गडचिरोली : 'ते गुरांना पाणी पाजायला शेतात गेले आणि वाघाने त्यांच्यावर हल्ला केला'

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
गडचिरोली जिल्ह्यात सध्या 'टय्या' नावाच्या वाघाची दहशत आहे. गेल्या दीड महिन्यात या वाघाच्या हल्ल्यात 7 जण ठार झालेत. आतापर्यंत जवळपास 15 जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे.
वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. मात्र अजूनही वाघ वनविभागाच्या हाती लागलेला नाही.
गडचिरोली शहरापासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेप्रा गावात वाघाच्या हल्ल्यात गणपत भांडेकर यांचा जीव गेला. 11 सप्टेंबरला गुरांची तहान भागवण्यासाठी गावाशेजाराच्या तलावावर ते गेले होते. झुडपातच त्यांच्यावर वाघाने झडप घातली.
गणपत यांच्या पत्नी सुंदनाबाई भांडेकर सांगतात, "गुरांना पाणी पाजायला ते शेतात गेले होते. झुडपात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने हल्ला करतांना सोबत असणाऱ्यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड केली. गावकऱ्यांना बोलावले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघ त्यांना घेऊन झुडपात निघून गेला."
परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे वन विभागाने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास सक्ती केली आहे. शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही, असं सुनंदाबाई म्हणतात.
त्या सांगतात, "शेतात धान पीक आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गायी- म्हशी आहेत. त्यांच्या चाऱ्यासाठी शेतात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा."
शासनाने भरपाई द्यावी. मालक गेल्यामुळे शेतात जाण्याची हिम्मत होत नाही. शेतमाल आहे पण आता शेतात जाण्याचा विचार करू शकत नाही, असंही त्या म्हणतात.
जेप्रा गावाला लागूनच घुंडेशिवनी गाव आहे. 6 सप्टेंबरला गावातील नामदेव गुडी या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला.
पोळ्याचा दिवस होता. बैलांना चारण्यासाठी नामदेवसह चार जण शेताकडे गेले. तिथे त्यांच्यावर वाघाने हल्ला केला.
नामदेव यांच्या पत्नी पार्वताबाई गुडी सांगतात, "दररोज बैल चारायला जायचे तसेच ते त्यादिवशीही शेतात गेले. त्यादिवशी त्यांचा उपवास होता. नारळ पाणी आणू ठेव, असं ते म्हणाले होते. पण शेतात वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने पंजा मारला, पाठीवर नखानी ओरबडले होते."

याप्रकरणी वनविभागाने घरातील एका सदस्याला नोकरीवर आणि भरपाईचं आश्वासन दिलं आहे. घराची परिस्थिती चांगली नाही. आता पोटालाही चिमटा पडलाय. यापूर्वी वाघाची तेवढी भीती नव्हती. पण आता वाघाचा बंदोबस्त करावा, आम्हाला शेतात जाता येत नाही. शेळ्यांचे, बैलाचे हाल आहेत, असं त्या पुढे सांगतात.
या दोघांसह 15 जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेलाय. मात्र अनेकांची वाघाच्या तावडीतून सुटकाही झाली.
त्यात राजगाटा माल या गावातील शेतकरी जीवन जुवारे आहेत. त्यांची वाघाच्या तावडीतून सुटका झाली. शेतात जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. ते जिवंत असले तरी हल्ल्यात त्यांच्या मानेवर, पाठीवर गंभीर जखमा झाल्यात. वाघ त्यांच्या पाठीवर बसल्यामुळे त्यांना उभं राहण्यास अडचणी येतात. उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. वनविभागाने उपचारासाठी मदत करावी अशी अपेक्षा त्यांना आहे.

