Financial Planning : आर्थिक नियोजनाची ही 7 सूत्रं तुमचं भविष्य सुखकर करतील

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आय. व्ही. बी. कार्तिकेयन
- Role, बीबीसीसाठी
फायनान्शियल प्लानिंग (Financial Planning) म्हणजेच आर्थिक नियोजन नेमकं कसं करायचं याविषयीचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण गुंतवणूकदार सामान्य असो वा व्यावसायिक, लहान असो वा मोठा प्रत्येकजण भविष्यासाठीच तरतूद करत असतो.
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किंवा कायम स्वावलंबी राहता येणं हा आर्थिक नियोजनामागचा हेतू असतो. म्हणूनच उत्तम आर्थिक नियोजन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घ्यायच्या ते पाहूयात.
आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय?
बहुतेकांच्या उत्पन्नाचं साधन नोकरी - मासिक पगार असतं म्हणून त्यांच्यापासून सुरुवात करू.
तुमची मिळकत जर नोकरीच्या पगारातून होत असेल तर मग समजा काही कारणामुळे पगार झाला नाही, वा हे उत्पन्न थांबलं किंवा काही काळ पगारात वाढ झाली नाही तरीही त्याचा तुमच्या आयुष्यावर जीवनशैलीवर लगेच मोठा परिणाम होणार नाही इतके पैसे वा तरतूद असणं म्हणजे आर्थिक स्वालंबन.
हीच गोष्ट व्यवसाय - धंदा असणाऱ्यांसाठीही लागू होईल. खरंतर आपण सहसा 'वाईट वेळ आली तर...' असा विचार करत नाही. पण असा विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे गेल्या 2 वर्षांत समोर आलं.
नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप पाहताही भविष्याचा असा विचार करणं गरजेचं आहे. 2007नंतर सरकारी नोकरीत रुजू झालेल्यांना पेन्शनची सुविधा उपलब्ध नाही. तर खासगी नोकऱ्यांमध्ये स्थैर्य किंवा 'जॉब सिक्युरिटी' कमी आहे.
2008च्या मंदीनंतर नोकरी करणाऱ्या दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढचा काही काळ अगदीच नगण्य वाढ झाली होती. पेन्शन फंड आणि ग्रॅच्युईटीही गरजेच्या वेळी तातडीने उपलब्ध होईलच असं नाही. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याला महत्त्व द्यायला हवं.
गुड इन्कम, बॅड इन्कम
ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण फायनान्शियल प्लानिंग करताना गुड इन्कम आणि बॅड इन्कम समजून घेणं महत्त्वाचं आहे.
आपला वेळ किंवा कौशल्य खर्च केल्यानंतर मिळतं ते - बॅड इन्कम. म्हणजे आपला पगार. पार्ट-टाईम नोकरी किंवा कन्सल्टिंगमधून मिळणारा पैसाही याच प्रकारचा.

