अहेरीमध्ये अखेर बाप-लेकीत होणार लढत, धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम आमने-सामने

राजे अंबरीशराव आत्राम, भाग्यश्री आत्राम आणि धर्मरावबाबा आत्राम
फोटो कॅप्शन, राजे अंबरीशराव आत्राम, भाग्यश्री आत्राम आणि धर्मरावबाबा आत्राम
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

भाऊ-भाऊ, काका-पुतण्या, मुलगा-वडील, भाऊ-बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही. याआधी अशा अनेक राजकीय लढाया झाल्या आहेत.

आता या विधानसभेत महाराष्ट्राला बाप-लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे. ही लढत होईल विदर्भातील अहेरी मतदारसंघात.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात ही लढाई असमार आहे.

धर्मरावबाबांच्या कन्येनं बंड केलं असून त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटानं त्यांना तिकिटही जाहीर केलं आहे.

शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा 12 सप्टेंबरला त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला होता.

याआधी धर्मरावबाबा यांनी मुलीच्या बंडाबद्दल विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभं करणार आहेत. माझ्या जावयावर आणि मुलीवर विश्वास ठेवू नका. या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे.”

त्यानंतर याच कार्यक्रमात अजित पवारांनी बापासोबतच राहा, अशी भावनिक साद भाग्यश्री आत्राम यांना घातली होती. तरीही भाग्यश्री आत्राम ठाम राहिल्या.

'तुम्हीच शरद पवार गटात या'

भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या वडिलांची साथ का सोडली? याचं कारण सांगितलं.

त्या म्हणाल्या, " मी सर्वांसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत आहे. या मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा आहे. आदिवासींच्या समस्यांवर कोण बोलणार आहे? धर्मरावबाबा यांनी मला गाजर दाखवले. सूरजगड आणि वाडलापेठमध्ये रोजगार का दिले नाही. आपले मुलं काठी घेऊन 4-5 हजारात काम करणार का? शिकून पण पहारेकऱ्यांच्या नोकऱ्या देता.

मी गैरआदिवसी आहे, असं आता सांगतात. मला जिल्हा परिषदेत बसवलं तेव्हा जात दिसली नाही का? तुम्हाला माझी जात काढायचा अधिकार नाही. तुमच्याकडे दम असेल तर माझ्या मुलांना 30-40 हजार पगाराच्या नोकऱ्या द्या."

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बोलताना भाग्यश्री आत्राम.
फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बोलताना भाग्यश्री आत्राम.

भाग्यश्री पुढं म्हणाल्या की, बाबा कितीही काही बोलले तर आशीर्वाद समजून गोड मानून घेणार. पण त्यादिवशी लाडकी बहिण योजनेत माझ्याबद्दल काय बोलले? ते ऐकून वाईट वाटलं.

धरमराव बाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाला नदीत फेकून देण्याची भाषा केली होती. त्यावरून भाग्यश्री आत्राम यांनी ही नाराजी व्यक्त केली.

अजितदादा मला बापाला सोडून जाऊ नका असं म्हणाले. मी त्यांना विचारते, तुम्ही काय केलं? तुम्ही तेच केले. वाईट वाटत असेल तर तुम्हीच आमच्या शरद पवार यांच्याकडे परत या, असं भाग्यश्री म्हणाल्या.

आधीच काका-पुतण्यांचा राजकीय संघर्ष सुरू असताना आता लेकीच्या बंडामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघातली राजकीय गणितं कशी बदलली? या मतदारसंघात लढत कशी असू शकते? हेच पाहुयात.

पण, त्याआधी या मतदारसंघात आत्राम राजघराण्याचं कसं वर्चस्व राहिलंय? हा मतदारसंघ कसा आहे, यावर एक नजर टाकूयात.

200 किमी विस्तारलेला मतदारसंघ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अहेरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भोगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून अहेरी तालुक्यातल्या लगाम बोरीपासून सिरोंचामधल्या पातागुडमपर्यंत जे की छत्तीसगड सीमेजवळील महाराष्ट्रातील शेवटचं गाव आहे, तिथपर्यंत 200 किलोमीटरपर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे.

