You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'चष्म्यातला गुप्त कॅमेरा वापरून माझं रेकॉर्डिंग करण्यात आलं,' तरुणीने सांगितली व्यथा
- Author, जॉर्जिया बोनिका
- Role, बीबीसी
स्मार्ट ग्लास म्हणजेच स्मार्ट चष्मे, ज्यांना तंत्रज्ञानाचं भविष्य मानलं जातं. या चष्म्यांमध्ये कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर, एआर फीचर्स आणि डिस्प्ले टेक्नोलॉजी असते. हे चष्मे नव्या पिढीत चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
मात्र यासोबतच अशीही चिंता व्यक्त केली जात आहे की, या उत्पादनांचा वापर महिलांचे चित्रीकरण करण्यासाठी, त्यांना अपमानित करण्यासाठी आणि त्यांचं शोषण करण्यासाठी केला जातोय. यातून महिलांच्या प्रायव्हसीचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.
उना नामक तरुणीचं म्हणणं आहे की, कोणीतरी तिच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय, कॅमेरे असलेल्या स्मार्ट चष्म्यांचा वापर करून तिचे चित्रीकरण केले. नंतर तो व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, जिथे तो जवळपास 10 लाख वेळा पाहिला गेला आणि त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या. त्यापैकी अनेक प्रतिक्रियांमध्ये अत्यंत अपमानास्पद, आक्षेपार्ह वक्तव्य होते.
उना म्हणते, "माझ्यासोबत काय घडत आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी अशाप्रकारची कोणतीही पोस्ट करण्याची परवानगी दिली नव्हती, ना लपूनछपून व्हीडिओ काढण्यास संमती दिली होती. या घटनेमुळे मी खूप घाबरले आहे. आता मला सार्वजनिक ठिकाणी जाण्याचीही भीती वाटते."
उना सांगते की गेल्यावर्षी जूनमध्ये ब्राइटन बीचवर चष्मा घातलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला होता.
त्या व्यक्तीने तिला तिचं नाव, ती कुठून आली आहे याबाबत विचारलं. त्याने तिला फोन नंबर देण्याबाबतही विचारणा केली.
पण उनाने नम्रपणे नकार दिला आणि तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं.
काही आठवड्यांनंतर तिला तिचा टिकटॉकवर व्हीडिओ मिळाला. त्या व्हीडिओत त्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाचं रेकॉर्डिंग होतं. सदर व्हीडिओ ज्याप्रकारे रेकॉर्ड करण्यात आला होता, त्यातून तेव्हा उनाला जाणवलं की त्या माणसाने त्याच्या स्मार्ट ग्लासद्वारे तिचं चित्रीकरण केलं आहे.
स्मार्ट ग्लास (चष्मा) मध्ये अत्याधुनिक सुविधा असतात. स्मार्ट चष्म्याच्या मदतीने नकाशे पाहता येतात, संगीत ऐकता येतं आणि व्हीडिओ रेकॉर्ड करता येतात.
उना सांगते की, त्या व्हीडिओवरील व्ह्यूज वाढताना पाहून तिला भीती वाटू लागली.
तिच्या मते, त्या व्हीडिओमध्ये ती ब्रिटनमधील ब्राइटनमध्ये राहते हेही दाखवण्यात आलं होतं. सदर व्हीडिओवरील प्रतिक्रिया अत्यंत अपमानास्पद होत्या.
"हे सर्व माझ्या नियंत्रणाबाहेर होतं आणि या विचाराने मी आणखी घाबरले होते," असं तिने सांगितलं.
उनाने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी लोकांचा व्हीडिओ काढणं बेकायदेशीर नाही, त्यामुळे या प्रकरणात ते काहीही करू शकत नाहीत.
अशा प्रकारच्या घटना माझ्या ओळखीच्या प्रत्येक महिलेसोबत घडतात. मात्र, अशा संभाषणांचं चित्रीकरण करून ते ऑनलाइन प्रसारित केलं जाऊ शकतं, ही कल्पनाच अत्यंत "भयानक आणि भीतीदायक" आहे, असं ती म्हणाली.
बीबीसीने उनाचा व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या अकाउंटच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
उनाचा व्हीडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने आपल्या टिकटॉक पेजवर अशा प्रकारचे शेकडो व्हीडिओ पोस्ट केले होते आणि अशा प्रकारचा काँटेंट तयार करणारा तो एकटाच नाही.
स्मार्ट चष्मा घातलेल्या एका व्यक्तीने लंडनमधील रहिवासी केट यांचाही असाच एक व्हीडिओ तयार केला होता.
केट जिममध्ये असताना एका माणसाने तिच्याकडे येऊन तिचा नंबर मागितला, पण केटने तिचा नंबर देण्यास नकार दिला.
दुसऱ्या दिवशी, त्या संभाषणाचा एक व्हीडिओ केट यांना पाठवण्यात आला आणि तो टिकटॉकवर अपलोड करण्यात आला.
