शैलजा पाईक : येरवडा झोपडपट्टी ते 7 कोटींची 'जिनिअस ग्रँट' फेलोशिप मिळवणाऱ्या महिला इतिहासकार

प्राध्यापिका शैलजा पाईक

फोटो स्रोत, MacArthur Foundation & Shailaja Paik

फोटो कॅप्शन, प्राध्यापिका शैलजा पाईक
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"आमच्याकडे ना नियमित पाण्याची सुविधा होती, ना शौचालय होतं. हे खरंय की मी कचरा आणि अगदी घाणीने वेढलेल्या अशा परिसरात वाढले आहे, जिथे डुकरांचा सहज वावर असायचा. सार्वजनिक शौचालयांच्या त्या आठवणी आजही माझ्या अंगावर काटे आणतात."

'डुकरांचा वावर असलेली झोपडपट्टी ते अमेरिकेतील प्राध्यापक' असा अभूतपूर्व प्रवास करणाऱ्या शैलजा पाईक आता 'मॅकआर्थर' ही मानाची फेलोशिप प्राप्त होणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत. या फेलोशिपअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पाच वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने 8 लाख डॉलर (भारतीय चलनात 6 कोटी 71 लाख रुपये) इतकी रक्कम प्राप्त होते.

शैलजा पाईक यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून दलित महिलांचं जगणं सखोलपणे मांडलं आहे.

दलित स्त्रियांचं योगदान आणि त्यांच्या आत्मभानाच्या जागृतीचा इतिहास लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध इतिहासकार अशी त्यांची ओळख आहे.

जॉन डी. आणि कॅथरिन टी. मॅकआर्थर फाऊंडेशनकडून 'मॅकआर्थर फेलोज् प्रोग्राम'ची (MacArthur Fellows Program) 'जिनियस ग्रँट' ही फेलोशिप अमेरिकेतील विविध क्षेत्रातील 20 ते 30 सृजनशील विद्वानांना दरवर्षी दिली जाते.

या वर्षीही लेखक, कलाकार, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक, माध्यमकर्मी, आयटी, उद्योग, संशोधन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना ही फेलोशिप जाहीर झाली असून त्यामध्ये इतिहास अभ्यासक म्हणून शैलजा पाईक यांचाही समावेश आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "ही फेलोशिप मिळाल्यामुळे मला फारच आनंद होत आहे. मी एकदम ढगांमधून चालत आहे, असं मला वाटतंय."

डुकरांचा वावर असलेली झोपडपट्टी ते अमेरिकेतील प्राध्यापक

शैलजा पाईक या मूळच्या पुण्यातील येरवड्याच्या. वीस बाय वीस फूटांच्या छोट्या घरामध्ये आपल्या तीन बहिणींसमवेत त्या येरवड्याच्या झोपडपट्टीमध्ये वाढल्या.

आपल्या बालपणाविषयी बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "आमच्याकडे ना नियमित पाण्याची सुविधा होती, ना आमच्याकडे शौचालय होतं. हे खरंय की मी कचरा आणि अगदी घाणीने वेढलेल्या अशा परिसरात वाढले आहे, जिथे डुकरांचा सहज वावर असायचा. सार्वजनिक शौचालयांच्या त्या आठवणी आजही माझ्या अंगावर काटे आणतात."

स्वयंपाकासाठी वा स्वच्छतेसारख्या नियमित कामांसाठी लागणारं पाणी आणण्यासाठी वस्तीतील सार्वजनिक नळाचं पाणी हाच आधार होता. तेव्हा या पाण्यासाठी मोठी रांग पार करुन हंडे आणावे लागायचे, अशी आठवणही त्या सांगतात. असं असूनही आपले वडील देवराम आणि आई सरिता यांनी आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून इंग्रजी माध्यमातील शिक्षणासाठी शक्य तितकं अनुकूल वातावरण निर्माण करुन दिल्याचं शैलजा यांनी सांगितलं.

शैलजा पाईक यांचं बालपण येरवड्यातील याच घरात गेलं.

