यंदा कर्तव्य आहे? आजची पिढी गिरवत आहे लग्नाआधी प्रेमाचे धडे

फोटो स्रोत, Getty Images
'इश्क ने हमको निकम्मा कर दिया, वर्ना...' आयुष्यात आलेल्या निकम्मेपणाचं खापर प्रेमावर फोडणाऱ्या या ओळी. पण बदलत्या जगात जे प्रेमातच निकम्मे झाले असतील, त्यांचं काय? अशांसाठी दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये प्रेमाचे वर्ग भरवले जात आहेत.
सोलच्या डॉन्गक युनिव्हर्सिटीमध्ये एका वर्गामध्ये प्राध्यापक युन-जू ली विद्यार्थ्यांना आधी एक बाटलीचं आणि नंतर सायकलीचं चित्र काढायला सांगतात. वरवर पाहणाऱ्याला हा चित्रकलेचा तास वाटेल, पण तसं नाहीये. हा प्रेमाचा वर्ग आहे. नेमक्या शब्दांमध्ये सांगायचं तर इथे "विवाह आणि कुटुंब" याविषयी अभ्यासक्रम शिकवला जात आहे, आणि ली त्यांच्या विद्यार्थ्यांना समाजामध्ये रूढ असलेले लिंगाधारित नियमांना आव्हान द्यायचे धडे देत आहेत.
त्या सांगतात की, लोक कशा पद्धतीने चित्र काढतात यावरून त्यांच्यात किती स्त्रीत्व किंवा पुरुषत्व आहे, हे समजतं. समजा एखादी स्त्री सायकलचं चित्र काढताना पुढील भागापासून सुरुवात करत असेल, तर तिच्यामध्ये पुरुषीपणा असल्याचं सूचित होतं.
ली त्यांच्या विद्यार्थ्यांना आश्वस्त करताना सांगतात की, "ही काही वाईट गोष्ट नाही, तर हे व्यक्तिमत्त्वाचं एक गुणवैशिष्ट्य आहे आणि त्याबद्दल आपल्याला जाणीव असायला हवी."
पुढे आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ली त्यांच्या विद्यार्थ्यांना लहान मुलं बगी ओढत असल्याची आणि मुली खेळण्यातल्या हत्यारांशी खेळत असल्याची चित्रं दाखवतात. या युरोपीयन खेळण्याच्या जाहिरातींमधून लिंगाधारित रूढीवादाला आव्हान दिलं असल्याचं ली विद्यार्थ्यांना सांगतात.
या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना नातेसंबंधांतील चढउतार हाताळण्यास शिकवले जाते, आणि त्यातूनच त्यांना एक दिवस योग्य जोडीदार मिळावा, असाही या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.
दक्षिण कोरियासमोर सध्या एक गंभीर समस्या उभी राहिली आहे - तरुण मुलं-मुली लग्न करत नाहीत आणि ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना फारशी मुलं नाहीत. या समस्येवर मात करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणजे हा वर्ग.
दक्षिण कोरियासारख्या स्त्री-पुरुषांसाठी ठराविक, पारंपरिक भूमिका असलेल्या देशामध्ये हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. 1960च्या आर्थिक उत्कर्षानंतरच इथल्या स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली.
घटता जन्मदर
स्त्रिया या प्रामुख्यानं गृहिणी असतात आणि पुरुष चरितार्थ चालवतात, ही भावना कोरियन समाजामध्ये खोलवर रुतलेली आहे. आजचे तरुण स्त्री-पुरुष लग्नाकडे आणि स्वतःची मुलं असण्याकडे कसं पाहतात, यावर या जुन्या समजुतींचा मोठा पगडा आहे.
दशकभरापूर्वी म्हणजे 2007मध्ये दक्षिण कोरियानं आपल्या इतिहासातला सर्वांत नीचांकी जन्मदर नोंदवला - दर महिलेमागे 1.05 मुलं. लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी हा जन्मदर 2.01 असण्याची गरज असताना, प्रत्यक्षात तो जवळपास त्याच्या निम्माच होता.