या मतदारसंघात एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि मुलचेरा हे पाच तालुके येतात. दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात हा मतदारसंघ येतो. तसेच नक्षलवाद्यांच्या सततच्या कारवायांमुळे हा मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो.

या मतदारसंघात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जंगलात सागवान आणि बांबू आहेत तसेच खनिज संपत्ती देखील आहे.

सर्वाधिक लोहखनिज या मतदारसंघात असून एटापल्ली तालुक्यात सुरजागड इथं लोहखनिजाची खाण देखील सुरू झाली आहे. अजूनही काही खाणी इथं प्रस्तावित असल्याची माहिती आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चुनखडी आहे.

2008 पर्यंत या मतदारसंघाला सिरोंचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखलं जायचं. पण, 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि या मतदारसंघाचं नाव अहेरी विधानसभा मतदारसंघ करण्यात आलं.

पूर्वी असलेले तालुके नवीन पुनर्रचनेतही कायम ठेवण्यात आले. एक-दोन गावं वगळता पुनर्रचनेत फारसा फरक पडला नाही. या मतदारसंघात गोंड आणि माडिया आदिवासी मतदार असून अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अनेक दशकांपासून आत्राम राजघराण्याचं वर्चस्व

अहेरी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. धर्मरावबाबा आत्राम यांच्यामुळे तिथं काँग्रेसची पाळेमुळं घट्ट झाली होती.

पक्ष कोणताही असो पण अहेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण नेहमी आत्राम राजघराण्याभोवतीच फिरत राहिलं.

राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली होती. राजे विश्वेश्वरराव महाराज हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदारही होते.

धर्मरावबाबा आत्राम

फोटो स्रोत, Facebook/Dharamrao Bhagwantrao Atram

फोटो कॅप्शन, धर्मरावबाबा आत्राम

विश्वेश्वरराव महाराज वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते आणि त्यांनी नेहमी काँग्रेसवर टीका केली.

त्यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी काँग्रेसनं अनेक प्रयत्न केलं. त्यांच्यासाठी स्वतः शंकरराव चव्हाण अहेरीला जाऊन 'राजेंना मंत्रिमंडळात घेतो, तुम्ही आमच्या पक्षात या' असं म्हणाले होते. पण, राजे विश्वेश्वरराव यांनी त्यांची भूमिका बदलली नाही.

त्यांच्या काळात वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन पेटलं होतं. विश्वेश्वरराव महाराज वेगळ्या विदर्भासाठी आग्रही होते. त्यांच्या काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात सरपंचपदाच्या निवडणुका होत नव्हत्या. महाराजांनी सांगितलं की लोक त्यांना सरपंच म्हणून निवडून द्यायचे.

कोणी राजेंना विरोध करून ग्रामपंचायत निवडणुकीत उभं राहिलं की तो हमखास पडायचा, असं संतोष मद्दीवार यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

संतोष मद्दीवार यांचे वडील डॉ. शंकरराव मद्दीवार हे अहेरीचे 25 वर्षं सरपंच होते. डॉ. शंकररावांनी राजे विश्वेश्वरराव यांच्यासोबत देखील काम केले आहे. संतोष मद्दीवार यांनी अहेरीचं राजकारण जवळून पाहिलं आहे.

संतोष मद्दीवार यांनी आत्राम राजघराण्याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यानुसार, विश्वेश्वरराव महाराजांनंतर त्यांचा मुलगा राजे सत्यवानराव यांनी आमदारकीची निवडणूक लढवली.

1980 च्या विधानसभा निवडणुकीत नागविदर्भ आंदोलन समितीकडून सत्यवान राजे उभे होते. काँग्रेसनं त्यांच्याविरोधात पेंटारामा तलांडी या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती.

