भोकरदन : रावसाहेब दानवेंच्या लोकसभेतील पराभवानंतर आता मुलाचे भवितव्य काय?

रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे

फोटो स्रोत, Facebook/Raosaheb Patil Danve

फोटो कॅप्शन, रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे
    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ चांगलाच गाजला. यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एका व्यक्तीला आपल्या पायाने बाजूला करताना दिसत आहेत. या व्हीडिओची खूप चर्चा झाली. विरोधकांनी म्हटलं की 'रावसाहेब दानवे स्वतःच्या कार्यकर्त्यालाच असं लाथ मारू शकत असतील तर इतरांचं काय', यावर त्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिले आणि छोट्या गोष्टीचं मोठ्या गोष्टीत रूपांतर झाल्याचं त्यांनी म्हटलं.

अशा अनेक गोष्टींची चर्चा होताना या विधानसभा निवडणुकीत होत आहे. पण यात एका मतदारसंघाची चर्चा विशेष होताना दिसत आहे. तो मतदारसंघ म्हणजे जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघ जरांगे फॅक्टर आणि रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे कारण या ठिकाणाहून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे निवडणुकीत उभे आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर राजकीय पटलावर जालना जिल्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

चंद्रकांत दानवे यांनी तीन वेळा तर संतोष दानवे यांनी दोन वेळा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही लढत भाजपच्या रावसाहेब दानवेंसाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण मागील 35 वर्षापासून आमदार, खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केलेले रावसाहेब दानवे यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.

सलग पाचवेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

रावसाहेब दानवेंच्या पराभवानंतर त्यांच्या विरोधकांनी आता आपला मोर्चा त्यांचे सुपुत्र संतोष दानवे यांच्या विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे.

मागील दहा वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यावर्षी सुद्धा रिंगणात उतरले आहेत.

खरंतर रावसाहेब दानवेंप्रमाणे शरद पवार यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. शरद पवार स्वतः आक्रमक प्रचार करताना दिसून येत आहेत.

लोकसभेला भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदार संघामधून रावसाहेब दानवे यांना अपेक्षित मतदान झाले नाही. हा पराभव रावसाहेब दानवे यांच्या चांगलांच जिव्हारी लागला.

अर्थात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना बसली हेच लोकसभेच्या निकालातून दिसून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

त्यात मनोज जरांगे यांची निवडणुकीतील माघार ही रावसाहेब दानवेंची डोकेदुखी वाढवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागलेल्या रावसाहेब दानवेंचे सुपुत्र संतोष दानवेंसाठी ही निवडणूक कशी असेल?

शरद पवार गटाच्या चंद्रकांत दानवेंचे तगडं आव्हान समोर असलेल्या आणि रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत जरांगे फॅक्टर कितपत प्रभावी ठरेल? हे सविस्तरपणे या लेखातून आपण समजून घेऊयात.

भोकरदनचा राजकीय इतिहास

जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघात जाफराबाद तालुका आणि भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगांव (रेणूकाई), सिपोराबाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो.

या विधानसभा मतदार संघात 1980 साली झालेल्या निवडणुकीत भोकरदन मधून काँग्रेसचे उमेदवार रंगनाथ पाटील विजयी झाले होते. 1985 मध्ये काँग्रेसचे उमेदवार संतोष दसपुते विजयी झाले.

परंतु, 1990 मध्ये भाजपने रावसाहेब दानवे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्यावर्षीचा विजयाचा गुलाल रावसाहेब दानवेंनी उधळला. 1995 मध्ये पुन्हा एकदा भोकरदन विधानसभेतून रावसाहेब दानवेच विजयी झाले.

चंद्रकांत दानवे (डावीकडे) आणि संतोष दानवे (उजवीकडे)

1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विठ्ठलराव पाटील सपकाळ यांचा विजय झाला.

परंतु 2003 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी भाजपचे उमेदवार शिवाजीराव थोटे यांचा पराभव केला. 2009 मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांचाच विजय झाला.

परंतु 2014 साली देशात भाजपाची लाट आली आणि त्यावर्षी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी विधानसभेत भाजपचा झेंडा फडकवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील संतोष दानवे यांचाच विजय झाला.

रावसाहेब दानवेंच्या वादग्रस्त विधानांचा त्रास होऊ शकेल का?

यावर्षी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी म्हटलं आहे की, "रावसाहेब दानवे यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा आहे, त्यामुळे त्यांचे सुपुत्र असणं हेच संतोष दानवेंचं बलस्थान आहे. शिवाय संतोष दानवे यांच्या रूपात जिल्ह्याला शांत, संयमी आणि उच्चशिक्षित तरूण नेतृत्व मिळालं आहे."

