कोरोना व्हायरस : उद्धव ठाकरे का म्हणाले की महाराष्ट्रासाठी पुढचे 15-20 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत?

देशातला तिसरा बळी मुंबईत गेल्यामुळे राज्य सरकारवरचा दबाव वाढत आहे.

फोटो स्रोत, Twitter / CMOMaharashtra

फोटो कॅप्शन, देशातला तिसरा बळी मुंबईत गेल्यामुळे राज्य सरकारवरचा दबाव वाढत आहे.

"पुढचे 15-20 दिवस हे आपल्यासाठी फार कसोटीचे आहेत. अनावश्यक ठिकाणी जाणं टाळा, संपर्क टाळा, गर्दी टाळा. स्वतःहून आपण जितकी ही बंधनं पाळू, तितक्या लवकरात लवकर आपण या संकटातून बाहेर पडू."

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वाक्य उच्चारलं.

कोव्हिड-19च्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत, तेसुद्धा मुंबई ते नागपूर म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात. त्यातच मंगळवारी कोरोना व्हायरसचा देशातला तिसरा बळी मुंबईत गेल्यामुळे राज्य सरकारवरचा दबाव वाढत आहे.

त्यामुळेच सध्या राज्यातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स, प्रमुख पर्यटनस्थळं बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेतच. शिवाय सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवा, गर्दी टाळा, असं आवाहनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी केलं. "धोक्याची वेळ जरी आली नसली, घाबरून जाण्याची वेळ जरी आली नसली तरी काळजी घेण्याची वेळ नक्कीच आली आहे," असं ते म्हणाले.

हे सर्व निर्बंध 15 दिवसांसाठी, म्हणजेच 31 मार्चपर्यंत लादण्यात आले आहेत. त्यामुळेच पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पण नेमकं का? 15 दिवसांमध्ये असं काय होईल?

कोरोना
लाईन

आकड्यांचा स्फोट

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 आजाराची लक्षणं शरीरात दिसायलाही पाच दिवस लागतात, असं आतापर्यंतच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात हा व्हायरस असेलही, तरी तुम्हाला ते कळण्याच्या आत तुम्ही तो इतरांमध्ये पसरवण्याचं काम करत राहाण्याची जास्त शक्यता आहे.

त्यामुळेच डिसेंबरच्या मध्यात चीनमधल्या वुहानमध्ये जेव्हा कोरोना व्हायरस प्रथम आढळला, तेव्हा तो रोग म्हणजे न्युमोनिया नसून काहीतरी वेगळाच आहे आणि त्यावर उपचार नाही, हे कळेपर्यंत तो अनेकांना झालासुद्धा होता. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर आधी चीन आणि मग जगाची झोप उडाली.

आणि हे फक्त चीनमध्येच नाही तर दक्षिण कोरिया, इराण आणि इटलीमध्येही असंच झालं. आधीच कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह लोकांना याची माहिती नसल्यामुळे त्यांच्या खोकल्यातून, शिंकण्यातून हा रोग इतरांमध्ये पसरत गेला, आणि त्यांच्यापासून पुढे. या आकडेवारीकडे पाहिलं तर या गुणाकाराचा अंदाज येतो -

आलेखरूपात पाहिलं तर हा गुणाकार अधिक स्पष्ट होतो -

इटली, इराण, दक्षिण कोरियात रुग्णांचा असा स्फोट झाला
फोटो कॅप्शन, इटली, इराण, दक्षिण कोरियात रुग्णांचा असा स्फोट झाला

हा रुग्णांचा गुणाकार सतत होत राहिल्यामुळे अचानक आकड्यांचा मोठा स्फोट झाला. भारताची आकडेवारी पाहिली तर तिथेही अशीच सातत्याने वाढ झाली आहे. आणि हे फक्त लक्षणं स्पष्ट होऊन पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे आकडे आहेत.

