सुखासाठी 'सेक्स'ला स्त्रियांनीच नाकारावे, अशी महात्मा गांधीजींची भूमिका होती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेच्या संतती नियमन कार्यकर्त्या आणि लैंगिक शिक्षणाच्या पुरस्कर्त्या श्रीमती मार्गारेट सँगर यांनी डिसेंबर 1935 साली भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे नायक, महात्मा गांधीजी यांची भेट घेतली होती. त्यांच्यात त्यावेळी अर्थपूर्ण असा संवाद झाला होता.
श्रीमती सँगर ह्या 18 दिवसांच्या भारतभेटीवर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भारतातील डॉक्टर, संतती नियमनासाठी झटणारे समाजसेवक तसेच महिलामुक्तीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि चर्चा केल्या.
महाराष्ट्रातल्या आश्रमात महात्मा गांधी आणि मार्गारेट यांच्यातही फार वेधक चर्चा झाली. या चर्चेबाबतचे तपशील हा लवकरच येऊ घातलेल्या प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्या राष्ट्रपिता गांधीजींवरील जीवनचरित्रात्मक पुस्तकाचा लक्षवेधी भाग आहे. जगभरातल्या अनेक दस्तावेजांमधून आणि 60हून अधिक संग्रहांमधून, अभ्यासपूर्ण दाखले गोळा करत गुहा यांनी गांधीजींवरचे हे 1,129 पानी पुस्तक लिहिले आहे. जगभर मान्यता आणि प्रसिद्धी मिळालेले गांधी 1915 साली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यापासून ते 1948 साली त्यांची हत्या होईपर्यंतच्या काळातील त्यांच्या आयुष्यातील नाट्यपूर्ण घडामोडींचा वेध घेणारे हे पुस्तक आहे.
महिलांचे हक्क, सेक्स आणि ब्रह्मचर्य याविषयींची गांधींजींची मते आणि विचार यांचाही समावेश या चरित्रात्मक पुस्तकात आहे.
एका प्रभावी नेता आणि दुसरा हाडाची कार्यकर्ती अशी गांधीजी - सँगर यांच्यातली चर्चा होती. आश्रमात झालेल्या बैठकीतील मुद्द्यांचे टिपण गांधीजींचे कुशल सचिव महादेव देसाई यांनी काढले होते. "महिलांची मुक्ती झाली पाहिजे. त्यांचे दैव घडवणाऱ्या त्या स्वतःच असल्या पाहिजेत, या मुद्द्यावर दोघांमध्येही एकमत झाल्याचे दिसत होते," असे त्यांनी लिहून ठेवले आहे.
मात्र चर्चेदरम्यानच मतभेदाची ठिणगी उडाली.

फोटो स्रोत, Getty Images
श्रीमती सँगर यांनी, अमेरिकेतले पहिले संतती नियमन केंद्र 1916 साली न्यूयॉर्कमध्ये सुरू केले होते. महिलांची मुक्ती खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रत्यक्षात येईल, जेव्हा नको असलेल्या गर्भधारणेपासून त्यांची सुटका होईल, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
पण गांधीजींनी याला आक्षेप नोंदवला. महिलांनीच नवऱ्यांना परावृत्त केले पाहिजे, तसेच नवऱ्यांनीही स्वतःच्या 'पाशवी इच्छे'वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत गांधीजींनी सेक्सकडे अर्थात लैंगिक संबंधांकडे फक्त प्रजननाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे असे सँगर यांना सुचवले.
श्रीमती सँगर यांनी लढवय्याप्रमाणे आपला मुद्दा लावून धरला.
त्या गांधीजींना म्हणाल्या, "पुरुषांप्रमाणेच महिलांच्या तितक्याच तीव्र कामुक भावना असतात. अनेक वेळेला बायकोही तिच्या जोडीदाराकडून शारीरिक मिलनाची अपेक्षा करत असते." "असे असताना, प्रेमात आकंठ बुडालेल्या, सुखी संसारातील जोडप्यांना साधारण दोन वर्षांतून एकदा, फक्त मूल जन्माला घालावयाचे असल्यावरच शारीरिक संबंध ठेवावेत. अशी त्यांच्यातली सेक्सची कृती नियंत्रित ठेवता येईल, असे तुम्हाला खरेच वाटते?" असं त्यांनी धाडसाने विचारले होते.
"नेमक्या याच वळणावर गर्भनिरोधक साधने मदतीला येतात," असे त्यांनी ठासून सांगितले. शरीर संबंधांनंतर येणारी नकोशी गर्भधारणा टाळणे शक्य झाले तरच स्त्रियांना त्यांच्या शरीरावर नियंत्रण मिळेल आणि त्यांना मदतच होईल, असा विचार त्यांनी मांडला होता.
