कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसचा चीननंतर सर्वाधिक प्रसार इटलीत होतोय. अत्यंत वेगात इटलीतल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. इथले डॉक्टर प्राण पणाला लावून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत.
इटलीत कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कुणावर उपचार करावेत आणि कुणावर नाही, याची आम्हाला निवड करावी लागतेय.
दिवसागणिक इटलीत शेकडोंच्या पटीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतेय. रुग्णालयातल्या मर्यादित साधनांच्या मदतीनं इटलीत कोरोना व्हायरसचा समाना केला जातोय.


जर एखाद्या 80 ते 90 वयोगटातील व्यक्तीला श्वसनाचा गंभीर त्रास होत असेल, तर त्यांच्यावर उपचाराच्या शक्यता कमी होतात, असं डॉ. ख्रिश्चिअन सॅलारोली यांनी कोरिएर डेला सेरा या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
सॅलारोली हे बर्गमोतील हॉस्पिटलमधील ICU चे प्रमुख आहेत. हे हॉस्पिटल लंबोर्दियाच्या (इटली) उत्तरेकडील भागात आहे.
"खरंतर हे खूप कठोर शब्द वाटू शकतात, पण दुर्दैवानं हेच सत्य आहे. काहीतरी चमत्कार घडवलं जाईल, अशी स्थिती सध्यातरी नाहीय," असं डॉ. सॅलारोली म्हणतात.
कोरोना व्हायरसनं इटलीत असा काय धुमाकूळ घातलाय, ज्यामुळे डॉक्टरांना नागरिकांच्या जीवन-मरणाचा निर्णय घ्यावा लागतोय?
इटलीत जगण्याची शक्यता अधिक असलेल्याच रुग्णांवर उपचार होतायत?
चीन वगळता इतर ज्या देशांमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोरोना व्हायरस पसरलाय, त्यात इटलीचा समावेश आहे. इटलीत या क्षणापर्यंत (16 मार्च) 24,747 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालीय, तर 1809 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीय.
इटली हा जपाननंतर असा दुसरा देश आहे, जिथं वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे, असं संयुक्त राष्ट्राची आकडेवारी सांगते. त्यामुळेच इटलीत कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जाते.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात इटलीतल्या सोसायटी ऑफ अॅनेस्थेसिया, अॅनाल्जेसिया, रेसिक्युटेशन अँड इंटेन्सिव्ह थेरपी (SIAARTI) या संस्थेनं विशेष पत्रक काढून, कुणाला ICU मध्ये बेड द्यायचे, याबाबतचा सल्ला दिलाय. याचाच दुसरा अर्थ की, इटलीत सगळ्याच रुग्णांना ICU मध्ये बेड मिळणार नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजे नेमकं काय केलं जाईल, तर हॉस्पिटलमध्ये पहिल्या आलेल्या रुग्णाला भरती करून घेतलं जाईलच, असं नव्हे. तर ज्या रुग्णांची वाचण्याची शक्यता अधिक आहे, त्यांची निवड करून, त्यांच्यावर लक्ष देण्यास डॉक्टरांना सांगितलं जातंय. त्यामुळं डॉक्टर आणि नर्सना अत्यंत कठोर असा निर्णय घ्यावा लागतोय.
"SIAARTI सांगते म्हणून कुठल्या रुग्णावर उपचार करायचा किंवा कुणाला मर्यादित उपचार द्यायचे. मात्र, त्याचवेळी सध्याची आणीबाणीची स्थिती पाहिल्यास, कुठल्या रुग्णाला उपचारांचा सर्वाधिक फायदा होईल, याचा विचार करणं डॉक्टरांना भाग पडलंय," असं डॉ. सॅलारोली सांगतात.
ICU बेड्सची कमतरता
इटलीतल्या हॉस्पिटल्समध्ये सुमारे 5,200 आयसीयू बेड आहेत. मात्र, हिवाळ्यामध्ये इथं श्वसनाचे त्रास होतात. त्यामुळं अनेकांनी आधीच आयसीयू बेडची नोंदणी करून ठेवलीय.
