डार्क रंगाचे लिपस्टिक लावल्यामुळे 'पुरुष वाईट नजरेने पाहतात', चेन्नईतून का सुरू झाली लिपस्टिकच्या रंगाबाबतची चर्चा?

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नंदिनी वेलिचामी
    • Role, बीबीसी तमिळ

"एकदा काही पुरुष माझ्याकडे वाईट नजरेनं पाहत आपसांत बोलत होते. माझ्या मित्र-मैत्रिणींनी म्हटलं की, मी लावलेल्या डार्क (गडद रंगाच्या) लिपस्टिकमुळं ते तसं करत आहेत."

"शिक्षक म्हणतात, तुम्ही मुलांना उत्तेजित करण्याच्या हेतूनेच अशा प्रकारे डार्क लिपस्टिक लावता."

"डार्क लिपस्टिक लावली तर, लोक म्हणतात ही ही मुलगी चित्रपटांतील खलनायिका दिसते. "

डार्क लिपस्टिक लावल्यानं महिलांना येणारे हे काही अनुभव आहेत. त्यांना अनेकदा अशाप्रकारचे शब्द ऐकावे लागतात.

लाल किंवा तपकिरी रंगाच्या गडद लिपस्टिक लावल्यामुळं ऑफिसमध्य काही लोक महिलांकडे रोखून किंवा वेगळ्या पद्धतीनं पाहतात, असंही महिलांचं म्हणणं आहे.

चेन्नई महापालिकेतील एका घटनेमुळं या विषयावर सध्या चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. लिपस्टिकच्या मुद्द्यावरून कामाच्या ठिकाणी एका महिलेला अडचणी आल्याची चर्चा सध्या सध्या सुरू आहे. ही घटना काय ते आधी जाणून घेऊ.

नेमके काय घडले?

लिपस्टिक लावल्याने आपली बदली करण्यात आल्याची तक्रार चेन्नई महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याने केली आहे. विशेष म्हणजे ही तक्रारदार महिला शहराच्या पहिल्या दलित महिला महापौरांची पहिली महिला चोपदार आहे.

शहराच्या पहिल्या दलित महापौर प्रिया राजन आणि त्यांच्या महिला चोपदार म्हणून पहिल्यांदाच नियुक्त झालेल्या माधवी यांच्यातील हा वाद आहे.

या वादाला कारणीभूत आहे, त्यांची लिपस्टिक! 15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या माधवी यांची नुकतीच कामाच्या ठिकाणाहून दुसरीकडे बदली झाली. त्यामागेही लिपस्टिकचे कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

चेन्नईच्या लिपस्टिक प्रकरणाची जोरदार चर्चा का सुरू आहे?

फोटो स्रोत, getty images/BBC

याबाबत अधिक माहिती अशी, की तीन वर्षांपूर्वी पहिल्या दलित महापौर म्हणून चेन्नई महापालिकेच्या महापौरपदी प्रिया राजन निवडून आल्या. महापालिकेत गेली 15 वर्षे काम करणाऱ्या माधवी यांची नूतन महापौरांच्या पहिल्या महिला चोपदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी महापौरांचे संरक्षण करणे, हे चोपदार म्हणून माधवी यांचे प्रमुख काम होते.

चेन्नईच्या लिपस्टिक प्रकरणाची जोरदार चर्चा का सुरू आहे?

फोटो स्रोत, PriyarajanDMK/IG

माधवी यांच्या म्हणण्यानुसार, या वादाची सुरुवात महापौर कार्यालयाने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या एका कार्यक्रमातून झाली.

''या कार्यक्रमात ‘फॅशन शो’ आणि ‘कॅटवॉक’ आयोजित करण्यात आला होता. त्यात मी कॅटवॉक केला.'' माधवी बीबीसीला सांगत होत्या.