मात्र गांधी त्यांच्या मुद्द्यावर अडून होते. त्यांची भूमिका काहीशी तात्विक होती.

फोटो स्रोत, Getty Images
"सर्व प्रकारच्या सेक्सकडे मी एक 'भूक' या भावनेने पाहतो," असे त्यांनी श्रीमती सँगर यांना सांगितले. यासाठी त्यांनी स्वतःच्या लग्नाचे उदाहरण दिले. "मी सर्वप्रकारच्या 'ऐहिक सुखाला रामराम' केल्यानंतर माझी बायको, कस्तुरबा हिच्याबरोबरचे माझे नाते अत्युच्च स्थानी, एका आध्यात्मिक पातळीवर पोहोचले," असा दाखला गांधीजींनी दिला.
वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजी विवाहबंधनात अडकले तर चार मुलांचे पितृत्व स्वीकारल्यावर 38व्या वर्षी, त्यांनी ब्रह्मचर्येचे पालन करण्याची शपथ घेतली. जैन महामुनी रायचंदभाई आणि महान रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांच्या विचारांचा मोठा प्रभाव गांधीजींवर होता. या दोन्ही थोरांनीही ब्रह्मचर्याचे पालन केले होते. गांधीजींनीही त्याच वाटेने जाणे निवडले. जैन ही प्राचीन भारतीय धर्मपरंपरा असून अहिंसा आणि संन्यास या मूल्यांना त्यात प्रमुख स्थान आहे. 'सत्याचे प्रयोग' या आपल्या आत्मचरित्रात गांधीजींनी एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे- जेव्हा त्यांचे वडील गेले त्यावेळी ते पत्नीसह लैंगिक सुखाचा आनंद घेत होते. पुढे भविष्यात या घटनेच्या नुसत्या स्मरणानेही त्यांना अत्यंत अपराधी वाटत असे, असं त्यांनी लिहिलं आहे.
अखेर श्रीमती सँगर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या शेवटी गांधीजींनी थोडीशी माघार घेतली.
'पुरुषांबाबत बोलायचे तर त्यांनी स्वतःहून नसबंदी केल्यास हरकत नाही, कारण तो 'या'बाबत आक्रमक असतो' असे गांधीजी म्हणाले. मात्र गर्भनिरोधक साधने वापरण्याऐवजी स्त्री-पुरुषांनी मासिक पाळीच्या चक्रातील गर्भधारणा होऊ शकत नाही, अशा सुरक्षित काळात सेक्स करणे हितावह ठरेल, असे गांधीजींचे मत पडले.
चर्चेअंती श्रीमती सँगर यांनी असहमतीनेच आश्रम सोडला. पुढे त्यांनी गांधीजींना वाटणाऱ्या अतिउपभोगाचे तसेच विवेकीपणाच्या वाटणाऱ्या भीतीविषयी लिहिलं. गांधीजींकडून त्यांच्या संतती नियोजनाच्या कामाला आजिबात प्रोत्साहन मिळाले नसल्याने, श्रीमती सँगर कमालीच्या निराश झाल्या होत्या.
मात्र कृत्रिम संतती नियोजनाच्या साधनांबद्दल वा गर्भनिरोधक साधनांच्या विरोधात जाहीरपणे मत मांडण्याची गांधीजींची ही पहिलीच वेळ नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
1934 साली, महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका भारतातल्याच कार्यकर्तीने त्यांना प्रश्न विचारला- स्वतःवर ताबा असणे ठीक आहे, मात्र त्यानंतर गर्भनिरोधकासारखी उपयुक्त गोष्ट महिलेसाठी आणखी दुसरी कोणती असेल बरे? यावर आपले मत काय?
त्यावर गांधीजींनी मत मांडले. "गर्भनिरोधकांचा आधार घेतल्याने शरीराला मुक्ती मिळू शकते असे तुम्हाला वाटते का? त्यापेक्षा स्त्रियांनी आपल्या पतीला लैंगिक सुखाची इच्छा करण्यापासून परावृत्त करायला शिकले पाहिजे. जर पश्चिमेकडील लोकांप्रमाणे आपणही फक्त गर्भनिरोधकांच्या भरवशावर राहिलो तर भयावह परिणामांना सामोरे जावे लागेल. स्त्री आणि पुरुष फक्त सेक्ससाठीच आयुष्य व्यतीत करतील. ते अल्पमती, निर्बुद्ध आणि खरे पाहता मानसिक आणि नैतिक अधःपतनाकडे वाटचाल करतील," असा प्रतिवाद गांधीजींनी केला होता.
'गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड , 1914-1948' या आपल्या आगामी पुस्तकात गुहा लिहितात- "गांधीजींच्या मते, सर्व प्रकारचे लैंगिक सुख ही 'भूक' होती; सेक्सचा उद्देश केवळ प्रजनन हा होता. तसेच आधुनिक गर्भनिरोधाची साधने ही भूक उद्दीपित करण्याचे काम करतात. म्हणूनच जर स्त्रियांनीच त्यांच्या पतीला सेक्सपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुरुषांनी या पाशवी भावनेचे दमन केले तर फार बरे होईल, असे त्यांचे मत होते"
पुढे अनेक वर्षांनी, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, बंगालमधील नोआखली जिल्ह्यात भीषण हिंदू-मुस्लीम दंगे उसळले. गांधीजींनी एक वादग्रस्त प्रयोग करून पाहिला. त्यांनी आपली नात आणि उत्कट शिष्या मनु गांधी हिला आपल्या शय्येवर निजायला बोलावले.

गुहा याबद्दल लिहितात, "आपल्या लैंगिक इच्छांची त्यांना परीक्षा घ्यायची होती किंवा त्यांचा लैंगिक भावनांवर किती ताबा आहे हे त्यांना पडताळून पाहायचे होते."
गांधीजींच्या चरित्रकाराच्या मते, "का कुणास ठाऊक, पण वाढत्या धार्मिक दंगलींचा संबंध गांधीजींनी स्वतःला संपूर्ण ब्रह्मचारी होण्यात आलेल्या अपयशाशी जोडला होता." महत्प्रयासाने इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळण्याची घोषणा झाल्यावरही देशात हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या. यामुळे ते व्यथित झाले. आयुष्यभर आहिंसा आणि सहिष्णुता यांचा संदेश देणारे गांधीजी,या दंगलींनी स्तब्ध झाले होते.
"हा संबंध जोडणे एखाद्या गृहीतकासारखे होतं. ठोस कारणाशिवायचा आणि कदाचित आत्मप्रौढीचा इरसाल नमुनाही म्हणता येईल असा. म्हणूनच त्यांच्या भोवतीची हिंसा हा एकप्रकारे स्वतःमध्ये असलेल्या अपरिपूर्णतेचा परिपाकच असल्याची त्यांची धारणा बनली होती," असे गुहा लिहितात.
जेव्हा गांधींनी आपल्या निकटवर्तीयांना या 'प्रयोगा'ची कल्पना दिली तेव्हा सोबतच्या अनुयायांकडूनच कडाडून विरोध झाला. अशा कृत्याने सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळेल, म्हणून तात्काळ हा बेत रद्द करावा, अशी काहींनी पूर्वकल्पना दिली. तर एका सहकाऱ्याने हा प्रयोग 'म्हणजे गोंधळात टाकणारा आणि अक्षम्य' होता असे म्हटले होते. आणखी एका सहकाऱ्याने तर निषेध नोंदवत, गांधींजींची साथ सोडणे पसंत केले.
मात्र गुहा म्हणतात, हा विचित्र प्रयोग समजून घ्यायचा तर "माणसे असे का वागतात या प्रश्नाबाबतच्या तार्कीक वा कारणमीमांसा देणाऱ्या स्पष्टीकरणाच्या" पलीकडे जाऊन विचार करावा लागेल.
तोपर्यंत जवळपास 40 वर्षे गांधीजींनी ब्रह्मचर्याचे पालन केले होते, "आणि आता त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात, अखंड भारताचे स्वप्न असे उध्वस्त झालेले पाहताना, समाजातील या असमतोलासाठी, याच समाजाच्या प्रभावशाली नेत्यामधल्या अपरिपूर्णतेला कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न ते करत होते."
गांधींच्या लिखाणाचा अभ्यास करून, गांधीजींच्या निकटवर्तीय आणि सच्च्या अनुयायी असणाऱ्या एकाने नंतर एका मित्राला लिहून कळवले, "उपभोग वा ऐहिक सुखाच्या आचरणाबाबत गांधीजी अत्यंत कठोर, स्वयं-शिस्तीचे होते. साधारणपणे मध्ययुगीन ख्रिस्ती साधक वा जैन महामुनींशी साधर्म्य साधणारी ही वृत्ती आपण म्हणू शकतो."
