‘मुलगा गेला, पैसेही गेले’; मराठवाड्यातल्या पतसंस्थांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?

नारायण ईथ्थर

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, नारायण ईथ्थर
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बीड येथील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेच्या घोटाळ्यातील आरोपी बबन शिंदे याला उत्तर प्रदेशातील वृंदावन येथून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सुमारे दीड वर्षांपासून तो फरार होता.

जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत गतवर्षी घोटाळा समोर आला होता. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नव्हत्या. तपास यंत्रणा फरार बबन शिंदेच्या मागावर होत्या अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

त्यानिमित्ताने बीबीसी मराठीचा हे रिपोर्ताज पुन्हा शेअर करत आहोत.

“तो घरी यायचा. म्हणायचा, नाना, असं झालं तसं झालं. म्या म्हणलं, तू काहीच नको करू. आपण पाहून घेऊ काय करायचं ते. जात्येन नाहीतर येत्येन. पण तू काही राडा करू नको. पण त्याने एक दिवस रात्रीला 6 वाजता आम्ही कुणी घरी नसतानाच राडा केला. आत्महत्या केली त्यानं.” – नारायण ईथ्थर, छत्रपती संभाजीनगर

“आता काय, आता सध्या ते सगळं बंद पडल्यामुळे मीच शांत झालोय. आता काय डोकं लागना, काय करावं म्हणून.” – संजय तिपाले, बीड

छत्रपती संभाजीनगरचे नारायण ईथ्थर आणि बीडचे संजय तिपाले ही पतसंस्थांमधील घोटाळ्याला बळी पडल्याची प्रातिनिधिक उदाहरणं. मराठवाड्यातल्या गावागावात तुम्हाला अशा करुण कहाण्या ऐकायला मिळतील.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

मराठवाड्यात गावागावांमध्ये पतसंस्था आणि मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीजचे कार्यालयं स्थापन झालेली दिसून येतात.

चांगला व्याजदर मिळतोय म्हणून गोरगरिबांसहित श्रीमंतांनीही या पतसंस्थांमध्ये पैसे गुंतवले आणि आता त्यांचे पैसे अडकून पडलेत.

एकट्या मराठवड्यात सहकारी पतसंस्थांमध्ये 5 हजार कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली.

  • मराठवाड्यात सहकारी पतसंस्थांमध्ये हे घोटाळे कसे झाले?
  • या घोटाळ्याला बळी पडलेले आज कोणत्या अवस्थेत आहेत?
  • ठेवीदारांनी पतसंस्थेत पैसे ठेवताना काय काळजी घेतली पाहिजे?

या प्रश्नांची उत्तरं देणारा बीबीसी मराठीचा हा विशेष रिपोर्ट.

‘पैसे गेल्याचं दु:ख नाही, पण मुलगा नव्हता जायला पाहिजे’

65 वर्षांचे नारायण ईथ्थर यांना सध्या ऐकायला कमी येतं. मोठ्या आवाजात बोललं की, मग ते प्रश्नाला उत्तर देतात.

नारायण यांचा मुलगा रामेश्वर ईथ्थरनं छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत सर्व कुटुंबीयांचे मिळून 23.50 लाख रुपये गुंतवले. पतसंस्थेत घोटाळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर रामेश्वरने आत्महत्या केली.

त्या दिवशीचा घटनाक्रम आठवल्यावर नारायण यांच्या डोळ्यात पाणी येतं.

“12 जुलै 2023. ही घटना अशी झाली की, एमआयडीसीचे पैसे उरले होते. रामेश्वरची इच्छा होती व्याज-बिज व्यवस्थित देते तर तिथं (आदर्शमध्ये) पैसे टाकू. त्यानंतर मग त्यानं ते पैसे तिथं नेऊन टाकले. तिथं टाकल्यानंतर सहा-सात महिन्यांमध्ये तो कार्यक्रम बंद पडला. आपले सगळे फिक्सच होते. आपण काही व्याज-बिज उचललं नाही.”

आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यानंतर नारायण यांचा मुलगा रामेश्वरनं आत्महत्या केली.

फोटो स्रोत, Kiran sakale

फोटो कॅप्शन, आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यानंतर नारायण यांचा मुलगा रामेश्वरनं आत्महत्या केली.

नारायण यांना अद्याप एक रुपयाही परत मिळालं नसल्याचं ते सांगतात. पैसे गेले, पण मुलगा गेल्याचं दु:ख त्यांना सहन होत नाही.

