फसव्या गुंतवणूक योजना ओळखण्याचे 5 मार्ग

पैसे, गुंतवणूक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

कोणत्याही जाहिरातीच्या शेवटी फास्ट फॉरवर्ड केलेलं एक वाक्य असतं - Investment returns are subject to market risk. Please read the offer document carefully before investing. पण हेच वाक्य खरंतर गुंतवणुकीचं सार आहे. आणि इथेच लक्ष न दिल्याने गुंतवणुकीतले सगळे पैसे गमवायची वेळ काहींवर येते.

काही दिवसांपूर्वी बार्शीतल्या विशाल फटे स्कॅममध्येही हेच झालं. 'इतके रुपये गुंतवा, तुम्हाला गुंतवणुकीच्या इतके पट मोबदला मिळेल...' यापूर्वीही अशा योजना येऊ गेलेल्या आहेत. या सगळ्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करायची पद्धत साधारण सारखीच असते. मग अशा बोगस योजनांना किंवा कंपन्यांना बळी पडू नये, म्हणून काय करायला हवं? समजून घेऊयात 5 मुद्द्यांमध्ये.

अतिशय जास्त दराने परतावा देण्याचं आमिष दाखवणाऱ्या अशा योजनांना म्हटलं जातं पाँझी स्किम्स. (Ponzi Schemes)

1920 च्या दशकात अमेरिकेत चार्ल्स पाँझी नावाच्या एका माणसाने अतिशय चढ्या दराने गुंतवणूक परतावा देणारी योजना आणली आणि लोक यात फसत गेले. त्यावरून अशा प्रकारच्या सगळ्या योजनांना पाँझी स्किम्स म्हटलं जाऊ लागलं.

अशा प्रकारच्या सगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये आजवर आढळलेली समान गोष्ट म्हणजे - कमी काळात प्रचंड मोठ्या दराने परतावा.

कमी काळात जास्त पैसे कमावायच्या लालसेने गुंतवणूकदार या योजनांकडे आकर्षित होतात आणि तिथेच गणित फसतं.

मग अशा योजना ओळखायच्या कशा? जाणून घेऊयात यातल्या 5 धोक्याच्या घंटा.

1. जास्त दराने परातावा

साधं उदाहरण घेऊयात. आपण भाजी घ्यायला जातो तेव्हा कांदे-बटाटे, भाज्या-फळं यांचे साधारण दर काय आहेत हे आपल्याला माहिती असतं. त्यापेक्षा 30-40 रुपये जास्त दराने जर कोणी हीच गोष्ट विकायला लागलं तर आपण याच्याकडे हीच भाजी इतकी महाग का, असा विचार करतो.

आणि तीच गोष्ट कोणी अगदीच स्वस्तात द्यायला लागलं तरीही आपल्या डोक्यात शंका येते... ही भाजी जून तर नाही ना... ही फळं बेचव किंवा खराब व्हायला तर लागली नाहीत ना...

मग हेच साधं तत्त्वं गुंतवणूक करतानाही लागू होतं.

पैसे, गुंतवणूक

फोटो स्रोत, Getty Images

म्हणजे वर्षानुवर्षं अस्तित्वात असलेल्या बँका, वित्तीय संस्था जर ठराविक दरानेच व्याज देऊ करत असतील तर एखादी नवीन आलेली कंपनी किंवा व्यक्ती इतका मोठा परतावा गुंतवणुकीवर कशी देऊ करतेय, ही शंका आपल्या डोक्यात यायलाच हवी.

ही असेल धोक्याची पहिली घंटा. इतरांपेक्षा जर कोणी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न द्यायचं सांगत असेल, तर सावध व्हा.

2. इतरांना सहभागी करण्याचा आग्रह

अशा योजनांमध्ये आणखीन एक गोष्ट केली जाते. सुरुवातीला काही काळ परतावा दिला जातो आणि तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबियांनाही यात सामील करून घ्या असा आग्रह धरला जातो.

तुम्ही जितक्या जास्त लोकांना आणाल तितका जास्त परतावा तुम्हाला मिळेल, असं सांगितलं जातं.

कधीकधी आमच्या सेमिनारला या, लगेच पैसे गुंतवायची गरज नाही, फक्त ऐकायला या असंही सांगितलं जातं. पैसे काढून घ्यायचे आहेत, असं सांगितलं तर काही तरी कारण देऊन तुम्हाला थांबवून ठेवलं जातं. ही असेल धोक्याची दुसरी घंटा.