"जरी गांधींच्या अनेक अपारंपारिक संकल्पना या प्राचीन हिंदू तत्वज्ञानाशी निगडित होत्या, तरी त्यांच्या आरोग्य, आहार आणि सहिष्णु वर्तणुकीच्या लहरी धारणा तसेच उपभोगाशी निगडित शुद्धिकरणाच्या संकल्पना पाहता ते गत व्हिक्टोरीयन काळातील एक व्यक्ती शोभावेत असे होते," असे इतिहासकार पॅट्रिक फ्रेंच यांनी लिहिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्पष्टपणे मांडायचे, तर गांधींचा स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन हा कमालीचा क्लिष्ट आणि वादग्रस्त होता.
पुरुषांना आकर्षक वाटावे यासाठी स्त्रियांच्या नटण्याथटण्याच्या ते विरोधात होते. गुहा यांच्यामते "ते आधुनिक केशभूषा तसेच पेहराव यांच्याच विरोधात होते."
त्यांनी मनु गांधी हिला लिहले होते, "किती दयनीय आहे हे! तुम्ही आजकालच्या मुली आपल्या प्रकृतीपेक्षा, आपल्या सामर्थ्याची काळजी घेण्यापेक्षा फॅशनला अधिक महत्त्व देता." मुस्लीम महिलांच्या बुरखा पद्धतीलाही त्यांचा विरोध होता. ते म्हणत, "यामुळे महिलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यांना पुरेशी हवा-प्रकाशही मिळत नाही, त्यामुळे बिचाऱ्या रोगग्रस्त राहतात."
पण त्याच वेळेला, गांधीजींचा महिलांच्या हक्कांवर गाढ विश्वास होता. तसेच स्त्री-पुरुष समानतेच्या विचारावरही ते ठाम होते.
दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या राजकीय तसेच सामाजिक चळवळींमध्ये महिलांनीही सहभाग घेतला होता. जेव्हा पश्चिमेतील राजकीय पक्षांमध्येही तुरळक महिला नेत्या होत्या, त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सरोजिनी नायडू या महिलेच्या हाती सोपवले. दारूच्या दुकांनांबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी महिलावर्गाला केले होते. ब्रिटिशांच्या मिठाबाबतच्या धोरणाला तसेच मिठावर कर लावण्याच्या सक्तीविरोधात त्यांनी काढलेल्या दांडी यात्रेतही महिलांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला होता.
असे असले तरी गुहा लिहितात तसे, "गांधींनी आधुनिक स्त्रीवादाची मात्र भाषा केली नव्हती."
"महिलांच्या शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते तसेच महिलांनी कार्यालये वा कचेऱ्यांमध्ये काम करणे भूषणावह मानणारे गांधीजी, घरगुती जबाबदाऱ्या तसेच मुलांचे पालनपोषण ही पारंपरिक कर्तव्ये एकट्या स्त्रीने पेलली पाहिजेत अशा विचारांचे होते. आजच्या आमच्या काळाच्या निकषांवर गांधीजींना पुराणमतवादी म्हणावे लागेल. मात्र त्याकाळचा, तेव्हाच्या आदर्शांचा विचार करता नक्कीच गांधीजी पुरोगामी विचारांचे होते असे म्हणावे लागेल."
जेव्हा देश स्वतंत्र्य झाला, तेव्हा 1947 साली गांधीजींच्याच थोरवीमुळे देशात महिला गव्हर्नर आणि केंद्रीय मंत्रिपदी महिला विराजमान झाल्या, असे गुहा मानतात. लक्षावधी निर्वासितांचे प्रश्न हाताळणाऱ्या गटाच्या नेतृत्वाची धुरा सामर्थ्यशाली महिलांच्या चमूकडेच होती. तत्कालीन प्रथितयश विद्यापीठाने एका महिलेचीच कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. मुख्य म्हणजे अमेरिकन विद्यापीठांनी महिला अध्यक्ष नेमण्याच्या कित्येक दशके आधीची ही घटना आहे.
गुहा सांगतात, 1940-50 च्या काळात भारताच्या सार्वजनिक व्यवस्थेत महिला प्रामुख्याने चमकत होत्या, तितक्याच जितक्या अमेरिकी व्यवस्थेत महिला अग्रणी होत्या. याचे श्रेय निर्विवादपणे गांधीजींना दिले पाहिजे. त्यांनी केलेल्या विक्षिप्त 'सत्याच्या प्रयोगा'नंतरही त्यांचे हे यश तितकेसे लोकांना माहिती नाही याचेच नवल वाटते!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