“पैशाची काहीच किंमत नाही, मुलगा गेल्याचं एवढं दु:ख झालं. आता त्याची लेकरं लहान-लहान आहेत. एक मुलगा, एक मुलगी आहे. दोघे लग्नाला आले, कोण आहे त्यांना पाहायला मागं?” असा नारायण सवाल करतात.

रामेश्वर ईथ्थर यांचा मुलगा आणि मुलगी कॉलेजात जातात. या दोघांच्या शिक्षणासाठी त्यांनी आदर्श पतसंस्थेत पैसे ठेवले होते.

आदर्श पतसंस्थेत पैसे ठेवल्याच्या नारायण यांच्याकडील पावत्या.

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, आदर्श पतसंस्थेत पैसे ठेवल्याच्या नारायण यांच्याकडील पावत्या.

‘पैसे भेटले असते तर मुलगी वाचली असती’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर नावाचं गाव. इथं आदर्श पतसंस्थेच्या शाखेची मोठी इमारत आहे.

याच शाखेत शेतकरी योगेश मोकासे 2015 पासून पैसे जमा करत होते. त्यांना मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज असतानाच आदर्श पतसंस्थेतील घोटाळा उघडकीस आला.

“ज्या टायमला माझी मुलगी 10 वर्षांची झाली, मला तिला मोठ्या दवाखान्यात न्यायचा टाईम आणि माझे आदर्शमध्ये पैसे अडकलेले होते 10 लाख रुपये. बँक बंद पडल्यामुळे मला तिला दवाखान्यात नेता आलं नाही. मी तिला घरी घेऊन आलो, एक-दीड महिन्यात माझी मुलगी वारून गेली.”

योगेश मोकासे

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, योगेश मोकासे

योगेश यांच्याकडे 3 एकर कोरडवाहू शेती आहे. सध्या ते शेतीसोबत मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.

त्यांचं घर पत्र्याचं आहे. घरात बंद पडलेला टीव्ही आणि त्याला लागूनच मुलीचा फोटो लावलेला दिसून येतो.

योगेश सांगतात, “पैसे भेटले तर आम्ही पोऱ्याला मोठ्या शाळेत टाकू, त्यांचं शिक्षण करू. ते जर पैसे भेटले असते तर माझी पोरगी वारली पण नसती. आम्ही हे अशा वातावरणात राहतो. पतराचं घर गळतं. थोडेफार पैसे आले तर घर बांधावं वाटेल. आता काहीच नाही करता येत ना पैसे अडकल्यामुळे.”

महामार्गात शेती गेली, आलेले पैसे पतसंस्थेत टाकले आणि...

मराठवाड्यात ज्या पतसंस्थांमधील घोटाळ्याची सर्वाधिक चर्चा होत आहे, त्यापैकी एक म्हणजे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि दुसरी आहे, ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

ज्ञानराधा पतसंस्थेचं मुख्य कार्यालय बीडमध्ये आहे. बीडमधील पारगाव जप्तीचे शेतकरी संजय तिपाले यांनी ज्ञानराधा पतसंस्थेत 14 लाख रुपये गुंतवले होते.

आम्ही संजय यांच्याकडे पोहोचलो तेव्हा ते गुरांना चारा टाकत होते.

“आता ह्यो सोलापूर-धुळे हायवे झालेला आहे. त्या हायवेमध्ये माझं अर्धं घर गेलेलं आहे. काही जमीन गेलेली आहे. त्या जमिनीचेच पैसे मी तिथं गुतिवलेले आहेत. शेतीतून काही एवढं उत्पन्न होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे,” घरापासून जाणाऱ्या रोडवर उभं राहून संजय सांगत होते.

ज्ञानराधा पतसंस्थेत ठेवी ठेवल्याच्या पावत्या दाखवताना संजय तिपाले.

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, ज्ञानराधा पतसंस्थेत ठेवी ठेवल्याच्या पावत्या दाखवताना संजय तिपाले.

पण पैसे तिथंच गुंतवायले हवेत, असं का वाटलं, या प्रश्नावर संजय म्हणाले, “अगोदर चांगला व्याजदर भेटला होता आणि टायमिंगला भेटला होता. म्हणून आम्ही डबल पैसे गुंतवले.”

आधी 13 % व्याजदर मिळाल्याचं संजय सांगतात.

ज्ञानराधा पतसंस्थेच्या कार्यालयाचा पत्ता विचारल्यावर शोभा जाधव घाईघाईत पुढे आल्या आणि ‘पैसे परत भेटतील का हो’ अशी विचारणा त्यांनी आमच्याकडे केली. शोभा बीड-जालना रोडवर हातगाडीवर फळं विकतात.

