आदिती स्वामी : उसाच्या शेतात तिरंदाजीचा सराव ते भारताची सर्वांत 'युवा वर्ल्ड चॅम्पियन'

आदिती

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, आदिती स्वामी
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

“आर्चरी म्हणजे माझी आता लाईफच आहे. मला कधी आर्चरीशिवाय दुसरं काहीच करायचं नाही,” आदिती स्वामी तिच्या लाडक्या खेळाविषयी मनापासून बोलते, तेव्हा तिच्या डोळ्यातही वेगळी चमक दिसते.

अवघ्या सतरा वर्षांच्या वयात आदितीनं आर्चरी म्हणजे तिरंदाजीची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळवलं आहे आणि अलीकडेच तिचा अर्जुन पुरस्कारानं सन्मानही झाला आहे.

आणि हो, हे सगळं यश आदितीनं साताऱ्यातच, एका उसाच्या शेतात तयार केलेल्या मैदानात सराव करून मिळवलं आहे.

ज्या वयात मुलं एरवी अभ्यासात बुडून गेलेली असतात किंवा शाळा कॉलेजात मजा-मस्ती करताना दिसतात, त्या वयात आदितीनं तिच्या खेळातलं शिखर गाठलं आहे.

ती सांगते, “तुम्ही स्पर्धेत उतरता, तेव्हा तुमचं वय काय आहे, यानं फरक पडत नाही. तुम्ही त्या क्षणी कसं खेळता हे महत्त्वाचं असतं.”

एका छोट्या शहरातल्या सामान्य कुटुंबातल्या लहानग्या मुलीलाही जग जिंकता येतं, हे आदितीनं दाखवलं आहे.

एकीकडे बारावीची प्रॅक्टिकल्स, परीक्षेचा अभ्यास, सराव आणि येऊ घातलेल्या वर्ल्ड कपची तयारी यातून वेळ काढत आदितीनं आमच्याशी बातचीत केली.

नवव्या वर्षी खेळाचा प्रवास

आदितीचे वडील गोपीचंद स्वामी पेशानं शिक्षक तर आई शैला ग्रामसेविका आहे आणि भाऊ आदित्य तिच्या पावलावर पाऊल टाकत तिरंदाजीचे धडे गिरवतो आहे.

स्वामी कुटुंब मुळचं साताऱ्यापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या शेरेवाडी गावचं पण सध्या सातारा शहरातच एका छोट्याशा घरात ते राहतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

आम्ही आदितीच्या घरी गेलो, तेव्हा समोरच एका भिंतीवर तिचा व्हिजन बोर्ड मांडलेला दिसला. म्हणजे पुढच्या काळात तिला कुठल्या स्पर्धा खेळायच्या आहेत, कुठली जेतेपदं मिळवायची आहेत हे लिहून ठेवलेलं होतं.

लॉकडाऊनच्या दिवसांत तयार केलेल्या या व्हिजन बोर्डमधली जवळपास सगळी उद्दीष्ट्यं तिनं पूर्णही केली आहेत आणि याचा तिच्या आई-वडिलांना अभिमान वाटतो.

आदितीचा व्हिजन बोर्ड

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, आदितीचा व्हिजन बोर्ड

मुळात गोपीचंद यांच्या आग्रहामुळेच आदिती खेळाकडे वळली. 2016 साली ती जेमतेम नऊ वर्षांची असताना गोपीचंद तिला साताऱ्यातल्या श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियमवर घेऊन गेले होते.

“मलाही खेळची पहिल्यापासून आवड होती, पण फारशी संधी मिळाली नाही. आपल्या मुलांनी तरी खेळावं असं वाटायचं. आदिती अभ्यासात तशी हुशार होती. पण तब्येतीनं सुधारावं, फिटनेससाठी तरी तिनं खेळात उरतावं असं वाटायचं.”

आदितीलाही तो दिवस व्यवस्थित आठवतो. ती स्टेडियममध्ये पोहोचली, तेव्हा तिथे कबड्डी, खोखो, व्हॉलिबॉल वगैरे. तिथेच एका कोपऱ्यामध्ये तिरंदाजीचा सराव सुरू होता.