कोरोना

एक नजर या पिरॅमिडवर टाकली तर कळेल की ज्यांच्यात आजाराची सौम्य लक्षणं दिसत आहेत, अशा लोकांची तपासणी आणि शहानिशा करणंही सर्वांत अवघड आहे. त्यामुळे जी खात्रीलायक आकडेवारी आपल्याकडे आज आहे, तीसुद्धा खऱ्या रुग्णांच्या संख्येच्या फार कमी असल्याचं तज्ज्ञ मानतात.

एका ताज्या अहवालानुसार भारतात दर दहा लाखांपैकी फक्त 6-7 रुग्णांची तपासणी होते आहे. हेच प्रमाण दक्षिण कोरियात सुमारे 4,831 आहे तर अमेरिकेत 42 प्रति दशलक्ष. त्यामुळे देशांच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी असल्याने या आकड्याचासुद्धा कधीही स्फोट होऊ शकतो, अशी तज्ज्ञांना भीती आहे.

पुढचे पंधरा दिवस पाळले नाही तर काय होईल?

इतर देशांमध्ये जे झालं, तेच भारतात होऊ शकतं. स्पष्ट लक्षणं असलेले अधिकाधिक पॉझिटिव्ह रुग्ण दवाखान्यांमध्ये भरती होत गेले, त्यामुळे अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवर, डॉक्टरांवरही ताण येत गेला. त्यातच या आजारावरील रामबाण इलाज अजूनही सापडला नसल्यामुळे रोगींना शक्य तो उपचार देऊन आयसोलेशन वॉर्ड म्हणजेच विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आलं, जेणेकरून त्यांच्यातून हा व्हायरस आणखी बाहेर पसरू नये.

मात्र अचानक एवढे रुग्ण आले तर त्यासाठी पुरेशी व्यवस्था करणं सर्वांना शक्य नव्हतं. चीनने जसं वुहानमध्ये दहा दिवसांत 1000 खाटांचं रुग्णालय उभारलं, तशी कार्यक्षमता प्रत्येकाकडे नसल्याने लोकांना क्वारंटाईन करणं, हे मोठं आव्हान उभं राहू लागलं. त्यासाठी राज्य सरकार खासगी रुग्णालय आणि अगदी हॉटेल्समधल्या रूमही भाड्याने घेण्याची व्यवस्था करत आहेत.

एवढ्या रुग्णांवर एकत्र उपचार शक्य नसल्याने, तसंच याचा प्रसार रोखण्याच्या दृष्टिकोनाने जगभरातल्या सर्व सरकारांनी आपापल्या आंतरराष्ट्रीय सीमा तर बंद केल्या आहेतच. शिवाय त्यांनी लोकांवरही संचारबंदी लादली आहे. म्हणजे लोकांनी कुठेही जाऊ नये, आणि स्वतःला किमान 14 दिवस बंदिस्त करून ठेवावं.

सोशल मीडियावर यासाठी social distancing असा शब्द प्रचलित होतो आहे. हेच ट्वीट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांही काही दिवसांपूर्वी मोठ्ठ्या अक्षरात केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कारण एकही रुग्ण जो पॉझिटिव्ह असेल, पण त्याला तपासणं शक्य झालं नसेल, तो जर बाहेर पडला तर त्याच्या जो जो संपर्कात आला असेल, तो एक नवा पेशंट म्हणून तयार होईल. आणि त्या नव्या पेशंटपासून आणखी नवे रुग्ण तयार होतील. त्यामुळे दवाखान्यांवरचा ताण आणखी वाढेल.

म्हणूनच गेल्या महिन्याभरात अख्खं चीन अक्षरशः बंद पडलंय. लोकांना स्वतःची संपूर्ण सोय करून घरांमध्येच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेच आदेश युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही दिले आहेत आणि तीच आदेशवजा विनंती आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत - घरांमध्येच राहा, अनावश्यक प्रवास आणि बाहेरील संपर्क टाळा.

#FlattentheCurve

जर तुम्ही फेसबुक अथवा ट्विटरवर अॅक्टिव्ह असाल तर हा #FlattentheCurve हॅशटॅग तुम्ही पाहिला असेल. जगभरातले तज्ज्ञ म्हणतायत की सध्या तरी शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवरील औषध शोधण्यात व्यस्त असताना, इतरांनी म्हणजे जगातल्या सर्वांनी social distancing करावं.

