कोरोना व्हायरस: मुंबई, पुणे, नागपूर लॉकडाऊनचा महाराष्ट्राला आर्थिक फटका कसा बसेल?

गेटवे ऑफ इंडिया

फोटो स्रोत, ANI

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं शुक्रवारी मोठं पाऊल उचललं. मुंबई आणि महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड नागपूर ही मोठी शहरा येत्या 31 मार्चपर्यंत 'अंशत: लॉकडाऊन' करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला.

या शहरांमधल्या जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकानं आणि व्यापार बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र काम बंद ठेवण्यात आलं तरीही खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये, असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

हे चार भाग 'अंशत: लॉकडाऊन'

देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामीण भागातील शेती आणि शेतीपूरक उद्योगधंद्यांचा वाटा आहेच. मात्र निमशहरी आणि शहरी भागातील कारखाने, माहिती तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट कंपन्यांची भूमिकाही मोलाची मानली जाते.

कोरोना व्हायरसचे राज्यातील रुग्ण वाढू नयेत, यासाठी सरकारनं वेगानं पावलं उचलत मुंबई आणि महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील व्यापरी केंद्र, दुकानं बंद करण्याचे निर्देश दिले खरे. पण यामुळं आर्थिक भार वाढण्याची चिन्ह दिसतायत.

विशेषत: मुंबई, पुणे, नागपूरसारख्या 'इंडस्ट्रियल हब'मधील व्यापार ठप्प झाल्यास ही चिन्हं अधिक गडद होतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोना
लाईन

मात्र, व्यावसायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेल्या या शहरांमधील 'अंशत: लॉकडाऊन' राज्याच्या आर्थिक अंगावर किती परिणाम करेल, हा खरा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर बीबीसी मराठीनं महाराष्ट्रातील उद्योजक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, संबंधित क्षेत्रातील अभ्यासक यांच्याशी बातचित करून शोधण्याचा प्रयत्न केलाय.

ज्या भागांमध्ये राज्य सरकारनं 'अंशत: लॉकडाऊन' केलंय, त्या त्या क्षेत्रात कोणते उद्योग, व्यावसाय आहेत, याची माहिती घेऊया. त्यानंतर हे बंद केल्यानं उद्भवणारे आर्थिक प्रश्न यावर चर्चा करूया.

मुंबई आणि महानगर क्षेत्र (Mumbai Metropolitan Region - MMR)

महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्यावसायिक भूभाग म्हणून मुंबई आणि महानगर (MMR) क्षेत्राकडे पाहिलं जातं. या क्षेत्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर (काही भाग) आणि रायगड (काही भाग) असे पाच जिल्हे येतात. तसंच 9 महानगरपालिका आणि 9 नगरपालिका या भूभागात आहेत, त्यावरून MMRची व्याप्ती लक्षात येते.

भारतातील बहुतांश मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालयं मुंबईत आहेत. बँक, उत्पादक कंपन्या, सेवा क्षेत्र यांची मुख्यालयं मुंबई आणि परिसरात आहेत.

बँकिंग, माहिती तंत्रज्ञान (IT), प्लास्टिक, रबर, स्टील, औषधं, इंजिनिअरिंग, खते ही क्षेत्रं मुंबई आणि महानगर क्षेत्रात आढळतात. त्यातही आणखी केंद्रित सांगायचं झाल्यास, डोंबिवली, अंबरनाथ या परिसरात केमिकल कंपन्या, दक्षिण मुंबईत बँकिंग आणि कॉर्पोरेट हाऊसेस, मुंबई उपनगरात अंधेरी MIDC, ठाणे भागात कॉर्पोरेट हाऊस, नवी मुंबईत MIDCसह कारखाने दिसून येतात.

याबाबत आम्ही उद्योजक आणि आर्थिक विषयाचे जाणकार जयराज साळगावकर यांच्याशी बातचीत केली. त्यांनी मुंबई आणि उपनगरातील दोन भागांवर विशेष भर दिला, ते म्हणजे अंधेरीतील औद्योगिक वसाहत आणि धारावीतील लघुद्योग.

उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

या दोन्ही भागांबाबत साळगावकर म्हणतात, "अंधेरी आणि धारावी हे दोन भाग मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. 'अनऑफिशियल इंडस्ट्रियल हब' म्हणून धारावीकडं पाहता येईल आणि 'ऑफिशियल हब' म्हणून अंधेरीकडं पाहता येईल."