त्यांनी आरोप केला, की ''त्या कार्यक्रमातून महापौर अचानक निघून गेल्या. परंतु नंतर लगेचच मला त्यांनी बोलावून घेऊन झापले. मी स्टेजवर कॅटवॉक का केला? असा जाब त्यांनी मला विचारला. त्यावेळी कार्यक्रमात इतर काय घडले, यावर काही चर्चा झाली नाही. मात्र तेव्हापासून मी लावलेल्या लिपस्टिकवर आक्षेप घेतला जाऊ लागला. जणू शस्त्र म्हणूनच ते माझ्याविरोधात वापरले जाऊ लागले."

लिपस्टिक न लावण्याच्या सूचना?

माधवी यांनी दावा केला, की त्या कार्यक्रमानंतर काही दिवसांनीच 'कर्मचाऱ्यांनी गडद लिपस्टिक लावू नये', अशा तोंडी सूचना महापौरांच्या स्वीय सहाय्यक यांनी दिल्या. त्यामुळे माधवी चिडल्या.

"हे माझे शरीर आहे आणि मी कोणती कपडे परिधान करावेत, कोणत्या शेडची लिपस्टिक लावावी, याबाबत मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याबाबत आदेश देणारे ते कोण?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी माधवी ऑफिसमध्ये उशिरा पोहोचल्या. त्याबद्दल त्यांना लेखी स्पष्टीकरण मागण्यात आले. बीबीसीने ते पत्र पाहिले. त्यात कर्तव्यात निष्काळजीपणा, वक्तशीर नसणे, वरिष्ठांचे आदेश न मानणे आणि 'ऑफिस गाईडलाइन्स'चे उल्लंघन करणे, असा ठपका माधवी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

माधवी यांनी बीबीसीला सांगितले, की ‘‘पाय फ्रॅक्चर झाल्याने त्या दिवशी त्या ऑफिसात उशिरा पोहोचल्या होत्या. दुखापत झाल्याने गर्दीच्या वेळेत प्रवास करणे त्यांच्यासाठी अवघड झाले होते.’’

ग्राफिक्स
ग्राफिक्स

माधवी यांनी त्या पत्राला उत्तर दिले, "तुम्ही मला लिपस्टिक लावू नका असे सांगितले होते, पण मी अवज्ञा केली. हा गुन्हा असेल तर मला लिपस्टिक लावण्यास मनाई करणारा सरकारी आदेश दाखवा." त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे माधवी यांनी बीबीसीला सांगितले.

मात्र दुसऱ्याच दिवशी माधवी यांची उत्तर चेन्नईतील दुसऱ्या कार्यालयात बदली करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे महापौरांनी माधवी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माधवी यांच्याशी लिपस्टिक लावण्याबद्दल ऑफिसमधील कोणीही बोलले नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

त्याचबरोबर माधवी वेळेवर ऑफिसला येत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आम्ही दोनदा दिलेल्या इशाऱ्यांकडे माधवी यांनी दुर्लक्ष केले."

'आंतरराष्ट्रीय कंपन्यांतही वाईट अनुभव'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चेन्नईतच 24 वर्षीय सुरेखा या वकिलीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने त्रिचीमध्ये असताना त्यांनाही काही अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या की,"मी एकदा रात्री औषध घ्यायला जात होते. तेव्हा दोन जण माझ्या मागून आले आणि बोलू लागले. 'इथं जवळंच बार आहे', असं ते म्हणत होते. मी लगचेच हॉस्टेलवर परत आले. मी प्रचंड घाबरले होते. पण मला जास्त वाईट वाटलं ते हॉस्टेलवरच्या मुलींचं बोलणं ऐकूण. 'डार्क लिपस्टिक लावणाऱ्यांना ते असंच बोलतात,' असं मैत्रिणींचं म्हणणं होतं."

पण त्यानंतरही सुरेखा तेवढ्याच आत्मविश्वासानं गडद रंगाची लिपस्टिक वापरत राहिल्या.

मदुराईच्या 22 वर्षाय प्रतिष्ठा एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत सोशल मीडिया मॅनेजर आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असतानाचा एक वाईट अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला.