जीवन जुवारे सांगतात, "आम्ही दोघे जण रस्त्याने बैल घेऊन जात होतो. वाघ आमचा पाठलाग करत होता. आम्ही सतर्क नव्हतो. आम्ही दोघे जण सोबत असताना वाघाने झुडपातून माझ्यावर हल्ला केला. मी रक्तबंबाळ झालो. त्यानंतर मला काहीच माहिती नाही.
वाघ लांबचित होता. तो लपत लपत आला. जवळच्याने वाघाला पळवून लावले. हिम्मत वाला माणूस सोबत असल्यामुळे माझी सुटका झाली. आता मला मदतीची गरज आहे."
वाघ जेरबंद करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतात जाऊ नये, असे स्थानिक प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र वन विभाग वाघाला पकडूच शकत नाही, असा आरोप गावकऱ्यांचा आहे.
ग्रामस्थ आनंदराव कुचरे यांच्या मते, "वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्यांचे जीव जाताहेत. वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाचे प्रयत्न अपुरे पडताहेत असा आरोप स्थानिकांकडून होतोय. वाघ जेरबंद होत नसेल तर ठार मारा अशी मागणी पुढे येऊ लागली लागली आहे."
त्यामुळे वनविभाग आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष पेटलाय. गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करताहेत. ठिय्या आंदोलन, जेल भरो आंदोलन करून गावकरी आपला संताप व्यक्त करताहेत.

आंदोलक विजय खरवडे सांगतात, "गेल्या दीड महिन्यापासून वनविभागाला नरभक्षक वाघाला पकडण्यात अपयश आलंय. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. नरभक्षक वाघाला ठार केले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना एकरी 50 हजार रुपये मोबदला देण्यात यावा."
वन विभागावर संथगतीचा आरोप होत असला तरी, वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडूनही प्रयत्न होत आहेत.
वाघबाधित क्षेत्रात वन विभागाच्यावतीने दिडशेहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत.

गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, दिभना, गोगाव, जेप्रा, पिपळ टोला, नवरगांव, दिलोडा, अमिर्झा, बोथेडा या गावांमधील आणि आसपासच्या गावांच्या जवळील सर्व 15 गावांना जंगलामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
वनविभागाने वाघाच्या शोधासाठी 100 ट्रॅप कॅमेरे लावले आहे. वाघाला आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी रेडे आणि बोकडही बांधून ठेवण्यात आले आहे.
सोबतच वाघाला पकडण्यासाठी रॅपीड रिस्पॉन्स पथक बोलावण्यात आले आहे. शुटरचीही मदत घेतली जात आहे.
उप वन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल सांगतात, "नागरिकांना ठार करणाऱ्यांना वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. आपण परिसरात 100 ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यामाध्यमातून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. एकदा सायटिंग झालं की आपण त्याला बेशुद्ध करून जेरबंद करू."
वडसा वनविभाग, FDCM ब्रह्मपुरी डिव्हिजन, गडचिरोली वनविभाग या तिन्ही डिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांचा वावर आहे.
गडचिरोलीला लागूनच ब्रम्हपूरी आणि ताडोबा अंधारी प्रकल्प आहे. ब्रम्हपुरी प्रकल्पातून वडसा वनविभागात 20 च्या जवळपास वाघ आले आहेत. तर गडचिरोली वनविभागातही 5 ते 6 च्या वर वाघ आहेत.
साधारण 2012 पासून या भागात 30 वाघ असण्याची शक्यता आहे.
धर्मवीर सालविठ्ठल पुढे सांगतात, "वाघ आणि मानव दोन्ही जगले पाहिजे अशी भावना वन्यजीवप्रेमींची आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठा प्रश्न आहे. व्याघ्र अधिवासामध्ये वाघांची संख्या वाढते आहे. त्यांच्याबरोबर वाघांच्या संचार मार्गाचे, व्याघ्र अधिवसाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असं वन्यजीव प्रेमींचे मत आहे."
राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांच्या मते, "शेतकऱ्यांना ठार करणारा वाघ वनविभागाला हुलकावणी देतोय. वनविभागाच्या कॅमेऱ्यात या वाघाव्यतिरिक्त इतर वाघांच्या पायांचे ठसे आणि इमेजेस आढळून आल्या आहेत. त्यामुळं 'टय्या' वाघ नेमका का सापडत नाही याचा शोध घेऊन नंतर त्याला जेरबंद करणे, हे वनविभागापुढे मोठं आव्हान आहे. मात्र तोपर्यंत आणखी नागरिकांचे बळी जाणार नाही याचीही खबरदारी वनविभागाला घ्यावी लागणार आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








