'उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला' - जे. पी. नड्डा - #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) महाराष्ट्रात आम्हीच जिंकलो होतो, पण सत्तेसाठी धोका झाला – नड्डा

महाराष्ट्रात आम्हीच जिंकलो होतो. पण सत्तेसाठी आमच्यासोबत धोका झाला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नड्डांनी महाराष्ट्रातील नवीन राजकीय समीकरणांबाबत नाराजी व्यक्त केली. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

नड्डा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असाच महाराष्ट्राचा कौल होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला.”

काँग्रेसविरोधात तुम्ही सहज निवडणूक जिंकता, मात्र प्रादेशिक पक्षांसमोर तुम्हाला आव्हानात्मक जातं, यासंदर्भात प्रश्न विचारला असता नड्डांनी महाराष्ट्रातील नव्या समीकरणांबाबत नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र भाजपनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीचा व्हीडिओ शेअर केलाय.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक युतीत लढले असतानाही नंतर मात्र शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि सर्वाधिक जागा असलेल्या भाजपला या तिन्ही पक्षांनी सत्तेबाहेर ठेवलं.

2) अर्थव्यवस्थेची स्थिती आधीपेक्षा वाईट – RBI गव्हर्नर

कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अपेक्षेपेक्षा विपरित परिणाम झाला असून, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं मत रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

दर दोन महिन्यांनी होणाऱ्या पतधोरणाच्या मुद्द्यावरील RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर शक्तिकांत दास बोलत होते.

“भारतात आजच्या घडीला केवळ कृषी क्षेत्रातच तेजी आहे. यावेळी मान्सून चांगला होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रात तेजी बघायला मिळेल. याशिवाय इतर क्षेत्रांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जे काही आकडे येत आहेत, ते सर्व निराशाजनक आहेत,” असं शक्तिकांत दास म्हणाले.

दुसरीकडे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंत्र्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे, त्यांची चर्चा सुरु आहे, कोठे उत्पन्न वाढवायचे, कोठे कपात करायची याची चर्चा होत आहे. कर लागू करण्यावर निर्णय प्रक्रिया सुरु आहे, मात्र अधिक कर लागू करण्याचा निर्णय लगेच होणार नाही, त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक आहे, अशी माहिती महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

3) ‘केरळमधील हत्ति‍णीनं तोंडातील जखमेमुळं दोन आठवडे काही खाल्लं नव्हतं’

केरळमध्ये स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यानं मृत्यू झालेल्या गरोदर हत्तिणीचं पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत. त्यानुसार, हत्ति‍णीच्या तोंडात जखमा झाल्या होत्या. पर्यायानं हत्ति‍णी दोन आठवडे काहीच खाऊ शकली नाही. त्यामुळं एका नदीत पडून हत्ति‍णी मृत्यूमुखी पडली. डेक्कन क्रोनिकलनं ही बातमी दिलीय.

या हत्ति‍णीच्या शरीरावर कुठल्याच गोळी किंवा जाळ्याचे व्रण नाहीत. सायलेंट व्हॅली परिसरात हत्तिणीनं स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्लं होतं, त्याचा स्फोट होऊन तोंडात जखमा झाल्या असाव्यात, असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय.

केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील मन्नारकडमध्ये स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यानं एका गरोदर हत्तिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरातल्या प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीट करून सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तीन संशयितांवर चौकशीचा रोख आहे.

4) अयशस्वी झाल्याची राहुल गांधींची टीका

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेलं देशव्यापी लॉकडाऊन अयशस्वी झाल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून काही आलेख शेअर केले आहेत, ज्यामध्ये स्पेन, जर्मनी, इटली आणि यूके येथील आकडेवारीची भारताच्या आकडेवारीशी तुलना केली गेलीय.

ज्यावेळी कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, त्यावेळी भारतात लॉकडाऊन शिथिल केलं जात असल्यानं राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केलीय.

5) मुंबईतल्या 97 वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना शहरात घडली आहे.

मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयातून कोरोना बाधित 97 वर्षाच्या आमीना सुनेसरा यांना सात दिवसांच्या उपचारानंतर आज सुखरुप घरी सोडण्यात आले.

वय जास्त असल्यामुळे आणि कमी ऐकू येत असल्याने उपचार करण्यास काही अडचणी आल्या. पण आमीना यांच्या जिद्दीपुढे सर्व अडचणींनी लोटांगण घातले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

आमीना यांच्या कुटुंबातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आठ दिवसांपूर्वी आमीन सुनेसरा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लक्षण ही दिसत होती. त्यांना मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि फक्त सात दिवसातच कोरोनावर मात करत आमीना सुखरुप घरी परतल्या.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)