'परिस्थितीने मला पुरुष वेश्या बनायला भाग पाडलं'

जिगोलो
    • Author, विकास त्रिवेदी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

"तुला कळतंय का तू कुठे उभा आहेस ते? इथे शरीराचा बाजार भरतो."

मी, एक पुरुष असूनसुद्धा त्या निळ्या-गुलाबी बल्बवाल्या कोठीत स्वतःला विकायला उभा होतो.

मी म्हणालो, "हो, मला दिसतंय. पण मी पैशांसाठी काहीही करायला तयार आहे."

माझ्यासमोर एक वयस्क महिला... नव्हे तर एक ट्रान्सजेंडर उभी होती. पहिल्यांदा जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा घाबरलोच. म्हटलं, ही कोण आहे?

ती म्हणाली, "खूप अॅटिट्यूड आहे तुझ्यात. इथे चालणार नाही."

दिवसाचे नऊ-दहा तास एका आयटी कंपनीत नोकरी करणारा मी त्यावेळी घाबरलो होतो. माझा आत्मा मरतोय असं मला वाटलं. मी अशा कुटुंबातून आलोय जिथे मी असं काही करेन असा कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. पण माझ्या गरजांनी मला असं करायला भाग पाडलं.

मी विचारलं, "मला कधीपर्यंत थांबावं लागेल. उद्या मला ऑफिस आहे."

"मग ऑफिसमध्येच जा. इथे काय करतोस?" हे उत्तर ऐकताच मी गप्प झालो.

काही मिनिटांतच मी या बाजारासाठी नवीन माल, नवीन छैला झालो.

ती ट्रान्सजेंडर अचानक थोडी शांत होत म्हणाली, "तुझा फोटो पाठवावा लागेल. नाही पाठवला तर कुणी बोलणार नाही."

हे ऐकल्यावर मी हादरलोच. माझा फोटो पब्लिक होणार होता. मी विचार करत होतो, एखाद्या नातेवाईकाने तो फोटो बघितला तर माझं काय होईल?

समोरून, उजवीकडून, डावीकडून माझे फोटो काढण्यात आले. दोन चांगले फोटोही मागितले.

माझ्या समोरच ते फोटो कुणालातरी व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले.

फोटोखाली लिहिलं होतं, 'नवीन माल आहे. रेट जास्त लागेल. कमी पैशात हवा असेल तर दुसऱ्याला पाठवते.'

माझा लिलाव सुरू होता. आठ हजारांपासून सुरुवात झाली आणि सौदा पाच हजारांमध्ये झाला.

यात मला क्लायंटसाठी सगळं करायचं होतं. हे सगळं कुठल्या सिनेमात नाही तर माझ्याबरोबर प्रत्यक्ष घडत होतं. सगळं खूप विचित्र होतं.

एका पिवळ्या टॅक्सीत बसून मी त्याच दिवशी कोलकात्याच्या पॉश भागातल्या घरात गेलो. घरात एक मोठा फ्रीज होता. त्यात दारूच्या खूप बाटल्या होत्या. घरात भलामोठा टीव्ही होता.

ती कदाचित 32-34 वर्षांची लग्न झालेली मुलगी होती. बातचीत सुरू झाली आणि ती म्हणाली, "मी चुकीच्या ठिकाणी अडकले. माझा नवरा गे आहे. अमेरिकेत राहतो. त्याला काही करता येत नाही. घटस्फोट देऊ शकत नाही. घटस्फोट झालेल्या मुलीशी कोण लग्न करणार? माझंही मन आहे. सांग काय करू?"

कामापुरता मामा

आम्ही दोघंही दारू प्यालो. ती हिंदी गाण्यावर डान्स करू लागली. आम्ही दोघं डायनिंग रुममधून बेडरुममध्ये गेलो.

आतापर्यंत ती माझ्याशी गोड बोलली होती. पण काम संपल्याबरोबर पैसे देऊन म्हणाली, "चल निघ इथून"

तिने मला टीपही दिली. मी तिला म्हणालो, "मी हे सगळं पैशांसाठी करतोय."

ती म्हणाली, "तुझ्या गरजेला तुझी हौस बनवीन मी."

माझी गरज कोलकात्यापासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या माझ्या घरातून सुरू झाली होती.

माझ्या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला मी अनलकी वाटायचो. कारण माझा जन्म झाला आणि वडिलांची नोकरी गेली. जसजसे दिवस गेले दुरावा वाढत गेला. मला एमबीए करायचं होतं. पण इंजीनिअरिंग करायला भाग पाडण्यात आलं आणि पुढे कोलकात्यात नोकरी लागली.

ऑफिसमध्ये सगळे बंगालीत बोलायचे. भाषा आणि ऑफिस पॉलिटिक्समुळे मी ऑफिसमध्ये कायम दुःखी असायचो. तशी तक्रारही केली पण त्याचं पुढे काही झालं नाही. बाथरुममध्ये जाऊन रडायचो तर कार्डच्या इन आणि आउट वेळेला नोट करुन म्हणायचे, 'हा जागेवर नसतो.'

माझा आत्मविश्वास ढासळत चालला होता. हळूहळू मी नैराश्याच्या गर्तेत अडकलो. डॉक्टरांकडेही गेलो. पण त्रास कमी झाला नाही.

जिगोलो

जबाबदाऱ्या आणि मानसिक त्रास याचं खांद्यावर इतकं ओझं झालं की मी इंटरनेटवर सर्च करू लागलो. मला पैसा कमवायचा होता. जेणेकरुन मला एमबीए करता येईल. घरी पैसे पाठवता येतील आणि कोलकात्याची नोकरी सोडून पळून जाता येईल.