"अनेक लघुद्योग धारावीत आहेत. गॅरेजपासून अनके बारीक सारीक कामं, जी दैनंदिन गोष्टींशी निगडित आहेत. तर अंधेरीतला MIDCचा भाग आहेच. मात्र, IT, सिनेक्षेत्र, सिप्झ, मीडिया हाऊसेस, मल्टिनॅशनल कॉर्पोरेट ऑफिसेस इत्यादी या भागात आहेत. त्यामुळं हा भाग बंद पडल्यास मोठा आर्थिक फटका नक्कीच बसेल," असं साळगावकर सांगतात.

'ITमुळं कॉर्पोरेट जगताला फटका'

अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे, मात्र ऑफिसेस पूर्णतः बंद झाले तर त्याचा फटका नक्कीच बसेल, असं तज्ज्ञांना वाटतं.

महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांवरील महत्त्वाची पदं भूषवलेले आशिष पेडणेकर सांगतात की बहुतांश ऑफिसमध्ये लागणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्र पुरवतं. "त्यामुळे जर आयटी क्षेत्रच ठप्प होत असेल, तर बाकी सर्व उद्योगांना त्याचा फटका बसतो. मुंबईत नेमकं हेच पाहायला मिळतंय.

"IT क्षेत्रच ठप्प झाल्यानं मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस, बँकांची मुख्यालयं, उद्योगांची मुख्यालयं यांनाही फटका बसतोय, हे आपण विसरायला नको," असं पेडणेकर म्हणतात.

खरेदी करण्याचं वर्तुळ विस्कळीत होणार?

मुंबई जवळपास 300 वर्षे भारतातलं व्यापारी केंद्र आहे. व्यापार म्हटल्यावर आयात-निर्यात आलीच. त्याबाबत अर्थतज्ज्ञ अभय टिळक म्हणतात, "मुंबईत येणारा माल किंवा इथून बाहेर जाणारा माल सर्वच ठप्प पडेल. इथली उलाढाल थांबल्यास, यावर अवलंबून असलेला मोठा वर्ग काही काळासाठी का होईना बेरोजगार होईल. परिणाम खरेदी करण्याचं वर्तुळ विस्कळीत होईल. त्याचा अर्थातच थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल."

कॉर्पोरेट ऑफिस, मनोरंजन क्षेत्र याबाबत बोलत असताना अभय टिळक हे मुंबईतलं उद्योगक्षेत्रामुळं ग्रामीण भागाला कसा फटका बसेल, याचाही उल्लेख करतात.

टिळक म्हणतात, "मुंबई-पुण्याचा विचार केला असता, ही शहरं बाजारपेठा आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतमालावर इथं प्रक्रिया होते, किंवा शेतीपूरक उद्योग आहेत. तो बंद पडल्यास अर्थात ग्रामीण भागाला परिणाम होईल."

शेती

फोटो स्रोत, PTI

पुणे आणि पिंपरी चिंचवड

सेवा आणि उत्पादन क्षेत्रात गेल्या दशकभरात पुणे-पिंपरी-चिंचवडनं बाजी मारलीय. IT हब म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख राज्यात निर्माण झालीय तर इथलं ऑटोमोबाईल क्षेत्रही अत्यंत वेगानं विस्तारलंय.

पुण्यातील 7 उद्योग क्षेत्रांबाबत अर्थतज्ज्ञ अभय टिळक प्रामुख्यानं उल्लेख करतात. त्यात ऑटोमोबाईल, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स, IT, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, रेडीमेड गार्मेंट्स आणि अन्नपदार्थ या क्षेत्रांचा अभय टिळक समावेश करतात.

यातील अन्नपदार्थ हे जीवनावश्यक मानून जरी सुरू राहिलं, तरी बाकीच्या क्षेत्रांवर परिणाम दिसेलच, अशी भीती अभय टिळक वर्तवतात.

बऱ्याचदा सर्वत्र वरील सहा-सात क्षेत्रांबाबतच चर्चा होते. मात्र, त्याहीपुढे जाऊन अभय टिळक एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतात. ते म्हणतात, "पुण्यातील उद्योग क्षेत्राबाबत चर्चा करताना अनेकजण 'शिक्षण क्षेत्रा'ला विसरतात. शिक्षण क्षेत्रामुळं पुण्याच्या अर्थव्यवस्थेच्या वर्तुळात मोठी भर घातली जाते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
फोटो कॅप्शन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

"पुण्यात एकाचवेळेला अडीच ते तीन लाख मुलं इथं बाहेरून शिकायला येतात. शाळा, कॉलेज, मेस, वसतिगृह बंद, चहावाले, वृत्तपत्र विक्रेते, गॅरेज बंद असल्यानं ही अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहेत."

