You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात म्हातारपण घालवणं किती कठीण? आधीपासून कशा प्रकारची तयारी करायला हवी?
- Author, डिंकल पोपली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परंतु, वृद्धावस्थेसोबतच आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक अडचणीही निर्माण होत आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर वृद्ध लोकांसाठी योग्य तयारी करणं किती आवश्यक आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे.
2050 पर्यंत भारतात सुमारे 35 कोटी लोक वृद्ध असतील. म्हणजेच प्रत्येक 5 जणांपैकी एक जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल. वयानुसार लोकसंख्येमध्ये होणारा हा बदल अनेक धोरणात्मक आव्हानं निर्माण करू शकतो.
ही आकडेवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची (एनएचआरसी) आहे.
सांकला फाऊंडेशनने 1 ऑगस्टला 'एजिंग इन इंडिया' नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नीति आयोग आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सहभागानं तयार करण्यात आला आहे.
या अहवालात भारतातील वाढत्या वृद्ध लोकसंख्येबद्दल सांगण्यात आलं आहे.
या अहवालानुसार, भारतातील अनेक वृद्ध लोकांना आरोग्यविषयक, आर्थिक आणि सामाजिक अशा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.
पारंपारिकपणे भारतात कुटुंबं आपल्या वडीलधाऱ्यांची काळजी घेत आले आहेत, परंतु आता काळ वेगानं बदलत आहे.
लहान कुटुंबांचा टेंड्र वाढत आहे. तरीसुद्धा बरेच वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या अजूनही आपल्या कुटुंबीयांवरच अवलंबून आहेत.
वयोमानानुसार त्यांना आरोग्याच्या समस्या आणि सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होतो.
आरोग्याशी संबंधित अडचणी
'एजिंग इन इंडिया' अहवालानुसार, 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांपैकी 35.6 टक्के लोक हृदयाच्या आजारांनी, 32 टक्के लोक उच्च रक्तदाबानं आणि 13.2 टक्के लोक मधुमेहानं त्रस्त आहेत.
मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं झालं, तर या वयोगटातील 30 टक्के लोक तणावाच्या लक्षणांनी आणि 8 टक्के लोक गंभीर नैराश्यानं त्रस्त आहेत.
त्याचवेळी पंजाबमध्ये 28 टक्के आणि चंदीगडमध्ये 21.5 टक्के वृद्ध लोक लठ्ठपणाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत, जे देशात सर्वाधिक प्रमाण आहे.
गोवा आणि केरळमध्ये हृदयविकाराचं प्रमाण सर्वाधिक असून ते अनुक्रमे 60 टक्के आणि 57 टक्के आहे. तर मधुमेहामुळे केरळमध्ये 35 टक्के, पुदुच्चेरीत 28 टक्के आणि दिल्लीमध्ये 26 टक्के वृद्ध प्रभावित आहेत.
ओडिशात 37.1 टक्के आणि उत्तर प्रदेशात 36.6 टक्के वृद्धांचं वजन कमी असल्याचं नोंदवलं गेलं आहे. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये दादरा आणि नगर हवेली येथे हे प्रमाण 40.1 टक्के असून ते सर्वाधिक आहे.
हाडं आणि सांध्यांच्या समस्या ही आणखी एक चिंता असून 19 टक्के वृद्ध या त्रासानं ग्रस्त आहेत. या समस्येत तेलंगणामध्ये प्रमाण सर्वाधिक म्हणजे 33 टक्के आहे, तर संधिवाताचे सर्वाधिक म्हणजे 22 टक्के प्रमाण जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळून येतं.
अहवालात देण्यात आलेल्या आरोग्य विम्याच्या आकडेवारीमुळे या समस्या आणखी गंभीर बनतात. त्यानुसार, ग्रामीण भागात फक्त 18.6 टक्के आणि शहरी भागात फक्त 17.3 टक्के वृद्धांकडेच आरोग्य विमा आहे.
ज्येष्ठांना दिसण्यात किंवा ऐकण्यात अडचण असल्यास, त्यांच्याकडे सहाय्यक साधनांची (जसं की श्रवणयंत्र, व्हीलचेअर इ.) मोठी कमतरता आहे. अहवालानुसार, 24 टक्के वृद्धांना दृष्टीदोष, तर 92 टक्के वृद्धांना श्रवणदोष आहे.
आर्थिक आधाराची गरज आणि इतर अडचणी
70 टक्के वृद्ध आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी पेन्शन किंवा कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून असतात.
यापैकी बहुतेक जण कुटुंबीयांवरच अवलंबून असतात, कारण 78 टक्के वृद्धांकडे पेन्शनची सुविधा नाही.
हेच एक मोठं कारण आहे की, ग्रामीण भागात 40 टक्के आणि शहरी भागात 26 टक्के लोक 60 वर्षांनंतरही काम करत राहतात.
शहरी भागात प्रत्येक 4 पैकी एक वृद्ध कर्जबाजारी आहे, कारण त्यांना उपचारासाठी पैसे उधार घ्यावे लागतात.
सामाजिक दुर्लक्ष किंवा भेदभाव
सामाजिक भेदभाव वाढत आहे. 18.7 टक्के वृद्ध महिला आणि 5.1 टक्के वृद्ध पुरुष आता एकटं राहतात.
संयुक्त कुटुंब पद्धती संपल्यामुळे एकटेपणा आणखी वाढला आहे, विशेषत: वृद्ध महिलांमध्ये.
