार्च - राज्यात रुग्णांची संख्या

राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या 14 झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. या रुग्णांच्या नातेवाईक आणि निकटवर्तीयांचीही तपासणी केली जाईल, असंही टोपे यांनी म्हटलं होतं.

मात्र, आता नागपूर आणि पुण्यातील वाढलेल्या तीन रुग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 17 झाला आहे.

12 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवासी तपासण्यात आले आहेत.

Presentational grey line

11 मार्च 2020 : 'दुबईहून आलेल्या ग्रुपमुळे लागण'

1 तारखेला दुबईहून जो ग्रुप आला त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनाच कोरोनाच संसर्ग झाला आहे. त्यामुळे या सर्वांशी आम्ही संपर्क साधला आहे. 40 जणांच्या या ग्रुपमधील सर्वांनाच कोरोनाची लागण झालेली नाहीये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 11 मार्चला सांगितलं होतं.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे, घाबरून जायचं कारण नाही, पण दक्षता घ्यायची गरज आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शाळा-कॉलेजना सुट्टी द्यायची का, अशी मागणी होत आहे. पण त्यासंदर्भात अजून निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात आलं. दोन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंत (14 मार्च) संपविण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्री, प्रशासकीय अधिकारी हे मुंबईत आहेत. त्यांना आपापल्या मतदारसंघात किंवा विभागांमध्ये लवकरात लवकर रूजू होता यावं, यासाठी अधिवेशन आटोपशीर करून कामकाज संपविण्याची चर्चा आम्ही विरोधी पक्षनेत्यांसह केल्याचं उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी सांगितलं.

Presentational grey line

11 मार्च 2020 : मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह

मुंबईमध्येही दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतल्या दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणं सुरु होतं. या रुग्णांसोबतचे मुंबईतील दोन सहप्रवाशांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेनं या दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 वर गेला आहे.

नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. 45 वर्षांच्या अमेरिकेहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरेंनी ANI वृत्तसंस्थेला दिली.

Presentational grey line

11 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 1195 विमानांमधील 1,38, 968 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.

18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं आढळल्यानं राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण आजपर्यंत 349 जणांना भरती करण्यात आलं आहे. भरती झालेल्या 312 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली असून 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ नये म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालयं तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 4

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)