पिंपरी-चिंचवडमधील IT हब किंवा इतर कंपन्यांमुळं असंघटित कामगारांना मोठा फटका बसेल. हाच कामगार वर्ग खरेदी क्षमता असणारा असतो, त्यांचीच खरेदी क्षमता कमी झाली तर अर्थात अर्थवव्यवस्थेवर परिणाम जाणवेल, असं अभय टिळक सांगतात.

अभय टिळकांच्या या मुद्द्याबाबत आपण या बातमीच्या शेवटी चर्चा करणार आहोत.

नागपूरमधल्या उद्योगांवर काय परिणाम होईल?

गेल्या दशकभरात नागपूरचीही ओळख मध्य भारतातील एक प्रमुख 'इंडस्ट्रियल हब' म्हणून तयार झाली आहे. अगदी ब्रिटिशकाळापासून खनिजं, वन संपत्ती लाभलेल्या नागपुरात आता अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग तसंच माहिती तंत्रज्ञान विकसित होत आहे.

आणि सर्वांत महत्त्वाचा उद्योग म्हणजे शेती आधारित उद्योग नागपुरात आहे. 'संत्रानगरी' ही बिरुदावली मिरवणाऱ्या नागपुरात संत्र प्रक्रिया उद्योग आणि संत्र्याची परदेशात निर्यात हा गेल्या तीन वर्षांपासून वाढणारा उद्योग मानला गेलाय.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत नागपूरच्या उद्योगांचा वाटा फार मोठा नसला, तरी इथलं उद्योगक्षेत्र वेगानं वाढतंय. त्यामुळं नागपूरच्या उद्योगक्षेत्रावरील परिणाम महत्त्वाचे ठरतात.

नागपूरच्या मेयो रुग्णालयात आतापर्यंत चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
फोटो कॅप्शन, नागपूरच्या मेयो रुग्णालयात आतापर्यंत चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

लोकमत नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर सांगतात की "प्रगत प्रदेशात ज्यावेळी कोरोना व्हायरस किंवा तत्सम संकटं येतात, त्यावेळी ते प्रदेश काही प्रमाणत सहन करतात. मात्र, नागपूरसारखा प्रगती करत असलेला प्रदेश ज्यावेळी अशा संकटाला सामोरं जातो, त्यावेळी नुकसानाची शक्यता अनेक पटीनं वाढते. तेच आता नागपुरात जाणवतंय."

पर्यटन, IT इंडस्ट्री, मिहानमधील कारखान्यांना मोठी झळ बसेल. शिवाय, याचे दूरगामी परिणामही होतील, असं नागपुरातील जाणकारांना वाटतं.

मात्र, कोरोना व्हायरसचं संकट हे मानवनिर्मित नाहीय. ते संपूर्ण जगावर आलंय. मानवी जीव वाचावेत, याला प्राधान्य देणं आवश्यकच आहे. त्यामुळं आर्थिक संकट सोसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, असंही अनेकांचं मत आहे.

'उद्योगाची घडी विस्कटतेय'

कोरोना व्हायरसमुळे आस्थापनं बंद झाल्यास सर्वाधिक फटका कुठल्या क्षेत्राला बसेल, याबाबत अधिक विस्तृतपणे बोलताना गजानन जानभोर सांगतात, "चंद्रपुरात सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्र, भंडाऱ्यात ऊर्जा, नागपुरात आयटी उद्योग यांच्यावर परिणाम दिसून येतील. शिवाय, लघुद्योगांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. कोरोनामुळं हे लघुद्योग एकदमच ठप्प झालेत. एकूणच उद्योगाची घडी विस्कटत चाललीय."

मुंबई-पुण्याच्या तुलनेत नागपूरचं औद्योगिक क्षेत्र जास्त नाही, हे गृहित धरलं तरी नागपूर हे वेगानं प्रगती करणारं शहर मानलं जातं. जानभोर सांगतात, "नागपुरात उद्योगवाढीला आता कुठं सुरुवात झाली होती. त्यातच नेमकं कोरोना व्हायरसचं संकट आल्यानं, अनेक उद्योगानं सुरुवातीलाच अडथळा निर्माण झालाय.