तोवर केवळ राम-लक्ष्मणाच्या गोष्टी आणि कहाण्यांमध्येच आदितीनं तिरंदाजीविषयी ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष पाहिल्या क्षणीच आदिती या खेळाच्या प्रेमात पडली.

लहानपणीची आदिती, तिच्या पहिल्या धनुष्यासोबत

फोटो स्रोत, Gopichand Swami

फोटो कॅप्शन, लहानपणीची आदिती, तिच्या पहिल्या धनुष्यासोबत

तिरंदाजीच का, असं विचारलं असता आदिती सांगते, “या खेळातलं धनुष्य आकर्षक वाटतं. तुम्हाला लक्ष एकाग्र करून खेळावं लागतं. शिवाय वैयक्तिक खेळ आहे, त्यामुळे तो मला खूप भावला. कुस्ती, वेटलिफ्टिंग अशा खेळात धावपळ करावी लागते, लागू शकतं म्हणून त्यात मला थोडा कमी रस वाटला.

“प्रवीण सर तिथे कोपऱ्यात तिरंदाजीचा सराव घेत होते. जेव्हा मी ते बघितलं तेव्हा बाबांना म्हटलं हां, मला हाच गेम करायचा आहे.”

उसाच्या शेतात तिरंदाजीचा सराव

प्रवीण सर म्हणजे प्रवीण सावंत आता साताऱ्याच्या वाढे फाट्याजवळ दृष्टी आर्चरी अकॅडमीत तिरंदाजीचे धडे देतात. त्यांची कहाणीही आदितीच्या कहाणीशी जोडलेली आहे आणि त्यातही संघर्षाची कमी नाही.

ते स्वतः तिरंदाजी करायचे आणि चंद्रकांत भिसे, प्रमोद चांदुरकर यांचं मार्गदर्शनही त्यांनी घेतलं. प्रवीण पुढे खेळाचं प्रशिक्षण देऊ लागले.

आधी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून आणि मग पोलिस दलात काँस्टेबल म्हणून सरकारी नोकरी करतानाच त्यांनी सराव आणि आसपासच्या मुलांना तिरंदाजीचं मार्गदर्शन करणं सुरू ठेवलं.

आदितीही त्यांच्याकडे सराव करू लागली. पण ती पहिल्यांदा भेटली तेव्हा लहान चणीच्या या मुलीकडे पाहून प्रवीण आधी साशंक होते.

आदिती कोच प्रवीण सावंत यांच्यासोबत

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, आदिती कोच प्रवीण सावंत यांच्यासोबत

तिरंदाजी करताना धनुष्याची प्रत्यंचा (दोरी) ओढण्यासाठी हातात ताकद आणि शरिरात तेवढीच स्थिरता आवश्यक असते. एका जागी उभं राहून, शरिराचा तोल सांभाळत, श्वासावर नियंत्रण ठेवून, वाऱ्याचा अंदाज घेत बाण सोडावा लागतो.

त्यासाठी पुरेसा फिटनेस आदितीकडे आधी नव्हता. म्हणून प्रवीण सरांनी तिच्या वडिलांना सांगितलं, की पंधरा दिवस हीची चाचणी घेऊयात आणि मग तिला खेळात घालायचं की नाही हे ठरवूया.

पण आदितीनं लगेचच सरांचं लक्ष वेधून घेतलं आणि आदितीचा सराव सुरू झाला.

“एखादी गोष्ट शिकवली तर अगदी पटकन ती शिकते. तिच्यामध्ये सातत्य आहे – अगदी वेळेत सरावाला येणं असो, नियमित सराव करणं असो. हे दिसून आल्यावर मी हो म्हणालो.”

