या भागात घटस्फोट घेण्यासाठी महिलांना द्यावे लागतात पैसे, नेमकी काय आहे ही प्रथा?

- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"आमच्याकडे लहानपणीच लग्न जुळवलं जातं, साखरपुडा होतो आणि त्यानंतर मुलीबाबतचे सर्व निर्णय तिच्या सासरची मंडळीच घेतात. जर मुलीला घटस्फोट हवा असेल तर त्याबदल्यात सासरच्यांकडून पैशांची मागणी केली जाते. माझ्या सासरच्यांनी 18 लाख रुपयांची मागणी केली आहे."
मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील कौशल्या त्यांची कहाणी सांगत होत्या. त्या सांगत असलेली प्रथा तिथे पिढ्यानपिढ्या सुरू आहे. या प्रथेला 'झगडा नातरा' असं म्हटलं जातं.
कौशल्या, पगारिया गावच्या रहिवासी आहेत. 'झगडा नातरा' प्रथेअंतर्गत त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांचा साखरपुडा झाला होता, तर 2021 मध्ये त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या 22 वर्षांच्या होत्या. त्यांचे वडील शेतकरी आहेत.
कौशल्या म्हणतात, "लग्नानंतरच्या या तीन वर्षांमध्ये मला घरगुती हिंसेला तोंड द्यावं लागलं. माझ्याकडे पाच लाख रुपये आणि एका मोटरसायकलची मागणी करण्यात आली. सासरचा छळ माझ्या सहन करण्यापलीकडे गेल्यावर मी माझ्या माहेरी परत आले."


कौशल्याची दु:खद कहाणी
सामाजिक दबाव आणि घटस्फोट होण्याच्या भीतीनं कौशल्या यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांना वाटत होतं की, प्रकरण जास्त ताणलं जाऊ नये. म्हणूनच सुरुवातीला त्यांनी कौशल्याची समजूत काढून त्यांना पुन्हा सासरी पाठवलं.
कौशल्या सांगतात, "मला मारहाण केली जायची. मला पुढे शिकायची इच्छा होती. तसंच नोकरी करायची होती. मला घटस्फोट देण्यासाठी आमच्याकडे 18 लाख रुपयांची मागणी करण्यात आली."
2023 मध्ये त्या पुन्हा माहेरी आल्या. त्यावेळेस मात्र त्यांनी निर्धार केला होता की आता त्या पुन्हा सासरी जाणार नाहीत.
मात्र, तरीदेखील त्यांच्या माहेरच्या लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना हे माहित होतं की, जर कौशल्या सासरी नांदायला गेल्या नाहीत तर त्यांना घटस्फोट घ्यावा लागेल.

फोटो स्रोत, KAUSHALYA
घटस्फोटापोटी कौशल्याच्या सासरच्यांच्या मागणीनुसार त्यांना मोठी रक्कम द्यावी लागेल. ती रक्कम देणं सोपं असणार नाही.
शेवटी हे प्रकरण पंचायतीकडे पोहोचलं. तिथे असा निर्णय घेण्यात आला की, जर कौशल्या यांना घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या सासरच्या मंडळींना 18 लाख रुपये द्यावे लागतील.
कौशल्या सोंदिया समुदायातील आहेत. हा समुदाय मागासवर्गीय जातीमध्ये येतो. या समुदायाचे लोक पोलीस, कायदा किंवा न्यायालयात दाद मागण्याऐवजी पंचायतींकडेच धाव घेतात. तिथे जाऊन ते त्यांची प्रकरणं सोडवतात किंवा पंचायत जो निर्णय देईल त्याप्रमाणे वागतात.
विकास नसलेलं मागासलेलं गाव
पगारिया गाव तसं मागासलेलं आहे. इथे विकास झालेला नाही. मुख्य रस्ता गावात शिरतात, त्याची स्थिती खराब झालेली दिसते. गावात रस्त्याची दुर्दशा झाले आहे. अनेक ठिकाणी डांबरी रस्ता देखील नाही. इथल्या बहुतांश महिला घुंघटमध्ये असतात.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (एनएफएचएस-5) नुसार राजगढ जिल्ह्यातील 52 टक्के महिला अशिक्षित आहेत. तर 20-24 वर्षे वयोगटातील एकूण तरुणींपैकी 46 टक्के तरुणी अशा आहेत, ज्यांचं लग्नं वयाच्या 18 वर्षाआधीच झालं आहे. म्हणजेच त्यांचा बालविवाह झाला आहे.