लंबोर्दिया आणि व्हेनेटो या इटलीच्या उत्तरेकडील भागातल्या खासगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये केवळ 1800 आयसीयू बेड आहेत.
लंबोर्दियातील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. स्टेफानो मॅग्नोन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आम्ही आमच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचलोय.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मॅग्नोन म्हणतात, "कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचाराबाबत दिवसागणिक परिस्थिती आणखी वाईट होत चाललीय. कारण जितकी बेड्सची क्षमता आहे, तिथपर्यंत आधीच पोहोचलोय. शिवाय, वॉर्ड्सबाबतही तशीच स्थिती आहे."
"मानवी आणि तांत्रिक अशा दोन्ही साधनांबाबत आम्ही अपुरे पडतोय. त्यामुळे आम्ही नवीन व्हेटिलेटर किंवा व्हेंटिलेशनसाठी नवीन साधन मिळण्याची वाट पाहतोय," असं ते सांगतात.
'इटलीत त्सुनामीसारखी स्थिती'
बर्गामोमधील आयसीयूत कार्यरत असणारे डॉ. डॅनियल मचिनी यांचं एक पत्रक सध्या ट्विटरवर व्हायरल झालंय.
या पत्रकात डॉ. मचिनी यांनी इटलीतल्या हॉस्पिटलमधील स्थिती सांगितलीय. या स्थितीला त्यांनी 'त्सुनामी'ची उपमा दिलीय. ते म्हणतात, श्वसनाच्या त्रास झाल्यानंतर उपचारासाठी वापरण्यात येणारी उपकरणं, व्हेंटिलेटर इत्यादी गोष्टी 'सोन्यासारखी' मौल्यवान झाली आहेत.
"रुग्णांची संख्या दरदिवशी दुपटीनं वाढतेय. सध्या दिवसाला 15 ते 20 रुग्ण भरती होतायत. चाचणी केल्यानतंर प्रत्येकाचा अहवाल येतोय : पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. नंतर लक्षात येतं की, आपत्कालीन रुम भरल्यात," अशी स्थिती निर्माण झाल्याचं डॉ. मचिनी सांगतात.
"आमच्या काही सहकाऱ्यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झालीय आणि त्यांच्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनाही. आमच्या सहकाऱ्यांचे काही नातेवाईक तर आताही जीवन-मरणाशी लढा देतायत," असं म्हणत डॉ. मचिनी हे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या व्यथा मांडतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. सॅलारोली हे कोरिएर डेला सेरा या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, "वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर एकप्रकारचं भावनिक ओझं आहे. कुणावर उपचार करायचे आणि कुणावर नाही, हा कठोर निर्णय काही डॉक्टरांना घ्यायला सांगितला जातोय."
"हे जसं मुख्य डॉक्टरांबाबत होऊ शकतं, तसंच नव्यानं काम करू लागलेल्या तरुण डॉक्टरांबाबतही होऊ शकतं. माणसांचं नशीब त्यांना ठरवावं लागतंय," असं सांगत डॉ. सॅलारोली पुढे सांगतात, "जवळपास 30 वर्षांचा अनुभव असलेल्या नर्स रडताना मी पाहिलंय. चिंताग्रस्त आणि थरथरणारेही लोक पाहिलेत."
इटलीचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
बीबीसीशी बोलताना इटलीचे परराष्ट्र मंत्री लुईगी दी माइओ यांनी माहिती दिली की, "युरोपमधील सर्व हॉस्पिटल आणि क्लिनकमध्ये वैद्यकीय साधनं पोहोचवण्याच्या समन्वयासाठी एकच युरोपियन यूनिटची स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे."
यावेळी इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आशावादही व्यक्त केलाय की, उत्तर इटलीत ज्या प्रांतांमध्ये रेड झोन घोषित करण्यात आलं होतं, अशा दहा शहरांध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला नाहीय.
"इटली हा युरोपमधील पहिला देश आहे, जिथं मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस पसरलाय आणि तोही अत्यंत वाईट पद्धतीनं. मात्र, त्याचवेळी मला अशीही आशाही आहे की, या संकटातून बाहेर पडणारा इटली हा पहिला देश ठरेल," असं इटलीचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