फोटो स्रोत, Sarita Paik

फोटो कॅप्शन, शैलजा पाईक यांचं बालपण येरवड्यातील याच घरात गेलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या म्हणाल्या की, "एकूणच सामाजिक, शैक्षणिक, भावनिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर या सगळ्याचा निश्चितच सखोल परिणाम होतो. एवढं कष्टाचं जीवन जगले, एरवड्यासारख्या परिसरात राहून, फारश्या सुविधा आणि सवलती नसताना हे करु शकले. त्यातही या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणच किती महत्त्वाचं आहे, हे माझ्या आई-वडिलांनी ओळखून त्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच, मी स्वत:ला माझ्या अभ्यासात पूर्णपणे झोकून देऊन हे काम करु शकले."

त्या काळातील आपल्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या की, "मी स्वत:ला गोधडीमध्ये गुंडाळून घ्यायचे आणि घरातल्यांना शांत आवाजात बोलायला सांगून अभ्यासासाठी शक्य तितकं अनुकूल वातावरण निर्माण करायचे.

"खरं तर अशा वातावरणात अभ्यास करणं हेच मोठं आव्हान होतं. मी सायंकाळी साडेसातला झोपी जायचे आणि मध्यरात्री दोन-तीन वाजता उठायचे. तिथून सहा-सात वाजेपर्यंत अभ्यास करायचे आणि मग शाळेला जायचे."

शैलजा यांच्या दोन्ही लहान बहिणी उच्चशिक्षित आहेत. त्यातील रोहिणी वाघमारे या पाटबंधारे खात्यात असून किर्ती पाईक-इनकर या देखील इग्लंडमध्ये डॉक्टर आहेत.

लहानपणी आई सरिता पाईक यांच्या कडेवर असलेल्या शैलजा पाईक

फोटो स्रोत, Shailaja Paik

फोटो कॅप्शन, लहानपणी आई सरिता पाईक यांच्या कडेवर असलेल्या शैलजा पाईक

बीबीसी मराठीशी बोलताना शैलजा यांच्या आई सरिता पवार फारच भारावलेल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "हे सगळं तिच्या कष्टाचं फळ आहे. मी कमी शिकलेली आहे पण तिच्या वडिलांना आणि मला नेहमी असं वाटायचं की, मुलींनी भरपूर शिकावं. मुलींना आपल्या पायावर उभं रहावं, हे माझं ध्येय होतं. बरेचदा ती आजारी असली तरीही अभ्यास करायची. तिने आमच्या परिस्थितीची जाण ठेवून हे मोठं यश मिळवलं आहे. जेव्हा तिने मला या फेलोशिपबद्दल सांगितलं तेव्हा मला फारच भरुन आलं."

शैलजा यांच्या धाकट्या बहिण रोहिणी वाघमारे म्हणाल्या की, "माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्द नाहीयेत. सामान्यत: तीन मुली असल्यावर मुलींची लग्न लावून मोकळं व्हावं, अशी मानसिकता असते, पण त्या काळातही आई-वडिलांची अशीच इच्छा होती की, मुलींनी शिकून पुढे जावं. कुणावरही अवलंबून नसावं. खरं तर ताईला कलेक्टर व्हायची इच्छा होती. तिने प्रीलीमही पास केली होती. पण ते स्वप्न अधुरं राहिलं असलं तरी आता तिचं काम जागतिक पातळीवर गेलंय, याचा आनंद वेगळाच आहे."

आपल्या संघर्षाविषयी बोलताना शैलजा पाईक म्हणाल्या की, "दलित असल्यामुळे भेदभावाचे अनेक प्रसंग वाट्याला निश्चितच येतात, तसे मलाही आले आहेत.

अगदीच उदाहरण सांगायचं झालं तर, मला 'फोर्ड फाऊंडेशन फेलोशिप' जेव्हा मिळाली तेव्हा माझ्या आजूबाजूच्या काही लोकांना यावर विश्वासच बसत नव्हता. ते वारंवार मला विचारायचे की, तुला कशी काय मिळाली? मला मिळालेली फेलोशिप कामासाठी मिळाली, पण एका दलित महिलेला मिळालेल्या फेलोशिपबद्दल त्यांना प्रचंड आश्चर्य वाटत होतं."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

काय आहे या फेलोशिपचं महत्त्व?

'जिनियस ग्रँट' नावाने ओळखली जाणारी ही फेलोशिप या वर्षी 22 जणांना देण्यात आली आहे.

'सृजनशीलता' हा मॅकआर्थर फेलोशिपचा मूलभूत निकष आहे. कल्पक विचारांच्या उदयोन्मुख सर्जक व्यक्तींमध्ये गुंतवणूक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या कामाला पाठिंबा व्यक्त करणं हा या फेलोशिपचा उद्देश आहे.

