गुंतवणूक, बचत : सुखी-समाधानी भविष्यासाठी तुमच्याकडे किमान किती पैसे असायला हवेत?

पैशांचे नियोजन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गौतम मुरारी
    • Role, बीबीसी तामिळसाठी

तुमच्या भविष्यासाठी किती पैशांची आवश्यकता असते, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्या हिशेब नेमका कसा लावाल? ते कमावायचे कसे? अशा काही प्रश्नांच्या उत्तराचा शोध आपण आज घेणार आहोत.

माणसांच्या राहणीमानाचा दर्जा ठरवणं ही कायम एक गुंतागुंतीची बाब राहिली आहे. 40 वर्षांपूर्वी घरात फोन असणं म्हणजे चैनीची बाब ठरवली जात होती, तर 30 वर्षांपूर्वी घरात टीव्ही असणं हीदेखील एक मोठी बाब होती. 25 वर्षांपूर्वी कार ही केवळ सरकारी अधिकारी आणि श्रीमंतांसाठीच होती.

लोकांचं राहणीमान त्याचा दर्जा आता बदलला आहे. अगदी निम्न मध्यमवर्गीयाचा विचार करता ज्याला 50 हजारांपेक्षा कमी पगार आहे त्यांची अगदी फार मोठी स्वप्नं नसतात. एलसीडी टीव्ही, डबल डोअरचा फ्रीज, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, लॅपटॉप, दुचाकी, वीकेंडला चांगल्या हॉटेलात जेवण, एक घर आणि कार अशी त्याची स्वप्नं असतात.

ज्यांचं उत्पन्न 50 हजार ते एक लाखांच्या दरम्यान आहे त्यांच्या खर्चाची यादीही संपत नाही. त्यात कार घेणं, बहुमजली फ्लॅट, क्रेडीट कार्ड, गृहकर्जाचा ईएमआय, पब, रेस्तरॉ, बार याचा त्यात समावेश आहे.

एक लाखापेक्षा अधिक कमाई करणाऱ्यांचे खर्चही त्यांच्या पगाराप्रमाणे वेगळे असतात.

50 हजारांपेक्षा कमी कमावणारे

भारतात असंघटित कामगार, व्यापारी, स्वयंरोजगार करणारे यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचं मासिक उत्पन्न हे 50 हजारांच्या आत असू शकतं.

प्रत्यक्ष कर मंडळाकडून मिळालेल्या माहितीचा विचार करता भारतात केवळ 5.87 कोटी लोकांनीच 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये प्राप्तीकर भरला आहे.

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळं भारतात प्राप्तीकराच्या सीमेमध्ये नसलेल्या आणि 50 हजारांच्या आत उत्पन्न असलेल्या लोकांचा एक मोठा वर्ग आहे, हे स्पष्ट होतं.

पण मग महिन्याला 50 हजार रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीकडं एक कोटी रुपये असेल तर तो आरामात जगू शकतो का? भविष्यासाठी त्याला नेमका किती पैसा आवश्यक असतो आणि त्यासाठीचे गुंतवणुकीचे पर्याय काय असू शकतात? चला जाणून घेऊयात.

"जर एका व्यक्तीला आज 50 हजार रुपये आवश्यक असतील, तर महागाईचा विचार करता 10 वर्षांनंतर त्याच व्यक्तीला खात्यात किती पैसे असणं गरजेचं आहे? तसंच त्या व्यक्तिला 20, 30, 40, 50 वर्षांनंतर किती पैशांची आवश्यकता असेल?

आज 50 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला तशाच प्रकारचं जीवन जगण्यासाठी 2040 मध्ये 1.51 लाख रुपये लागतील? या हिशोबाने तुम्हाला 2065 मध्ये महिन्याला 6,49,274 रुपये लागतील. आपल्या जीवनमानावर महागाईचा होणारा हा सर्वात वाईट परिणाम आहे. त्यामुळं आश्चर्यचकित होऊ नका, असं चेन्नईतील फायनान्शिअल प्लॅनर डी मुथूकृष्णन यांनी म्हटलं.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारताचा महागाईचा दर 2020 पर्यंत 6.6% टक्के असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर केलेला हिशोब 6% टक्क्यानुसार केला आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीचा विचार करता, 2008 ते 2013 दरम्यान भारतातील महागाईचा दर 8.3 टक्के राहिला आहे. त्यामुळं सरासरी महागाई दर 6 टक्के ठेवण्यात आला आहे.

पैशांचे नियोजन

फोटो स्रोत, Getty Images

पण महागाईचा खरंच आपल्या उत्पन्नावर एवढा परिणाम होईल का? याचं उत्तर आपल्या आई-वडिलांना किंवा आजी आजोबांना विचारा. त्यांना त्यांच्या काळात किराणा, कपडे, दागिने, सोनं, घरभाडं या सर्वासाठी किती पैसे लागायचे? त्यावरून वाढलेल्या किमतींमुळं आपला खिसा कसा रिकामा होतो, हे तुमच्या लक्षात येईल, असा इशारा मुथूकृष्णन यांनी दिला.