वयानुसार भेदभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. विशेषत: दिल्लीत, जिथे 12.9 टक्के वृद्धांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा भेदभाव सहन करावा लागतो.
अशा भेदभावाच्या बाबतीत केरळ 16.5 टक्के वृद्ध लोकसंख्येसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तमिळनाडू (13.6 टक्के), हिमाचल प्रदेश (13.1 टक्के) आणि पंजाब (12.6 टक्के) आहेत. बिहार (7.7 टक्के), उत्तर प्रदेश (8.1 टक्के) आणि आसाम (8.2 टक्के) या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे.
वृद्ध एकटे राहण्याचा ट्रेंडही वाढत आहे. संयुक्त कुटुंबं कमी होत आहेत, 2.5 टक्के वृद्ध पुरुष आणि 8.6 टक्के वृद्ध महिला एकट्या राहतात.
यासोबतच अनेक वृद्ध निरक्षर आहेत. 93.7 टक्के वृद्ध डिजिटल कामकाज करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याचा धोका जास्त असतो.
वृद्धांची संख्या का वाढत आहे?
संपूर्ण जगभरात जन्मदर सातत्याने कमी होताना दिसत आहे.
परंतु, वैद्यकीय शास्त्रात गेल्या काही दशकांत झालेल्या प्रगतीमुळे माणसाच्या आयुर्मानात वाढ झाली आहे. त्यामुळे वृद्धत्वाच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.
म्हणूनच जगभरात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जपान, इटली आणि जर्मनीसारख्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांत वृद्धांची संख्या सर्वात जास्त आहे. तिथे एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
विकसनशील देश देखील आता लोकसंख्येत होत असलेल्या या मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहेत.
परिणामी, 2050 पर्यंत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या वृद्ध असेल.
तज्ज्ञ काय सुचवतात?
वयाचा हा टप्पा टाळता येणार नाही, परंतु त्यासोबत येणाऱ्या अडचणी मात्र नक्की टाळता येऊ शकतात.
मेहरचंद महाजन डीएव्ही कॉलेज फॉर वुमेन, चंदीगड येथील समाजशास्त्र विभागाच्या वरिष्ठ सहायक प्राध्यापक डॉ. बिंदू डोगरा म्हणतात की, लहान कुटुंबांच्या वाढत्या ट्रेंडमुळे ही समस्या आणखी गंभीर झाली आहे.
त्या म्हणतात, "पूर्वी कुटुंबं मोठी असायची. घरातील वृद्धांसोबत बोलायला, त्यांची काळजी घ्यायला इतर कुटुंबीय असायचे. पण आता काळ बदलला आहे. आजकाल फक्त पुरुषच नाही, तर महिलाही नोकरीसाठी घराबाहेर असतात. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांमध्ये एकटेपणा आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता पूर्वीपेक्षा जास्त आहे."
1. आर्थिकदृष्ट्या तयार रहा - डॉ. बिंदू यांच्या मते, आयुष्याच्या या टप्प्यासाठीची सर्वोत्तम तयारी म्हणजे स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणं.
ते म्हणतात, "लोक आयुष्यभर त्यांच्या मुलांवर, घरावर किंवा कार खरेदीसारख्या सुविधांवर भरपूर रक्कम गुंतवतात. वृद्धापकाळात त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी त्यांनी कालांतरानं चांगल्या सर्वसमावेशक विमा आणि पेन्शन योजनेतही गुंतवणूक करणं फार महत्वाचं आहे."
त्यांनी सांगितलं, "जर एखादा वृद्ध व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्याला चांगल्या उपचारांसाठी किंवा चांगल्या आहारासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही."
2. आपल्या आहाराकडे लक्ष द्या - चांगल्या आहारामुळे आजारांपासून बचाव होतो आणि त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. चांगल्या आहारानं मानसिक आरोग्यही सुधारतं.
3. शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका - डॉ. बिंदू म्हणतात की, वय वाढल्यावर बरेच लोक शारीरिक हालचाली कमी करतात, ज्यामुळे त्यांना आजार होण्याचा धोका वाढतो.
"हलका व्यायाम आणि चालणं तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा."
4. आपले मित्र आणि सामाजिक नातं जपून ठेवा - "काम आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे माणूस आपल्या मित्रांपासून आणि सामाजिक नात्यांपासून दूर होतो."
"पण लक्षात ठेवा की, मुलं आपलं काम किंवा शिक्षणात व्यग्र होतील. त्यामुळे त्यांच्याकडे तुमच्यासाठी जास्त वेळ नसेल किंवा ते घरापासून दूर राहू शकतात. अशा वेळी आपलं स्वतःचं सामाजिक वर्तुळ असणं फार महत्त्वाचं असतं."
5. स्वतःला व्यग्र ठेवा - जेव्हा माणूस आपल्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर येतो, तेव्हा कधी-कधी त्याला असं वाटतं की, आता लोक त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि अनेक वेळा त्यांची मतंही विचारात घेतली जात नाहीत.
ही भावना आपल्याला खूप निराश करू शकते. म्हणून स्वतःला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एखादा छंद पुन्हा जोपासा.
व्यग्र राहिल्यामुळे केवळ मानसिक तणाव कमी होत नाही, तर माणूस सक्रिय राहतो आणि त्याच्या एकूण आयुष्याचा दर्जाही सुधारतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)