जोखीम पत्करून समाजातील जटील समस्यांना भिडणाऱ्यांना तसेच चौकटबाह्य विचार करुन त्यातून सुंदर, कल्पक आणि प्रेरक गोष्टींची नवनिर्मिती करणाऱ्या व्यक्तींना उजेडात आणून त्यांचं महत्त्व अधोरेखित करणं, हा देखील या फेलोशिप देण्यामागचा मूलभूत विचार आहे.

या फेलोशिपअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पाच वर्षांसाठी 8 लाख डॉलर (भारतीय चलनात 6 कोटी 71 लाख रुपये) इतकी रक्कम प्राप्त होते.

फेलोशिपबाबत बोलताना त्या म्हणतात की, "दक्षिण आशिया तसेच त्यापलीकडच्या दलित आणि दलितेतर अशा सर्वांचाच जातीअंताचा लढा या फेलोशिपमुळे अधिक बळकट होईल, अशी आशा मला वाटते."

द व्हल्गरिटी ऑफ कास्ट: दलितस्, सेक्शुअॅलिटी अँड ह्युमॅनिटी इन मॉडर्न इंडिया

फोटो स्रोत, Shailaja Paik

फोटो कॅप्शन, शैलजा पाईक लिखित 'द व्हल्गरिटी ऑफ कास्ट: दलितस्, सेक्शुअॅलिटी अँड ह्युमॅनिटी इन मॉडर्न इंडिया'

या फेलोशिपचं महत्त्व अधोरेखित करुन सांगताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "ही फेलोशिप 'नो स्ट्रींग्स अटॅच्ड' स्वरुपाची आहे. म्हणजेच, या फेलोशिपच्या बदल्यात निवड झालेल्या उमेदवारांनी काही विशेष वा वेगळी गोष्ट करणं अपेक्षित नाहीये, ही उल्लेखनीय बाब आहे.

"या फेलोशिपची रक्कमही भारतीय चलनात मोठी आहे. प्रतिभावंत लोकांमध्ये केलेली गुंतवणूक या उद्देशाने मॅकआर्थर फाउंडेशन ही फेलोशिप देतं.

"पुढे जाऊन हे लोक आणखी चांगलं काम करतील, असे त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवणारी ही फेलोशिप आहे, हे विशेष," असं कुंभोजकर सांगतात.

या फेलोशिपसाठी अर्ज वा मुलाखत अशी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया पार पाडली जात नाही.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामनिर्देशित केलेल्या अभ्यासू आणि आश्वासक उमेदवारांचा या फेलोशिपकरिता विचार केला जातो.

शैलजा पाईक

फोटो स्रोत, MacArthur Foundation

'दलितांमधल्या दलित' म्हणजे दलित महिला होय'

आधुनिक भारतातील जात, लिंग आणि लैंगिकतेचा दलित महिलांच्या आयुष्याच्या दृष्टीकोनातून परामर्श घेणे, हा शैलजा पाईक यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

आपल्या एकूण अभ्यासाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, "भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 17 टक्के लोकसंख्या दलितांची आहे. मला असं लक्षात आलं की, दलित महिलांच्या शिक्षणावर फारसं काम झालेलं नाहीये. आकडेवारी दिसते पण नक्की काय परिस्थिती आहे, याबाबतचे क्वालिटेटीव्ह रिसर्च उपलब्धच नव्हते. या दलित महिलांचा इतिहास नीटसा कुणी लिहिलेलाच नाहीये, तेव्हा मी ठरवलं की मला हे काम करायचं आहे.

शैलजा पाईक

फोटो स्रोत, MacArthur Foundation

"ऐतिहासिकदृष्ट्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कोणत्याही स्वरूपातील शिक्षण, सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक पाणवठे वा विहिरी, इतकंच काय, एखाद्याची ऐपत असली तरीही चप्पल घालणं वा नवे कपडे घालणं यासारख्या गोष्टींचीही परवानगी नव्हती.

"यातही पुन्हा दलित महिला या निसंशयपणे अधिकच वंचित आणि दडपलेल्या. जेंडर आणि राजकारणाच्या दृष्टीकोनातून विचार करता त्यांचं स्थान अगदीच नगण्य असल्याने 'दलितांमधल्या दलित' म्हणजे दलित महिला होय."