ज्ञानराधा पतसंस्थेचं बीडमधील मुख्य कार्यालय.

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, ज्ञानराधा पतसंस्थेचं बीडमधील मुख्य कार्यालय.

“कमीतकमी 2 लाख रुपये आमचे येणे बाकी आहे. 6 वर्षं पैसे भरायचे होते. पण आम्ही पुन्हा पैसे भरले नाही. कारण ती बँक बंदच पडली,” शोभा सांगत होत्या.

त्यानंतर त्यांनी आम्हाला पतसंस्थेच्या कार्यालयाकडे कसं जायचं ते सांगितलं.

बीड-जालना रस्त्यावरुन थोडसं आत गेलं की ज्ञानराधा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाची टोलेजंग इमारत दिसून येते. सध्या या पतसंस्थेला टाळं ठोकण्यात आलं आहे.

ज्ञानराधा असो की आदर्श पतसंस्था, संस्थाचालकांनी उभारलेल्या टोलेजंग इमारती, दवाखाने, मंगल कार्यालयं पाहूनही भुरळ पडल्याचं, ठेवींवर अधिक व्याज मिळेल याची खात्री पटल्याचं अनेक ठेवीदार कबूल करतात.

घोटाळा कसा झाला?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची एकूण सभासद संख्या 35 हजार 421 असून ठेवी 351 कोटी रुपयांच्या आहेत. ही पतसंस्था महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित येते. आदर्श पतसंस्थेत गैरप्रकार कसा झाला आणि त्यावर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधीमंडळात दिली.

“आदर्श पतसंस्थेचा 2016-19 दरम्यानचा विशेष रिपोर्ट लेखा परीक्षक यांनी सादर केलेला आहे. यात अपहार, गैरव्यवहार, फसवणूक, विनाकारण कॅश क्रेडिट, कर्जवाटप इत्यादी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पंतसंस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कर्जदार अशा 54 लोकांसह 103.70 कोटी इतक्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा संभाजीनगर येथे दाखल केलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे आणि 19 लोकांना अटक करण्यात आलीय.”

आदर्शमधील ठेवीदारांचे पैसे परत देण्याविषयी वळसे पाटील म्हणाले, “आता फक्त प्रॉपर्टीची विक्री करुन पैसे वसूल करणं आणि वसूल केलेले पैसे गोरगरीब लोकांना ज्यांचे ते आहेत, त्यांना देणं हे काम सुरू आहे. त्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करतोय.”

आदर्श पतसंस्थेची पिशोर गावातील शाखा

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, आदर्श पतसंस्थेची पिशोर गावातील शाखा

ज्ञानराधासारख्या मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं काम केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालतं. ज्ञानराधा पतसंस्थेतील घोटाळ्याचा मुद्दाही विधीमंडळात उपस्थित करण्यात आला.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, “ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह मल्टिस्टेट लिमिटेडचे 6 लाख 50 हजार ठेवीदार आहेत आणि ठेवीदारांचे जवळजवळ 2 हजार कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत.”

तर आमदार बबनराव लोणीकर घोटाळ्याविषयी माहिती देताना म्हणाले, “गोरगरिब लोकांच्या, दीनदुबळ्या, शेतकऱ्यांच्या कष्टाचे 2 हजार कोटी रुपये संस्थाचालकांनी ठेवी म्हणून घेतल्या आणि नातेवाईकांना व संचालक मंडळाला कर्ज दिलं. कर्ज देताना मॉर्गेज (तारण) जे आहे त्याच्या दहापट कर्ज दिलं. जे कर्ज वसूल होणारच नव्हतं.”

ज्ञानराधातील घोटाळ्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंसहित इतर काही जणांना अटक करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं ज्ञानराधाच्या राज्यभरातील वेगवेगळ्या कार्यालयांवर छापे टाकले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

"मल्टिस्टेटमधील घोटाळे कोट्यवधी रुपयांचे आहेत आणि अनेक गुंतवणूकदारावर त्याचा परिणाम झाला आहे. या प्रश्नाची दखल घेण्यासाठी लवकरच दिल्लीत विशेष बैठक बोलावण्यात येईल," असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. ती मिळाल्यास इथं अपडेट करण्यात येईल.

मराठवाड्यात 5 हजार कोटींचा घोटाळा

मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील गैरप्रकाराचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार रजनी पाटील म्हणाल्या, “आज मल्टिस्टेट पेव फुटल्याप्रमाणे यायला लागलंय. 18%, 20% असं व्याज मिळतंय म्हणून लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. पण, या लोकांवर कारवाई करायला हवी. सुमारे 5 हजार कोटींचा घोटाळा आमच्या मराठवाडा क्षेत्रामध्ये झालेला आहे.”

