'मी हाऊस हसबंड आहे म्हणून मित्र माझी टिंगल उडवतात'

लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच माझ्या सासरी एका मोठ्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. माझ्या मेव्हणीचं लग्न होतं. सोनल म्हणजेच माझ्या बायकोकडची सर्व पाहुणे आले होते. साधारण वर्षभराच्या आमच्या मुलीला घेऊन मी गच्चीवर काही पाहुण्यांसह बसलो होतो. त्याचवेळी मुलीनं शी केली.
मी लगेचच खाली गेलो. त्यावेळी सोनल तिच्या चुलत भावडांबरोबर गप्पागोष्टींत मग्न होती. मी सोनलकडे डायपर मागितलं. सोनमनंसुद्धा तितक्याच तत्परतेनं माझ्या हातावर डायपर ठेवलं. ते घेऊन मी वर जातच होतो तेवढ्यात माझ्या सासूबाई आल्या आणि त्यांनी मला रोखलं.
माझ्या हातातून डायपर हिसकावून ते त्यांनी सोनलच्या हातात दिलं. आणि 'तू थांब जरा,' असं दरडावल्याच्या स्वरात त्या मला म्हणाल्या. 'नवऱ्याला डायपर बदलायला सांगते, तुला बदलता येत नाही का,' असं त्यांनी सोनलला खडसावलं. काय सुरूय हे मला कळतच नव्हतं. आतापर्यंत स्वराचं डायपर मीच बदलत होतो आणि मी नवीन काहीच करणार नव्हतो.
मग सासूबाईंनी मला जरा बाजूला घेऊन समजावलं. 'हे लग्नाचं घर आहे. नवा जावई असल्यानं सर्वांच्या नजरा तुझ्याकडेच आहेत. तुझं लक्ष नसेल पण वेगवगेळ्या ठिकाणांवरून लोकं तुला पारखत असतात. आज जर तू हे डायपर बदललं असतं तर गावात बातमी पसरायला वेळ नसता लागला की सोनलचा नवरा आनंद तर त्याच्या मुलीचं डायपरसुद्धा बदलतो.'
आधीच आमचा विवाह आंतरजातीय आणि त्यात मी हाऊस हसबंड. त्यामुळे मामला तसा नाजुकच. सोनलच्या घरच्यांना माझ्या घरी राहण्याविषयी माहीत होतंच, नातेवाईकांमध्येसुद्धा याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

#HisChoice ही बीबीसीची विशेष सीरिज आहे. भारतातल्या 10 पुरुषांच्या जीवनात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित ही सीरिज आहे.
या कथा 'अधुनिक भारतीय पुरुषां'चे विचार आणि त्यांच्या आशा-आकांक्षा, प्राधान्यक्रम आणि त्यांच्या आवडीनिवडींवर प्रकाश टाकतात.

गेली सहा वर्ष मी हाऊस हसबंड आहे. त्यामुळे तुम्ही काय करता, या प्रश्नाचं उत्तर देण्यात आता मी पटाईत झालो आहे. पण प्रश्न विचारणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव आणि त्या उपप्रश्न काही कमी झालेले नाहीत.
लोकांचं आणि कित्येकदा स्वतःचसुद्धा मन राखण्यासाठी मी 'घरून काम करतो,' असं उत्तर लोकांना देतो.
पण त्यापुढे त्यांचे प्रश्न असतात - 'आजकाल घरून काम करून भागतं? बायको कामाला जाते का मग?'
एक छोटासा किस्सा सांगतो. आमच्या घराजवळच एक गार्डन आहे. रोज सायंकाळी मी स्वराला खेळायला घेऊन तिथं जातो. सर्व मुलं एकतर त्यांचे आजीआजोबा किंवा त्यांच्या आईबरोबर आलेली असतात. तिथं मुलीला घेऊन येणारा मी एकटाच बाप असतो.
तिथं येणाऱ्या बायका मला सुरुवातीला विचारायच्या, 'हिची आई नाही आली?' असं विचारताना, 'तुम्हाला नोकरी नाही का? तुम्ही इथे या क्षणी कसे आलात?' असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात.
