जगभरात 37 कोटी बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती उघड

युनिसेफ अहवाल: 37 कोटी मुली-महिलांवर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, समोर आली धक्कादायक आकडेवारी

फोटो स्रोत, Getty Images

11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व लक्षात घेत युनिसेफनं (UNICEF) अलीकडेच मुलं-मुली, महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचारासंदर्भात अहवाल सादर केला आहे.

लहान मुलांवर त्यातही मुलींवर जगभरात होत असलेल्या लैंगिक हिंसाचाराचं चित्र फक्त धक्कादायक नाही तर मन विषण्ण करणारं आहे.

एकीकडे 21 व्या शतकात मानवजात मंगळावर वस्ती करण्याच्या योजना तयार करत असतानाच एक संवेदनशील मानवी समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला अजूनही किती काम करावं लागणार आहे, हे या अहवालातून लक्षात येतं. या अहवालातील महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी करणारा हा लेख...

युनिसेफच्या (UNICEF) अहवालातून मुलं-मुली आणि महिलांवर होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची संख्या आणि व्याप्ती समोर आली आहे.

युनिसेफनं या जागतिक अहवालातून लैंगिक हिंसाचार, बलात्कारासंदर्भात दिलेली भयावह माहिती कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मुलांवर बालपणातच होणाऱ्या लैंगिक हिंसाचारासंदर्भातील ही आकडेवारी म्हणजे धोक्याची घंटा असून त्याचा मुलांवर जबरदस्त परिणाम होत असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. या हिंसाचार आणि अत्याचारामुळे अनेक मुलींची आयुष्यं उद्ध्वस्त होत आहेत.

जगभरात मुलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भातील हा याप्रकारचा पहिलाच अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाआधी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

युनिसेफच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी

युनिसेफच्या पहिल्या जागतिक आणि प्रादेशिक अहवालातून समोर आलेली आकडेवारी आणि माहिती हादरवून टाकणारी आहे. या अहवालातील काही महत्त्वाच्या नोंदी अशा आहेत,

या अहवालानुसार, 18 वर्षांखालील 8 पैकी एका मुलीला लैंगिक हिंसाचाराला तोंड द्यावं लागत आहे.

युनिसेफच्या अंदाजानुसार, आज हयात असलेल्या 37 कोटींहून अधिक मुली आणि महिलांना वयाची अठरा वर्षे पूर्ण करण्याआधी बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागलं आहे.

'युनिसेफ'च्या या पहिल्या जागतिक आणि प्रादेशिक अहवालातून विविध सांस्कृतिक, भौगोलिक आणि आर्थिक स्तरातील मुलांवर होणाऱ्या हिंसाचारासंदर्भातील माहिती समोर आली आहे.

कमकुवत संस्था-यंत्रणा, राजकीय किंवा सुरक्षा संकट आणि युद्ध यासारख्या प्रमुख घटकांमुळे मुलींच्या बाबतीत धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

युनिसेफ अहवाल: 37 कोटी मुली-महिलांवर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, समोर आली धक्कादायक आकडेवारी

फोटो स्रोत, Getty Images

या अहवालानुसार 14 आणि 17 वयोगटादरम्यानच्या मुलींना सर्वाधिक लैंगिक हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं.

युनिसेफचा हा जागतिक अहवाल त्यांनी 2010 ते 2022 दरम्यान 120 देशांमधून गोळा केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.

जगभरात असलेली हिंसाचाराची व्याप्ती - युनिसेफच्या अहवालातील आकडेवारीनुसार आफ्रिकेतील सब-सहारा भागात लैंगिक हिंसाचारानं पीडित मुलींची संख्या सर्वाधिक आहे. तिथे ही संख्या 7.9 कोटी आहे.

त्याखालोखाल पूर्व आणि आग्नेय आशियात 7.5 कोटी महिला, मध्य आणि दक्षिण आशियात 7.3 कोटी पीडिता तर युरोप आणि उत्तर अमेरिकेत पीडितांची संख्या 6.8 कोटी आहे.

