भारतात 'पुरुषसत्ताक' पद्धत नसल्याच्या निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर का होत आहे चर्चा?

फोटो स्रोत, x/@nsitharamanoffc
- Author, शताली शेडमाके
- Role, बीबीसी मराठी
बंगळुरू येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले भाष्य चांगलेच चर्चेत आले आहे. यावरुन सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
'पुरुषसत्ताक पद्धत काय असते?', असा प्रतिप्रश्न विचारताना त्या म्हणाल्या की "आपलं अपयश झाकण्यासाठी अनेक जण या शब्दाचा आसरा घेताना दिसतात. जर तसं असतं तर इतिहासात इतक्या महिला उच्चपदावर गेल्या असत्या का? त्या म्हणाल्या लक्षात घ्या की डाव्या विचारसरणीच्या लोकांनी तयार केलेला हा शब्द आहे, याकडे तुम्ही लक्ष देऊ नका."
निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर काही महिलांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारला आहे की निर्मला सीतारामन या नेमक्या कोणत्या देशात राहतात?
सीतारामन यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय ते जाणून घेऊया.
निर्मला सीतारामन नेमकं काय म्हणाल्या?
शनिवार 9 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील CMS बिझनेस स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाष्य केलं. महिला सक्षमीकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
कार्यक्रमाच्या निवेदकांनी निर्मला सीतारामन यांना विचारलं की "अनेक महिला खूप परिश्रम करत आहेत, त्यांच्याजवळ गुणवत्ता आहे पण त्या पुढे येऊ शकत नाहीत. कुठे ना कुठे, पुरुषसत्ताक पद्धती या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचे तुम्हाला वाटते का?"
या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, "काय असते पुरुषसत्ताक पद्धत?"
'पुरुषसत्ताक' पद्धत ही डाव्या पक्षांच्या विचारसरणीतून आलेली संकल्पना आहे, असं त्या म्हणाल्या.
"जर पुरुषांची सत्ता किंवा पुरुष प्रधानता ही महिला सशक्तीकरणाच्या आड आली असती तर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान बनू शकल्या असत्या का?" हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी अरुणा असफ अली, सरोजिनी नायडू यांचा नावाचाही उल्लेख केला.

फोटो स्रोत, x/@nsitharamanoffc
"जर तुम्ही तर्कशुद्ध प्रश्न विचारला तर कुणीच तुम्हाला शांत बसायला सांगून खाली बसवू शकत नाही. निदान भारतात तरी असं नाहीये," अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"तुम्हाला तुमची स्वप्नं पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही," असं त्या म्हणाल्या.
"पुरुषसत्ताक पद्धत नसती तर तुम्ही मंगळावरच गेला असता,असं थोडंच आहे. अनेक जण स्वतःची कार्यक्षमता झाकण्यासाठी अशा शब्दांचा आसरा घेताना दिसतात. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विणलेल्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नका," असं त्या म्हणाल्या.
त्याचवेळी त्या हे देखील म्हणाल्या, 'मी असं देखील नाही म्हणत की, महिलांना पुढे येण्यासाठी भरपूर प्रोत्साहन मिळत आहेत.'
महिलांसाठी विकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्या म्हणाल्या.


सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
निर्मला सीतारामन यांनी भाष्य केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी महिला अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला आहे.

फोटो स्रोत, x/@mehtahansal
निलाक्षी बसुमात्री यांनी ट्विटरवर लिहिलं की, "निर्मला सीतारामन म्हणतात, पुरुषसत्ताक पद्धत भारतात अस्तित्वात नाही. त्या नेमकं कोणत्या भारताबद्दल बोलताहेत?"

फोटो स्रोत, x/@__nilakshi
सिद्धार्थ नावाच्या एका यूझरनं लिहिलं की, "भारताला आजवर 15 पंतप्रधान लाभलेत, त्यापैकी 14 पुरुष आणि 1 महिला आहेत. असं असतानाही निर्मला सीतारामन म्हणतात, पुरुषसत्ताक पद्धत असती तर इंदिरा गांधी पंतप्रधान बनू शकल्या असत्या का?’