"नवीन प्रकल्प अडचणीत येतील, येऊ घातलेले प्रकल्प लांबणीवर जातील, त्यामुळं प्रकल्पांचा खर्च वाढेल. त्यामुळं औद्योगिक क्षेत्राला निश्चितच फटका बसेल," असं जानभोर म्हणतात.

संत्रा

फोटो स्रोत, Getty Images

नागपूरला 'संत्रानगरी' म्हणतात. संत्र आणि संत्रआधारित प्रक्रिया उद्योग इथं मोठ्या प्रमाणात आहे. या अनुषंगानं जानभोर म्हणतात, "गेल्या तीन-एक वर्षांपासून संत्र निर्यातीचं प्रमाण वाढलं होतं. यातून चांगला पैसा उभा राहत होतो, रोजगार निर्माण होत होता. मात्र, तीनच वर्षात हे संकट आलंय. त्याचे परिणाम आता हे सर्व निवळल्यावरच लक्षात येतील."

एवढंच नव्हे तर, नागपूर-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सनं पत्रक काढून जीवनावश्यक सेवा वगळून इतर आस्थापनं बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला समर्थन दिलंय आणि तसं पत्रकही जारी केलंय. कोरोनाशी लढण्यासाठी आस्थापनं स्वत:हून पुढे येत असल्या तरी, जानभोर यांनी मांडलेली आर्थिक आव्हानं निश्चितच महत्त्वाची आहेत.

असंघटित क्षेत्राला सर्वांत मोठा फटका - अभय टिळक

उद्योगक्षेत्रासोबतच अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांच्याशी चर्चेदरम्यान अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर आला. तो म्हणजे, 'असंघटित क्षेत्राचं काय?'

बहुतांश असंघटित क्षेत्र हा मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये एकवटलेला आहे. भाजीवाल्यापासून मोठ्या उद्योगांना बारीक-सारीक गोष्टी पुरवण्यापर्यंत हा वर्ग काम करतो.

या असंघटित क्षेत्राबाबत अभय टिळक अधिक विस्तारानं मांडणी करतात. ते म्हणतात, नोटाबंदीतून सावरतोय न सावरतोय, तोच पुन्हा आता हे कोरोना व्हायरसमुळं फटका बसलाय.

"मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेले जे पूरक उद्योग आहेत, त्यामध्ये हा असंघटित कामगार आहे. डबेवाले, कँटिन, स्वच्छता करणार इत्यादी कामं हा कामगार करतो. यातही सर्वात मोठा वर्ग हा वाहतूक क्षेत्रात आहे. हे सर्व उद्योगाशी संबंधितच आहेत," असं अभय टिळक म्हणतात.

अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'ची संकल्पना प्रत्यक्षात आणलीय. मात्र, जाणकार अंदाज वर्तवतात त्याप्रमाणं, कोरोना व्हायरसचं संकट टळल्यानंतर या क्षेत्रातल्या म्हणजे कंपन्यांमधील संघटित क्षेत्राला जर नुकसान झाला असेल, तर सरकारकडून भरपाई मिळेलही. पण असंघटित क्षेत्राचं काय, हा प्रश्न उरतोच.

उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत अभय टिळक म्हणतात, असंघटित क्षेत्राला तात्पुरता फटका बसेल, त्यांना थेट रक्कम द्यावी लागील, अन्यथा खरेदी करण्याचं वर्तुळ पूर्णपणे विस्कळीत होईल.

कोरोना व्हायरसमुळं उद्योग आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत सारांशात्मक बोलताना अभय टिळक गंभीर समस्येकडे लक्ष वेधतात.

"कोरोनामुळं उत्पन्नाचं वर्तुळ बंद विस्कळीत होण्याची सर्वाधिक भीती आहे. आस्थापनं बंद असल्यानं मागणी कमी होईल, मागणी नसल्यानं पुरवठा कमी होईल, पुरवठा नसल्यानं उत्पादन क्षमता रोडवेल. परिणामी त्यामुळं गुंतवणूक होणार नाही. हे दुष्टचक्र संपायला हवं. अन्यथा, येत्या काळात अर्थव्यवस्थेला मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागेल," असं अभय टिळक म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)