‘निवांतपणा हे माझं स्वप्न आहे’, महिलांच्या वाट्याची कामं कधीच का संपत नाहीत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
“मी सकाळी चारला उठून अनारसे आणि शंकरपाळे केले आहेत,” गीता मला सांगत होती.
गीता पुण्यात एका कंटेंट मॅनजमेंट कंपनीत काम करते. तिचं ऑफिस साडेनऊला सुरू होतं, त्यासाठी तिला घरातून आठला निघावं लागतं. तिथे रोजची शिफ्ट नऊ तासांची आहे, पण काम संपता संपता दहा तास होतातच.
पण घरी आलं तरी तिचं काम संपत नाही
सणवाराच्या काळात तिला रात्रीची झोपही नसते. आता गौरी-गणपतीच्या काळात तिला रोज चारला उठून फराळाचे पदार्थ तयार करायला लागले होते.
“आमच्या घरात गौरींसमोर ठेवायला विकतचे पदार्थ चालत नाहीत. त्यामुळे ऑफिस सांभाळून हे करायचं असतं,” तिच्या बोलण्यात अभिमान आहे की हतबलता हेच कळत नाही.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाझेशनच्या एका ताज्या अहवालात म्हटलं आहे की, भारतात नोकरी/काम करणाऱ्या लोकांपैकी निम्म्याहून जास्त लोक दर आठवड्याला 49 तासांपेक्षा जास्त काम करतात.
पण यात महिलांची, त्यातही तरुण महिलांची आकडेवारी पाहिली तर त्यांचे कामाचे तास याहूनही जास्त आहेत.
आयटी आणि मीडियात काम करणाऱ्या भारतीय महिलांचे कामाचे तास जगात सर्वाधिक आहेत.
या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका दर आठवड्याला 56.5 तास काम करतात तर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला दर तासाला 53.2 तास काम करतात. याच महिला जर 18-24 या वयोगटातल्या असल्या तर त्या दर आठवड्याला अनुक्रमे 57 तास आणि 55 तास काम करतात.


याच क्षेत्रातल्या पुरुषांचे तास यापेक्षा किंचित जास्त असले, तरी भारतासारख्या देशात महिलांची कामं फक्त नोकरीपुरती मर्यादित नसतात हे मान्य करावं लागेलच.
महिला दर आठवड्याला 55 तास ऑफिसात काम करत असल्या तरी घरचं काम धरून त्यांचं काम पुरुषांच्या तुलनेत दुप्पट होतं.
स्वयंपाक, घरातल्या मुलांची आणि जेष्ठांची देखभाल करणं, सफाई किंवा इतर कोणतंही घरकाम ज्यासाठी महिलांना आर्थिक मोबदला मिळत नाही, त्याला विनामोबदल्याचं काम किंवा अनपेड वर्क असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
अशा कामाला विनामोबदल्याचं कामं म्हणतात. या कामाचं प्रमाण भारतात प्रचंड आहे.
भारताल्या महिलांच्या एकूण विनामोबदल्याच्या कामाचं मूल्य प्रचंड आहे. स्टेट बँकेच्या इकोरॅप रिपोर्टनुसार, भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महिलांच्या अनपेड लेबर, म्हणजेच ज्याचा त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही अशा कामाची योगदान 22.7 लाख कोटी रूपये इतकं आहे. म्हणजेच GDP च्या 7.5 टक्के.
सीमा कुलकर्णी महिला किसान अधिकार मंच या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्य आहेत. त्या म्हणतात, “पिरियॉडिक लेबर सर्व्हे मधून समोर आलेला जो ऑफिशियल डेटा आहे, त्यानुसार 2017-18 मध्ये महिलांच्या विनामोबदल्याच्या कामाचा टक्का 31 टक्के होता तर आता तो 2022-23 च्या डेटानुसार 37 टक्क्यांच्या जवळपास आहे. स्टेट सपोर्ट नसल्याने हा टक्का वाढलाय. त्यामुळे पाणी भरणं, अन्नसुरक्षा, केअरवर्क यात महिलांचा खूप वेळ जातो.”
गेल्या सात वर्षांत महिलांचा कामात सहभाग वाढला असला तरी त्यांचा विनामोबदल्याच्या कामाचा टक्काही वाढलाय.
हाच ट्रेंड या वर्षी म्हणजे 2023-24 च्या डेटामध्येही दिसून येतो.
15 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांच्या लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (सर्व प्रकारच्या कामाचा टक्का) 2022-23 मध्ये 37 टक्के होता तर आता तो वाढून 41.7 टक्के झाला आहे.
पण असं म्हणून चालणार नाही की सगळ्याच महिलांना त्याच्या कामाचे पैसे मिळतात किंवा त्यातून काही आर्थिक उत्पन्न मिळतं.
महिलांच्या या कामाच्या वाढलेल्या टक्क्यांत बहुतांश वाटा स्वयंरोजगार या रकान्यात वाढला आहे.
याच रिपोर्टमधली दुसरी आकडेवारी असंही दाखवते की, नोकरी करणाऱ्या महिलांच्या तुलनेत स्वयंरोजगार मिळवणाऱ्या महिलांना कमी पैसे मिळतात.
म्हणजेच महिलांच्या कामाचा टक्का वाढला असता तरी एकतर तो विनामोबदल्याच्या कामाचा आहे किंवा त्यांना कामाचे कमी पैसे मिळतात.
दोन्हीकडून महिलांचं मरण
घरातल्या कामाची मुख्य जबाबदारी महिलांवरच असते. पुरुषांनी काही कामं केली तरी ती मदत म्हणूनच गृहित धरली जाते.
इशा नाशिकमध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते. तिला एक चार वर्षांची मुलगी पण आहे. ती याबद्दल सांगते, “लहान मुलगी, सासू-सासरे, घरातली कामं आणि नोकरी करताना जीव नकोसा होतं. काम कधी संपतच नाही असं वाटतं. नवरा मदत करत नाही असं नाही, पण ती फक्त मदत असते. माझ्याकडे समजा कामाला मोलकरीण येत असली, तरी ती नसली की धुणंभांडी मलाच करावी लागतात, ती जबाबदारी न सांगता दुसरं कोणी, नवरा घेईल असं नसतं. त्यातच मुलगी रडायला लागली, तर तुझ्याकडेच ती राहाते म्हणून तिलाही माझ्याकडे सोपवून घरचे निवांत होतात.”