लॅटिन अमेरिका (दक्षिण अमेरिका) आणि कॅरिबियनमध्ये 4.5 कोटी मुली आणि महिला तर उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये 2.9 कोटी मुली आणि महिला लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत.

युनिसेफ अहवाल: 37 कोटी मुली-महिलांवर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, समोर आली धक्कादायक आकडेवारी

या बातम्याही वाचा:

युनिसेफ अहवाल: 37 कोटी मुली-महिलांवर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, समोर आली धक्कादायक आकडेवारी

ओशियानामध्ये (आशिया आणि अमेरिका खंडांमधील पॅसिफिक महासागरातील प्रदेश) हीच संख्या 60 लाख इतकी आहे.

अर्थात, मुली आणि महिलांना या अत्याचाराला मोठ्या प्रमाणात सामोरं जाव लागत असलं आणि त्यासंदर्भातील बरीचशी आकडेवारीही उपलब्ध असली तरी मुलं आणि पुरुषांनादेखील याप्रकारच्या अत्याचाराला तोंड द्यावं लागत असल्याचं आकडेवारीतून दिसतं.

लैंगिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या मुलांची आणि पुरुषांची संख्याही मोठी आहे. लैंगिक हिंसाचाराला सामोरं जाणाऱ्या मुलं आणि पुरुषांची संख्या 24 ते 31 कोटी असल्याचा अंदाज आहे.

साधारणपणे 11 पैकी 1 मुलगा बालपणात लैंगिक हिंसाचार किंवा बलात्काराला बळी पडतो आहे.

युनिसेफनं हा अहवाल तयार करताना प्रत्यक्ष शारीरिक संपर्कातून होणारा हिंसाचार किंवा अत्याचाराबरोबरच ऑनलाइन किंवा शाब्दिक स्वरुपाच्या लैंगिक हिंसाचाराचाही यात समावेश केला आहे.

या प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या जगभरात 65 कोटी इतकी आहे. म्हणजेच 5 पैकी एका मुलीला या प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचाराला तोंड द्यावं लागतं.

युनिसेफ अहवाल: 37 कोटी मुली-महिलांवर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, समोर आली धक्कादायक आकडेवारी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

युनिसेफच्या कार्यकारी संचालिका कॅथेरिन रसेल म्हणतात, "मुलांवर होणारा लैंगिक हिंसाचार हा आपल्या नैतिकेवर, विवेकावर असलेला डाग आहे. यामुळे मुलांच्या मनावर खोल आणि कायमस्वरुपी आघात होतो. अनेकदा मुलांवर हा हिंसाचार किंवा अत्याचार एखाद्या परिचयातील किंवा विश्वासातील व्यक्तींकडूनच केला जातो. जिथे मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे तिथे त्यांना अत्याचाराला तोंड द्यावं लागतं."

कॅथेरिन रसेल पुढे म्हणतात, "विशेषकरून नाजूक परिस्थिती असलेल्या किंवा अस्थिर वातावरण असलेल्या भागातील मुलं लैंगिक हिंसाचाराला बळी पडतात. युद्ध किंवा सशस्त्र संघर्ष होत असलेल्या भागात भयावह लैंगिक हिंसा घडताना दिसते. तिथे अनेकदा बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराचा वापर युद्धातील शस्त्र म्हणूनच केला जातो."

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची पार्श्वभूमी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

19 डिसेंबर 2011 ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं, 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl) म्हणून घोषित केला होता.

जगभरातील मुलींचे अधिकार आणि त्या तोंड देत असलेल्या अतिशय वेगळ्या स्वरुपाच्या आव्हानांची दखल घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

मुलींना सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांची दखल घेत त्यांच्या मानवी अधिकारांची पूर्तता करण्याचा आणि मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधण्याचा हेतू यामागे आहे.

मुलींनादेखील सुरक्षित आयुष्य जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, निरोगी आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त लहानपणीच नव्हे तर प्रौढ महिला झाल्यावरदेखील त्यांना सन्मानानं सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे.