2011 च्या जणगणनेनुसार राजगढ जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 15.45 लाख आहे, तर इथे महिलांची संख्या जवळपास 7.55 लाखाहून अधिक आहे.
मध्य प्रदेशातील राजगढव्यतिरिक्त आगर मालवा, गुना सह राजस्थानातील झालावाडपासून चित्तौडगढपर्यंतच्या परिसरात नातरा प्रथा अजूनही सुरू आहे.
काय आहे ही प्रथा?
जाणकार सांगतात की, या भागामध्ये ही प्रथा 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे.
सीमा सिंह 1989 पासून राजगढमधील पी जी कॉलेजमध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
त्या म्हणतात की, 'झगडा नातरा' प्रथेचा कोणताही लिखित स्वरुपाचा इतिहास नाही. मात्र, ही प्रथा खूप जुनी आहे. विधवा महिला आणि लग्न न करता महिला आणि पुरुषांनी एकत्र राहण्याची ही परंपरा होती. जेणेकरून अशा महिला आणि पुरुषांना सामाजिकदृष्ट्या चांगलं आयुष्य जगता यावं.
त्या सांगतात की या प्रथेबाबत अनेक जाणत्या, वृद्ध व्यक्तींशी चर्चा करण्यात आली. आधी या प्रथेचं नाव नाता प्रथा असं होतं.
त्यानुसार, "या प्रथेअंतर्गत विधवा महिलांना पुन्हा एकदा सामाजिक जीवनाची संधी मिळत होती. अर्थात काळानुरुप या प्रथेचं स्वरुप बदलत गेलं. आज या प्रथेचं रुपांतर एकप्रकारे महिलांची सौदेबाजी करण्यात झालं आहे."
"यात मुलींचा बालविवाह केला जातो किंवा बालपणातच साखरपुडा केला जातो. त्यानंतर मग जेव्हा पती-पत्नीत तणाव निर्माण होतो किंवा घटस्फोट व्हायची वेळ येते तेव्हा महिलांकडे पैशांची मागणी केली जाते. पैशांच्या या मागणीलाच इथे 'झगडा' मागणे असं म्हणतात."

अशा प्रकरणांमधील पंचायतींच्या भूमिकेबद्दल सीमा सिंह म्हणतात, "पंचायतींकडे जेव्हा ही प्रकरणं जातात, तेव्हा मुली एकतर याला विरोध करतात किंवा पैशांची मागणी पूर्ण करणं मुलीच्या माहेरच्यांना शक्य नसतं.
"कारण मुलाकडचे लोक नेहमीच खूप जास्त पैशांची मागणी करतात. पंचायतीमध्ये त्यांच्याच समाजाचे लोक या गोष्टीचा निर्णय घेतात की मुलीला तिच्या स्वातंत्र्याबद्दल किंवा घटस्फोटासाठी सासरच्यांना किती पैसे द्यावे लागतील."
तर याबाबत स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते भानु ठाकूर म्हणतात की, "या प्रथेचा प्रभाव स्थानिक लोकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की या प्रथे अंतर्गत केला जाणारा साखरपुडा हा कोर्ट मॅरेजपेक्षाही अधिक विश्वसनीय किंवा ठोस मानला जातो."
गेल्या तीन वर्षांमध्ये 'झगडा नातरा' प्रथेची 500 हून अधिक प्रकरणं फक्त राजगढ जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहेत.
भानु ठाकूर म्हणतात की जी प्रकरणं नोंदवली गेली आहेत, त्यांची ही संख्या आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत जी नोंदवली गेलेली नाहीत. त्यामुळे या प्रकारच्या प्रकरणांची संख्या कितीतरी अधिक असू शकते.
तीन वर्षांत 500 प्रकरणांची नोंद
कौशल्या यांच्या प्रकरणाबाबत आम्ही राजगढचे पोलीस अधीक्षक आदित्य मिश्रा यांच्याशी बोललो. आदित्य मिश्रा म्हणाले, "ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य प्रथा आहे. या प्रथेचा वापर आजदेखील या परिसरातील लोक रुढी-परंपरांच्या नावाखाली महिलांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी करतात."
पोलीस अधीक्षक आदित्य मिश्रा म्हणाले, "अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात लहानपणीच मुलांचा साखरपुडा केला जातो. मग पुढे घटस्फोट झाल्यानंतर मुलीकडच्यांना मुलाच्या कुटुंबियांना लाखो रुपये द्यावे लागतात."
ते सांगतात, "एकप्रकारे हा महिलांच्या स्वातंत्र्याचं दमन करण्याचाच प्रयत्न आहे आणि समाजात याला योग्य मानलं जातं."

