कोरोना व्हायरसमुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, निधी राय
- Role, व्यापार प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
कोरोना व्हायरसमुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत का? या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर आहे - हो.
कोव्हिड - 19 च्या जगभर पसरलेल्या साथीचा जगभरातल्या सर्वात मोठा फटका बसणाऱ्या 15 अर्थव्यवस्थांची यादी युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट - UNCTAD ने जाहीर केलीय. यामध्ये भारताचाही समावेश आहे.
चीनमधल्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम व्यापारावर झालेला आहे आणि यामुळे भारताला 34.8 कोटी डॉलर्सपर्यंतचा तोटा होण्याचा अंदाज आहे.
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑर्डिनेशन अँड डेव्हलपमेंट (OECD)ने देखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा अंदाज वर्ष 2020च्या 6.2% वरून घटवून आर्थिक वर्ष 2020-21 साठी 5.1% वर आणलेला आहे.



घाबरून जाण्याची गरज नसल्याचं एकीकडे भारतीय सरकार वारंवार सांगतंय तर दुसरीकडे विरोधकांनी कोरोना व्हायरसच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे.
तेलगू देसम पक्षाचे खासदार जयदेव गल्ला लोकसभेत बोलताना म्हणाले, "कोरोना व्हायरसचा आपल्या देशावर काय आर्थिक परिणाम होणार आहे, हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे."
कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम?
औषध उत्पादक कंपन्या
औषधांचं उत्पादन करणाऱ्या फार्मा कंपन्यांच्या महसुलावर तर परिणाम झालेलाच आहे. पण याचा आपल्या आयुष्यावरही परिणाम होणार आहे.
औषधांच्या दुकांनांमधला साठा संपतोय. देशभरातल्या मोठ्या शहरांमधले केमिस्टसनी सॅनिटायझर्स आणि मास्कसाठीची नवीन मागणी नोंदवलेली आहे, पण त्यांना गेले आठवडाभर या गोष्टींचा पुरवठा मिळालेला नाही.

लोकं आपल्याकडे गोष्टी साठवून ठेवत असल्याने आता किंमतीपेक्षा जास्त भावाने या वस्तूंची विक्री व्हायला लागली आहे.
मुंबईच्या मालाडमधील जे. के. मेडिकल स्टोअरच्या हेमंत येवलेंनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही गेल्या आठवड्यातच N95 मास्कची मागणी नोंदवलेली आहे, पण ते आम्हाला अजून मिळालेले नाहीत. सॅनिटायजर्सचीही तीच स्थिती आहे. आमच्याकडे लहान बाटल्या नाहीत. सॅनिटायजर्स आणि मास्कसाठीची मागणी या आठवड्यात वाढलेली आहे आणि ती आणखीन वाढेल असं आम्हाला वाटतंय."
खारमधल्या नोबल प्लस फार्मसीचे बिचेंद्र यादव यांचंही हेच म्हणणं आहे, "आमच्याकडे मास्क आहेत पण त्यावर ते N95 आहेत असं लिहिलेलं नाही. पण तरीही लोकं ते घेत आहेत. आमच्याकडे सॅनिटायजर्सच्या फक्त 500 बाटल्या आहेत आणि नवीन स्टॉक येत नाहीये. आमचा भरपूर स्टॉक विकला गेलाय आणि तरीही मागणी कायम आहे," यादव सांगतात.