पण, निवडणूक अर्ज भरताना काही चुका झाल्या; त्यामुळे सत्यवानराजेंचा अर्ज बाद झाला. त्यामुळे पेंटारामा तलांडी बिनविरोध निवडून आले होते. तसेच ते काँग्रेसचे बिनविरोध निवडून येणारे पहिले आमदार ठरले होते.

भावा-भावांमध्ये राजकीय लढाई

इतके दिवस मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला शेवटी आत्राम राजघराण्याचं वर्चस्व असलेल्या अहेरीत पेंटारामा यांच्या स्वरूपानं प्रवेश करता आला होता. पण, पुढच्या निवडणुकीत ही जागा कायम राखणं त्यांच्यासाठी आव्हान होतं.

काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात अयशस्वी ठरला आणि सत्यवान महाराज यांनी पुन्हा एकदा अहेरी विधानसभा मतदारसंघाची सत्ता राजघराण्याकडे खेचून आणली.

पण, मतदारसंघात एकदा का होईना आपला विजय झाला. त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. काँग्रेसनं या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले.

शेवटी काँग्रेसनं 1990 ला राजे विश्वेश्वरराव यांचे पुतणे आणि राजे सत्यवानराव यांचे चुलत भाऊ धर्मरावबाबा आत्राम यांनाच मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला.

काका आणि चुलतभावाच्या विरोधात जात धर्मरावबाबा आत्राम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

1990 ला धर्मरावबाबा आत्राम आणि राजे सत्यवानराव या दोन्ही भावांमध्ये लढत झाली. धर्मरावबाबांनी ही जागा काँग्रेसला मिळवून दिली आणि राजे सत्यवानराव यांचा पराभव झाला.

इथूनच दोन्ही भावांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि सत्यवानराव यांनी या निवडणुकीचा वचपा पुढच्या निवडणुकीत काढला. सत्यवानरावांनी 1995 च्या निवडणुकीत धर्मरावबाबांचा पराभव केला.

यानंतर 1999 ला गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून धर्मरावबाबा निवडून आले. पुढे त्यांनी 2004 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते निवडूनही आले.

2009 ला पुन्हा सत्यवानराव विरुद्ध धर्मरावबाबा या दोन्ही भावांमध्ये संघर्ष होताच. पण, या विधानसभेच्या आखाड्यात तिसरा उमेदवार दीपक आत्राम यांनी रंगत वाढवली. सत्यवानराव आणि धर्मराव या दोन्ही भावंडांचा पराभव झाला आणि दीपक आत्राम अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आले.

मतदारसंघात भाजपचा प्रवेश आणि काका-पुतण्यांमध्ये राजकीय लढाई

या मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी 2014 ला राजे अंबरीशराव आत्राम जे सत्यवानरावांचे पुत्र आहेत त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं आणि इथूनच काका-पुतण्यांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. अंबरीशरावांनी मोदी लाटेत काका धर्मरावबाबांचा पराभव केला.

विदेशातून शिक्षण घेऊन आलेले राजे आमदार झाले. राज्यमंत्रिपद देखील मिळालं. पण, 2019 च्या निवडणुकीत मात्र धर्मरावबाबांनी अंबरीशरावांचा पराभव करून त्यांचा मतदारसंघ परत मिळवला.

पक्ष फोडाफोडीमुळे समीकरणं कशी बदलली?

अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले. अजित पवार महायुतीत सामील झाले. अजित पवारांसोबत असलेले धर्मरावबाबा महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले.

पण, यामुळे अंबरीशराव आत्राम यांची अडचण झाली आहे.

सध्या अहेरीत विद्यमान आमदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी चर्चा आहे.

स्वतः धर्मरावबाबांनी या मतदारसंघात काम सुरू केलं आहे. मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांचा या मतदारसंघात प्रचारही सुरू झाला आहे. ही जागा आपल्यालाच मिळणार असंही धर्मरावबाबा बोलून दाखवतात.

दुसरीकडे भाजप आपल्याला तिकीट देईल की नाही हे माहिती नसल्यानं संभ्रमात गेलेले अंबरीशराव आत्राम पुन्हा एकदा सक्रिय झाले.

