दुप्पट-तिप्पट परताव्याचा दावा करणाऱ्या पतसंस्थांमधील गुंतवणूक किती सुरक्षित असते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मराठवाड्यात आदर्श, ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम अर्बन, राजस्थानी अशा अनेक पतसंस्थांमधील घोटाळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
मराठवाड्यातील वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये 5 हजार कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली.
या घोटाळ्यांमुळे या पतसंस्थांमध्ये ज्यांनी पैसे ठेवले त्या लोकांचे पैसे अडकून पडले आहेत. अशा लोकांची संख्या हजारोंमध्ये आहे.
ठेवींवर अधिकचा म्हणजे 13 % व्याजदर मिळतोय म्हणून किंवा दामदुप्पट परतावा मिळतोय म्हणून लोकांनी या पतसंस्थांमध्ये पैसे ठेवले आणि आता या पतसंस्थांना टाळं लागलंय.
त्यामुळे पतसंस्थांमध्ये पैसे ठेवण्यापूर्वी काळजी घेणं, काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
या गोष्टी कोणत्या आहेत याचीच सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

फोटो स्रोत, shrikant bangale
दरम्यान, मराठवाड्यातील पतसंस्थांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा कसा झाला, त्याविषयीचा बीबीसी मराठीचा विशेष रिपोर्ट पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा.
पतसंस्थांमधील घोटाळ्यासंदर्भात बातमी करताना जे काही प्रश्न उपस्थित झाले, त्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही सहकारी बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याशी संपर्क साधला.
पतसंस्थांचं गावोगावी पेव का फुटलंय?
सध्या महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये पतसंस्थेची कार्यालयं स्थापन झालेली दिसून येतात. पण, पतसंस्थांचं पेव फुटण्यामागची कारणं काय आहेत?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
याविषयी बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले, "पतसंस्था नोंदणी करण्यासाठी लागणारी रक्कम ज्याला आपण एंट्री पॉईंट नॉर्म्स म्हणतो ती इतकी कमी आहे की हा पैसे जमवणं सहज शक्य असल्यामुळे सर्व ठिकाणी पतसंस्थांचं पेव फुटलेलं दिसतं. एकेका गावामध्ये 4-4, 5-5 पतसंस्था दिसतात.
"एखाद्या बँकेला शाखा उघडायची असेल तर त्याला 2 कोटी रुपये भांडवल लागतं. इथं मात्र 1 लाख रुपयामध्ये तुम्ही पतसंस्था उघडू शकता. 1 लाख रुपये गावपातळीवर जमा करणं सहज शक्य आहे."

फोटो स्रोत, shrikant bangale
देशभरात नोंदणीकृत 613 पैकी तब्बल 317 ‘मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ज महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारीतील पतसंस्थांचा विचार केल्यास महाराष्ट्रात नागरी/ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्था 13 हजार 412 आहेत.
यापैकी 8 हजार 986 पतसंस्था नफ्यात असून 4 हजार 426 पतसंस्था तोट्यात आहेत. पण एखादी पतसंस्था अडचणीत केव्हा येते?
अनास्कर सांगतात, “प्रत्येक पतसंस्था आलेल्या ठेवींचं कर्जात वाटप करत असते. ते 30 % रक्कम स्वत:कडे ठेवून ते 70 % रक्कम वाटत असतात. कर्जानं वाटलेली रक्कम परत आली तरच ती रक्कम ठेवीदारांना परत मिळते. पण कर्जवाटपातच भ्रष्टाचार होत असेल, तारण न घेता कर्ज वाटली जात असतील तर कालांतरानं ही कर्ज बुडीत होतात आणि ठेवीदारांचे पैसे अडचणीत येतात.”

जास्त व्याजदर, पण गुंतवणूक किती सुरक्षित?
व्याजदर जास्त भेटत असल्यामुळे या पतसंस्थांमध्ये पैसे ठेवल्याचं अनेकांनी बीबीसी मराठीला सांगितलं. पण, जास्त व्याजदर जिथं मिळतो तिथली गुंतवणूक किती सुरक्षित असते?
विद्याधर अनास्कर सांगतात, “ठेवी ठेवताना त्याचा ठेवीवरील व्याजदर विचारायचा नाही. तर कर्जावरील व्याजदर विचारायचा. जिथं जास्त व्याजदरानं कर्ज दिलं जातं त्या पतसंस्थेमधील गुंतवणूक धोकादायक आहे. कारण जास्त व्याजानं दिलेलं कर्ज हे परत येत नाही. कारण ते फेडण्याकरता तेवढं उत्पन्न त्या पैशांतून येत नाही.
"समजा तुम्ही 22 टक्क्यांनी कर्ज दिलं, तर त्याला व्यवसाय करायला 6 टक्के पैसे लागतात. याचा अर्थ त्याला 28 टक्क्यांनी नफा कमवावा लागतो. आणि 28 टक्के इतका निव्वळ नफा असलेला कुठलाही व्यवसाय बाजारात नाहीये. त्यामुळे जास्त व्याजदरानं घेतलेली कर्ज बुडतातच," असं अनास्कर सांगतात.

फोटो स्रोत, dnyanradhamultistate.com
पतसंस्थांमध्ये पैसे ठेवण्यापूर्वी ठेवीदारांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? या प्रश्नावर बोलताना अनास्कर सांगतात, “तुम्ही तीन-चार निकष लावले पाहिजेत. ती पतसंस्था सतत तीन वर्षं नफ्यामध्ये आहेत का. त्या पतसंस्थेचं थकबाकीचं, एनपीए म्हणजे अनुत्पादक कर्जाचं प्रमाण किती आहे, त्याचं प्रमाण धोक्याच्या पातळीवर गेलंय का, ही बॅलन्सशीट बघूनच आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे.”
“एकाच ठिकाणी ठेव न ठेवता तुम्ही जर अनेक ठिकाणी ठेव ठेवाल, कुटुंबातील वेगवेगळ्या नावानं ठेवी ठेवाल, तर जेवढी ठेव रक्कम कमी, तेवढी त्याची सुरक्षितता जास्त, अशाप्रकारे तुमची ठेवी सुरक्षित करण्याबरोबर तुम्हाला व्याजाचा जास्त मोबदला पतसंस्थेमध्ये मिळवता येईल.”
जास्तीत जास्त किती व्याजदराची अपेक्षा ठेवावी?
ठेवींवर जास्तीत जास्त व्याजदर मिळण्याची अपेक्षा लोक बाळगतात. त्यामुळे मग ठेवींवर किती व्याजदाराची अपेक्षा बाळगायला हवी, याविषयी काही ठोकताळे आहेत का?
अनास्कर सांगतात, “बाजारात जो काही दर चालू आहे त्याप्रमाणे मला मोबदला मिळाला पाहिजे याला रिझनेबल रिटर्न म्हणतात.
“जिथं तुम्हाला रिझनेबल रिटर्न आहे, ठेवीवरचा व्याजदर 8 टक्के असेल आणि कुठे तुम्हाला 9 टक्के किंवा एखादा, दीड टक्के जास्त मिळाला तर ठेवी ठेवायला हरकत नाही. पण, 13,14,15 टक्क्यानं तुम्हाला कुणी व्याज देत असेल तर याचा अर्थ ती पतसंस्था लवकरच अडचणीत येणार आहे आणि तुमचे पैसे बुडणार हे सत्य तुम्हाला विसरता येणार नाही.”
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