देशभरात एकूण 613 नोंदणीकृत ‘मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ज असून त्यात महाराष्ट्रात तब्बल 317 मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहेत.

राज्य सरकारच्या अखत्यारितील पतसंस्थांचा विचार केल्यास महाराष्ट्रात नागरी/ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्था 13 हजार 412 आहेत. यापैकी 8 हजार 986 पतसंस्था नफ्यात असून 4 हजार 426 पतसंस्था तोट्यात आहेत. पण पतसंस्था अडचणीत येण्याचं कारण काय?

बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीलाही टाळं लागलंय.

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीलाही टाळं लागलंय.

सहकारी बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सांगतात, “प्रत्येक पतसंस्था आलेल्या ठेवींचं कर्जात वाटप करत असते. 30 % रक्कम स्वत:कडे ठेवून ते 70 % रक्कम वाटत असतात. कर्जानं वाटलेली रक्कम परत आली तरच ती ते त्या ठेवीदारांना परत देऊ शकतात.

"पण कर्जवाटपातच घोटाळा होत असेल, कर्जवाटपातच भ्रष्टाचार होत असेल, तारण न घेता कर्ज वाटली जात असतील तर कालांतरानं ही कर्ज बुडीत होतात आणि कर्ज बुडित झाल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडचणीत येतात.”

आदर्श, ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम अर्बन...

13 % व्याजदर मिळतोय म्हणून बीडच्या शारदा झणझण यांनी ‘जिजाऊ मांसाहेब मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’मध्ये पैसे ठेवले. आता या पतसंस्थेलासुद्धा टाळं लागलंय.

“रिटायरमेंटचा पैसा ठेवलाय मी तिथं. लाखानिशी मिळालेले. तिथं ठेवले होते मी. रिटायर लोक 4-5 तर वारले त्यातले. आत्ता परवा एक बाई वारल्या,” शारदा यांच्या बोलण्यातून त्यांची हतबलता जाणवत होती.

सध्या महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये पतसंस्थेची कार्यालयं स्थापन झालेली दिसून येतात. पतसंस्थांचं पेव फुटण्यामागची कारणं काय आहेत?

साईराम अर्बन पतसंस्थेची शाखा

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, साईराम अर्बन पतसंस्थेची शाखा

विद्याधर अनास्कर सांगतात, “पतसंस्था नोंदणी करण्यासाठी लागणारी रक्कम ज्याला आपण एंट्री पॉईंट नॉर्म्स म्हणतो ती इतकी कमी आहे की हा पैसे जमवणं सहज शक्य असल्यामुळे सर्व ठिकाणी पतसंस्थांचं पेव फुटलेलं दिसतं. एकेएका गावामध्ये 4-4, 5-5 पतसंस्था दिसतात.

“एखाद्या बँकेला शाखा उघडायची असेल तर त्याला 2 कोटी रुपये भांडवल लागतं. इथं मात्र 1 लाख रुपयामध्ये तुम्ही पतसंस्था उघडू शकता. 1 लाख रुपये गावपातळीवर जमा करणं सहज शक्य आहे.”

त्यामुळे पतसंस्थांना परवानगी देताना सरकारचं धोरण अधिक कठोर हवं, असं तज्ञांचं म्हणणं आहे.

पतसंस्था नोंदणी करण्यासाठी लागणारी रक्कम जास्त असावी असंही त्यांनी सुचवलं आहे.

पतसंस्था घोटाळे, सहकारी बँकिंग तज्ज्ञ

बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे येताना हिरापूर येथे श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा दिसते. ही शाखाही बंद पडल्याचं स्थानिक लोक सांगतात.

'सहकारातून प्रगती आणि प्रगतीतून समृद्धी', असं घोषवाक्य या पतसंस्थेच्या बोर्डाशेजारी लिहिलेलं आहे.

बीडमधल्या राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीही घोटाळा झाला आहे. जवळपास 300 कोटींच्या ठेवी या पतसंस्थेत असून याप्रकरणी पोलिसांनी पतसंस्थेचा अध्यक्ष चंदुलाल बियाणी याला पुण्यातून अटक केली आहे.

मराठवाड्यातील पतसंस्थांमधील घोटाळे एकामागोमाग एक बाहेर येत आहेत.