त्यांच्यानुसार, "मागील तीन वर्षांमध्ये जवळपास 500 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींकडे मी एक सकारात्मक बाब म्हणून पाहतो. कारण इतक्या वर्षांनंतर आता पीडितांमध्ये किमान इतकं धैर्य तरी निर्माण झालं आहे की ते या प्रकरणाची तक्रार करत आहेत आणि कायद्याची मदत घेत आहेत."
सीमा सिंह म्हणतात, "या प्रकाराला 'मुलींची सौदेबाजी'च म्हटलं पाहिजे. कारण या प्रथेअंतर्गत मुलगा मुलीच्या माहेरच्यांकडे पैशाची मागणी करतो. तेव्हा मुलींचे कुटुंबीय अनेक मुलांशी बोलल्यानंतर नाईलाजानं जो मुलगा सर्वाधिक पैसे देण्यात तयार होतो, त्याच्याकडे पाठवतात. त्याच्याकडून आलेल्या पैशांची मदत घेऊनच मग मुलीकडचे तिच्या सासरच्यांनी मागितलेली रक्कम देतात."

मांगीबाईचं आयुष्य
राजगढहून 20 किलोमीटर अंतरावरील कोडक्या गावात राहणाऱ्या मांगीबाईची कहाणी देखील कौशल्यासारखीच आहे.
आपली कहाणी सांगताना मांगीबाई भावनाविवश झाल्या.
त्या म्हणतात, "मला माझ्या सासरी जेवायला देखील मिळत नव्हतं. झोपायला अंथरुण मिळत नव्हतं. माझ्या पतीला जेव्हा दारू पिण्यापासून रोखायची तेव्हा मला मारहाण केली जायची."
"माझं आयुष्य बरबाद झालं होतं. आम्ही खूप गरीब माणसं आहोत. माझं काही खूप मोठं स्वप्नं नव्हतं. मला फक्त सुखी आयुष्य हवं होतं. मात्र माझ्या वाट्याला तेवढं देखील आलं नाही."

मांगीबाई म्हणतात की त्यांनी जेव्हा घटस्फोट घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मग हे प्रकरण पंचायतीमध्ये पोहोचलं. तिथं देखील मांगीबाई यांच्या विरोधातच निर्णय देण्यात आला.
जानेवारी 2023 मध्ये मांगीबाई यांनी राजगढमधील खिलचीपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांचे पती, सासरे आणि जेठ यांच्याविरोधात मारहाण करणं आणि पैसे मागितल्याची तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगीबाईचे पती कमलसिंह, जेठ मांगीलाल आणि त्यांचं सासर असलेल्या बोरदा गावातीलच कंवरलाल यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 498 अ (महिलांवर पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून केले जाणारे अत्याचार, क्रौर्य यासंदर्भातील कलम) अंतर्गत तक्रार नोंदवली गेली. सध्या मांगीबाईचे पती आणि सासरकडचा एक व्यक्ती जामिनावर बाहेर आहे.
सध्या मांगीबाई त्यांच्या आई-वडिलांबरोबर राहतात.

मांगीबाईचे वडील आणि त्यांचे दोन भाऊ मजूरी करून पोट भरतात.
त्यांचे वडील म्हणतात की 'झगड्या'ची 5 लाख रुपयांची रक्कम देणं त्यांना शक्य नाही. त्याचबरोबर जोपर्यंत ते ती रक्कम देत नाहीत, त्यांना त्यांच्या मुलीचं इतरत्र लग्नदेखील करता येणार नाही.
याच दरम्यान मांगीबाई यांचे पती कमलेश यांनी मात्र दुसरं लग्न केलं आहे. ते रोजंदारीवर मजूरी काम करतात.
बीबीसीला कमलेश यांनी सांगितलं की, "मी मांगीबाईच्या वडिलांना जवळपास तीन लाख रुपये दिले आहेत. ही रक्कम मी त्यांना सहा महिन्यांआधी दिली होती. लग्नाच्या वेळेस माझ्या कुटुंबानं मांगीबाईला एक तोळं सोनं, एक किलो चांदीचे दागिने देखील दिले होते. आम्ही फक्त आमच्या वस्तू आणि जी रक्कम दिली होती, तीच मागत आहेत. आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही."
जेव्हा आम्ही त्यांना हे विचारलं की हे पैसे त्यांनी मांगीबाईच्या वडिलांना का दिले होते, त्यावर त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.
तर मांगीबाई यांचा आरोप आहे की कमलेश यांनी दुसरं लग्न केल्यानंतर देखील ते त्यांच्याकडून पैशांची मागणी करत आहेत.
पंचायत घेते अंतिम निर्णय
अशा प्रकारच्या पंचायतमध्ये बसून निर्णय घेणारे 70 वर्षांचे पवन कुमार (नाव बदललं आहे) म्हणतात की फार पूर्वीपासून ही प्रथा सुरू असून, त्यात असं दिसून आलं आहे की पंचायतचा निर्णय मुलाकडच्या बाजूनंच होतो.
पवन कुमार म्हणतात की, "आमच्याकडे या प्रकरणांमध्ये पंचायतचा निर्णय अंतिम असतो. मी अनेक पंचायतींमध्ये उपस्थित होतो. तिथे मी 60,000 रुपयांपासून ते 8 लाख रुपयांमध्ये भांडणं सोडवली आहेत."
ते पुढे म्हणाले, "लहानपणीच लग्न ठरल्यामुळे पुढे नात्यात तणाव निर्माण होतात आणि मोठेपणी मुली घटस्फोट घेतात. काही प्रकरणांमध्ये मुलींची देखील चूक असते. अशावेळी आमचा प्रयत्न असतो की मुलीकडच्यांना कमीत कमी पैसे द्यावे लागावेत. मात्र 90 टक्के प्रकरणांमध्ये मुलीकडच्यांना पैसे द्यावेच लागतात."