"माझ्या ओठांवर डाग होते. त्याचं मला वाईट वाटायचं. त्यामुळं मी डार्क लिपस्टिक लावायला सुरुवात केली. मला मित्र मैत्रिणी विचारायचे की, आपण कॉलेजला शिकायला जातोय, मग लिपस्टिक कशाला हवी? ते असंही म्हणायचे की, डार्क लिस्टिक लावल्यामुळं मी चित्रपटांतील खलनायिकांसारखी दिसते. माझे त्यावरून अनेकदा मित्रांशी वाद व्हायचे," असं त्यांनी सांगितलं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

बेंगळुरूच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या 33 वर्षीय जयलक्ष्मी म्हणाल्या की, त्यांचे सहकारी डार्क लिपस्टिकमुळं त्यांच्याकडं रोखून पाहत असतात.

"पुरुष सहकारीच नाही, तर महिलाही माझ्याकडं वेगळ्या पद्धतीनं पाहतात. बेंगळुरूसारखं मोठं शहर आणि आंतरराष्ट्रीय कंपनीतही ही परिस्थिती आहे. पण तरीही, मला आवडत म्हणून मी रोज डार्क लिपस्टिक वापरतेच," असं त्या म्हणाल्या.

चेन्नई विद्यापीठात मास्टर्स इन इलेक्ट्रॉनिकचं शिक्षण घेणाऱ्या वसुमिता यांच्या मते, त्यांना तर डार्क लिपस्टिक लावायची भीती वाटते. त्यामुळं आवडत असूनही त्या डार्क लिपस्टिक लावत नाहीत. लाईट रंगाच्या लिपस्टिकची निवड त्या करतात.

वसुमिता यांच्या मते, "डार्क लिपस्टिकमुळं लोक ट्रान्सजेंडरबरोबर तुलना करायला लागतात. त्यामुळं मी एकटी असले तरच डार्क लिपस्टिक लावते, नसता लाईट कलरचीच लिपस्टिक लावते."

नैतिक बंधने

चेन्नईमध्ये 70 लाखांहून अधिक लोक राहतात. त्यातील बहुतेक महिला कमावत्या आहेत. महापौर प्रिया राजन या तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम या प्रादेशिक पक्षाच्या सदस्य आहेत. हा पक्ष पुरोगामी विचारधारेचा मानला जातो. मात्र या प्रकरणामुळे पक्षाच्या या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या वादाला कारणीभूत आहे, त्यांची लिपस्टिक! 15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या माधवी यांची नुकतीच कामाच्या ठिकाणाहून दुसरीकडे बदली झाली. त्यामागेही लिपस्टिकचे कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

माधवी यांच्या बदलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली, तसेच विरोधकांनीही या प्रकरणावर टीका केली आहे.

या वादाला कारणीभूत आहे, त्यांची लिपस्टिक! 15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या माधवी यांची नुकतीच कामाच्या ठिकाणाहून दुसरीकडे बदली झाली. त्यामागेही लिपस्टिकचे कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

चेन्नईतील महिला हक्क कार्यकर्त्या निवेदिता लुईस म्हणाल्या, "जर माधवीचे आरोप खरे असतील तर, सरकारी कार्यालयांमध्ये महिलांवर अशी नैतिक बंधने लादणारे कोण आहेत, हे आपण विचारले पाहिजे."

माधवी यांच्यावरील दंडात्मक कारवाई ‘अति’च झाल्याचे लुईस यांनी म्हटले आहे.

लिपस्टिकची आवड

चेन्नई महापालिकेत पूर्वीच्या पदावर नेमणूक व्हावी, म्हणून कायदेशीर लढाई लढण्याचा कोणताही विचार नसल्याचे माधवी यांनी स्पष्ट केले. जनतेतून आणि सोशल मीडियातून याबाबत मिळणारे समर्थनच संबंधितांवर दबाव आणेल, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, माधवी यांनी लिपस्टिक लावणे सुरुच ठेवले आहे. मात्र त्या स्थानिक आणि स्वस्त लिपस्टिक वापरतात.

"मला फॅशनेबल राहायला आवडते, पण मला ब्रँडेड उत्पादने परवडत नाहीत. मी पार्लरमध्येही जात नाही," असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर "मला गुलाबी लिपस्टिक आवडते," असेही त्यांनी बीबीसीला आवर्जून सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)