इतर मुलांसोबत मग आदितीही तिरंदाजीचे धडे गिरवू लागली. कधी शाहू स्टेडियमवर तर कधी कुठल्या मोकळ्या मैदानात असा दोनतीन ठिकाणी सराव चालायचा. तेव्हा काही सहकारी एकत्र आले आणि सावंत यांनी व दृष्टी आर्चरी अकॅडमीची स्थापना केली.

उसाच्या शेतातलं मैदान

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, उसाच्या शेतात तिरंदाजीसाठी हे मैदान तयार केलं आहे. आदिती आणि दृष्टी अकॅडमीचे अन्य खेळाडू इथे पहाटेपासूच सरावासाठी येतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सावंत सांगतात, “माझे खेळातले गुरू सुजीत शेडगे आणि माझी पत्नी सायली सावंत यांनी मिळून ही अकॅडमी सुरू केली. मी वॉर्डबॉय असताना ज्या हॉस्पिटलमध्ये काम करायचो, तिथे महिंद्र कदम यांचं मेडिकल स्टोर होतं, त्यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. महिंद्र यांनी मग वाढे फाट्याजवळ त्यांचं एक एकराचं उसाचं शेत आमच्या या अकॅडमीला दिलं.”

2019 पासून इथे सराव सुरू झाला आणि आदितीची खरी जडणघडण झाली.

ती सांगते, “मी दोन वर्ष रिकाम्या हातानं घरी आले, तरी मला कधी सरांनी हार मानू दिली नाही. ते मला सतत प्रेरणा देत राहिले. मग वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकले, एशियन गेम्स जिंकले, तरी कधी मला हवेत नाही जाऊन दिलं. सतत जमिनीवर ठेवलं त्यामुळे सर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहेत.”

प्रवीण सावंत यांनाही आपल्या शिष्येविषयी अभिमान वाटतो. आदितीच्या यशामागची कारणं सांगताना ते सांगतात, “आदितीमध्ये दोन गोष्टी खूप चांगल्या वाटतात. एक तिच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे. आणि त्यासोबत तिच्यामध्ये संयम आहे.

“तिच्यामध्ये एक निरागसपणा आहे. त्यामुळेच वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावरदेखील खेळाडू म्हणून ती विनम्र आहे आणि नवीन येणारी आव्हानं पेलण्याची तिची तयारी आहे. त्यामुळे हार-जीत या गोष्टींकडे न बघता ती मनापासून सराव करते.”

साताऱ्यात असली की आदिती अकॅडमीतच राहते. किंवा पहाटे पहाटेच मैदानात येते. आधी व्यायाम, फिटनेससाठी सराव, मग तिरंदाजीचा सराव, त्यानंतर अभ्यास, विश्रांती, संध्याकाळी पुन्हा सराव असा तिचा साधारण दिनक्रम असतो.

कंपाऊंड तिरंदाजीत पदकांची रास

भारतात तिरंदाजीसाठी कोणतं धनुष्य वापरतात, यावरून या खेळाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे भारतीय प्रकाराचं बांबूनं बनवलेलं धनुष्य – ज्याचा वापर केवळ भारतात राष्ट्रीय पातळीवर होतो.

दुसरं म्हणजे दोन्ही भुजा बाहेर वळलेलं रिकर्व्ह प्रकाराचं धनुष्य, ज्याचा वापर ऑलिंपिकसह सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केला जातो.

तिसरं म्हणजे पुली आणि लेव्हर्सचा वापर असलेलं कंपाऊंड प्रकाराचं आधुनिक धनुष्य, ज्याचा समावेश ऑलिंपिकमध्ये नाही, पण अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आहे.

तिरंदाजीचे दोन मुख्य प्रकार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तिरंदाजीचे दोन मुख्य प्रकार

बहुतांश मुलं बांबूच्या धन्युष्याचा वापर करून तिरंदाजीची सुरुवात करतात आणि मग रिकर्व्ह किंवा कंपाऊंड तिरंदाजीकडे वळतात.

आदितीच्या फिटनेसची पातळी आणि तिच्यातली क्षमता पाहता, तिनं कंपाऊंड तिरंदाजी करावी असा सल्ला प्रवीण सावंत यांनी दिला.