घरचं आणि बाहेरचं करणं ही कसरत दरवेळी करणं अवघड होतं हे इशा मान्य करते.
“एका बाजूला आता मुलींकडून अपेक्षा आहेत की त्यांनी करियर करावं, नोकरी करावी, भरपूर पैसे कमवावेत. आजकाल प्रत्येकालाच कमवणारी बायको/सून हवी असते. पण म्हणून तिने घरातल्या जबाबदाऱ्या न घेऊन चालत नाही. ऑफिसमध्ये म्हणतात करियरमध्ये पुढे जायचं असेल तर फक्त ठरलेल्या वेळात काम करू नका, एक्स्ट्रा थांबा. जास्त काम करा, आणि घरचे म्हणतात घरच्या जबाबदाऱ्या टाळू नका, दोन्हीकडून बायकांचं मरण होतं,” ती निश्वास सोडते.
भारतातल्या महिला सर्वाधिक वेळ काम करतात याबद्दल जेव्हा आमच्याही ऑफिसात चर्चा झाली तेव्हा वरिष्ठांपासून कनिष्ठ महिला कर्मचारी सगळ्यांनीच मान डोलावली. प्रत्येकीलाच मान्य आहे की हो, घर आणि नोकरी दोन्ही मिळून अतिकाम तर होतंय.
शहरात काम करणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची परिस्थिती अशी असेल तर कष्टकरी महिलांची परिस्थिती कशी असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
मध्यंतरी कामाच्या संदर्भात दिल्लीच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या संगीताची भेट झाली.
त्यांनाही दररोज नऊ तासांची शिफ्ट असते. दिल्ली शहराच्या सीमेवरच्या भागात त्या राहतात. त्यामुळे कामावर येताना दीड तास आणि जाताना दीड तास, असे त्यांचे रोजचे तीन तास जातात.
त्यातच घरचं काम, मुला-बाळांचं पाहाणं यामुळे त्यांचा दिवस सकाळी चारला सुरू होतो ते रात्री अकराला संपतो.
संगीता यांना झोपसुद्धा पुरेशी मिळत नाही.

ग्रामीण भागातही परिस्थिती वेगळी नाहीये. तिथेही शेती किंवा अन्य रोजगाराच्या कामासोबतच पाणी आणणं, इंधन जमा करणं, घरकाम अशा जबाबदाऱ्या आहेतच.
काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात मला भेटल्या होत्या सुनिताबाई.
त्यांनी हसत हसत म्हटलं, “मेल्याशिवाय काय बाईची सुटका नाही कामातून.”
“आता तुम्ही बघा, तुम्ही आलात तेव्हा मी पाण्याचे हंडे भरून आले, मग इथे ओवरी झाडून घेतली. तुमच्याशी बोलता बोलता भाजी निवडली. आता नातवाला बघतेय. सुनेचा स्वयंपाक झाला की बाजारात जाणार आणि मग शेतावर.”
त्यांना एका क्षणाची उसंत नव्हती.
त्यांच्या आणि इशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्गात फरक आहे, पण तिच्यासाठीही निवांतपणा ही चैन आहे.
“एकदिवस असा यावा, ज्या दिवशी मला काहीच काम नसेल, त्या दिवसाची वाट, वाट कसली स्वप्नच पाहाते मी, की मी निवांत उठेन, घरात कोणतंही काम पडलेलं नसेल. मला हातात चहाचा कप, जेवायला मिळेल. तसं मिळाल्यावरही किचनमध्ये पडलेला पसारा आवरण्याचं टेन्शन नसेल. त्यादिवशी खूप झोप काढेन मी,” ती म्हणते.
खूप वेळ मिळाला तर अनेक गोष्टी करायच्या आहेत बायकांना, पण वेळच त्यांच्याकडे नाहीये.