फोटो स्रोत, x/@DearthOfSid
ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शक तसेच 'द डेली आय' या वेबपोर्टलच्या संपादक विनिता नंदा यांनी पोर्टलवर लेख लिहिला आहे. त्यांनी यात म्हटलं की, सीतारामन यांनी भारतात पुरुषसत्ताक पद्धत असल्याचे नाकारणे हे अनेकांना अस्वस्थ करणारे असल्याचे म्हटले आहे.
नंदा म्हणतात की "भारतात पुरुषसत्ताक पद्धत नसल्याचे नाकारणे म्हणजे सत्ताधारी वर्गाची शोषित वर्गाच्या यातनेशी असणारी नाळ तुटल्याचे द्योतक आहे."
सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे गंभीर बाब असल्याचे नंदा यांनी म्हटले आहे.
'पुरुषसत्ताक' पद्धत म्हणजे काय?
निर्मला सीतारामन यांनी 'पॅट्रियार्की' हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे की, अशी पद्धत ज्यात पुरुषांकडेच सर्व सत्ता आणि सत्तेची साधनं असतात. या पद्धतीला पुरुषसत्ताक किंवा काही ठिकाणी पितृसत्ताक पद्धतही म्हणतात.
अनेक वेळा जिथं पुरुषांना प्राधान्य दिलं जातं, पुरुषांच्याच हिताचा विचार केला जातो अशा पद्धतीला पुरुष प्रधान संस्कृती देखील म्हटलं जातं.
पुरुषसत्ताक पद्धती आणि महिला हक्क यावर बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी नसिरुद्दीन यांनी एक ब्लॉग लिहिला आहे.
आपला समाज पुरुषसत्ताक आहे. म्हणजेच पुरुषांच्या बाजूनं किंवा त्यांच्या हितांचा विचार करणारी ही पद्धत किंवा विचार आहे. याची पाळंमुळं फार खोलपर्यंत रुतलेली आहेत. पण त्याचा विस्तार नेमका किती झाला आहे? याचा अंदाज लावणं मात्र कठीण आहे.
या पद्धतीला एक संस्थात्मक रूप देण्यात येतं. अनेकदा ही संस्था पुरुषांच्या पाठीशी उभी राहते. एकप्रकारे महिलांवर पुरुषांची मक्तेदारी दर्शवणारी ही पद्धत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर चर्चा व्हावी'
एक्स प्लॅटफॉर्मवर अवनी बन्सल नामक युझरने व्हिडीओ पोस्ट करत महिला सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुरुषसत्ताक जगभरातील महिलांचे हक्क आणि सुरक्षेचा मुद्दा नवीन नाही. अनेक घटनांमधून, प्रसंगांमधून तो वारंवार उपस्थित होत असतो.
देशातील स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, पडदा पद्धत इत्यादीमधून स्त्रीच्या अस्तित्व आणि अस्मितेचा मुद्दा उठत असतो. महिला अत्याचारांच्या घटनेत दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे.
मणिपूर येथील हिंसाचारात दोन नग्न महिलांची धिंड काढण्यात आली, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळं समाजमन ढवळून निघालं. संतापाची लाट उसळली मात्र, त्यावर ठोस उपाययोजना अजूनही अंमलात आलेल्या नाहीत, असं अवनी बन्सल यांनी आपल्या व्हीडिओत म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पुढे त्या म्हणतात, “भारतात जेव्हाही पुरुषसत्ताक पद्धतीचा विषय निघतो, तेव्हा काही चर्चित महिलांची उदाहरणं देऊन देशात ही पद्धतच अस्तित्वात नसल्याचं म्हटलं जातं. मात्र, खरंच असं आहे का? ”
असं म्हणत त्यांनी देशातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.

फोटो स्रोत, Getty Images
पैलवान विनेश फोगाट यांच्या आंदोलनावेळी निर्मला सीतारामन यांनी आवाज उठवला नव्हता याचा उल्लेखही अवनी बन्सल यांनी केला आहे.
"विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी लैगिक शोषणाच्या तक्रारींविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना कशाप्रकारची वागणूक देण्यात आली, यावर तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत, मग पुरुषसत्ताक पद्धत नाही असं कसं म्हणता? हीच पुरुषसत्ताक पद्धत आहे, पूर्ण देशात पसरलीय तुम्ही डोळे उघडून एकदा चारी बाजूंनी बघा," असा सल्लाही अवनी यांनी दिलाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