3. गुंतवणूक परताव्याची हमी

कोणत्याही वित्तीय संस्था त्यांच्या गुंतवणूक योजनांवर किती परतावा मिळेल याची हमी देत नाहीत. Investment Returns हे शेअरबाजार, नियमावली आणि इतर गोष्टींवर अवलंबून असतील हे कायमच सांगितलं जातं. म्हणूनच जाहिरातींमध्ये एक अॅस्ट्रिक म्हणजे * ही खूण करून याकडे लक्ष वेधलेलं असतं.

त्यामुळे तुम्हाला इतके टक्के रिटर्न देतो असं छातीठोकपणे कोणी सांगायला लागलं तर सावध व्हा.

व्हीडिओ कॅप्शन, IPO म्हणजे नेमकं काय? यात गुंतवणूक करावी की नाही? । सोपी गोष्ट 465

याविषयी बोलताना शेअरबाजार अभ्यासक सीए निखिलेश सोमण सांगतात, "सेबी नियमांनुसार शेअरबाजारात परताव्याची अपेक्षा जरी तुम्ही ठेवत असाल तरी ती गँरंटेड रीटर्न देण्याची अशी कुठलीही तरतूद नाही. किंबहुना जर कोणी तुम्हाला गॅरंटेड परतावा देऊ असं सांगत असतील, तर सावधान.

कारण शेअर बाजाराच्या नियमाप्रमाणे, सेबी नियमांनुसार कोणीही खात्रीशीर परतावा देऊ शकत नाही. म्युच्युअल फंडही Subject to Market Risks असतात. मग शेअरबाजारात कोण बरं असा परतावा देईल? जर असे काही लोक तुमच्याकडे येऊन भेटत असतील, तुम्हाला योजना सांगत असतील तर कृपया सावधान रहा. अशा अमिषांना, प्रलोभनांना बळी पडू नका. नाहीतर कालांतराने तुमचे पैसे गेलेलेच तुम्हाला दिसतील."

4. योजना वा व्यक्तीची विश्वासार्हता

एखादी गाडी किंवा बाईक घ्यायची असेल, तर आपण शोरूम कुठे आहे, कधीचं मॉडेल आहे, मायलेज किती आहे, सर्व्हिस सेंटर कुठे आहे आणि ती गाडी ओळखीच्या कोणी वापरलीय का... या सगळ्या गोष्टी तपासतो. बरोबर? मग कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करतानाही फक्त किती मोठा परतावा मिळतोय हे बघून चालणार नाही.

ही योजना देणारी व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या भागात कधीपासून आहे, तिची नोंदणी सेबीसोबत किंवा कोणत्या ब्रोकिंग फर्म्स किंवा वित्तीय संस्थांकडे आहे का, तुम्हाला ऑफर होत असलेली योजना सेबी, IRDA नोंदणीकृत आहे का, या गोष्टी तपासायलाच हव्यात. त्या व्यक्तीचे कागद, लेटरहेड, नावाचे शिक्के यावर विश्वास ठेवू नका. त्यात कोणते नोंदणी क्रमांक आहेत का, हे तपासा.

सगळ्या मान्यताप्राप्त संस्था त्यांच्या गुंतवणूक पद्धती म्हणजे तुमचे पैसे कशात गुंतवले जाणार याविषयी आणि योजनांमधल्या धोक्यांविषयी अगदी स्पष्टपणे सगळं सांगतात. तुम्हाला ऑफर देत असलेली व्यक्ती गुंतवणूक पद्धत आणि त्यातले धोके सांगतेय का, हे नक्की बघा.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे फसवणूक झाली तर लपवून ठेवू नका.

5. फसवणूक झाल्यास तक्रार करा

आपल्याला कोणीतरी लुबाडलं हे सांगणं लाजीरवाणं असतं आणि म्हणून ते कोणाला सांगितलं जात नाही आणि परिणामी इतर लोकही त्याच योजनेला बळी पडतात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी फसवलं असेल तर त्याची रीतसर तक्रार दाखल करा. जेणेकरून ही व्यक्ती इतरांना त्याच मार्गाने फसवू शकणार नाही.

त्याचवेळी जर एखादी व्यक्ती बोगस आहे, फ्रॉड आहे हे गुंतवणूक करायच्या आधी लक्षात आलं तर त्याबद्दलही इतरांना माहिती द्या. याविषयीही पोलिसांचं वा सेबीचं लक्ष वेधा. म्हणजे अशी योजना मोठीच होऊ शकणार नाही.

या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या जर आपली गुंतवणूक सुरक्षित राहू शकेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)