मग नेहमीप्रमाणे पुढचा प्रश्न, 'मग तुम्ही काय करता?'
'मी घरीच असतो,' असं उत्तर दिलं की,'मग बायको जाते का कामाला,' असा प्रश्न यायचा.
त्याचं उत्तर 'हो' असं दिलं की 'मुलीकडे कोण पाहतं,' असं विचारलं जायचं,
'मीच पाहातो,' असं माझं उत्तर असायचं. यावर मग लगेचच प्रश्न यायचे, 'राहते का मुलगी तुमच्याकडे? तिचं खाणंपिणं, आंघोळ कोण करतं?'
'मीच करतो,' असं उत्तर दिलं की मग त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव विचित्रच असायचे.

आताआता कुठे आमच्या सोसायटीतले किंवा आजूबाजूचे लोक थोडं समजून घेत आहेत. पण 'हा फुकटखाऊ आहे. बायकोची कमाई खातो,' अशी दबक्या आवाजातली चर्चा असतेच.
आता यांना मी कसं सांगणार की मी घरात राहूनही लेखनाची कामं करतो, माझी २ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एक प्रकाशनाच्या मार्गवर आहे आणि एकाचं काम सुरू आहे.
माझा आणि सोनलचा प्रेमविवाह आहे. आम्ही सुरुवातीपासूनच ठरवलं आहे की ज्याला चांगली संधी मिळेल तो पुढे जाईल. ज्याला जे शक्य होईल आणि जे आवडेल ते तो करेल.
सुरुवातीपासूनचं मी नोकऱ्यांमध्ये सतत गटांगळ्या खाल्ल्या, तर सोनलचं करीअर मात्र उत्तम बहरत गेलं. मला वाटतं तिला त्यात साथ देणं माझं काम आहे आणि मी तेच करत आहे.
लग्न झाल्यापासून मी घरातच आहे. मला घरात राहायला, घर सांभाळायला आवडतं. मला स्वयंपाक करायला आवडतो आणि मी घरातली सर्व कामं एन्जॉय करतो.
महत्त्वाचं म्हणजे माझी मुलगी ही सोनलपेक्षा माझ्याकडे जास्त रमते. आई असणं हा एक फुलटाईम जॉब आहे. पण त्याचवेळी आई ही एक भावना आहे, असं मी मानतो आणि ती एखाद्या पुरुषातही तितकीच असू शकते जेवढी एका स्त्रीमध्ये असते.
मी जेव्हा घरीच राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याजवळच्या काही मित्रांनी मला साथ दिली. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात राहत असल्यानं फारसा प्रॉब्लेम आला नाही.
पण त्याचवेळी मी माझ्या मूळ शहरात म्हणजेच भोपाळमध्ये जातो, तेव्हा मात्र मी मित्रांच्या चेष्टेचा विषय ठरतो. पण त्यांच्याशी वाद घालण्यास मला रस नसतो.
लोक तुमची टिंगलटवाळी त्याचसाठी करतात जेणे करून तुम्हाला त्याची लाज वाटावी आणि तुम्ही ते सोडावं. पण मला अजिबात लाज वाटत नाही आणि मी ही जबाबदारी सोडणार नाही.
चेष्टा करण्यासाठी काही मित्र फोन करून 'आज जेवायला काय केलं' आहे असंही विचारतात. कधीकधी गप्पांचा फड रंगलेला असताना राजकारण, समाजकारण किंवा इतर महत्त्वाच्या, गंभीर विषयांवर चर्चा सुरू होतात.
अशावेळी मी मतं मांडायला सुरुवात केली की, 'अरे आनंद जरा चहा टाक ना किंवा काही तरी खायला कर ना,' असं काही मित्र म्हणतात. हे सांगण्यामागे त्यांचा रोख 'तुला यातलं काय कळतं' असा असतो, पण मीही ते स्पोर्टिंगली घेतो. मी काही चिडत नाही किंवा त्यांना लेक्चर झाडत नाही.
कित्येकदा माझे काही मित्र म्हणतात, 'यार तुझं तर चांगलं आहे, तू तर घरात राहून ऐश करतो.' पण, ते हे मानायला तयार नाहीत की घरातली कामंसुद्धा एक कामच आहे आणि ते २४ तास आणि वर्षांचे १२ महिने असतं.
