गुगल पे, फोन पे, पेटीएमसारखे यूपीआय वापरत असाल तर या 5 नव्या गोष्टी लक्षात ठेवा

चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले तर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले तर

काही वर्षांआधी यूनिफाईड पेमेंट इंटरफेस ही संकल्पना फार थोड्या जणांना कळत असेल पण आज मात्र यूपीआय म्हटलं की गल्ली ते दिल्ल्ली सगळ्यांना एका फटक्यात कळतं.

2016 साली नोटबंदी झाल्यानंतर डिजिटल व्यवहारांना खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

आता चहाच्या टपरीवरही यूपीआय व्यवहारांचा पर्याय असतो.

डिजिटल पेमेंट आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 17 लाख कोटी व्यवहार यूपीआयने फक्त नोव्हेंबर 2023 या महिन्यात झाले होते.

G20 शिखर परिषदेच्या वेळी केंद्र सरकारनेही यूपीआय व्यवहारांचं यश विशद केलं होतं.

पण आता 1 जानेवारी 2024 पासून रिझर्व्ह बँकेने यूपीआय व्यवहारांसाठी काही नवीन नियम आणले आहेत.

ग्राहकांसाठी काय बदललं?

यूपीआय व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

1. वापरत नसणारे यूपीआय आयडी

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) बँकांना सांगितलं आहे की एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेले फोन पे, गुगल पे, पेटीएम असे आयडी बंद करून टाकावेत.

त्यामुळे 12 महिने एखाद्या आयडीवरून व्यवहार झाले नसतील तर तो आयडी बंद होईल.

यूपीआय

फोटो स्रोत, Google

NPCI ने हा नियम आणला आहे कारण वापरात नसलेल्या यूपीआय आयडीवरून फ्रॉड होण्याशी शक्यता असते असं त्यांना वाटतं.

2. मर्यादेत वाढ

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं आहे की ते यूपीआय व्यवहारांची मर्यादा काही ठराविक बाबतीत वाढवत आहेत. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आता यूपीआयद्वारे 1 लाखाऐवजी 5 लाखांपर्यंत रक्कम ट्रान्सफर करता येईल.

3. ट्रान्सफर शुल्क

ऑनलाईन वॉलेटसारख्या प्रीपेड पेमेंट व्यवस्थेतून 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे व्यवहार करताना 1.1टक्क्यांचा ट्रान्सफर चार्ज लागेल. पण NPCI ने म्हटलं आहे की हे फक्त व्यावसायिकांसाठी आहे. सर्वसामान्य नागरिकांना हे लागू होत नाही.

यूपीआय

फोटो स्रोत, Getty Images

यूपीआय वन सुविधाही आणली आहे. यात टॅप अँड पे अशी व्यवस्था असेल. याने व्यवहार आणखी सोपे होतील.

4. यूपीआय एटीएम

साध्या एटीएमसारखेच आता यूपीआय एटीएमही स्थापन करण्यात येतील. देशभरात यांची सेवा सुरू करण्यात येईल.

यातूनही सोप्या पद्धतीने पैसे काढता येतील. जसं एरवी पैसे काढताना आपण डेबिट कार्ड वापरतो तसंच यूपीआय एटीएममधून पैसे काढताना क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

5. चुकून भलत्याच अकाऊंटला पैसे गेले तर?

वाढते ऑनलाईन स्कॅम लक्षात घेता NPCI ने नवीन तरतूद आणली आहे. आता नव्या युझरला पैसे ट्रान्सफर करताना 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर 4 तास वाट पाहावी लागेल.

त्यामुळे जर भलत्याच अकाऊंटला रक्कम ट्रान्सफर झाली तर त्या चार तासात ती परत मिळवता येईल.

सुरक्षेचं काय?

यूपीआय व्यवहार कितपत सुरक्षित आहेत याबदद्ल बीबीसी तेलुगूने काही तज्ज्ञांशी चर्चा केली

थॉमस प्राँग ऑल इंडिया ऑफिसर्स फेडरेशनचे माजी जनरल सेक्रेटरी आहेत.

ते म्हणाले, “सरकार यूपीआय प्रचार करत आहे, पण यूपीआयमधून होणारे फ्रॉड थांबवण्यासाठी सरकार काहीच पावलं उचलत नाहीये. सुरक्षिततेची खबरदारी घेतल्याखेरीज यूपीआयचा प्रसार का करण्यात येतोय?”

ते पुढे म्हणाले, “पूर्वी बँक खात्यातून व्यवहार व्हायचे आणि अशा व्यवहारांचा माग काढणं सोपं होतं. पण आता पैसे कसे आणि कुठे जातात याचा थांग लागत नाही. नुकतंच खासदार दयानिधी मारन यांच्या खात्यातून 1 लाख रुपये चोरीला गेले. त्याबदद्ल बातमीही आली.

मारन किंवा त्यांच्या पत्नी दोघांनी त्यांचे बँक डिटेल्स कोणालाही दिले नव्हते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत पैसे परत मिळवून दिले. पण सामान्य माणसांचं काय? त्यांना खासदारांसारखी वागणूक किंवा प्राथमिकता मिळणार का? सरकारने याचाही विचार केला पाहिजे.”

यूपीआय

फोटो स्रोत, Getty Images

“माझ्या ओळखीतल्या एका प्राध्यापकांच्या अकाऊंटमधून दीड लाख रूपये चोरीला गेले. त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लीक केलं नव्हतं किंवा आपला ओटीपी कोणासोबत शेअर केला नव्हता. मग असं कसं झालं? त्यामुळेच यूपीआयच्या सुरक्षिततेवर शंका येते.”

‘भारतासारख्या देशात यूपीआय गरजेचं’

अर्थशास्त्रज्ञ सोमा वलीप्पन यांनी सांगितलं, “देशाच्या प्रगतीसाठी डिजिटल व्यवहार गरजेचे आहेत आणि ते थांबवता येणार नाहीत. आधी मोठ्या रक्कमांच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा राबवण्यात येत होती, पण आता सामान्य लोकही डिजिटल व्यवहारांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.”

“भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात यूपीआय यंत्रणा फारच महत्त्वाची आहे. लोकांना रोख रक्कम मिळवण्यासाठी झगडावं लागत नाही,” ते पुढे म्हणाले.

“आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असतो. इंटरनेट उपलब्ध आहे, त्यामुळे डिजिटल व्यवहार होणं सोपं आहे आणि ते गरजेचंही आहे.”

“जर समस्यांबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच समस्या आहेत. समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि इंटरनेट किंवा इतर यंत्रणा बंद झाल्या तर हातात फोन असूनही आपण काही करू शकत नाही. मोठमोठ्या राष्ट्रांमध्येही पूर किंवा चक्रीवादळ येतात. त्यानंतर तिथे कित्येक दिवस इंटरनेट किंवा वीज नसते. याचाच अर्थ आपणही कागदी चलन अगदीच हद्दपार करून चालणार नाही.”

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.