यामुळे लोक एकमेकांपासून दूर राहिले तर रोग प्रसाराची गती कमी होईल आणि त्यामुळे रुग्णांचा आकडा फुगण्याची शक्यता कमी कमी होत जाईल. यामुळे रुग्णालयांवरचा ताण अचानक न येता तो जास्त काळासाठी पसरत जाईल.

या आलेखात पाहिलं तर कळेल की कोरोना व्हायरसचा प्रसार आरोग्य व्यवस्थेवर ताण आणून मृतांचा आकडा वाढवू शकतो. मात्र जर तुम्ही आजारी असताना आज घरातच बसलात, गर्दीत कुठेही न जाता, कुणाच्या थेट आणि जास्त काळ संपर्कात न राहिलात तर या रोगाचा प्रसार होण्याची गती मंदावू शकते.

Flatten the curve

फोटो स्रोत, Twitter / @CT_Bergstrom

फोटो कॅप्शन, Flatten the curve

या दोन रेषांमधली तुलना केली तर social distancingमुळे शक्य आहे की पहिल्या रेषेला असं दाबून जरा सपाट करण्याचा प्रयत्न करता येईल. यासाठीच सध्या #FlattentheCurve हॅशटॅग वापरला जातो आहे.

मग मी काय करावं?

Self isolation, म्हणजेच स्वतःला इतरांपासून जास्तीत जास्त वेगळं आणि अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 14 दिवस घरातच राहा, तेही. म्हणूनच महाराष्ट्रात तसंच इतर काही राज्यांमध्ये सध्या सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स, जिम बंद ठेवण्याचे आदेश 31 मार्च पर्यंतचे आहेत.

1. जर घरात एकटेच राहात असाल तर उत्तम, पण जर कुणाबरोबर राहणार असाल तर खात्री करून घ्या की ते आजारी नाहीत, किंवा त्यांच्यात कुठली आजारपणाची लक्षणं नाहीत. दारं-खिडक्या उघडी ठेवा.

2. तुम्हाला जर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याजवळ राहण्याची गरज असेल तर स्वतःचीसुद्धा काळजी घ्या. मास्क, हँड सॅनिटायझर सतत वापरत राहा, आणि घर स्वच्छ ठेवा. घरातल्या डस्टबिनवर झाकणं लावा.

3. कपडे नियमितपणे धुवून वापरा. हस्तांदोलन किंवा मिठी मारणं टाळा, शारीरिक संपर्क कमीत कमी असायला हवा.

इटलीतले डॉक्टर

फोटो स्रोत, Getty Images

4. जर सहवासातील कुणी आजारी असेल तर त्यांचे टॉवेल, कंगवा इत्यादी वैयक्तिक उपयोगाचं सामान वापरू नका. बाथरूम वेगळं करणं शक्य नसेल तर त्यांच्या वापरानंतर ते स्वच्छ करून मग वापरा.

5. अनावश्यक प्रवास टाळा. अशा ठिकाणी जाणंच टाळा जिथे जास्त लोक असतील, म्हणूनच सरकारने मॉल्स, पब-रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. होम डिलेव्हरीचा पर्याय जिथे उपलब्ध असेल तिथे निवडा.

6. शक्य असेल तर छोट्या दुकानांमधून अत्यावश्यक सामान खरेदी करा, जिथे जास्त गर्दी टाळता येईल. रांगांमध्ये उभे असाल तर इतरांपासून एक मीटरचं सुरक्षित अंतर ठेवा.

7. वर्क फ्रॉम होमचा पर्याय असेल तर नक्की तो स्वीकारा. जर नसेल शक्य तर कामकाजाच्या अशा वेळा आखून घ्या की सर्वांना सर्वच दिवस ऑफिसला जाण्याची गरज असणार नाही. कामाचे दिवस किंवा शिफ्ट वाटून घ्या जेणेकरून लोकांचा संपर्क कमीत कमी होईल.

हे नक्की वाचा -

हे नक्की पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)