फोटो स्रोत, KAUSHALYA
सामाजिक कार्यकर्त्या काय म्हणतात?
मोना सुस्तानी या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. या प्रथेच्या विरोधात जवळपास एक दशकाहून अधिक काळापासून त्या काम करत आहेत. त्या म्हणतात की ही प्रथा महिलाविरोधी आहे आणि पितृसत्ताक विचारपद्धतीला प्रोत्साहन देते.
त्या म्हणतात, "माझं लग्न एका राजकीय कुटुंबात झालं आहे. 1989 मध्ये मी जेव्हा लग्न होऊन सासरी आले, तेव्हा ही प्रथा पाहून आश्चर्यचकित झाले. मग मी या प्रथेच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार केला."
झगडा नातरा प्रथे अंतर्गत आलेल्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांच्या संस्थेचा प्रयत्न असतो. जेणेकरून मुलीच्या कुटुंबियांवर आर्थिक ताण येऊ नये. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना यश देखील मिळालं आहे.

मोना सुस्तानी म्हणतात की गेल्या 5 वर्षांमध्येच त्यांच्या संस्थेनं जवळपास 237 मुलींची या प्रथेतून सुटका केली आहे. यातील बहुतांश मुलींना एक पैसा देखील द्यावा लागला नाही.
मोना सुस्तानी पुढे म्हणतात, "ही खूप कठीण गोष्ट असते. अनेकवेळा चर्चा करून, कुटुंबियांवर राजकीय आणि पोलिसांचा दबाव आणून आम्ही फक्त 5 वर्षांमध्ये 237 मुलींची कोणतीही रक्कम न देता या प्रथेतून सुटका केली आहे. आज त्यामधील अनेकांचं दुसरं लग्न देखील झालं आहे आणि त्या आधीपेक्षा चांगलं आयुष्य जगत आहेत."
चुकीच्या प्रथेविरोधात दिला लढा
तर ही चुकीची प्रथा मूळापासून संपवण्यासाठी रामकला गेल्या 6 वर्षांपासून काम करत आहेत. त्या स्वत: या प्रथेच्या पीडिता आहेत. त्या म्हणतात की मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा हे सर्व एखाद्या चमत्कारासारखंच वाटतं.
या प्रथेमुळे रामकला यांना त्यांचं घर देखील सोडावं लागलं होतं. सध्या त्या पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर या प्रथेविरोधात मुली आणि महिलांना मदत करत आहेत.

रामकला म्हणतात, "मुलींची यातून सुटका करणं कठीण गोष्ट आहे. 'झगड्या'च्या रुपात पैसे देण्यासाठी मुलींवर प्रचंड सामाजिक दबाव असतो. अशावेळी आमच्याकडे जेव्हा एखादं प्रकरण येतं तेव्हा सर्वात आधी आमचा प्रयत्न असतो की ते प्रकरण पोलिसांकडे जावं. अनेक प्रकरणांमध्ये आम्ही मुलगा किंवा पती आणि त्याच्या कुटुंबियांशी देखील चर्चा करतो. जर त्यांनी समजूतदारपणा दाखवला तर ठीक, नाहीतर मग आम्ही कायद्याचा आधारे मुलींची मदत करतो."
अर्थात जरी रामकला, मोना सुस्तानी आणि इतर लोक वेगवेगळ्या प्रकारे या चुकीच्या प्रथेत अडकलेल्या मुलींची मदत करण्याचा प्रयत्न करत असले तरी देखील कौशल्या आणि मांगीबाई सारख्या हजारो मुलींना, महिलांना त्यांच्या आयुष्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लाखो रुपये मोजण्यास भाग पाडलं जातं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











