इराणच्या बंदरावर भीषण स्फोट, 28 जणांचा मृत्यू तर किमान 800 जण जखमी

शाहीद राजाई बंदरावरील स्फोटात 800 हून अधिक जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Mohammad Rasoul Moradi/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, शाहीद राजाई बंदरावरील स्फोटात 800 हून अधिक जखमी झाले आहेत.
    • Author, फ्रान्सिस माओ
    • Role, बीबीसी न्यूज

इराणच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार दक्षिण भागात असलेल्या बांदर अब्बास शहराजवळ असलेल्या शाहीद राजाई बंदरावर एक भीषण स्फोट झाला आहे. त्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 800 जण जखमी आहेत.

या प्रचंड स्फोटानंतर इराणी प्रशासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. हा स्फोट शनिवारी (26 एप्रिल) सकाळी झाला.

इराणच्या शाहीद राजाई बांदर जिल्ह्यामध्ये हा स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता की, जवळपासच्या कार्यालयांच्या खिडक्या फुटल्या आणि किमान एका इमारतीचं छतही कोसळलं.

शाहीद राजाई इराणचं सर्वात मोठं व्यावसायिक बंदर आहे. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या होर्मोझगान प्रांतात ते आहे.

हे बंदर होर्मोझगान प्रांताची राजधानी बांदर अब्बास शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेला आहे.

घटनास्थळाहून समोर येणाऱ्या फोटोंमध्ये स्फोटाच्या वेळी लोक तिथून पळून जात असून अनेक जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले पाहायला मिळत होते.

समोर येणाऱ्या बातम्यांनुसार स्फोटामुळं कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात अनेक जण दबले आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

इराणच्या सरकारी टीव्हीने या घटनेची माहिती देताना म्हटलं की, "रात्री अंदाजे 12 वाजता (शनिवारी) बांदर अब्बास राजाई बंदरावर एक कंटेनरमध्ये स्फोट झाला. त्यामुळं आसपासच्या इमारतींचंही नुकसान झालं. होर्मोझगान प्रांताच्या क्रायसिस मॅनेजमेंट प्रमुखांच्या मते, प्राथमिक तपासणीमध्ये बंदरावरच्या एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्याचं समोर आलं आहे."

स्फोटात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.

फोटो स्रोत, Mohammad Rasoul Moradi/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, स्फोटात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.

बीबीसी पर्शियनच्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "घटनेचं कारण शाहीद राजाई बंदराच्या किनाऱ्यावर असलेल्या कंटेनरमधील स्फोट होतं."

समोर येणाऱ्या माहितीनुसार स्फोट झालेल्या ठिकाणी आग लागली आणि फोटोमध्ये धुराचे लोटही दिसत होते.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या घटनेवर 'तीव्र दुःख आणि पीडितांप्रती संवेदना' व्यक्त केल्या. तसंच या प्रकरणाची सरकारीच चौकशी करणार असल्याचंही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या मते, आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. तसंच बचावपथकांनी घटनास्थळावरून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते आग लागली होती ती पसरून कंटेनरपर्यंत पोहोचल्याने स्फोट झाला.

फोटो स्रोत, MOHAMMAD RASOLE MORADI/IRNA/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, प्रत्यक्षदर्शींच्या मते आग लागली होती ती पसरून कंटेनरपर्यंत पोहोचल्याने स्फोट झाला.

एका अधिकाऱ्यांनी बीबीसी पर्शियन सेवेशी बोलताना म्हटलं की, "काही कर्मचारी छत कोसळलेल्या भागात अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे."

घटनेचे काही व्हीडिओदेखील ऑनलाईन शेअर होत आहेत. त्यामध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी लोक जमा झालेले असून ते धावत सुटल्याचं दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बंदराच्या किनाऱ्यावर एक आग लागली होती. ती अत्यंत वेगाने एका उघड्या कंटेनरकडे गेली. त्यात ज्वालाग्रही पदार्थ होते. कदाचित रसायनं होती.

एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, "आग वेगानं पसरण्याचं कारण त्याठिकाणी झालेला स्फोट हे होतं."

या परिसराच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी जवळपास 50 किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकल्याचं सांगितलं.

नकाशा

स्थानिक माध्यामांच्या मते, इराणच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीनं म्हटलं आहे की, बंदरावर झालेल्या या स्फोटाचा संबंध देशातील "ऑईल रिफायनरी, ऑइल टँक किंवा पाईपलाईनशी नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.