मला इंटरनेटवर मेल एस्कॉर्ट म्हणजेच जिगोलो बनण्याचा मार्ग दिसला. हे सिनेमात बघितलं होतं. काही वेबसाईट्स असतात जिथे जिगोलो बनण्यासाठी प्रोफाईल बनवले जातात. पण हे जॉब प्रोफाईल नव्हतं.

इथे तुमच्या शरीराचा लिलाव होणार होता

प्रोफाईल लिहिताना भीती वाटत होती. पण मी उभा होतो तिथून माझ्यासमोर फक्त दोनच मार्ग होते.

एक - मागे फिरून आत्महत्या करायची

किंवा

दोन - जिगोलो व्हायचं.

मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

मी ज्या स्त्रियांना भेटलो त्यात विवाहित, घटस्फोटीत, विधवा आणि अगदी सिंगल मुलीसुद्धा होत्या. यातल्या बऱ्याच जणींसाठी मी माणूस नाही तर 'माल' होतो. त्यांच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत सगळ्या गोड बोलायच्या. म्हणायच्या मी नवऱ्याला घटस्फोट देऊन तुझ्याबरोबर राहीन. पण बेडरुममध्ये घालवलेल्या त्या क्षणांनंतर सगळं प्रेम आटून जायचं.

मग ऐकायचो -

'चल निघ इथून'

'पैसे उचल आणि पळ'

अनेकदा शिव्यासुद्धा...

हा समाज आमची मजाही लुटतो आणि आम्हालाच प्रॉस्टिट्यूट म्हणून शिव्याही घालतो.

एकदा एका नवरा-बायकोने एकत्र बोलवलं. नवरा सोफ्यावर बसून दारू ढोसत आम्हाला बघत होता. मी पलंगावर त्याच्या समोर त्याच्या बायकोबरोबर होतो.

हे काम दोघांच्या मर्जीने होत होतं. कदाचित दोघांची ही कुठलीतरी डिझायर असेल.

यादरम्यान 50 वर्षांच्या वरची बाईसुद्धा माझी क्लायंट होती. तो माझ्या आयुष्यातला सर्वात वेगळा अनुभव होता.

संपूर्ण रात्र त्या माझ्याशी बाळा-बाळा म्हणून बोलत राहिल्या. सांगायच्या, त्यांची मुलं आणि कुटुंबाला त्यांची काळजी नाही. त्यांच्यापासून दूर राहतात.

त्या मलाही म्हणाल्या, 'बाळा लवकर निघ या धंद्यातून. चांगलं नाही, हे सगळं.'

त्या रात्री आमच्यात फक्त गप्पांशिवाय काहीच झालं नाही. सकाळी बाळा म्हणत त्यांनी ठरल्याप्रमाणे पैसेही दिले.

एक आई आपल्या मुलाला शाळेत जाताना देते तसे. मला खरंच त्या बाईचं वाईट वाटलं.

मी धंदा करतो... धंदा

एक दिवस मी खूप दारू प्यायलो होतो आणि आयुष्यातल्या दुःखामुळे अगदी वैतागून गेलो होतो. त्या भरात मी आईला फोन केला.

रागात तिला म्हणालो, "तू विचारत होतीस ना अचानक जास्त पैसे कसे पाठवू लागलो. आई, मी धंदा करतो... धंदा"

"गप्प बस... दारू पिऊन काहीही बरळतोस," असं म्हणत आईने फोन ठेवला.

जिगोलो

मी आईला माझं सत्य सांगितलं होतं. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. मी पाठवत असलेले पैसे वेळेवर घरी पोहोचत होते ना... मी त्या रात्री खूप रडलो.

माझं महत्त्व केवळ माझ्या पैशांपुरतं आहे? त्यानंतर मी आईशी याविषयी कधीच काही बोललो नाही.

मी धंद्यात टिकून राहिलो. कारण मला पैसे मिळत होते. बाजारात माझी डिमांड होती. वाटलं जोवर कोलकात्यात नोकरी करावी लागेल आणि एमबीएसाठी अॅडमिशन घेत नाही, तोवर हे करत राहीन.

पण या धंद्यात अनेकदा विचित्र माणसं भेटतात. शरीरावर ओरखडे काढतात.

हे व्रण शरीरावरही असतात आणि मनावरही... आणि ही वेदना दुसरा जिगोलोच समजू शकतो.

मला जराही पश्चाताप नाही

मी एमबीए केलं आणि याच एमबीएच्या जोरावर मी आज कोलकत्यापासून दूर एका शहरात चांगली नोकरी करतोय. आनंदी आहे. नवीन मित्र मिळाले. ज्यांना माझ्या भूतकाळाबद्दल काहीही माहिती नाही. कदाचित मी या गोष्टी कधी कुणाला सांगू शकणार नाही.

आपण बाहेर जातो. सिनेमे बघतो. राणी मुखर्जीचा 'लागा चुनरी में दाग' सिनेमा माझा फेव्हरेट आहे. कदाचित मी त्या सिनेमाच्या कथेशी स्वतःला रिलेट करु शकतो.

हो, भूतकाळाचा विचार केला तर मनाला बोच तर लागतेच. हा माझ्या आयुष्यातला असा काळ आहे जो माझ्या मृत्यूनंतरही संपणार नाही.

(बीबीसीचे प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी घेतलेली ही एका जिगलोची मुलाखत. या कथेतील व्यक्तीच्या आग्रहामुळे त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहे. #HisChoice या बातम्यांच्या मालिकेची निर्मिती सुशीला सिंह यांची आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)