तुम्ही किती दिवस काम करू शकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळं लोकाचं आयुर्मान हे 75 वर्षांपर्यंत असणं हे अगदी सामान्य आहे. भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीवरूनही ते स्पष्ट होतं.

आपण असा विचार केला की, एखादी व्यक्ती वयाच्या 60 वर्षांपर्यंत काम करत असून निरोगी आहे. पण त्याला आधुनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या काळात त्याना नोकरी किंवा काम मिळत राहणं शक्य होईल का? जरी त्यांना नोकरी मिळाली तरी त्यांना वाढत असलेल्या महागाईच्या दरानुसार पगार किंवा मोबदला मिळू शकेल का? असे काही प्रश्न उपस्थित होतात.

आता वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत महागाईच्या प्रमाणात उत्पन्नही वाढत जाईल असा विचार आपण करू... म्हणजे जी व्यक्ती 2021 मध्ये 50 हजार रुपयांसह जीवन जगत असेल, त्याच व्यक्तीला तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी 2051 मध्ये महिन्याला 2.87 लाख रुपयांची आवश्यकता असेल. म्हणजे त्या व्यक्तीला वर्षाला 34.46 लाख रुपयांची आवश्यकता असेल," असं ते म्हणाले.

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

मग त्या व्यक्तिला कोणाच्या उपकारांवर न जगता पुढील 15 वर्षांसाठी खर्च करायला हाती किती पैसे असायला हवे? त्यानं कुठं गुंतवणूक केली पाहिजे? अशी विचारणा आम्ही केली.

भविष्यासाठीचे नियोजन

या व्यक्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याकडं 3 कोटी 90 लाख 50 हजार रुपये असायला हवे. ते जर वार्षिक 8 टक्के व्याज मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवले तर पुढची 15 वर्षे आरामात जीवन जगता येऊ शकतं.

निवृत्तीच्या एका वर्षापूर्वी पैसे तयार राहतील. म्हणजे त्यातून दरवर्षी आवश्यक ती रक्कम काढून तसं नियोजन करणं शक्य होऊ शकेल.

यात महागाईचादेखील विचार करण्यात आलेला आहे, हे विशेष उल्लेखनीय ठरेल. म्हणजे 2051 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी त्यांना महिन्याला 2.87 लाख रुपये मिळू शकतील, तर 2061 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी त्यांना महिन्याला 5.14 लाख रुपये मिळू शकतील.

"मग मला सांगा तुमच्यासाठी एक कोटी रुपये पुरेसे आहेत का? एक कोटी रुपयांत तुम्ही समाधानी जीवन जगू शकाल का?" असे प्रतिप्रश्न मुथूकृष्णन यांनी केले.

मग यावर पर्याय काय? असं आम्ही त्यांना विचारलं.

गुंतवणूक कुठे करायची?

"ज्याचं लग्न झालेलं असेल आणि मुलं असतील त्यांनी तातडीनं चांगला वैद्यकीय विमा घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमचा बचत केलेला पैसा खर्च होण्यापासून वाचू शकतो.

त्याशिवाय तुमच्याकडं किमान 200-300 ते ग्रॅम म्हणजे 20 ते 30 तोळे सोनं असायला हवं. त्यामुळं अडचणीच्या काळात सरकारी आणि खासगी बँकांकडून कमी दरात कर्ज घेणं शक्य होऊ शकतं.

आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी किमान 2-3 महिन्यांचा पगार हा एखाद्या उत्पन्न योजनेत गुंतवा. त्यामुळं कोरोनासारखी परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला कुटुंबाची किंवा नोकरी नसेल तर त्याचीही काळजी करण्याची गरज नाही. त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही गुंतणूक तुम्हाला फायद्याची ठरू शकेल.

जर तुम्हाला महागाईच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक मोबदला हवा असेल तर शेअर मार्केट हा एकमेव पर्याय आहे. बँकेत फिक्स डिपॉझिटवर सध्या 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजही मिळत नाही.

भारतात सरकारतर्फे केवळ सुकन्या समृद्धी या एकाच योजनेवर 7.6% व्याज दिलं जातं.

अगदी कर्जावर आधारित म्युचल फंडमध्येही 10 टक्क्यांपेक्षा अधिक मोबदला मिळणं कठीण आहे. शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर रिटर्न मिळू शकते, पण त्यात धोकाही तेवढाच जास्त असतो. त्यात एका चुकीच्या निर्णयामुळंही तुम्ही संपूर्ण पैसा गमावण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळं पुढची 30 वर्ष तुम्ही सरासरी 12 टक्के मोबदला देणाऱ्या निफ्टी इंडेक्स फंड किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

स्मॉल कॅप फंड्स, मिड कॅप फंड्स, लार्ज अँड मिड कॅप फंड्स, E.L.S.S फंड, SS फंड्स आणि लार्ज कॅप फंड्स अशा काही फंड्समध्ये गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत 13.8 टक्क्यांपेक्षा अधिक मोबदला मिळाला आहे.

त्यामुळं तुम्ही जर वार्षिक 12 टक्के मोबदला देणाऱ्या एसआयपी योजनेत 30 वर्षांसाठी महिन्याला 11 हजार 250 रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 3.97 कोटी रुपये मिळू शकतात, असं जी मुथूकृष्णन म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)