खेळात आदितीची होणारी प्रगती पाहता सरावासाठी स्वतःचं स्वतंत्र धनुष्य आणि बाण घेणं गरजेचं असल्याचं लक्षात आलं. तेव्हा गोपीचंद यांनी कर्ज काढलं. आदितीची उंची वाढल्यावर दुसरं धनुष्यही घ्यावं लागलं, तेव्हा खेळावर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी गोपीचंद यांनी नव्या घराचं स्वप्नही लांबणीवर टाकलं.

ते सांगतात, “बाण तुटायचे, त्याची किंमतही जास्त असायची. एकावेळी बारा बाणांचा सेट घ्यावा लागयचा. आदिती चांगली खेळतेय म्हटल्यावर आम्ही विचार नाही केला. पालक म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं. आमचं काही कमी झालं, तरी तिला खेळात कमी पडू द्यायची नाही कुठलीच गोष्ट.”

कोव्हिडची साथ आली आणि लॉकडाऊन लागलं, तेव्हाही घराच्या आवारातल्या एका चिंचोळ्या भागात टार्गेट बसवू आदिती सराव करत राहिली. प्रवीण सावंत तिला ऑनलाईन मार्गदर्शन करत राहिले.

आदितीची कामगिरी

या सगळ्या कष्टांचं तिनं लवकरच चीज केलं. तिचा खेळ सुधारत गेला. वेगवेगळ्या वयोगटातल्या स्पर्धा आणि राष्ट्रीय पातळीवर पदकांची कमाई केल्यावर तिनं 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदार्पण केलं आणि वर्षभरातच तिथे आपला ठसा उमटवला.

मग 2023 च्या जुलैत जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत आदितीनं महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली.

पाठोपाठ तिरंदाजीच्या जागतिक स्पर्धेत म्हणजे सीनियर पातळीवरही कमाल केली आणि वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदकं मिळवली.

ते सारं स्वप्नवत होतं, असं आदिती सांगते. “मी कधी विचारही केला नव्हता की एवढ्या लवकर वर्ल्ड चॅम्पियन होईन. पोडियमवर पदक घेण्यासाठी गेले, तेव्हा मला भारावून गेल्यासारखं वाटत होतं. मग राष्ट्रगीत वाजू लागलं.

“तो माझ्या आयुष्यातला सर्वांत अभिमानाचा क्षण होता. मी जेव्हापण आठवते तेव्हा मला.. माझं ऊर खूप भरून येतं.”

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदकासह आदिती

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदकासह आदिती

आदितीच्या त्या यशाची जगानं दखल घेतली, कारण आदिती तिरंदाजीच्या आधुनिक युगातली सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन ठरली. तसंच ती भारताचीही कुठल्याही खेळातली सर्वात तरूण जगज्जेतीही ठरली.

मग ऑक्टोबर महिन्यात चीनच्या हांगझूमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आदितीनं वैयक्तिक कांस्य मिळवलं; तसंच ज्योती सुरेखा वेन्नम आणि परमीत कौरच्या साथीनं भारताला सांघिक सुवर्ण मिळून देण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला.

आदिती स्वामी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अर्जुन पुरस्कार स्वीकारताना

फोटो स्रोत, @RASHTRAPATIBHVN

फोटो कॅप्शन, आदिती स्वामी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अर्जुन पुरस्कार स्वीकारताना

हे सगळं सुरू असताना, आदिती एकीकडे शिक्षणही घेते आहे. कॉलेजला जाणं शक्य होत नसल्यानं ऑनलाईन लेक्चर्स ऐकून तिचा अभ्यास सुरू असतो.

पण अभ्यासाऐवजी आता खेळावरच तिनं लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे. आदिती सांगते, “माझं स्वप्न आहे की, मी कितीही मोठी झाले तरी मला आर्चरीतून कधी बाहेर नाही पडायचं. मी कोच होईन किंवा मी मोठी झाले, म्हातारी झाले तरी माझ्या मुलांना आर्चरी शिकवेन पण मला आर्चरीशिवाय दुसरं काही करायचं नाहीये.”