मीही घरातल्या कामांसाठी सकाळी साडेपाचला उठतो जसा एखादा पुरुष कामावर जाण्यासाठी उठतो. स्वयंपाक, भांडी, झाडलोट, साफसफाई, कपडे धुणे, भाजीपाला आणणे अशी सर्व कामं करतो.
एवढंच कशाला घराचं सर्व बजेट माझ्याच हातात आहे. अर्थात सोनल सर्वांत जास्त पैसे कमावते. पण, गुंतवणूक कुठे आणि कशी करायची हेसुद्धा मीच ठरवतो. हे खरं आहे की घर सांभाळताना तुम्हाला आर्थिक शिस्त लागते. मी रोजचा हिशेब डायरीत लिहून ठेवतो. कित्येकदा माझा कल वेगवेगळे खर्च टळण्याकडे असतो. असं नाही की पैसे कमी आहेत.
पण, मला बरेच खर्च हे अनावश्यक वाटतात. सेव्हिंग करण्यासाठी मी घरात गल्लासुद्धा केला आहे. पण म्हणून त्या पैशांनी स्वतःसाठी शॉपिंग नाही करत कधी. मला तर हे आठवतसुद्धा नाही की माझ्यासाठी शेवटचं शॉपिंग कधी केलं होतं ते.
विषय आर्थिक स्वातंत्र्य आणि कमवण्याचा निघालाच आहे तर आणखी एक किस्सा सांगतो. कुठल्यातरी कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो. त्याचवेळी सोनल घरात होती. स्वराला तिच्या शाळेत एक प्रोजेक्ट देण्यात आला होता. त्यात 'हेड ऑफ द फॅमिली'चं नावं लिहायचं होतं. सोनलनं माझं नाव तिथं लिहून टाकलं.
मी परत आल्यानंतर ते पाहिलं आणि तिला विचारलं, 'पैसे तर तू कमावतेस त्यामुळे 'हेड ऑफ द फॅमिली' तर तू पाहिजेस.' त्यावर तिचं उत्तर होतं, 'हीच तर स्टेरिओ टाईप गोष्ट बदलायला हवी. घर तू सांभाळतोस तू चालवतो, ज्या व्यक्तीवर घराची सर्व जबाबदारी आहे त्यामुळे तूच 'हेड ऑफ द फॅमिली' पाहिजे.'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
घरातच राहत असल्यामुळे कधीकधी मर्यादासुद्धा येतात. लिहिण्याची फ्रीलान्स कामं घेत असल्यानं मला अनेकदा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याच्या ऑफर्स मात्र नाकाराव्या लागतात.
पण, मला माझ्या छंदांना आणि वाचन-लिखानाला वेळ देता येतो. रोजच्या कामातून वेळ काढून मी आमच्या गॅलरीत एक छोटंसं किचन गार्डन केलं आहे. त्यात काही आवडीची झाडं लावली आहेत.
माझ्या आईला मात्र सुरुवातीला हे काही आवडलं नव्हतं. आमचं लग्न झाल्यानंतर ती एकदा घरी आली. तिचं मन राखण्यासाठी सोनलनं किचनमध्ये जाऊन सर्व कामं करणं सुरू केलं. पण या कामांची सवय नसल्यानं सोनलला ते काही फारसं जमत नव्हतं. एक दोन दिवस तिनं निभावून नेलं. पण मलाच काय आईलासुद्धा ते लक्षात येत होतं.
मी सोनलला सांगितलं, 'जे खरं आहे आणि आपण जसं रोज वागतो तसंच आपण आताही वागायचं.'
मी किचनचा आणि सर्व कामांचा ताबा घेतला. माझा एकंदर पवित्रा पाहून माझ्या आईनं काही नकारघंटा वाजवली नाही. पण तिनं हे स्वीकारसुद्धा केला नाही.

अतिशयोक्ती नाही सांगत पण, सोनलच्या ऑफिसात तिच्या टिफीनची चर्चा असते. अनेक जण तिला म्हणतात, 'सोनल तू लकी आहेस, तुला असा नवरा मिळाला.'
