कोरोना व्हायरस : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात कोरोना व्हायरसची लागण कशी रोखणार?
काल-परवा पर्यंत चीन, पूर्व आशिया, इटलीमध्ये पसरलेल्या कोरानाव्हायरसच्या साथीचा धोका आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. सोमवारी पुण्यात कोरोनाव्हायरसची लागण झालेले राज्यातले पहिले रुग्ण आढळून आले. त्यानंतर मुंबईतही 2 जणांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
तेव्हापासून सर्वसामान्यांमध्ये विशेषतः लोकल ट्रेन आणि बसनं रोजचा प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण मुंबईसारख्या शहरात प्रवास टाळणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. मुंबईत रोज सत्तर लाखांहून अधिक लोक रेल्वेनं प्रवास करतात. गर्दीनं भरलेल्या ट्रेन्समधून विषाणूंचा प्रसारही अधिक वेगानं होण्याची भीती असते.

फोटो स्रोत, Getty Images
त्या पार्श्वभूमीवर शहरातील रेल्वे आणि बससेवा या विषाणूचा सामना करण्यासाठी काय तयारी करते आहे, आणि त्याविषयी लोक समाधानी आहेत का, हे आम्ही जाणून घेतलं.
लोकल ट्रेन्समध्ये कोरोना विषाणूला कसं रोखणार?
रेल्वे मंत्रालयानं लोकांमध्ये कोरोना व्हायरसविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत.
"आम्ही प्रत्येक स्टेशन आणि ट्रेनमध्ये उद्घोषणा करतो आहोत. कोरोना व्हायरसविषयीची माहिती आणि तो रोखण्यासाठी कशी काळजी घ्यायची, हे सांगणारी पोस्टर्स आम्ही सगळीकडे लावली आहेत. रेल्वे बोर्ड आणि आरोग्य मंत्रालयाकडून आलेले माहितीपर व्हीडिओ आम्ही जिथे शक्य होईल तिथे प्रसारीत करत आहोत," अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रेल्वे प्रशासन सतत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्व स्टेशन मास्तरांना त्या त्या विभागातील रुग्णालयं आणि वैद्यकीय सुविधांची माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
"ट्रेनमधून प्रवास करताना कुणाला अस्वस्थ वाटत असेल, आणि ते आमच्या निदर्शनास आलं किंवा कुणी निदर्शनास आणून दिलं तर ती ट्रेन एखाद्या स्टेशनवर आल्यावर पुढची पावलं उचलली जातील. तिथला स्टेशन मास्तर त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करेल."
रेल्वेच्या रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसवर उपचारांचं ट्रेनिंग दिलं जात असून तिथं विलगीकरण कक्ष तयार केले जातायत. पश्चिम रेल्वेनंही अशाच स्वरुपाच्या उपाययोजना केल्या असल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
'बेस्ट' प्रशासन कशी तयारी करत आहे?
रेल्वेप्रमाणेच मुंबईत बससेवा पुरवणाऱ्या 'बेस्ट' (BEST) प्रशासनानंही लोकांना माहिती देण्यासाठी पावलं उचलली आहेत. बसेसमध्ये आणि ठिकठिकाणच्या बसस्टॉप्सवर MCGM आणि WHOनं दिलेल्या सूचना लावण्यात आल्याचं 'बेस्ट'च्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"बसमध्ये कुणी आजारी पडल्यास, एरवीही आमचे चालक-वाहक अम्ब्युलन्स बोलावतात किंवा पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेतात. आमच्या प्रत्येक डेपोमध्ये दवाखाने आहेत, जिथे कर्मचाऱ्यांपैकी कुणी आजारी पडलं तर मदतीसाठी जाऊ शकतं."
पण रेल्वे आणि बेस्ट प्रशासनानं घेतलेली ही पावलं पुरेशी आहेत का? त्याविषयी प्रवाशांना काय वाटतं?
'प्रवास टाळून कसं चालेल?'
गिरीश गुरव मुंबईजवळ बदलापूरला राहतात आणि रोज मुंबई सेंट्रलपर्यंत प्रवास करतात. आजच्या प्रवासात तरी आपण कुठली माहिती देणारी उद्घोषणा ऐकली नसल्याचं ते सांगतात."आम्हाला कुठली घोषणा किंवा पोस्टर दिसले नाहीत. प्रवासाच्या गडबडीत दुर्लक्ष झालं असेल."
तर रेल्वे प्रवासी संघाच्या रेखा होडगे यांना कोरोना व्हायरसनं रोजच्या जीवघेण्या प्रवासातला धोका आणखी वाढवला आहे असं वाटतं. त्या डोंबिवलीहून घाटकोपरपर्यंत आणि पुढे मेट्रोनं नियमित प्रवास करतात. रेल्वेनं स्वच्छतेवर भर द्यायला हवा असं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
"मेट्रोमध्ये लोकल ट्रेनसारखीच गर्दी असते, पण तिथे जास्त स्वच्छता असते आणि बरेच लोक मास्क वापरताना दिसतात. लोकलमधून प्रवास करतानाही सर्व प्रवाशांना मास्क अनिवार्य करायला हवा. पुढे जाऊन विषाणूंची साथ पसरली तर रेल्वे डब्यांत किंवा तिकिट खिडकीजवळ सॅनिटायझर, मास्क पुरवणं वगैरे एवढं तर रेल्वे करू शकते."
अनिता म्हात्रे नवी मुंबईहून कुलाब्यापर्यंतचा प्रवास मध्य रेल्वे आणि बेस्ट बसनं करतात. त्या सांगतात, "ट्रेननं प्रवास टाळता येत नाही, खासगी वाहनांनी प्रवास परवडणारा नाही. रेल्वे स्टेशनवर थर्मल स्कॅनर सिस्टिम बसवून त्यातूनच जाणं लोकांना अनिवार्य करता येईल. पण तेही किती विश्वासर्ह ठरेल असा प्रश्न पडतो. मुंबईसारख्या शहरात एखाद्या आजाराचा संसर्ग व्हायचा तर कुठूनही होऊ शकतो, पण जितकं शक्य होईल तितकी काळजी घ्यायला हवी."
प्रवासादरम्यान संसर्गाचा धोका
कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून किंवा असे तुषार पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात नाका-तोंडाला लागल्यानं होत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे. तसंच गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्याचं तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे.
त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन केंद्र आणि राज्य शासनानंही केलं आहे. पण प्रवास टाळता येणार नसेल, तर लोक कोणती काळजी घेतायत?
गिरीश गुरव सांगतात, "कोरोना व्हायरसविषयी ऐकल्यापासून मी अधिक सतर्क बनलो आहे. पण आसपास पाहिल्यावर लोकलमधून प्रवास करताना जेवढी काळजी घ्यायला हवी, तेवढी लोक घेताना दिसत नाहीत. लोक कुठेही खिडकीतून थुंकतात. त्यामुळं खिडकीच्या जाळीला हात न लावणं, ट्रेन प्रवासादरम्यान चेहऱ्याला हात न लावणं अशी काळजी आम्ही घेतो आहोत. सुरक्षितता ही शेवटी आमच्याच हातात आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