फोटो स्रोत, iStock
वांद्य्रातल्या मेडिकल स्टोअर्समध्ये कुठे मास्क उपलब्ध आहेत का हे शोधण्यात धवल जैन यांची आख्खी दुपार गेली.
ते सांगतात, "मी नेहमी प्रदूषणापासून बचाव म्हणून मास्क वापरतो. पण आता मला तेच मास्क तिप्पट किंमतीत घ्यावे लागतायत. आणि ती किंमत मोजायची तयारी असली तरी दुकानांमध्ये मास्क मिळत नाहीयेत. मी N95 मास्कची ऑनलाईन ऑर्डर दिलीय. सोमवारी डिलीव्हर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता आठवडा संपत आला तरी मला मास्क मिळालेला नाही."
गेल्या तीन महिन्यांमध्ये सॅनिटायजर्स आणि मास्कसाठीची मागणी 316 टक्क्यांनी वाढली असल्याचं ट्रेडइंडिया डॉट कॉमने म्हटलंय. "देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता या गोष्टींचं उत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा प्रयत्न करत आहेत." ट्रेडइंडिया डॉट कॉमचे सीओओ संदीप छेत्री यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
भारत हा जगासाठीचा जेनेरिक औषधांचा सगळ्यात मोठा पुरवठादार आहे. चीनमधले व्यवहार ठप्प झाल्याने भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध आणले.
भारतामध्ये या औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ही पावलं उचलण्यात आली. पॅरासिटमॉल, विटामिन B1, B6, B12 आणि औषधं तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या - APIच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, EPA
जलवाहतूक, रसायनं आणि खतांसाठीचे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं, "देशामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून टास्क फोर्सने काही सूचना दिल्या होत्या. मंत्र्यांची एक समिती याचा आढावा घेतेय.
औषधं तयार करण्यासाठी लागणाऱ्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स - API ची आपण निर्यातही करतो आणि आयातही. निर्यात केल्यास देशात भविष्यात काही APIचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. कोरोनाव्हायरसमुळे आम्ही अशा APIच्या निर्यातीवर काही कालावधीपुरते निर्बंध घातलेले आहेत."
आर्थिक वर्ष 2019मध्ये भारताने चीनकडून 68% APIची आयात केली होती.
पर्यटन
विविध देशांनी प्रवासावर घातलेले निर्बंध, खबरदारीचे सल्ले आणि सूचना यासगळ्यांदरम्यान अश्विनी कक्कर यांचा फोन सतत खणखणतोय.
नियोजित प्रवास रद्द करणाऱ्या वा पुढे ढकलणाऱ्या कॉर्पोरेट वा सामान्य नागरिकांचे हे फोन्स आहेत. अश्विनी गेली 30 वर्षं ट्रॅव्हल व्यवसायात आहेत आणि यापूर्वी कधीही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती, असं ते सांगतात.
ते म्हणतात, "मी पाहिलेली ही सगळ्यात मोठी वैद्यकीय आणीबाणी आहे. SARS, MARS आणि स्वाईन फ्लूपेक्षा मोठं आहे. त्यावेळी असं घडलं नव्हतं. देशाबाहेर प्रवास करणाऱ्या 20% जणांनी प्रवास रद्द केलाय वा पुढे ढकललाय. आणि तीन महिन्यांत जवळपास 30 टक्के कॉर्पोरेट प्रवासावर परिणाम होईल. हे सगळेजण प्रवास रद्द करतील वा पुढे ढकलतील, आणि याचा आर्थिक फटका बसेलच पण सोबत कामंही वाढेल."
"जगभरात अनेक आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स रद्द झाल्याने हॉटेल्सची ऑक्युपन्सीही 20 ते 90 टक्क्यांपर्यंत खाली आलेली आहे. सगळ्यात मोठा फटका बसलाय तो डेस्टिनेशन वेडिंग्सना."