पण माझं म्हणणं आहे, 'सोनल नाही मी लकी आहे कारण मला अशी बायको मिळाली आहे.' कारण तिच्या मुळेच मला जे योग्य वाटतं ते करता येत आहे.
एकदा सोनलच्या ऑफिसतल्या एका तरुणानं तिला विचारलं होतं की, 'तुझा नवरा काय करतो,' तिनं उत्तर दिलं की, 'तो घरीच असतो.' त्यावर त्यानं पटकन प्रतिक्रिया दिली, 'म्हणजे फुकट आहे.' सोनलनं त्याला काही उत्तर दिलं नाही पण घरी येऊन माझ्याकडे दुःख व्यक्त केलं. मी तिची समजूत काढली.
मुळात आमच्यात उत्तम संवाद आहे, त्यामुळे अशा कुठल्याही विषयावर आमच्यात भांडण किंवा अबोला होत नाही. हो पण सामाजिक विषयांवर मात्र आमच्यात रोजच तूतूमैमै होते. जी गरजेची आहे असं मला वाटतं.
आता एवढ्या वर्षांनंतर माझ्या हाऊस हसबंड असण्यानं सोनम कधीही दबावात नसते. कारण ज्या-ज्या वेळी ती नोकरी बदलते, ज्या-ज्या वेळी ती तिचा टिफीन उघडते त्या त्यावेळी हा प्रश्न तिला विचारला जातो. पण आता ती फारच कम्फर्टेबल आहे.
मला वाटतं हा शिक्षण, संस्कार आणि समजुतीचा भाग आहे. आम्ही तिघंही भाऊच. आम्हाला बहीण नाही. त्यात मी सर्वांत लहान असल्यानं घरातली कामं बरेचदा माझ्या अंगावर पडायची. तिथूनच मला घरातली कामं कळत केली.
माझ्या वडिलांनी मला कायम 2 गोष्टी शिकवल्या आहेत. एक अन्नावर राग काढू नये आणि दुसरं महिलांवर हात उगारू नये, त्यांना सन्मानानं वागवावं.
माझ्या मुलीवर संस्कार करताना या गोष्टी तर माझ्या लक्षात आहेतच, त्याच बरोबर मी खूपच सजगही आहे. कारण ही सर्वांत मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. मी तिला रोज झोपताना गोष्ट सांगतो.
तिला सर्व योग्य गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. उद्या तिच्याकडून काही चूक झाली तर लोक मला दोष देतील, याची मला कधीकधी भीती वाटते. तिच्यावर एक ग्लोबल सिटीझन म्हणून संस्कार करण्याचा माझा प्रयत्न असतो.
मला असं वाटतं की, आताच्या जगात मुलांवर संस्कार करताना मुलगा मुलगी असा भेद करू नये. मुलीकडूनच फक्त स्वयंपाकाची अपेक्षा करू नका. मुलालासुद्धा चपात्या बनवायला शिकवा. माझे इतर दोन भाऊ माझ्या कामाचा फारसा विषय काढत नाहीत, पण कुटुंब आणि नातेवाईकांतल्या जाणत्या मुलींसाठी मात्र मी आज आदर्श आहे.
अर्थात तुम्ही जेव्हा काही जगावेगळं करत असता तेव्हा लोकं सर्वांत आधी तुमची टिंगल उडवतात, नंतर तुमच्यावर यथेच्छ टीका करतात आणि मग हळूहळू तुमचा स्वीकार करतात. मी अजूनही पहिल्याच टप्प्यात आहे.
असो, मी काही कुणी बिघडलेला माणूस म्हणून घरात पडून नाही, मी माझ्या मर्जीनं घरात आहे आणि हीच भावना मला रोज नवं बळ देत असते.
(ही कथा उत्तर भारतात राहाणाऱ्या एका पुरुषाच्या जीवनावर आधारीत आहे. ज्यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी चर्चा केली. त्यांच्या ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे. बीबीसी प्रतिनिधी सुशीला सिंह यांची ही निर्मिती आहे. )
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