"परंतु संतोष दानवे यांचे वडील रावसाहेब दानवे यांच्याकडून सतत होणारी वादग्रस्त विधानं आणि त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा याचा फटका देखील त्यांना या निवडणुकीत बसू शकतो," असंही पुढे ते म्हणाले.

"तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकात दानवेंचे वडील पुंडलिक दानवे यांची आजही जनतेच्या मनात असलेली चांगली प्रतिमा हे त्यांचं बलस्थान आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी व्यक्त केलं आहे.

रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात

फोटो स्रोत, Facebook/Raosaheb Patil Danve

फोटो कॅप्शन, रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भाजप नेते रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यामुळे तर नेहमी चर्चेत असतातच परंतु यावेळी ते एका व्हीडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांचा फोटो काढताना दानवे यांच्या शेजारी उभं असलेल्या एका कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला केले. या संपूर्ण घटनेमुळे दानवे टीकेचे धनी ठरले आहेत.

शिवाय संतोष दानवेंच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीच्या ताफ्यावर अज्ञातांकडून दगडफेक झाली.

हा हल्ला रावसाहेब दानवेंची मुलगी आशा पांडे यांच्या दगडवाडी गावात झाला. हा हल्ला रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केला आहे.

यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अनंत साळी सांगतात की, "ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या अशा घटनांमुळे भोकरदन मतदार संघातील निवडणूक रावसाहेब दानवे यांच्या विरोधात फिरू शकते, याचा फटका संतोष दानवेंना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही."

तर रावसाहेब दानवेंनी स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो असं ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

"चंद्रकांत दानवेंच्या तुलनेत संतोष दानवे हे स्थानिकांसाठी केलेल्या विकास कामांच्या बाबतीत खूप पुढे आहेत. भोकरदनमध्ये सिंचन आणि मुख्य रस्त्यांचा विकास यावर त्यांनी विशेष भर दिला. ही लढाई अटीतटीची असली तरी स्थानिकांचा कल संतोष दानवेंच्या बाजूने असल्याचा दिसून येतो," असं देशपांडे सांगतात.

"लोकसभेच्या पराभवानंतर रावसाहेब दानवेंनी त्यांचे सगळे कार्यकर्ते कार्यरत केले. भाजपशी संबंधित सगळ्या जुन्या आघाड्या, विविध संघटना कार्यरत केल्या. रावसाहेब दानवेंनी मतदार संघात प्रत्यक्ष फिरून, स्थानिकांशी संपर्क ठेवून लोकसभेवेळी असलेली नाराजी कमी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे." असंही पुढे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव दिसणार

संतोष दानवेंच्या प्रचारात प्रमुख भर हा लाडकी बहीण योजनेवरच दिला जात आहे. भोकरदन विधानसभा मतदार संघात लाडकी बहीण योजनेचा किती प्रभाव दिसणार याबद्दल बोलताना यावर बीबीसी मराठीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेमुळे लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला शहरी भागात 15 ते 20 टक्के महिलांची मतं महायुतीकडे जाऊ शकतात. परंतु ग्रामीण भागात लाडकी बहीण योजनेचा फार प्रभाव दिसेल असं वाटत नाही."

फाईल फोटो

भोकरदनमधील स्थानिकांचे प्रश्न

भोकरदन विधानसभा मतदार संघ हा सगळा सोयाबीन- कापूस उत्पादक पट्टा आहे. तिथल्या शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबिनचे भाव हे सध्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. हा दर 4300 ते 4500 रुपये प्रती क्विंटल इतका आहे.

शेतमालाला योग्य भाव मिळणे हा स्थानिकांचा महत्त्वाचा प्रश्न मानला जातो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर म्हणतात, "भोकरदनसहीत संपूर्ण जालना जिल्ह्यात शेतमालाच्या हमी भावासोबतच शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न देखील गंभीर आहे."

जरांगे फॅक्टरचा प्रभाव

लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालला आणि त्याचे नुकसान भाजपला झाले हे निर्विवाद सत्य असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

ते सांगतात की "जरांगे फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रात चालला पण सर्वाधिक नुकसान हे भाजपलाच झाले. मुस्लीम व्होटिंग आणि जरांगेचे मतदान एकत्र न येता सुद्धा महाविकास आघाडीकडे वळले. याचे नुकसान भाजपलाच झाले."

मनोज जरांगे यांची निवडणुकीतील माघार ही रावसाहेब दानवेंची डोकेदुखी वाढवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फोटो स्रोत, Facebook/Santosh Raosaheb Danve

आता जरांगे फॅक्टर, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर होणाऱ्या भोकरदन विधानसभेतील निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.