सोयाबीनचे बाजारभाव एवढे का पडलेत? पुढच्या काही दिवसांत ते किती वाढतील?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एकीकडे महाराष्ट्रात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे सोयाबीनच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी चिंतेत आहे.
हमीभावापेक्षाही कमी दरानं शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे.
2024-25 साठी केंद्र सरकारनं सोयाबीनला प्रती क्विंटल 4,892 रुपये इतका हमीभाव जाहीर केला.
पण, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत होता. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात 20 टक्क्यांची वाढ केली होती. त्याचा परिणाम लगेच बाजारावर जाणवला आणि सोयाबीनच्या दरात 200-300 रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली.
पण नंतर हे भाव परत घसरत गेले. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी 3,750 ते 4,100 रुपये दर मिळाला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
याचा अर्थ हमीभावापेक्षा सरासरी 700-1000 रुपये प्रती क्विंटल कमी दरानं शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे.
या बातमीत आपण सोयाबीनचे सध्याचे दर काय आहेत, हे दर का घसरलेत आणि पुढच्या काही दिवसांत त्यात किती वाढ होऊ शकते, याची माहिती पाहणार आहे.


डॉ. सचिन मोरे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत. सोयाबीन या शेतमालावर त्यांचा अभ्यास आहे.
बीबीसी मराठीनं सोयाबीनच्या दराविषयी त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. ती इथं आपण 5 प्रश्नं आणि 5 उत्तरांच्या स्वरुपात जाणून घेऊया.
प्रश्न 1- सोयाबीनचे दर एवढे का कोसळलेत? काय कारणं आहेत?
डॉ. सचिन मोरे-“सोयाबीनचे दर हे पुरवठा आणि मागणीवर निश्चित झालेले असतात. सोयाबीनचे जे पुरवठा करणारे देश आहेत त्यामध्ये ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना हे महत्त्वाचे तीन देश आहेत. या तीन देशांमध्ये 2024-25 मध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झालेलं आहे. जागतिक पातळीवर 350 मिलियन मेट्रिक टन सोयाबीनचं असायचं ते यावेळेस 394 मिलियन मेट्रिक टन झालेलं आहे. त्याच्यामुळे सोयाबीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
"दुसरं, सोयाबीनचे मागणी करणारे जे देश आहे, ज्यामध्ये चीनकडून एकूण उत्पादनाच्या 65 % मागणी होत असते. तर ती यावर्षी किंवा गेल्या 5 वर्षांपासून स्थिर आहे. 90 ते 100 मिलियन मेट्रिक टन एवढी ही मागणी आहे. यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे कमी झालेले आहेत आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा झालेला आहे.”

फोटो स्रोत, kiran sakle
सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. जगभरातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत भारतात सोयाबीनचं 3% उत्पादन घेतलं जातं. यंदा देशातील सोयाबीनचं उत्पादन 6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात सरासरी सोयाबीनचं लागवडीखालील क्षेत्र 41 लाख हेक्टर असतं. पण, यंदा 51 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. अशास्थितीत, यंदा सोयाबीनला जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो?
प्रश्न 2- भारतात यंदा सोयाबीनला जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो?
डॉ. सचिन मोरे- “या हंगामात सोयाबीन आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त 3300 ते 3500 प्रती क्विंटल राहणार आहे . त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसणार आहे. भारतीय बाजारपेठेत खुली बाजारपेठ आजसारखीच राहिली तर हा दर जास्तीत जास्त 4700 ते 4800 पर्यंत जाईल.
“साधारणत: 15 डिसेंबरपर्यंत हमीभावानं सोयाबीनची खरेदी होऊ शकते आणि खुल्या बाजारपेठेतही हमीभावापर्यंत जाण्यासाठी आपल्याला बरीच वाट बघावी लागू शकते. माझ्या अंदाजानुसार, जानेवारी 2025 ची वाट आपल्याला बघावी लागू शकते.”

फोटो स्रोत, shrikant bangale
प्रश्न-3 सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कमी ओढा दिसून येत आहे. यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
डॉ. सचिन मोरे- “15 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात 209 खरेदी केंद्र ही केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केलेली आहेत. त्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आणि आपला शेतमाल विकण्यासाठी शेतकरी निरुत्साही आहेत. यामध्ये दोन कारणं आहेत.
"हे जे खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या शेतापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहेत. दुसरं, तिथं आपला माल विकल्यानंतर त्याची किंमत आपल्याला कधी मिळेल याची अजूनही शेतकऱ्यांना शाश्वती नाहीये. यामुळे शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्राकडे कल वाढत नाहीये."

फोटो स्रोत, kiran sakle
प्रश्न-4 गेल्यावर्षीच्या सोयाबीनला अधिक दर आणि यंदाच्या सोयाबीनला कमी दर मिळाल्याचं शेतकरी सांगत आहे. असं का होत आहे?
डॉ. सचिन मोरे- “सोयाबीनच्या काढणीच्या काळामध्ये पाऊस असल्यामुळे सोयाबीनची जी प्रत आहे तिला थोडसं नुकसान झालेलं आहे. थोडसं डागी सोयाबीन आलेलं आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये जेवढी आर्द्रता असली पाहिजे त्याच्यापेक्षा ते 15 टक्क्यापर्यंत जास्त आहे.
"त्यामुळे व्यापाऱ्यांची यावर्षीच्या सोयाबीनपेक्षा गेल्यावर्षीच्या स्टॉकमधील सोयाबीनला जास्त पसंती आहे. आर्द्रतेमुळे सोयाबीनला प्रती क्विंटल 300 ते 400 रुपयांचा फटका बसत आहे."

फोटो स्रोत, KIRAN SAKLE
प्रश्न-5 शेतकऱ्यांना विद्यापीठाकडून 3 टप्प्यांमध्ये सोयाबीन विकण्याचा सल्ला दिता जातो. त्याविषयी थोडक्यात सांगा.
डॉ. सचिन मोरे- “सोयाबीनचा पहिला टप्पा हा सोयाबीन काढणीपश्चात मजुरांचे पैसे देण्यासाठी किंवा आर्थिक गरजांसाठी वन थर्ड सोयाबीन जवळच्या बाजारपेठेत किंवा शासनाच्या खरेदी केंद्रात विकली पाहिजे. सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता 31 डिसेंबर ते 31 जानेवारी यादरम्यान असते. आजूबाजूचे मार्केट लातूर, वाशिम इथली परिस्थिती पाहून या महिन्यात दुसरा टप्पा विक्रीसाठी आणायचा.
"तिसरा टप्पा एप्रिल-मे महिन्यात विक्रीसाठी आणायचा. तीन टप्प्यात सोयाबीन विक्रीची व्यवस्था केली, तर आपल्याला कमी आणि अधिक दोन्ही भाव मिळून साधारणपणे उच्च भाव मिळू शकतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











