नागपूर डायरी : 'हे छापू नका' पासून 'अभी तो जंग शुरू हुई हैं' पर्यंत, वाचा अधिवेशनातील रंग

विजय शिवतारे, छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ते सोमवारचा (16 डिसेंबर) दिवस. अवघ्या काही तासांमध्ये राजकारणाचे बरेच बदललेले रंग पाहायला मिळाले.

तशी डिसेंबरच्या महिन्यातली थंडी जाणवत असली तरी विधान भवनाच्या परिसरात नेत्यांच्या मनात मात्र वेगळीच धग जाणवत होती.

साहजिकच नवनिर्वाचित मंत्री उत्साहानं विधानभवनात येताना दिसले. पण, त्यासोबतच ज्यांना मंत्रीपद नाही मिळालं अशा आमदारांच्या चेहऱ्यांवर नाराज स्पष्टपणे दिसत होती.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्यात दिवशी महायुतीच्याच वेगवेगळ्या नेत्यांच्या भावना मात्र वेगवेगळ्या दिसत होत्या. कुणी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंदानं विधानभवनात येत होतं, तर कुणाच्या चेहऱ्यावर कालच्या यादीत नाव नसल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं.

विधान भवनाच्या परिसरात सगळीकडं एकच चर्चा याचं नाव कसं आलं अन् त्याचा पत्ता कसा कट झाला.

काही जण यावर स्पष्टपणे बोललेही. पण काही वेळानं तेच भविष्यातल्या काळजीनं छापू नका असंही म्हणाले.

काही ठरावीक चेहरे माध्यमांच्या गराड्यात होते. काहींनी थेट नाराजी व्यक्त केली. तर काही पुढं काय मांडून ठेवलंय ते पाहण्यासाठी इथंही मौनच राहिले.

सगळ्याच पक्षांचे बडे नेते मीडिया स्टँडवर येऊन बोलत होते. पुन्हा एकदा मंत्री बनलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची वाटचाल कशी असेल ते सांगितलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पत्रकारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर त्यांना बोलतं केलं तर, "भुजबळ वरिष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळलं आहे. अजित पवार त्यांना योग्य स्थान देतील. अजितदादा खऱ्या अर्थानं त्यांचा विचार करतील," असं सांगत राष्ट्रवादीकडं चेंडू टोलवला.

विरोधकांच्या हाती ईव्हीएम

इकडे विरोधकांनी पहिल्या दिवसापासून आंदोलनाचा पवित्रा घेतला. ईव्हीएमला विरोध करत त्या विरोधी आंदोलन सुरू होतं. विधानसभेच्या पायऱ्यांकडं त्यांनी मोर्चा वळवा, "ईव्हीएम हटाव-संविधान बचाव" च्या घोषणा दिल्या.

महाविकास आघाडीतील सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, वरुण सरदेसाई, जितेंद्र आव्हाड असे नेते होते. पटोलेही घाईघाईत आले आणि सहभागी झाले.

पण अनेकांच्या नजरा शोधत होत्या जयंत पाटील, रोहित पवार यांना. ते मात्र कुठेही दिसले नाहीत.

विरोधी पक्षानं विधानसभेच्या पायऱ्यांवर 'ईव्हीएम हटाव-संविधान बचाव' म्हणत घोषणाबाजी केली.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षानं विधानसभेच्या पायऱ्यांवर 'ईव्हीएम हटाव-संविधान बचाव' म्हणत घोषणाबाजी केली.

बीडमधल्या सरपंचाच्या हत्येवरूनही सरकारवर आरोप सुरू होते. पण विरोधी आमदारांचा कमी झालेला आकडा इथं प्रकर्षानं जाणवला.

आंदोलनात आक्रमकताच काय पण पुरेशी गर्दीही दिसली नाही.

'मी कुठे नाराज?'

नवनिर्वाचित मंत्री, आमदार यांचं येणं सुरू होतं. त्यात दीपक केसरकरही होते. मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्यांपैकी ते एक.