फोटो स्रोत, Getty Images
कोणतेही कष्ट न घेता वा वेळ खर्च न करता आपल्याकडे येणारा पैसा म्हणजे - गुड इन्कम. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, व्याज किंवा 'स्लीपिंग पार्टनर' म्हणून केलेल्या गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न हे या प्रकारात येतं.
अशा प्रकारच्या गुड इन्कममधून आपल्याला आपले सगळे खर्च भागवता येणं, हा टप्पा म्हणजे आर्थिक स्वावलंबन. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला भविष्यात इतका परतावा मिळायला हवा की त्यातून आपले तेव्हाचे सगळे खर्च पगार वा इतर थेट उत्पन्न नसलं तरी भागू शकतील.
आर्थिक नियोजनाची 7 सूत्रं
वॉरन बफे आणि राकेश झुनझुनवालांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी काय म्हटलंय, ते पाहूयात.
1. आयुर्विमा (Life Insurance) आणि आरोग्य विमा (Health Insurance) असायलाच हवा. ही सगळ्यात प्राथमिक गोष्ट आहे.
2. गुंतवणूक ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे.
3. शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात करा. वॉरन बफेंनी वयाच्या 9व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली होती.
असं म्हणतात की वयाच्या तिशीच्या आत गुंतवणूक करायला जे सुरुवात करतात ते 45 वर्षांचे होईपर्यंत आर्थिकदृष्टा स्वावलंबी होण्याची शक्यता जास्त असते.
4. सेव्हिंग्स अकाऊंटचा वापर दर महिन्याच्या खर्चासाठी करू नका. बचत खातं स्वतंत्र असूद्या आणि खर्च वेगळ्या खात्यातून करा.
5. असं म्हणतात की वयाच्या चाळिशीनंतर आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू होतो. मुलांचं शिक्षण, करियरमधले अडथळे, वाढत्या वयासोबत येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी या सगळ्या गोष्टी चाळिशीनंतर येतात. आर्थिक नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा.
6. आपल्याला सध्याच्या खर्चाचा विचार करतानाच सोबत भविष्यातल्या खर्चांचाही विचार करून त्यानुसार प्लानिंग करायचं आहे. मुलांच्या शाळेच्या फीचं उदाहरण पाहू. आताची फी किती आहे यावरून पुढच्या पाच वर्षांनी शिक्षणाचा हा खर्च किती असेल याचा अंदाज घेऊन तशी तरतूद करायला हवी.
7. महागाई, चलनवाढीचा दर (Inflation) याचाही विचार फायनान्शियल प्लानिंग करताना करणं आवश्यक आहे. नोव्हेंबर 2021मध्ये चलनवाढीचा दर 14 टक्क्यांपेक्षा जास्त होता. दर वेळी महागाईचा दर इतका चढा नसला तरी अनेकदा तो 10 टक्क्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे भविष्यात हा तर किती असू शकेल, याचा विचार आता गुंतवणूक करताना केला पाहिजे.
फायनान्शियल प्लानिंगच्या पद्धती कोणत्या?
आर्थिक उद्दिष्ट ठरवून केलेलं नियोजन - म्हणजे यामध्ये तुम्ही आपल्याला किती रक्कम उभी करायची आहे याचा आकडा ठरवता आणि त्यासाठी नियोजन करता. गुंतवणुकीच्या या मुद्दलावरून मिळणाऱ्या व्याजातून खर्च भागवण्याचं उद्दिष्ट असतं.
यासाठी भविष्यात किती खर्च असतील, त्यासाठी किती व्याज वा गुंतवणूक परतावा मिळायला हवा हे शोधणं महत्त्वाचं आहे. भविष्यातला चलनवाढीचा दरही लक्षात घ्यायला हवा. हे सगळं लक्षात घेऊन त्यासाठीची गुंतवणूक करायला हवी.
उदाहरणार्थ, सगळे खर्च भागतील इतकं व्याज फिक्स्ड डिपॉझिटवर मिळायला हवं. म्हणजे महिन्याचा खर्च सुमारे 50,000 असेल तर त्यानुसार वर्षाला 6 लाख मिळायला हवेत. शिवाय टॅक्सेसचाही विचार करायला हवा. म्हणजे वार्षिक व्याज 7 लाखांपेक्षा जास्त मिळेल इतकी गुंतवणूक हवी.

फोटो स्रोत, Getty Images
फिक्स्ड डिपॉझिटवरचा व्याजदर 6% ते 6.5% धरला तर त्यानुसार FDची रक्कम किती हवी आणि त्यासाठी आता दरमहा किती गुंतवायला हवेत याचं गणित करावं लागेल.
हेच तत्त्वं म्युच्युअल फंड्सनाही लागू होतं. SIP - सिस्टीमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लानसोबतच SWP - सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लानचाही विचार करा.
प्रत्येक खर्चासाठी गुंतवणूक - ज्याप्रमाणे आपण घरात असताना दिवे गेले तर पटकन मिळेल अशा ठिकाणी टॉर्च ठेवून देतो, तेच सूत्र आर्थिक नियोजनातही लागू होतं.
भविष्यात येऊ घातलेला प्रत्येक खर्च डोळ्यांसमोर ठेवून त्या उद्दिष्टाने आता गुंतवणूक करायला हवी. परवडणारं घर, मुलांचं शिक्षण, फिरायला जाणं ही उद्दिष्टं असू शकतात.
आपण करत असलेली गुंतवणूक आपल्याला गरज भासणार आहे त्या कालावधीतच मॅच्युअर होईल याचीही खातरजमा करणं अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे भविष्यासाठी तरतूद करताना तुम्ही किती निधी गुंतवतायत आणि किती कालावधीसाठी गुंतवताय हे महत्त्वाचं असतं.
एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं - आर्थिक नियोजन कोणत्याही पद्धतीने करा. आर्थिक शिस्त ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ती शिस्त बाळगली तरच तुमचं नियोजन यशस्वी होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