गेल्या दशकात लोकांची जननक्षमता वाढवण्यासाठी सरकारने नागरिकांना पितृत्वाच्या अधिक रजा, वंध्यत्वावरील उपचारांचा खर्च आणि तीन किंवा अधिक मुलं असलेल्या कुटुंबांना सार्वजनिक चाइल्डकेअर सुविधा देण्यात प्राथमिकता अशा सुविधा देण्याबरोबरच अब्जावधी डॉलर खर्च करूनही हाती काही लागलं नव्हतं.
पूर्व आणि आग्नेय आशियामधील तैवान, जपान, हाँगकाँग आणि सिंगापूर अशा देशांमध्ये जननक्षमतेच्या दरामध्ये अशीच घट झालेली बघायला मिळते.
दक्षिण कोरियामध्ये एक नवीन शब्दप्रयोग वापरात आला आहे - सँपो पिढी. यातील 'सँपो (Sampo)' या शब्दाचा अर्थ आहे तीन गोष्टींचा त्याग करण - प्रेमसंबंध प्रस्थापित करणे, लग्न करणे आणि मुलं वाढवणे.

फोटो स्रोत, Kwon Moon
ली या बदलत्या प्रवाहाची कारणमीमांसा करताना सांगतात की, एकीकडे तरुण लोकांना नोकरी मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी धडपड करावी लागत आहे, तर दुसरीकडे विकासाची मंदगती आणि बेरोजगारी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसत आहेत.
संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की, पुरुषांसाठी आर्थिक विवंचना या लग्नाच्या विचारातील सर्वांत मोठा अडथळा आहेत, आणि अनेक तरुण आता गरज म्हणून लग्न करण्यापेक्षा इच्छा असली तरच लग्न करतात.
स्त्रियांनाही आर्थिक परिणामांची चिंता वाटते.
"मुलं वाढवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी खूप खर्च येतो, त्यामुळे माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना लग्न करायची इच्छा नाही," असं युन-जू ली यांची 24 वर्षांची विद्यार्थिनी जी-वॉन किम सांगते. "माझ्या काही मैत्रिणींना घराचं भाडं स्वतःच भरणं, स्वतःला हव्या त्या वस्तू खरेदी करणं, एखादं कुत्र्याचं पिल्लू पाळणं आणि फक्त डेटिंग करणं, या गोष्टी अधिक चांगल्या वाटतात."
'संकुचित आधुनिकता'
आर्थिक चिंतांच्या जोडीला इतरही काही कारणं आहेत. "एकदा लग्न झालं आणि मुलं झाली की तुमचं स्वतःचं आयुष्य संपतं, असं म्हणतात," असा इशारा किम देते.
ली यांचा दुसरा एक विद्यार्थी जी-मियाँग किम सांगतो की त्याला लग्न करून सेटल व्हायचंय, पण त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या कुटुंबाच्या लोकांच्या काही गोष्टींबद्दलच्या दृष्टिकोनाबाबत खात्री हवी आहे.
पूर्वीच्या दशकांमध्ये नवीन लग्न झालेल्या कोरियन स्त्रियांनी आपलं कुटुंब सोडून नवऱ्याच्या घरी राहायला जाणं अपेक्षित आहे. आणि त्या नवीन कुटुंबामध्ये सर्वांत तळाच्या स्थानावर समाधान मानून राहावं, अशी त्यांच्याकडून अपेक्षा असायची. मात्र आपल्या घरात तुला अशी वागणूक मिळणार नाही, अशी खात्री किमला त्याच्या गर्लफ्रेंडला द्यावी लागली.

फोटो स्रोत, Kwon Moon
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या कुटुंब आणि लोकसंख्या संशोधन केंद्राच्या प्राध्यापक आणि संचालक जीन येयुंग दुसऱ्या एका मुद्द्याकडे लक्ष वेधतात. कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये "संकुचित आधुनिकता" आहे - एकीकडे झपाट्याने घडणारे सामाजिक बदल आणि त्याच्या जोडीला देशाची अर्थव्यवस्था पुढे नेणारे महत्त्वाचे आर्थिक टप्पे, असा हा काळ आहे.