फोटो स्रोत, Getty Images
नुकतंच लग्न झालेल्या अनु गुप्ता हनिमूनसाठी थायलंडला जाणार होत्या पण कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे त्यांनी हा बेत रद्द केला. "हा माझा भारताबाहेरचा पहिला प्रवास असणार होता. आम्ही सगळी तिकीटं बुक केली, हॉटेल्स आणि ट्रिप्सही बुक केल्या होत्या. पण आता आम्ही जाऊ शकत नाही आणि आमचे पैसे परत मिळणार का हे देखील माहित नाही."
कोरोना व्हायरसच्या या जागतिक साथीमुळे जागतिक पर्यटन क्षेत्राचं किमान 22 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं नुकसान होणार असल्याचा अंदाज ट्रॅव्हल अँड टुरिझम काऊन्सिल आणि ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने म्हटलंय.
तर प्रवाशांमुळे मिळणाऱ्या महसुलाचं 63 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं नुकसान होणार असल्याचं इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने म्हटलंय. आणि यामध्ये कार्गो म्हणजे मालवाहतूक उद्योगाचा समावेश नाही.
होळीसाठीचे आणि इतर विविध कार्यक्रम रद्द झाल्यानेही पर्यटन क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय.
भारतात रद्द झालेले महत्त्वाचे कार्यक्रम
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातला होळीचा कार्यक्रम रद्द केला.
- पंतप्रधान मोदींनीही होळीचं खेळणं रद्द केलं.
- युरोपियन युनियन समिटमध्ये सहभागी होण्यासाठीचा पंतप्रधानांचा बेल्जियम दौरा रद्द करण्यात आला.
- केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने 'इंडिया फिनटेक फेस्टिव्हल' पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
- भारतीय महिला संघाने चीन दौरा रद्द केला.
- शाओमीने त्यांचा प्रॉडक्ट लाँच रद्द केला.
- रिअलमी कंपनीनेही त्यांचा प्रॉडक्ट लाँच रद्द केला.
ऑटोमोबाईल
वाहन उद्योग व्यवसायामध्ये 3.7 कोटी लोकांना रोजगार मिळत असल्याचं सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)तं म्हणणं आहे. आर्थिक मंदीचा या क्षेत्राला आधीच फटका बसलेला होता. आता चीनमध्ये कामकाज ठप्प झाल्याने त्यांना सुट्या भागांचा तुटवडा भासतोय.
व्यवसायाने ऑटो डील असणाऱ्या निर्मल गर्ग यांची पश्चिम बंगालमध्ये 4 स्टोअर्स आहेत. ते सांगतात, "परिस्थिती दिवसेंदिवस खालावतेय...आधी आम्हाला मंदीचा फटका बसला होता आणि आता लोकं अधिक घाबरली आहेत त्यामुळे त्यांना नवीन कारमध्ये इतका पैसा टाकायची इच्छा नाही."

फोटो स्रोत, Getty Images
पण परिस्थिती अगदीच वाईट नसल्याचं ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडियाचे संचालक विनी मेहता सांगतात.
"परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी आम्ही काळजीत नक्कीच आहोत. मार्चपर्यंतचा साठा आमच्याकडे आहे. पण एप्रिलपर्यंत चीनमध्ये कामकाज सुरू झालं नाही तर मात्र गोष्टी बदलतील. मग इतर पर्यायांचा विचार करावा लागेल."
कोरोना व्हायरसच्या परिणामांवर आपण लक्ष ठेवून असल्याचं टाटा मोटर्स, टीव्हीएस मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो या कंपन्यांनी म्हटलंय.
हिरे उद्योग
जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रालाही या व्हायरसचा मोठा फटका बसलाय. भारताकडून पैलू पाडलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची सर्वात जास्त निर्यात हाँगकाँग आणि चीनला होते आणि या दोन्ही देशांमध्ये या विषाणूच्या उद्रेकाचं प्रमाण मोठं आहे.
सूरतमधल्या 'नेकलेस डायमंड' या डायमंड पॉलिशिंग युनिटचे संस्थापक कीर्ती शहा यांनी बीबीसाल सांगितलं, "असे अनेक लहान उद्योग आहेत जे आम्हाला तयार रत्न आणि दागिने देतात आणि मग आम्ही त्यांना पैसे देतो. आम्हाला हाँगकाँग आणि चीनकडून आमचे पैसे मिळत नाहीय. आम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतोय, पण ते कठीण झालंय. या लहान उद्योगांना म्हणून आम्ही पैसे देऊ शकत नाहीत. दोन्हीकडे पैसे अडकले आहेत."
जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल (GJEPC)चे उपाध्यक्ष कोलिन शहा यांनी बीबीसीला सांगितलं, "एक्स्पोर्ट होणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याने भारताच्या एकूणच जेम्स आणि ज्वेलरी निर्यातदारांना 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा अधिकचा तोटा होण्याचा अंदाज आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








