भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटना? देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर काँग्रेसनं काय म्हटलं?

फोटो स्रोत, YOU TUBE SCREEN GRAB
विधानसभेत भाषण देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा समावेश आहे, असा आरोप यावेळी केला. काँग्रेस नेत्यांनीही या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
यासोबतच लाडकी बहिण योजनेबद्दल बोलताना सुरू केलेल्या योजना बंद पडू देणार नसल्याचं ते म्हणाले. शिवाय, ईव्हीएमवरून महायुतीवर होणाऱ्या आरोपांवरही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.
राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (19 डिसेंबर) काँग्रेसवर सडकून टीका केली.
नवं सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे मुख्यमंत्र्यांचं पहिलंच भाषण होतं.
वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटना असल्याचा आरोप केला.
'काँग्रेसचा शहरी नक्षलवादाशी संबंध'
"मी 'भारत जोडो' अभियानावर बोललो होतो, तेव्हा माझ्यावर टीका केली गेली. आज पुराव्यासह सांगतो. राहुल गांधींनी सुरू केलेल्या या अभियानात कोण आहे ते एकदा पहा," फडणवीस म्हणाले.
"देशात आपण नक्षलवादाविरोधात लढाई पुकारतो. नक्षलवादी काय करतात? त्यांचा भारताच्या संविधानावर, त्यातून तयार झालेल्या कोणत्याही संस्थेवर आणि लोकशाहीवर विश्वास नाही. ते समांतर राजसत्ता निर्माण करण्याची इच्छा असणारा गट आहे," असं ते नक्षलवाद्यांविषयी बोलताना म्हणाले.


फडणवीस पुढे म्हणाले, "ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सुरू झाला."
16-28 वयापर्यंत प्रत्येकाच्या मनात क्रांतीची भावना असते, असं नमूद करत फडणवीस म्हणाले की, या वर्गाला पकडून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करण्यासाठी तयार झालेल्या गुप्त गुन्हेगारी गटांना शहरी नक्षलवाद म्हटलं जाऊ लागलं.
"हे संविधानाचं नाव घेतात, पण संविधानानं तयार केलेल्या सर्व शासकीय संस्थांबद्दल लोकांमध्ये संशय तयार करतात आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे असं काम करतात," असा आरोप फडणवीसांनी केला.
'40 नक्षलवादी संघटनांचा भारत जोडो यात्रेत सहभाग'
भारत जोडो यात्रेतील लोक काठमांडुला एका बैठकीत गेले असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्या बैठकीचा इंग्रजीतला अहवाल त्यांनी वाचून दाखवला. त्यात देशविरोधी उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं.
"भारत जोडो मधल्या 180 पैकी 40 संघटना या गुप्त गुन्हेगारी संघटना आहेत. या संघटनांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या. हे आम्ही म्हणत नाही. तर हे 2012 मध्ये आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असताना सांगितलं गेलं होतं," फडणवीस म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
आर. आर. पाटील यांना त्यावेळी पुण्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण शिबीराविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी 48 नक्षलवादी संघटनांची यादी दिली होती. त्या संघटना भारत जोडो यात्रेत होत्या असं फडणवीस सांगत होते.
"लोकसभेत 2014 मध्ये मनमोहन सिंग सरकारने 72 गुप्त गुन्हेगारी संघटनांची नावं घोषित केली होती. त्यातल्या 7 महाराष्ट्रातल्या संघटना भारत जोडो यात्रेत सामील आहेत," फडणवीस पुढे म्हणाले.
काँग्रेसचा पलटवार
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं, "राहुल गांधी भारत जोडो यात्रा देशाच्या जनतेसाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशहितासाठी साडेचार हजार किलोमीटरची पदयात्रा करत होते. याच्यामध्ये कुठल्याही समाजविघातक संघटना काम करत असतील, तर त्याला थांबवणं, त्याच्यावर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग सरकार झोपलं होतं का? हा माझा सवाल आहे."