त्यांनीही मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली होती. पण तिकिट भाग्यश्री यांना मिळालं.

बाप-लेक-पुतण्या असा रंगणार संघर्ष?

दुसरीकडे अंबरीशराव आत्राम देखील महायुतीत तिकीट मिळालं नाही, तरी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून ते कार्यकर्त्यांच्या सभा घेत असल्याचं जेष्ठ पत्रकार महेश तिवारी सांगतात.

महेश तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी विधानसभा मतदारसंघातून पत्रकारिता करत आहेत.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "आता या मतदारसंघात बाप-लेक-पुतण्या अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मुलगी विरुद्ध वडील अशी महाराष्ट्रातली ही पहिलीच लढत असणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असेल."

भाग्यश्री आत्राम उमेदवार म्हणून कशा असतील हे समजून घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.

दैनिक सकाळचे गडचिरोलीस्थित पत्रकार मिलिंद उमरे यांनी भाग्यश्री आत्राम यांच्या राजकीय कारकीर्दीचं विश्लेषण करताना म्हटलं, "भाग्यश्री आत्राम यांच्याकडे वडिलांपेक्षा अनुभव कमी आहे. जनसंपर्कही त्यामानाने कमी आहे."

अंबरीशराव आत्राम

फोटो स्रोत, facebook/Raje Ambreish Rao

फोटो कॅप्शन, अंबरीशराव आत्राम

पण भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांचे कार्यकर्ते स्वीकारतील की नाही हा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं उमरेंना वाटतं.

"अजित पवारांकडे गेलेल्या नेत्याच्या मुलीला तुम्ही पक्षात घेऊन उमेदवारी देत आहात. हे कार्यकर्त्यांना रुचणारं नाही. काही कार्यकर्ते तशी खंतही बोलून दाखवतात," असं उमरे सांगतात.

अंबरीशराव आत्राम विरुद्ध धर्मरावबाबा यांच्यात कशी लढत होईल याबद्दल विचारले असता उमरे सांगतात, 'अंबरीशराव आत्राम देखील धर्मरावबाबांच्या तुलनेत अनुभवी नाहीत.'

"जर अंबरीशराव हे भाजपच्या पाठिंब्याशिवाय उभे राहिले तर अपक्ष म्हणून धर्मरावबाबांना कितपत टक्कर देतील हा प्रश्न देखील आहे," असं उमरे म्हणतात.

कोण आहेत भाग्यश्री आत्राम?

गेल्या अनेक वर्षांपासून भाग्यश्री या वडिलांसोबत काम करतात. त्यामुळे त्यांच्याच तालमीत मुलगी भाग्यश्री आत्राम यांची राजकीय जडणघडण झाली. जिल्हा परिषदेच्या राजकारणातून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

भाग्यश्री आत्राम

फोटो स्रोत, Facebook/Bhagyashree Atram

फोटो कॅप्शन, भाग्यश्री आत्राम

बांधकाम सभापती म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही मिळालं होतं. सध्या त्या गोंडवाना विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत.

या मतदारसंघात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे कोणते?

अहेरी संवेदनशील आणि दुर्गम भागात वसलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे इथं आरोग्याच्या समस्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आदिवासी दाम्पत्याला 15 किलोमीटर पायी प्रवास करावा लागला होता.

दुसरीकडे इथं पायाभूत सुविधांचा मुद्दा आहे. दरवर्षी पावसाळ्यात पर्लकोटा नदीला पूर आला की याच मतदारसंघात येणाऱ्या भामरागड तालुक्याच्या उर्वरीत गडचिरोलीपासून संपर्क तुटतो. गावंच्या गावं पाण्याखाली जातात.

दुसरीकडे सुरजागड लोह प्रकल्पावरून आदिवासींमध्ये रोष दिसतोय. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी 255 दिवस आंदोलनही झालं होतं.

आदिवासींच्या रिक्त पदांचा मुद्दा आहे, बरोजगारी आहे, यामुळे तरुणांमध्येही रोष दिसतोय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)