"जे बदल युरोपमध्ये घडायला एखादं शतक किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागला असेल, ते बदल आशियामध्ये घडायला दोन ते तीन शतके लागली," येयुंग सांगतात. "अर्थकारण, शिक्षण आणि महिलांची भूमिका या गोष्टी अनेक अर्थांनी इतक्या तातडीने बदलल्या की, सामाजिक संस्था आणि सामाजिक संकेत त्या गतीने बदलू शकले नाहीत."
असेच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे कॉर्पोरेट जगत.
"कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये नोकरी करणाऱ्या आयांसाठी फारसं स्थान नाही, अशा ठिकाणी अनेक महिलांना मुलांना वाढवण्याची चिंताच नकोय," असं ली सांगतात.
युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधील लोकसंख्याशास्त्राचे प्राध्यापक पीटर मॅकडोनाल्ड सांगतात की, नियोक्त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य फारसं किंवा अजिबात महत्त्वाचं नसतं.
"पूर्व आशियाई देशांमध्ये कर्मचाऱ्यांकडून दीर्घकाळ काम करण्याची तसंच आपल्या कामाला प्रथम आणि सर्वाधिक प्राधान्य देण्याची अपेक्षा ठेवणं, हे कंपनी/उद्योगाच्या मालकांचं खास गुणवैशिष्ट्य आहे," मॅकडोनाल्ड सांगतात.
महिलांना लग्न न करण्यास उद्युक्त करणारी आणखी एक संभाव्य गोष्ट म्हणजे घरकामाच्या विभागणीमध्ये प्रचंड तफावत. 2015च्या OECDच्या अहवालानुसार, कोरियन पुरुष हे घरकामासाठी दिवसातील फक्त 45 मिनिटंच सरासरीने देतात. OECDमध्ये असलेल्या 35 देशांच्या तुलनेत हे प्रमाण अवघं एक तृतियांश आहे.
डेटिंगचा सराव
लग्न आणि कुटुंब या अभ्यासक्रमात विद्यार्थी त्यांच्या जोडीदारांसह अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतात. विद्यार्थी त्याला "सक्तीचं डेटिंग" असं म्हणतात, ली मात्र त्यासाठी "जोडीचा खेळ", असं अधिक सौम्य नाव देतात.
यामध्ये जोडप्यांना, पुढील आयुष्यात वास्तवात निभावायला लागतील, असे निरनिराळे प्रसंग साकारायला लागतात, जसे की, परवडणाऱ्या डेटवर जाणं, विवाहाचं नियोजन करणं आणि लग्नाचा करार करणं. या करारामध्ये घरकामाच्या विभागणीपासून पालकत्वाच्या जबाबदारींपर्यंत आणि सुटीच्या दिवशी आधी कुणाच्या पालकांच्या घरी जायचं, इथपर्यंत अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात.

फोटो स्रोत, Alamy
या वर्गांमध्ये लैंगिक शिक्षणासारखी प्राथमिक बाबसुद्धा शिकवली जाते. विशीतल्या तरुण-तरुणींना मासिक पाळीबद्दल समजावून सांगणं, हे कदाचित विचित्र दिसेल, पण ली सांगतात की इथल्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना गरोदर राहू नये, हे सांगण्यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लैंगिक जीवनाबद्दल सकारात्मक वाटेल आणि गरोदर राहण्यावर अधिक नियंत्रण मिळवता येईल असं ज्ञान, माहिती देण्याकडे शाळा लक्ष देत नाहीत.
सिंगापूरमध्ये पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी बाळासाठी बोनस योजना अंमलात आणली आहे, त्याअंतर्गत प्रत्येक पालकाला रोख रक्कम दिली जाते तसेच बाळाच्या भविष्यासाठी पालकांच्या बचतीइतकी रक्कम दिली जाते. पण ही योजना सुरू होऊन पाच वर्षं झाली तरी, जन्मदरावर अशा उपाययोजनांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही.
