वेश्या व्यवसायावर बंदी घालणारा देश तुम्हाला माहितेय का?

वेश्या व्यवसाय, स्पेन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी वेश्या व्यवसाय बेकायदेशीर असेल असं जाहीर केलं आहे. रविवारी (17 ऑक्टोबर) त्यांनी ही घोषणा केली.

'महिलांना गुलाम बनवणारी ही प्रथा' बंद करणार असल्याचं त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं. वेलेंसिया येथे सोशलिस्ट पक्षाच्या तीन दिवसीय काँग्रेसच्या अंतिम दिवशी ते संबोधित करत होते.

1995 पासून स्पेनमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर करण्यात आला होता. स्पेनमधला वैश्या व्यवसाय 4.2 अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज 2016 साली संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला होता.

जगातलं वेश्या व्यवसायाचं तिसरं मोठं केंद्र

स्पेनमध्ये प्रत्येक 3 पुरुषांपैकी एक पुरुष पैसे देऊन सेक्स करत असल्याचं 2009 च्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. तसंच थायलंड आणि पोर्टोनंतर वेश्या व्यवसायाचं तिसरं मोठं केंद्र स्पेन असल्याचं 2011 साली संयुक्त राष्ट्रांच्या एका संशोधनात सांगण्यात आलं होतं.

स्पेनमध्ये वेश्या व्यवसायासंबंधी कोणताही नियम नाही. सार्वजनिक ठिकाणी पैसे न देता सेक्स करत असल्यास त्यावरही कोणते निर्बंध नाहीत किंवा शिक्षा नाही. सेक्स वर्कर आणि ग्राहकांमध्ये दलाली करणं मात्र याठिकाणी बेकायदा आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज

फोटो स्रोत, Reuters

वेश्या व्यवसाय कायदेशीर करण्यात आल्यापासून स्पेनमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वेगाने वाढला.देशात सध्या जवळपास 3 लाख महिला सेक्स वर्कर असल्याचा अंदाजही एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.

स्पेनचे पंतप्रधान काय म्हणाले?

पंतप्रधान सांचेज यांच्या पक्षाने 2019 मध्ये निवडणुकांपूर्वी जाहीरनाम्यात वेश्या व्यवसाय बंद करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या मुद्याला महिला मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने पाहिलं गेलं होतं.

जाहीरनाम्यानुसार, 'गरीब परिस्थितीत जगत असताना वेश्या व्यवसाय हा कोणत्याही महिलेसाठी सर्वाधिक क्रूर पैलू असतो आणि हे महिलांविरुद्ध हिंसेचे एक साधन आहे.'

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज वेलेंसिया येथे पक्षाच्या काँग्रेसमध्ये भाषण देत होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज वेलेंसिया येथे पक्षाच्या काँग्रेसमध्ये भाषण देत होते.

परंतु निवडणूक होऊन दोन वर्षं उलटले तरी सरकारने याबाबत कोणताही कायदा सादर केला नाही.

स्पेनमध्ये वेश्या व्यवसायाच्या समर्थकांचं म्हणणं आहे की या कामामुळे महिलांचा मोठा फायदा झाला आणि त्यांचं आयुष्य सुरक्षित बनलं आहे. परंतु वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी हा स्पेनमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.

2017 मध्ये स्पॅनिश पोलिसांनी तस्करी विरोधात छापेमारी केली ज्यात 13 हजार महिलांची ओळख पटली. यापैकी किमान 80 टक्के महिलांनी सांगितलं की दलालांकडून त्यांचं शोषण होत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)