राज्यातील ‘हे’ उमेदवार एकाच कुटुंबातून असून वेगवेगळ्या पक्षाकडून लढणार

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं की वाजलं सर्वच राजकीय पक्षाच्या मुख्य कार्यालयांच्याबाहेर इच्छुक उमेदवारांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. यात पक्षासाठी अनेक वर्षांपासून सामान्य कार्यकर्ता ते एका पदाधिकाऱ्यापर्यंत प्रवास केलेल्यांची वर्दळ अधिक.
तर दुसरीकडे पक्ष कार्यालयात पक्षांचे प्रमुख आणि महत्त्वाच्या नेत्यांची आपल्या पक्षाला अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवता यावी यासाठी सुरू असलेली रस्सीखेच.
परंतु निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा आणि या मतदारसंघातून तिकीट आपल्याला मिळावं या दोन्हीसाठी समांतर संघर्ष सुरू असताना काही नेते मात्र यातूनही मार्ग काढतात.
खरं तर निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरं होणं हे काही नवीन नाही आणि महाराष्ट्रासाठी तर नेत्याचा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश होणं, पक्षात फूट पडणं, पक्षावरच दावा करणं यातलं काहीच आता नवीन राहिलेलं नाही.
परंतु पक्षाची विचारधारा, परंपरा, अधिकृत भूमिका, पक्षाचा अजेंडा, यापूर्वी विरोधी पक्षावर केलेले गंभीर आरोप असं सगळं सोयीस्कररीत्या विसरून ‘तिकीटासाठी काय पण...’ असं काहीसं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.
म्हणजे विधानसभा लढवण्यासाठी तिकीट मिळालं पाहिजे, मग ते आपल्याशी विसंगत विचारधारा असलेल्या पक्षातून मिळो किंवा अगदी काल-परवापर्यंत ज्या पक्षाविरोधात भूमिका मांडल्या, ज्या नेत्याविरोधात वक्तव्य केली अशा कुठल्याही पक्षाकडून मिळो. पण तिकीटासाठी गेल्या काही दिवसांत राज्यात महत्त्वाची पक्षांतरं झालेली दिसतात.
आता यासाठी कुटुंबतील सदस्य अगदी आई-वडील, भाऊ-बहीण सुद्धा अपवाद नाही. म्हणजे महाराष्ट्रात या घडीला एकाच कुटुंबातील सदस्य विविध पक्षात सक्रिय राजकारणात असलेली पहायला मिळतात. आणि या निवडणुकीत तर संबंधित पक्षाकडून तिकीट मिळत नसल्याने किंवा आघाड्यांमध्ये तडजोड म्हणूनही एकाच कुटुंबातील सदस्य एकाच पक्षातून किंवा वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत.
1. माजी मंत्री गणेश नाईक भाजपतून तर चिरंजीव संदीप नाईक एनसीपी (शरद पवार) पक्षाकडून
भाजपचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना पक्षाकडून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांचे चिरंजीव माजी आमदार संदीप नाईक यांनी निवडणुकीच्या तोंडावर 22 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
संदीप नाईक हे नवी मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. परंतु या पदाचा राजीनामा देत त्यांनी आता पक्षांतर केलं आहे. ते बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात.
यामुळे नवी मुंबईत ऐरोलीतून गणेश नाईक तर भाजपकडून तर त्याचे चिरंजीव संदीप नाईक विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडून बेलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

फोटो स्रोत, Getty Images
संदीप नाईक यांना विधानसभेसाठी बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. परंतु भाजपने या जागेसाठी मंदा म्हात्रे यांची उमेदवारी निश्चित केल्याने संदीप नाईक नाराज होते अशी माहिती आहे.
गणेश नाईक आणि नाईक कुटुंब हे नवी मुंबईतील एक राजकीय घराणं म्हणून ओळखलं जातं. 2019 मध्ये गणेश नाईक यांच्यासह संदीप नाईक यांनी 50 नगरसेवकांसह काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यापूर्वी ते ऐरोली मतदारसंघातून दोन टर्म आमदार, नवी मुंबईचे नगरसेवक आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत.
2. नितेश राणे भाजपाकडून तर बंधू निलेश राणे शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवणार
भाजपने 20 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आपल्या पहिल्या उमेदवार यादीत कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश राणे यांना पुन्हा संधी दिली आहे.
नितेश राणे हे भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. तर दुसरे चिरंजीव निलेश राणे महायुतीतील भाजपचा मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे. महायुतीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने भाजप त्याठिकाणी उमेदवार देऊ शकणार नाही. यामुळे निलेश राणे भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.


3. छगन भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
तर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

फोटो स्रोत, @ChhaganCBhujbal
महायुतीत नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहे. आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून नांदगावसाठी उमेदवारीही जाहीर झाली आहे.
यामुळे महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने समीर भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे ते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
4. इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक
महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत, एकाच घराण्यातला आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ होय.
या मतदारसंघात 1952 पासून सलग नाईक घराण्यातल्या आमदार विधानसभेवर जातो. शिवाय एकाच घरातून राज्याला दोन मुख्यमंत्री देणारा मतदारसंघ म्हणून देखील या मतदारसंघाची ओळख आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्याचा परिणाम या मतदारसंघावरही झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नाईक कुटुंबातही फूट पडली आहे.