कोरियानेसुद्धा स्वतःहून पालकांना असं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. 2010मध्ये सोलमधील आरोग्य, कल्याण आणि कुटुंब मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना महिन्यातल्या एका बुधवारी "वेळेआधी" घरी जाऊन स्वतःच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला सांगितलं. या उपक्रमाला "Family Day" असं संबोधलं जायचं. पण कार्यालयांमधले दिवे संध्याकाळी 7 वाजता बंद केले तरी सरकारी कर्मचाऱ्यांना घरी जाऊन स्वतःच्या जोडीदाराबरोबर कुटुंब वाढवण्यात स्वारस्य नव्हतं.
येयुंग म्हणतात की अशा तऱ्हेचे अल्पकालीन प्रोत्साहन उपाय केले जातात, याचा अर्थ असा की, "या देशांनी सर्वांत मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही, तसंच स्त्री-पुरुषांच्या बदलत्या भूमिकांशीही जुळवून घेतलेलं नाही."
अशाच प्रकारे मॅकडोनाल्ड म्हणतात की, अधिक व्यापक सामाजिक बदल झाल्याशिवाय दक्षिण कोरियमध्ये जननक्षमता वाढवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न निरर्थक आहेत.
काही वर्षांपूर्वी सरकारने कमी जन्मदराबद्दल स्त्रियांना दोष दिल्याचा आरोप झाला होता. त्याचबरोबर मुलाला जन्म देण्याच्या वयातील स्त्रीचे भौगोलिक स्थान दर्शवणारी, एक गुलाबी-थीमची वेबसाईट बऱ्याच टीकेनंतर बंद करण्यात आली होती.
अशा दुःसाहसी उपक्रमांमुळे उलट परिणाम होऊन, महिला त्यांच्या कमी जननक्षमतेस कारणीभूत असलेल्या वर्तनावर अधिक ठाम होतात, असं मॅकडोनाल्ड सांगतात.

वर्गातील विद्यार्थ्यांसाठी, हा अभ्यासक्रम म्हणजे स्वतःला समजून घेण्याबरोबरच, कौटुंबिक जीवनाकडे अधिक सकारात्मकतेने बघायला शिकवणारा उपक्रम आहे.
"आधी मला असं वाटायचं की, मी ज्या पद्धतीने माझ्या गर्लफ्रेंडशी बोलतो, ते सामान्य आहे. पण पर्सनॅलिटी पॅटर्न चाचणीमुळे हे सिद्ध झालं की मी तिच्यावर मालकीहक्क गाजवत होतो," जी-मियाँग किम कबूल करतो. "मला वाटायचं त्यापेक्षा मी जास्त पुराणमतवादी होतो."
ली सांगतात की विद्यार्थ्यांना "अगदी योग्य व्यक्ती शोधायला शिकवलं जात नाही, तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम असलेली व्यक्ती शोधायला शिकवलं जातं." आनंदी वैवाहिक जीवन आणि आनंदी कुटुंब यांचा मार्ग यातूनच सापडण्याची त्यांना आशा वाटते.
पण काही विद्यार्थ्यांना अजूनही पालकांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे कठीण वाटतं.
"माझी आई मला सांगते की, मी चांगले आर्थिक स्थैर्य असलेल्या, मनमिळाऊ कुटुंबातील, चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या मुलाशी लग्न करावं," जी-वॉन किम सांगते.
पण ती सांगते की ती काही वैशिष्ट्यांना इतर वैशिष्ट्यांपेक्षा जास्त महत्त्व देते. "मी दिसण्यापेक्षा आर्थिक सुबत्तेला महत्त्व देते," ती हसून सांगते. "माझी आई सांगते की एकदा लग्न झालं की, दिसणं महत्त्वाचं राहणार नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