अपेक्षाभंग आणि धडा

ईथ्थर कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नासाठी, योगेश मोकासे आणि संजय तिपाले यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक म्हणून त्यांच्याकडील पैसे पतसंस्थांमध्ये ठेवले. काहींनी तर स्टेट बँक ऑफ इंडियातून पैसे काढून या पतसंस्थांमध्ये ठेवल्याचं आमच्याशी बोलताना सांगितलं.

सुरुवातीच्या वर्षांमध्ये वेळेवर मिळणारा व्याजदर, त्याची अधिकची टक्केवारी यामुळे ठेवीदारांचा या पतसंस्थांवर विश्वास बसला आणि ते अधिकचे पैसे गुंतवत गेले.

अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर सांगतात, “पैसे गोळा करुन पहिले काही वर्षं विश्वासार्हता संपादन करणं हा घोटाळेबाजांचा कॉमन पॅटर्न असतो. पहिले काही वर्षं जास्त व्याजदर दिला जातो आणि तो नवनवीन येणाऱ्या डिपॉझिटमधून दिला जातो. यामुळे या पतसंस्थांची विश्वासार्हता वाढत जाते.

“दुसरीकडे, वेतनमान वाढत नाहीये, उद्योगधंद्यांतून परतावा मिळत नाहीये अशास्थितीत आपल्याकडील रकमेतून दामदुप्पट परतावा मिळत असेल तर गोरगरिबांसहित सगळे लोक त्याकडे आकृष्ट होतात. त्यामुळे मग पतसंस्थांच्या व्यवसायात असणारी मंडळी आणि स्वत:हून पैसे आणून देणारे हे लोक अशी ही एकमेकांच्या परस्परपूरक प्रक्रिया आहे.”

ज्ञानराधा पतसंस्थेची करमाड गावातील बंद असलेली शाखा.

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, ज्ञानराधा पतसंस्थेची करमाड गावातील बंद असलेली शाखा.

मराठवाड्यात कुणी शेती विकून तर कुणी सोनं विकून अधिक परतावा मिळेल, या आशेपोटी पतसंस्थांमध्ये पैसे ठेवले.

पण लाभ आणि लोभ यात एका मात्रेचा फरक असतो. ठेवीदार लोभाला बळी पडतात. जिथं जास्त व्याजदर दिला जातो, त्या पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवतात. पण, जास्त व्याजदर म्हणजेच जास्त धोका हे तत्व ठेवीदारांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे, ही बाब सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ आवर्जून नमूद करतात.

विद्याधर अनास्कर सांगतात, “ठेव ठेवताना ठेवीचा व्याजदर विचारायचाच नाही, तर ठेव ठेवताना कर्जाचा व्यादजर विचारायचा. आणि जिथं जास्त व्याजदरानं कर्ज दिलं जातं त्या पतसंस्थेमधील गुंतवणूक धोकादायक आहे. कारण जास्त व्याजानं दिलेलं कर्ज हे परत येत नाही. कारण ते फेडण्याकरता तेवढं उत्पन्न त्या पैशांतून येत नाही.

"समजा पतसंस्थेनं 22 टक्क्यांनी कर्ज दिलं, तर व्यवसाय करायला 6% पैसे लागतात. याचा अर्थ पतसंस्थेला 28 टक्क्यांनी नफा कमवावा लागतो. आणि 28% इतका निव्वळ नफा असलेला कुठलाही व्यवसाय बाजारात नाहीये.”

संजय तिपाले यांनी ज्ञानराधामध्ये ठेवलेली ठेव

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, संजय तिपाले यांनी ज्ञानराधामध्ये ठेवलेली एक ठेव

एकट्या पिशोर गावात आदर्श पतसंस्थेचे अडीच हजार खातेदार असून त्यांनी 33 ते 34 कोटी रुपयांच्या ठेवी आदर्श पतसंस्थेत ठेवल्याचं ग्रामस्थ आर.के.मोकासे सांगतात.

पंतसंस्थांमध्ये पैसे अडकल्यामुळे ठेवीदार सध्या मानसिक तणावाखाली आहेत. तसंच त्यांचा सरकारला सवालही आहे.

पिशोर गावातील आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार नारायण मोकोसे म्हणतात, “सरकारला आमचं हेच म्हणणं आहे, या पतसंस्थेवर जर तुमचा वॉच नसेल तर त्यांना परवानगीच देऊ नका ना. गोरगरिबाची कशाला फसवणूक करता? तुम्हाला लोकांनी निवडून दिलं कशासाठी दिलं? रक्षण करायला दिलं की लोकांना लुटायला दिलं?”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)