पुढे त्या म्हणाल्या की, "हाच तो समाज आहे, ज्यामधून मी आले आहे. म्हणूनच गेल्या 25 वर्षांपासून हाच माझ्या अभ्यासाचा, संशोधनाचा आणि लिखाणाचा विषय राहिला आहे."

दलित महिलांचं जगणं मांडणारा सखोल अभ्यास

शैलजा पाईक या जात, लिंगभाव आणि लैंगिकता अशा दृष्टीकोनातून दलित महिलांच्या आयुष्यावर अभ्यास करणाऱ्या आधुनिक इतिहासकार आहेत.

पाईक यांनी आपल्या अभ्यासातून जात वर्चस्वाच्या इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्रदान केली आहे. त्याबरोबरच दलित महिलांचा आत्मसन्मान आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं शोषण करण्यामध्ये जेंडर (लिंगभाव) आणि सेक्शुअॅलिटीने (लैंगिकता) कशाप्रकारे प्रभाव टाकला आहे, या बाबीचाही उहापोह त्यांनी आपल्या लिखाणातून केला आहे.

त्यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये दलित आणि दलित महिला केंद्रस्थानी आहेत.

शैलजा पाईक लिखित दलित वूमन्स एज्यूकेशन इन मॉडर्न इंडिया : डबल डिस्क्रिमिनेशन (2014)

फोटो स्रोत, Shailaja Paik

फोटो कॅप्शन, शैलजा पाईक लिखित 'दलित वूमन्स एज्यूकेशन इन मॉडर्न इंडिया : डबल डिस्क्रिमिनेशन' (2014)

त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील साहित्याव्यतिरिक्त समकालीन दलित महिलांच्या मुलाखती आणि त्यांचे अनुभव यांच्या एकत्रिकरणातून आजच्या संदर्भात एक नवा परिप्रेक्ष्य साकारला आहे.

'दलित वूमन्स एज्यूकेशन इन मॉडर्न इंडिया : डबल डिस्क्रिमिनेशन' (2014) आणि 'द व्हल्गरिटी ऑफ कास्ट: दलितस्, सेक्शुअॅलिटी अँड ह्युमॅनिटी इन मॉडर्न इंडिया' अशी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पहिल्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्राच्या शहरी भागातील दलित महिलांचा शिक्षणासाठीचा संघर्ष ब्रिटिशकालीन अवस्थेशी तुलना करत मांडला आहे.

कुठून झालं शिक्षण?

शैलजा पाईक

फोटो स्रोत, MacArthur Foundation

सध्या शैलजा पाईक या 2010 पासून 'युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी'शी संलग्न असून तिथे त्या 'वूमन, जेंडर अँड सेक्शुऍलिटी स्टडीज् अँड एशियन स्टडीज्' या विषयाच्या रिसर्च प्रोफेसर आहेत.

निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या शैलजा यांचं इतिहास या विषयामधलं एम. ए. या पदवीचं शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात 1994-96 या काळात पूर्ण झालं.

2000 साली त्यांना इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चची (ICSSR) परदेशात जाऊन एमफील करण्याकरिता असलेली फेलोशिप मिळाली. तेव्हा त्या इंग्लंडला गेल्या.

त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. आजवर त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाला अमेरिकन कौन्सिल ऑफ लर्नड सोसायटीज, स्टॅनफोर्ड ह्युमॅनिटीज सेंटर, नॅशनल एंडोमेंट फॉर द ह्युमॅनिटीज, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज, येल युनिव्हर्सिटी, एमोरी युनिव्हर्सिटी, फोर्ड फाऊंडेशन, आणि चार्ल्स फेल्प्स टॅफ्ट रिसर्च सेंटर यांच्याद्वारे निधी प्राप्त झाला आहे.

त्यांनी इंग्लंडमधील वॅरवीक विद्यापीठातून 2007 साली पीएचडी प्राप्त केली आहे. त्यानंतर युनियन कॉलेजमध्ये (2008-2010) इतिहासाच्या व्हिजीटींग असिस्टंट प्रोफेसर आणि येल विद्यापीठामध्ये (2012-2013) दक्षिण आशियाई इतिहासाच्या पोस्टडॉक्टरल असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)