आज मुलींच्या पाठीशी जर भक्कमपणे उभं राहिलं आणि त्यांना योग्य शिक्षण दिलं तर यातून उद्योग-व्यवसाय, राजकारण, संशोधन, कला यासारख्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. तशी क्षमता त्यांच्यात आहे.

हवामान बदल, राजकीय संघर्ष, आर्थिक प्रगती, आरोग्य सेवा आणि जागतिक स्थैर्य यासारख्या मानव जातीसमोर असलेल्या मोठ्या समस्यांचा सामना करून त्यातून मार्ग काढण्यामध्ये मुली आणि महिलांची महत्त्वाची भूमिका ठरू शकते.

लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांच्या मनावर या अत्याचारांचा इतका खोलवर आणि प्रचंड परिणाम होतो की वयस्क झाल्यावर देखील हा धक्का त्यांना सतावत असतो.

यातून त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतं. नैराश्य, चिंता यासारख्या गोष्टींबरोबरच निरोगी नातं प्रस्थापित करण्यात देखील त्यांना अडचणी येतात.

मुली-महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजना

पुढील महिन्यात कोलंबियात होणाऱ्या ग्लोबल मिनिस्टेरियल कॉन्फरन्स ऑन व्हॉयोलन्स अगेंस्ट चिल्ड्रन (Global Ministerial Conference on Violence Against Children) मध्ये विविध देशांच्या सरकारमधील नेते, नागरी समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, पीडित आणि तरुण सहभागी होणार आहेत.

जगभरातील मुलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी, त्यांचं सुरक्षित भविष्य उभारण्यासाठी आणि मुलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराशी लढा देण्यासाठीच्या उपाययोजना आणि त्यावरील कारवाईंची आवश्यकता, महत्त्व युनिसेफच्या अहवालातील आकडेवारीतून अधोरेखित होतं.

युनिसेफच्या कार्यकारी संचालिका कॅथेरिन रसेल म्हणतात,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

त्यासाठी सुचवण्यात आलेल्या काही उपाययोजना अशा आहेत,

  • ज्यामुळे मुलांवर लैंगिक अत्याचार होतात आणि मुलं मदत मागण्यास कचरतात अशा सामाजिक आणि सांस्कृतिक निकष, नियमांमध्ये बदल करणं.
  • लैंगिक हिंसाचार झाल्यास तो लक्षात यावा आणि त्याची माहिती देता यावी, यासाठी प्रत्येक मुलाला त्यासंदर्भातील योग्य माहिती देऊन सजग, सतर्क करणं.
  • प्रत्येक पीडिताला न्याय आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल आणि अत्याचारामुळे होणारी त्यांची पुढील हानी होण्याचा धोका कमी होईल यासाठीची व्यवस्था निर्माण करणं.
  • मुलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या लैंगिक हिंसचारापासून त्यांच्या बचाव करण्यासाठीचे नियम आणि कायदे अधिक कठोर आणि सक्षम करणं. तसंच त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा, साधनसुविधा उपलब्ध करून देणं.
  • मुलांवर होणाऱ्या हिंसाचार, अत्याचाराच्या वर्गीकरणासंदर्भातील आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्यासाठी तसंच त्या संदर्भातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आकडेवारी हाताळणारी अधिक सक्षम यंत्रणा उभारणं.

वैज्ञानिक, तंत्रज्ञान विषयक भौतिक प्रगती साधत असतानाच मानवी समाज, मानवी मूल्ये, संवेदनशील समाज याचं महत्त्व देखील तितक्याच अग्रक्रमानं लक्षात घेईल.

पृथ्वीवरील जवळपास निम्म्या मानवी संख्येला म्हणजे मुली-महिलांना त्यांचे सर्व अधिकार मिळतील असं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे.

त्यांना सुरक्षित, आनंदी जीवन जगता येईल असा समाज नजीकच्या भविष्यात निर्माण होईल तेव्हाच आपण स्वत:ला खऱ्या अर्थानं एक परिपूर्ण, प्रगतीशील मानवी समाज असल्याचं म्हणवू शकू, यात शंका नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)