पत्रकारांनी त्यांच्याशी बोलून संधी का मिळाली नसल्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी केसरकरांनी आपण नाराज नसून शिंदेंबरोबरच असल्याचं सांगितलं.

पण केसरकरांना नेहमी भेटणाऱ्यांना मात्र त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. ती फक्त त्यांनी बोलून दाखवली नाही.

38 मिनिटांत आटोपलं कामकाज

विधानसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झालं. फडणवीसांनी नवीन आमदारांची आणि सगळ्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली.

नाना पटोले उठले आणि त्यांनी बीडमधल्या सरंपचाच्या हत्येवरून प्रश्न उपस्थित केला. परभणीच्या घटनेकडेही सरकारनं लक्ष द्यावं असं ते म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करू असं म्हणाले.

सभागृहात आठ विधेयकं मांडण्यात आली. त्यानंतर शोक प्रस्ताव झाला आणि पहिल्या दिवसाचं विधानसभेचं कामकाज संपलं. फक्त 38 मिनिटं कामकाज झालं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

विधान परिषदेतही ओळख झाल्यानंतर अंबादास दानवेंनी बीडच्या सरपंचाच्या घटनेकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. अजित पवार गटाचा पदाधिकाऱ्यावर आरोप असल्याचं दानवे म्हणाले.

फडणवीसांनी कोणालाही सोडलं जाणार नाही. सांगत कारवाईची माहिती दिली. तपास सीआयडीला दिला असून एक एसआयटीद्वारे तसेच आर्टीफिशियल इंटलिजन्स वापरून चौकशी केली जाईल असं सांगितलं.

शोकप्रस्तावानंतर विधान परिषदेचं कामही 35 मिनिटांत संपलं.

यानंतर बाहेर आलेल्या आमदारांतील काहींची नाराजी स्पष्टपणे दिसली.

विजय शिवतारेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना थेट नाराजी व्यक्त केली.

'अभी तो जंग शुरू हुई हैं'

स्पष्ट नाराजी दाखवणारे आणखी एक नेते म्हणजे छगन भुजबळ. सकाळी विधानभवनात कुठेही न दिसलेले भुजबळ दुपारी माध्यमांच्या सहकाऱ्यांसोबत बोलताना दिसले. ते मंत्रिपदाबद्दलच बोलत होते.

त्यांनी अजित पवारांवर स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली. विनाकारण मंत्रिमंडळातून काढून मी काहीही करून दाखवू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय, असं ते पत्रकारांना सांगत होते.

पण अभी तो जंग शुरू हुइ हैं असं म्हणत खास त्यांच्या स्टाईलमध्ये लढणार असल्याचंही सांगितलं.

नंतर माध्यमांना औपचारिक प्रतिक्रिया दिली. त्यातही नाराजी लपवली नाही.

छगन भुजबळ

फोटो स्रोत, ANI

जरांगेंना अंगावर घेतल्यामुळं झालं का असं पत्रकारांनी विचारलं तर त्याचंच बक्षीस मिळालं, असंही म्हणाले.

'ते छापू नका'

सोमवारचा आणखी एक चर्चेतला नाराज चेहरा म्हणजे भाजपचे सुधीर मुनगंटीवार. तेही विधानभवनात दिसले नाही.

पण, कालपर्यंत माझं नाव होतं आणि कालच कसं गायब झालं? असा त्यांचा एक बाईट माध्यमांवर होता.

फडणवीसांनी मुनगंटीवार यांच्यासाठी पक्षाने दुसरा काहीतरी विचार केला असेल, असं सांगितलं.

सुधीर मुनगंटीवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुधीर मुनगंटीवार

मुनगंटीवारांशी नंतर अनेकांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी थेट बोलणं टाळलं. नाराजीच्या सूरात अनौपचारिकपणे ते बरंच काही बोलले. पण ते छापू नका असंही म्हणाले.

त्यांनी नितीन गडकरींची भेटही घेतली. त्यांच्याशी दोन तास चर्चा केली. पण त्यानंतरही मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगितलं आणि काल ते कलं नव्हतं, हा त्यांचा प्रश्न मात्र कायम होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.