अजित पवारांना भाजप आणि एकनाथ शिंदेंमुळे 'भूमिकांची कसरत' करावी लागतेय का?

फोटो स्रोत, ANI
- Author, डॉ. श्रीरंग गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचं यावेळी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, हिंदुत्त्ववादी पक्षांसोबत राहूनही पुरोगामी भूमिकेला चिकटून राहण्याची त्यांची कसरत.
गेले काही दिवस अजित पवारांचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांमधील नेत्यांकडून जेव्हा कधी धर्माधारित मतं व्यक्त केली जातात, तेव्हा तेव्हा अजित पवार आपलं मत व्यक्त करताना पुरोगामी भूमिकेला धरून राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, यातून महायुतीतल्या पक्षांची विचारधारेच्या पातळीवरून कसरत स्पष्टपणे दिसून येते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच केलेल्या एका वक्तव्याच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा दिसून आलं.
‘बटेंगे तो कटेंगे’ ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली घोषणा हरियाणातील निवडणुकीच्या वेळी चर्चेचा विषय ठरली होती. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रचारक असलेल्या योगींनी महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्येही ही घोषणा दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेला महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ‘व्हायरल’ केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावरून याबाबतची पोस्ट शेअर केली.

फोटो स्रोत, Getty Images
हिंदुत्त्ववादी विचार सातत्यानं मांडणारे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला.
त्यानंतर राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र याविरोधात भूमिका घेतली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अगदी बहरात आला असताना “अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. इतर राज्यांमध्ये ते चालू शकतं. महाराष्ट्रातील जनतेनं आजवर पुरोगामीपण जपलं आहे. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे. बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथं येऊन वेगळी वक्तव्यं करू नयेत,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून नाराजी
दोन-अडीच वर्षांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर भाजपनं अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र, तेच नवाब मलिक आता महायुतीचे मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत. नवाब मलिक सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
धर्माधारित राजकीय वक्तव्यांवर नवाब मलिक म्हणाले की, "आपली शक्ती एकात्मतेत आहे आणि एकीनं राहण्यातच फायदा आहे. आमची विचारधारा स्पष्ट आहे. धर्मावर आधारित राजकारण आम्हाला मान्य नाही. निवडणुकीत अशी विधानं करून फक्त चर्चा होते. एकता हाच सर्वात मोठा मंत्र आहे. नकारात्मक राजकारण केलं, तर जनता स्वीकारत नाहीत, हे उत्तर प्रदेशातील निकालावरून दिसून आलं आहे.
“महाराष्ट्रात विभाजनाच्या राजकारणाविरोधात अजित पवार नेहमीच उभे राहतात. फुटीचं राजकारण करू नये, असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. फुटीचं राजकारण देशाच्या आणि जनतेच्या हिताचं नाही. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे.”
याच नवाब मलिक यांचा प्रचार न करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. नवाब मलिकांवर दाऊदशी व्यवहार केल्याचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषीकडून मुंबईत नवाब मलिकांनी जागा विकत घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अजित पवारांनी मात्र ‘नवाब मलिक दाऊदला साथ देऊ शकत नाहीत’ म्हटलं.
"ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत, असे अनेक नेते मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले, वेगवेगळ्या पदांवर गेले," असंही अजित पवार ‘एनडीटीव्ही’शी बोलताना म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवाब मलिक निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सुरेश पाटील हे अधिकृत उमेदवार दिले आहेत.
भाजपने नवाब मलिक यांना पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तर नवाब मलिकांचा जोरदार प्रचार करण्याचं अजित पवारांनी ठरवलं आहे.
‘बारामती’बाबत अजित पवार सतर्क
एकीकडं या घडामोडी सुरू असताना दुसरीकडं अजित पवारांनी त्यांच्या स्वत:च्या बारामती मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सभा घेणं टाळलं आहे. भाजपचे हे तिघंही दिग्गज अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेताना दिसत नाहीत. पक्षानं अशा कुठल्याही सभांचं आयोजन केलेलं नाही.
याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे म्हणाले, “या अगोदरच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ आणि पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना कुठल्याही पद्धतीची ‘रिस्क’ घ्यायची नाहीये. ही निवडणूक जिंकून त्यांना ‘टायगर अभी जिंदा है’ सर्वांना दाखवायचं आहे. बारामतीत मुस्लिमांचं जवळपास 50 टक्के मतदान आहे आणि आता अजित पवार पाच मतांसाठीही तडजोड करायला तयार नाहीत.”
अजित पवारांच्या या भूमिकेमुळं महायुतीमध्ये मतभेद होतील का, असं विचारता महेश म्हात्रे म्हणाले, “नुकतंच माझं भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बोलणं झालं. ते म्हणाले, '1995 मध्ये आम्हाला अपक्षांची मदत लागली होती. तशीच आता लागणार आहे.' त्यामुळे भाजप अजित पवारांना दुखावेल, असं मला वाटत नाही.”


