इस्रायलकडून इराणवर हल्ल्यांना सुरुवात, तेहरानमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज

इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी.

इस्रायलच्या लष्करानं 'इराणच्या लष्करी तळांवर हल्ले' करत असल्याची माहिती दिली आहे.

इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांच आवाज आल्याची माहिती इराणच्या सरकारी मीडियानं दिली आहे.

या हल्ल्यांनंतर इस्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) म्हटलं की, "जगातील इतर कोणत्याही सार्वभौम देशाप्रमाणे इस्रायलकडेही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे."

आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांच्या मते, "7 ऑक्टोबर 2023 नंतर इराणमधील सरकार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सातत्यानं इस्रायवर हल्ले केले आहेत."

“आम्ही संरक्षण क्षमता पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही इस्रायलच्या आणि इथल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्वकाही करू,” असंही हगारी म्हणाले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

इराणने काय म्हटलं?

इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे येथील सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं इराणच्या सरकारी टीव्हीच्या दाखल्यानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार इराणच्या एका गुप्तचर अधिकाऱ्यानं इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टिव्हेट असल्यानं स्फोटांचे आवाज आले असल्याचं सांगितलं आहे.

मात्र, इस्रायलनं इराणमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.

इराणमधील पहाटे 4 वाजेचे छायाचित्र
फोटो कॅप्शन, इराणमधील पहाटे 4 वाजेचे छायाचित्र

एएफपी या वृत्तसंस्थेनं इराणच्या सरकारी वाहिनीच्या दाखल्यानं तेहरानमधील दोन्ही विमानतळावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती दिली आहे, तर व्हाइट हाऊसनं त्यांना इस्रायलनं इराणमध्ये केलेल्या हल्ल्याबाबत माहिती असल्याचं सांगितलं आहे.

अमेरिकेतील बीबीसीच्या न्यूज पार्टनर सीबीएसशी बोलताना राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, “इस्रायल इराणमध्ये लष्करी तळांवर जे हल्ले करत आहे, ते इराणनं 1 ऑक्टोबरला बॅलेस्टिक मिसाइलनं केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात स्वसंरक्षणासाठी केलेली कारवाई आहे,असं आमचं मत आहे.”

लाल रेष

इराण-इस्रायल संघर्षाबद्दल या बातम्याही वाचा :

लाल रेष

'इस्रायलकडून हल्ल्याची शक्यता वर्तवली जात होती'

बीबीसीच्या मध्य पूर्व भागाचे संपादक सॅबेस्टियन अशर यांच्या मते, महिनाभरापूर्वी इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचं म्हटलं जात आहे. इराणनं त्या हल्ल्यात इस्रायलवर 200 बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला होता.

इराणकडून हल्ला झाला तेव्हापासूनच प्रत्युत्तरातील अशा हल्ल्याची शक्यता वर्तवली जात होती.

इस्रायलकडून एक निवेदन जारी करण्यात आलं असून, त्यात ऑपरेशन सुरू असल्याचं म्हटलं आहे.

इराणनं इस्रायलवर 200 बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणनं इस्रायलवर 200 बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला होता.

हल्ले नेमके कोणत्या स्तरावर केले जात आहेत, याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही.

सिरियाच्या सरकारी वृत्त संस्थेच्या माहितीनुसार इस्रायलनं सिरियातील मध्य आणि दक्षिण भागांतील काही लष्करी तळांवरही हल्ले केले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कार्यालयातील त्यांचा एक फोटो जारी केला आहे. त्यात या हल्ल्या दरम्यान ते लष्कराच्या मुख्यालयातील ऑपरेशन सेंटरमध्ये उपस्थित असल्याचं दिसत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)