सध्या मनोहरराव नाईकांचा एक मुलगा आमदार इंद्रनील नाईक अजित पवारांसोबत तर त्यांचा मोठा मुलगा ययाती नाईक शरद पवारांसोबत आहे.
आता पुसद विधासभा मतदारसंघातून दोन सख्खे बंधू एकमेकांविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
तर दुसरीकडे इंद्रनील नाईक यांचे बंधू ययाती नाईक हे सुद्धा या मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
5. धर्मराव आत्राम आणि कन्या भाग्यश्री आत्राम
या विधानसभेत महाराष्ट्राला बाप-लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ही राजकीय लढाई असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामधली. कारण, धर्मराव बाबांच्या कन्येनं बंड केलं असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 12 सप्टेंबरला (गुरुवार) शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

याआधी धर्मरावबाबा यांनी मुलीच्या बंडाबद्दल विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभं करणार आहेत. माझ्या जावयावर आणि मुलीवर विश्वास ठेवू नका. या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे.”
राजकीय घराण्यांची ताकद आणि पक्षासाठी बेरजेचं राजकारण
महाराष्ट्रात विधानसभेचा हा सामना थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा होणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर आणि हरियाणाच्याही निकालानंतर मविआ असो वा महायुती दोन्ही आघाड्यांसाठी ही लढाई तितकीशी सोपी नाही.
यामुळे महाराष्ट्रात विधानसभेत अगदी अटतटीची लढत पहायला मिळणार आहे. यामुळे दोन्ही आघाड्यांसाठी आणि आघाड्यांमधील पक्षांसाठी एक एक जागा महत्त्वाची आहे.
अशा परिस्थितीत स्थानिक राजकारणात वर्चस्व असलेल्या राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय कुटुंबांनी विधानसभेच्या उमेदवारीत आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
भाजप असो वा काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते सगळ्यांसाठीच यावेळेसच्या विधानसभेची प्रत्येक जागा महत्वाची असून सत्ता स्थापन करताना बेरजेचं राजकारण केलं जात असल्याचं पहायला मिळत आहे.
परंतु, असं करत असताना पक्षाची विचारधारा किंवा भूमिका असे अनेक नैतिक मुद्दे बाजूला सारत उमेदवारी मिळणं यासाठीच प्रयत्न होताना दिसत आहेत. तर पक्षाकडूनही निवडून येण्याची क्षमता, स्थानिक पातळीवरील संबंधित उमेदवाराकडे असलेली यंत्रणा, रिसोर्सेस अशा सगळ्याबाबींचा विचार केला जात आहे.
परंतु पत्रकार, राजकीय विश्लेषक अशा अनेकांकडून अशा प्रकारच्या सुरू असलेल्या पक्षांतरांवर टीका केली जात आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय, “महाराष्ट्र निवडणुकीतील गंमत (की आभासमान चमत्कार? ) : दोन्हीकडे हिंदुत्व, दोन्हीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आणाभाका, दोन्हीकडे शाहू फुले आंबेडकर परंपरेचा उच्चार, दोन्हीकडे संविधानाचा गजर, दोन्हीकडे 'बाहेरून ' आलेल्यांना तूप रोटी…”

फोटो स्रोत, X/@PalshikarSuhas
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी असे दोन परस्परविरोधी विचारधारा असलेले पक्ष आहेत. यामुळे आताच्याघडीला उमेदवारीसाठी असं कधीही कोणत्याही पक्षात पक्षांतर करणं तुलनेने सोयीचं झालं आहे असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
ते म्हणाले, “पूर्वी हिंदुत्ववादी आणि सेक्युलर असं ध्रुवीकरण होत होतं परंतु आता बदललेल्या राजकीय समिकरणांमध्ये पक्षांतर करणं किंवा विचारधारा सोयीने भूमिका मांडं अशी अडचण राहिलेली नाही. त्यामुळे पक्षांतर करायला अडचण येत नाहीत.”
“तसंच नव्या पिढीच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढलेल्या दिसतात. यासाठी त्यांच्याकडे संयम नाही. तसंच राजकीय कुरघोड्यांमध्ये पक्षांकडूनही अशी कुटुंबात महत्त्वांकाक्षा असेल तर प्रोत्साहन किंवा पाठिंबा दिला जातो. वाढलेली महत्त्वाकांक्षा आणि राजकीय पक्षाकडून मिळणारा आधार मग स्पर्धक म्हणून घरातले लोकच पुढे येता, असं देशपांडे सांगतात.
तसंच इलेक्टिव्ह मेरीट म्हणजेच निवडून येण्याची क्षमात हाच मुद्दा सर्वांत महत्त्वाचा ठरल्याने पक्षाकडूनही निर्णयाचा आधार किंवा प्राधान्य याच मुद्याला दिलं जातं असंही ते सांगतात.

या बातम्याही वाचा -
- गेल्या 5 वर्षांतल्या 5 राजकीय भूकंपांचा या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
- शरद पवारांचा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इनकमिंगसाठी नेमका प्लॅन काय आहे?
- नेहमी फक्त चर्चा होते, पण राजकीय पक्ष महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री का बनवत नाहीत?
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कांदा कुणाला रडवणार, महायुती की महाविकास आघाडी?

खरं तर राजकीय पक्षांमध्ये निवडणूक जवळ आली की स्थानिक पातळीवर अनेकांना उमेदवारीचं आश्वासन दिलं जातं. किंवा तळागाळात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करणारा पदाधिकारी, एखादा झेडपी सदस्य किंवा कार्यकर्ता हा सुद्धा इच्छुक उमेदवार असतो. यासाठी पक्षाकडून होणारी मुलाखत प्रक्रिया सुद्धा केली जाते.
अभय देशपांडे सांगतात, “स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या प्रक्रियेतून पुढे आलेल्या नेत्यालाच संधीसाठी प्राधान्य दिलं जातं. पक्षाकडून मुलाखत प्रक्रिया होते हे खरं आहे. पण सहसा तयार असलेल्या उमेदवारालाच संधी मिळण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात राजकीय वारसा नसलेले अनेक नेते आतापर्यंत सक्रिय राजकारणात आलेत. पण तुलनेने संख्या कमी आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