कंपाऊंड प्रकाराच्या तिरंदाजीचा ऑलिंपिकमध्ये समावेश नाही. पण 2025 साली वर्ल्ड गेम्समध्ये या खेळात आदितीकडून भारताला पदकाची अपेक्षा नक्कीच राहील. ऑलिंपिकमध्येही कपाऊंड तिरंदाजीचा समावेश व्हावा आणि भारतासाठी तिथेही पदक जिंकावं असं स्वप्न आदिती पाहते.

बदलता दृष्टीकोन

2023 मध्येच आदितीसोबतच मूळचा नागपूरचा पण सध्या दृष्टी अकॅडमीत सराव करणाऱ्या ओजस देवतळेनंही कंपाऊंड तिरंदाजीत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. दोघांनाही 2024 साली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं.

एकाच अकॅडमीतील दोघांच्या यशामुळे तिरंदाजीकडे पाहायचा लोकांचा दृष्टीकोन बदलल्याचं आदिती सांगते.

“आधी असं असायचं की लोक म्हणायचे की एवढा महागडा खेळ कशाला, मुलींना खेळात कशाला टाकायचं. पण आता ते सगळे आमचं कौतुक करतात. स्वतःहून माझ्याकडे येतात आणि सांगतात की त्यांच्याही मुलांना खेळ शिकायला पाहिजे.”

आदिती

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, आदितीच्या यशात तिच्या आईवडिलांचाही मोठा वाटा आहे.

गोपीचंद आणि शैला यांनाही तेव्हा मुलीला हे असं काही का शिकवताय, असा प्रश्न लोकांनी विचारला होता.

“लोक बोलायचे, कशाला उगाच तीरकामठ्याचा खेळ, डोळ्यात बिळ्यात गेलं तर? मुलींना कशाला हे शिकवणं बरोबर आहे का? तुम्ही शिक्षक आहात तुमची मुलगी डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे तर इकडे खेळात कशाला?

“ती एकटी कशी बाहेर स्पर्धेला जाणार, तुम्हाला तिची काळजी आहे का नाही, असंही विचारायचे. पण आम्ही ठरवलं होतं, आपण लोकांचं या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं आणि आपल्या कामावर लागायचं. आता तेच लोक अभिनंदन करतात, कौतुक करतात की तुमचा निर्णय खूपच बरोबर होता.”

अधिकाधिक मुलींनी खेळात उतरायला हवं असं आदिती सांगते. “मी पालकांना हेच सांगू इच्छिते की मुलगी ही मुलांपेक्षा कमी नसते. मुलींनाही तेवढंच स्वातंत्र्य आणि तेवढेच करियरचे पर्याय द्या जेवढे मुलांना मिळतात. आणि त्या ज्या गोष्टी करत आहेत त्या गोष्टीसाठी तुमचा पूर्णपणे पाठिंबा ठेवा.”

खरं तर आदिती लहानाची मोठी झाली, त्या सातारा शहराला खेळाचा मोठा इतिहास आहे.

1952 मध्ये स्वतंत्र भारताचं ऑलिंपिकमधलं पहिलं वैयक्तिक पदक जिंकणारे पैलवान खाशाबा जाधव याच साताऱ्याच्या मातीतले. तर 2016 साली रिओ ऑलिंपिकमध्ये स्टीपलचेसची फायनल गाठत इतिहास रचणारी धावपटू ललिता बाबर याच साताऱ्यातल्या मोही गावातली.

पण असा समृद्ध इतिहास असूनही साताऱ्यात खेळाच्या उत्तम सुविधांची वानवा आहे. प्रवीण सावंत आणि आदिती दोघंही त्याविषयीची खंत बोलून दाखवतात.

गावा- गावातल्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या, त्यांना आर्थिक पाठबळ मिळालं, तर ते आणखी पुढे जाऊ शकतात असं त्यांना वाटतं.