बारामतीचे मतदार लोकसभेप्रमाणं विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना कौल देणार नाहीत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पारड्यात मतं टाकतील, असं वाटत नाही का? असं विचारता म्हात्रे म्हणाले, “मी नुकताच बारामती मतदार संघाचा दौरा केला. लोकांची मतं जाणून घेतली. त्यानुसार लोकसभेला ‘ताई’ (सुप्रिया सुळे) आणि विधानसभेला ‘दादा’ (अजित पवार) असं आमचं ठरल्याचं लोकांनी मला सांगितलं. अजित पवार गेल्या वेळी बारामतीतून राज्यात विक्रमी मतांनी निवडून आले होते. यंदा त्याचं मताधिक्य फार तर 50 टक्क्यांनी घटेल, पण निवडून तेच येतील, अशी शक्यता मला दिसते.”
सध्याची भूमिका पाहता अजित पवार निवडणुकीनंतर पुन्हा शरद पवारांना जाऊन मिळतील का, असं विचारता म्हात्रे म्हणाले, “शरद पवारांची इनिंग 1967 पासून आजतागायत सुरू आहे. अजित पवार कायम प्रतीक्षेत राहिले. आता ते 65 वर्षांचे आहेत आणि पुढच्या निवडणुकीत सत्तरीचे होतील. मध्येच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना चाल दिली. त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या पवारांच्या स्वप्नामुळं अजित पवार त्यांच्यापासून दूर गेले. पण अजित पवार पुन्हा शरद पवारांकडं जाऊ शकतात. शेवटी खेळ सत्तेचा आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर बसू शकतात, तर मुख्यमंत्री पदाची वगैरे ऑफर मिळाल्यावर अजित पवार पुन्हा आपल्या काकांच्या मांडीवर का नाही बसणार?”
‘अजित पवारांनी परतीचे दोर कापलेले नाहीत’
याच प्रकारचं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही व्यक्त केलं. ते म्हणाले, “अजित पवारांनी परतीचे दोर कापलेले नाहीत. सध्या ते एखाद्या जबाबदार राज्यकर्त्याप्रमाणं वागत, बोलत आहेत. त्याचं स्वागतच करायला हवं. जरी ते महायुतीत सामील झाले असले, तरी ते शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या संस्कारात वाढलेले आहेत. पुरोगामी विचारांमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे. अजित पवार म्हणजे राणे नव्हे, जिकडं जाईल तिकडं चांगभलं! सत्तेत गेल्यापासून त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवून धरलं आहे.”
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या भाजपच्या घोषणांना अजित पवारांनी विरोध केला. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी केलेला हा ‘स्टंट’ आहे का? असं विचारता ते म्हणाले, “असं बिल्कुल नाही. मधल्या काळात राज्यात काही ठिकाणी धार्मिक हिंसाचार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी हिंदुत्त्ववादी भूमिका घेतली. अजित पवारांनी तेव्हाही वेगळी भूमिका घेतली. साताऱ्यातील पुसेसावळी गावात अचानक हिंसाचार होऊन एकाचा बळी गेला होता. अजित पवारांनी त्या गावात जाऊन संबंधित कुटुंबाचं सांत्वन केलं होतं. गावकऱ्यांना शांततेचं आवाहन करून कायदा व सुव्यवस्था पूर्ववत केली होती. विशाळगडावरील दंगल प्रकरणानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पीडितांना आश्वस्त केलं होतं. नुकसानग्रस्तांना सरकारच्या वती आर्थिक मदत केली होती.
“अजित पवारांच्याच पुढाकारानं अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना होऊन त्यासाठी सुमारे सात कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पातही पवारांनी त्यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला वाढीव निधी देण्याची तरतूद केली.”

फोटो स्रोत, ANI
अगदी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून अल्पसंख्याकांसाठी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षानं काम केलं. आपण धर्मनिरपेक्षतेची विचारधारा सोडली नाही, असं वारंवार स्पष्ट केलं. तरीही मुस्लीम मतदार त्यांच्यापासून दूर गेल्याचं निकालातून दिसलं. त्याचा फायदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचंही दिसून आलं.
महाराष्ट्रातील 12 टक्क्यांहून अधिक मुस्लिम समाजाला निवडणुकीमध्ये चुचकारण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनीच अजित पवारांना अशी भूमिका घेण्यास सांगितलं आहे, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. तर दुसरीकडं त्यांच्या या भूमिकेमुळं महायुतीत मतभेद होऊ शकतात, असंही काही विश्लेषकांचं मत आहे.
त्याबाबत ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर म्हणाले, “महायुतीतील मित्र पक्षांमध्ये यावरून मतभेद असूही शकतात. पण, ज्यानं-त्यानं आपापले मतदार सांभाळावेत, असंच ठरलेलं दिसतंय. अल्पसंख्याक समाज हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. त्यामुळं आपलाच पक्ष मूळ आहे, हे सांगणाऱ्या अजित पवारांना हा मतदार राखणं फार महत्त्वाचं वाटतं. कारण या निवडणुकीत जागा कमी झाल्या, तर त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं महायुतीतील प्रत्येक पक्षानं आपापली विचारधारा कायम ठेऊन अधिकाधिक उमेदवार निवडून आणावेत, असं सहमतीनं ठरलं असणार. कारण लोकसभेत मुस्लिम मतदारांनी एकजुटीनं मतदान केल्यानं अनेक उमेदवार पडल्याचा अनुभव भाजपनं नुकताच घेतला आहे.
“त्यामुळे आता सर्व जातीजमातींमध्ये विभागलेला हिंदु तरी एकत्र यावा, यासाठी भाजपनं ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा केलेली आहे. त्यातून कधी कधी अजित पवार भाजपला जड वाटत असले, तरी बहुमताच्या जुळणीसाठी ते त्यांना सांभाळून घेत आहेत. खरं तर आता विचारधारा वगैरे कालबाह्य झाली आहे. कुणीही कुणासोबत जाऊ शकतं, हे राजकारण महाराष्ट्रातील जनता अनुभवते आहेच. पण या सगळ्या राजकीय साठमारीत विकास, प्रगतीकडं दुर्लक्ष होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)