फोटो स्रोत, @NANA_PATOLE
"राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला बदनाम कसं करता येईल, याचा प्रयत्न भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे," असंही पटोले पुढे म्हणाले.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर बोलताना म्हटलं, "मुख्यमंत्री अर्बन नक्षलचा वारंवार उल्लेख का करतात? त्यांना दिसतात तर कारवाई का करत नाही? बुधवारी (19 डिसेंबर) काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला तेव्हा त्यांचा अर्बन नक्षल काय होता हे दिसलं."
'मालेगाव षडयंत्र'
निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणत्या थराला जात आहोत, असा प्रश्न फडणवीसांनी केला.
यावेळी त्यांनी एक षडयंत्र सांगितलं. मालेगावमध्ये 2024 मध्ये 114 कोटी रुपयांची निनावी रोख रक्कम बँक खात्यांमध्ये आली असल्याची तक्रार काही युवकांनी पोलिसांत केली.
आरोपी सिराज मोहम्मदने 14 लोकांची पॅन आणि आधार कार्ड वापरुन मालेगाव मर्चेंट बँकेत खोटी खाती उघडली आणि रक्कम त्या खात्यात टाकली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पोलीस, ईडी, आयकर विभागाने चौकशी केल्यावर समजले की, देशभरात 21 राज्यांतून 201 बँक खात्यात हजारो कोटींचा व्यवहार झालाय. त्यातील 600 कोटी दुबईला गेले, तर 100 कोटी निवडणुकीच्या काळात वापरले गेले असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
"देशाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेप सुरू झालाय, त्याचेही पुरावे संसदेत आले आहेत," फडणवीस म्हणाले.
विरोधकांच्या देशभक्तीवर शंका नाही, पण दुर्दैवाने त्यांचा खांदा ते कोणालातरी बंदूक ठेवायला देत आहेत याचं दुःख होत असल्याचं ते पुढे म्हणाले.
'मी आधुनिक अभिमन्यू'
भाषणावेळी महायुतीला निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना त्यांनी अजित पवारांचंही नाव घेतलं. "अजितदादा सगळे तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री बोलतात. पण तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हा," असं फडणवीस म्हणाले.
"मी आधुनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्यूह भेदात येतो. चारही बाजुंनी माझ्या विरोधात चक्रव्यव्ह करण्याचा प्रयत्न झाला. ते भेदून आज मी उभा आहे," फडणवीसांच्या या वाक्यावर भरपूर प्रशंसा मिळाली.
आधीच्या सरकारनं सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. "लाडकी बहिण योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नाहीत. पण एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरली जात असेल तर तो योग्य प्रकारे पैसा जातोय की नाही हे पाहणं ही तुमची आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे. तो जनतेचा पैसा आहे," ते म्हणाले. योजनेचा पुढचा हफ्ता जानेवारी महिन्यात वितरित केला जाणार असल्याचं ते म्हणाले.
अतिरिक्त 74 लाख मतं आली कुठून या प्रश्नाचं उत्तरही फडणवीसांनी बोलताना सभेत दिलं. विधानसभा निवडणुकीत एकूण मतदार 9 कोटींच्या वर होते. त्यापैकी 6 कोटींपेक्षा जास्त लोकांनी मतदान केल्याचं ते म्हणाले. मतदानाच्या दिवसांत कधी, किती मतदान झालं याची नेमकी आकडेवारीही फडणवीसांनी सांगितली.
निवडणूक आयोग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी मतदानाच्या दिवशी जाहीर करतं. त्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर केली जाते. आपण हे लक्षात न घेता रोज 74 लाख जास्तीची मतं आली कुठून असा प्रश्न विचारत आहोत, असं फडणवीस सांगत होते.
"शरद पवार हे देशातल्या संतुलन नेत्यांपैकी एक आहेत. यापुर्वी हारले तरी इव्हीएमचा मुद्दा त्यांनी कधीच उपस्थित केला नव्हता. पण यावेळी इव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो आणि मोठी हे जिंकतात असं ते म्हणाले," त्यांच्या या भूमिकेने आश्चर्य वाटलं असल्याचं फडणवीस म्हणाले.
इव्हीएम हटाओ रॅली आयोजित केली होती. त्यात वादग्रस्त वकील मेदमूद प्राचा यांना बोलावलं. दहशवाद्यांची बाजू घेणारे देशविरोधी असल्याचं फडणवीस सांगत होते. अशांपासून दूर रहायचा सल्लाही फडणवीसांनी दिला.