व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट झाल्याच्या अवघ्या सहा तासांत तो सुमारे 50 हजार वेळा पाहिला गेला. या व्हीडिओमध्ये केटच्या दिसण्यावर आणि वागणुकीवर अनेक अपमानास्पद आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया होत्या.
केट म्हणते, "मला अक्षरशः उलटी येईल असं वाटत होतं. मी खूप चिंतेत होते. इंटरनेटवर लोक माझी नक्कल करत होते, माझी थट्टा करत होते, आणि हे जे काही घडलं त्यासाठी मी कधीच संमती दिली नव्हती, हे देखील लक्षात घेत नव्हते."
अशाप्रकारे व्हीडिओ तयार करणं कितपत योग्य आहे, असं म्हणत केटने त्या व्यक्तीवरील संताप व्यक्त केला. "हे सगळं स्वस्तातल्या पब्लिसिटीसाठी केलं जातं. मात्र, त्यावर येणाऱ्या वाईट प्रतिक्रिया तुमच्या आत्मविश्वासावर आणि आत्मसन्मानावर घाला घालतात."
केटने बीबीसीला हेही सांगितलं की तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाला आहे. "कधी-कधी जेव्हा वाटतं की मानसिक आरोग्य सुधारत आहे, तेव्हा पुन्हा अशाप्रकारच्या घटना घडतात."
सदर व्हीडिओबाबतची तक्रार केल्यानंतर टिकटॉकने उना आणि केट यांचे व्हीडिओ पोस्ट करणारे अकाउंट्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले.
महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्य रेबेका होगेन म्हणतात की विनापरवानगी किंवा संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय स्मार्ट चष्म्यांद्वारे लोकांचं चित्रीकरण करण्याची प्रवृत्ती वा ट्रेंड संतापजनक आणि अत्यंत त्रासदायक आहे.
"हे अगदी स्पष्ट आहे की अशा चष्म्यांचा वापर गुन्हेगारांकडून केला जाईल, किंवा महिलांना घाबरवण्यासाठी, धमकावण्यासाठी आणि त्यांना लज्जित करणाऱ्या गंभीर लैंगिक वर्तनासाठी केला जाईल. हे निश्चितच महिला आणि मुलींबद्दलची चिंताजनक वृत्ती दर्शवते", असं त्या म्हणाल्या.
स्मार्ट ग्लासच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गुगल ग्लास हे पहिलं स्मार्ट ग्लास मानलं जातं. 2014 साली ते ब्रिटनमध्ये विक्रीसाठी वेठण्यात आले होते आणि त्यांची किंमत सुमारे 1 हजार पाउंड होती.
मात्र गोपनीयतेबाबतच्या चिंतेमुळे सात महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत, 2015 साली त्यांची विक्री थांबवण्यात आली. अनेक बार आणि रेस्टॉरंट्सनीही आपल्या परिसरात स्मार्ट चष्म्यांच्या वापरावर बंदी घातली होती.
आता गूगल कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज स्मार्ट चष्म्यांसह पुन्हा एकदा बाजारात येण्याची योजना आखत आहे.
काळानुसार स्मार्ट चष्म्यांमध्ये बदल करण्यात आले असून ते आता सामान्य चष्म्यांसारखे दिसू लागले आहेत.
त्यांच्यातला फरकदेखील फार किरकोळ असल्यानं कोण स्मार्ट चष्मा वापरतंय आणि कोण साधा चष्मा, हे ओळखणं कठीण झालं आहे, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालक कंपनी मेटाने 2021 मध्ये स्मार्ट चष्म्यांची विक्री सुरू केली होती आणि गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत जवळपास 20 लाख जोड्या विकल्या गेल्या.
कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या चष्म्यांमध्ये एलईडी लाईट आहे. त्यामुळे, जेव्हा रेकॉर्डिंग सुरू असते, तेव्हा हा लाईट प्रकाशित होतो. त्यामुळे कोणी रेकॉर्डिंग करत असेल तर इतरांनाही ते लक्षात येतं. तसेच, हा लाईट लपवता येणार नाही, अशी रचना या चष्म्यात करण्यात आली आहे, असं कंपनी सांगते.
मात्र ऑनलाइन अनेक असे मार्ग उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने गुप्तपणे रेकॉर्डिंग करताना ही लाईट बंद किंवा लपवता येते. याची पुष्टी करण्यासाठी बीबीसीने यापैकी काही पद्धतींचा वापर करून रेकॉर्डिंगदरम्यान एलईडी लाईट लपवता येते का ते तपासून पाहिलं. त्यात ही लाईट यशस्वीपणे लपवली जाते, हे स्पष्ट झालं.
उना आणि केटचं चित्रीकरण होत असताना त्यांना चष्म्यांवर कोणतीही चमकणारी लाईट दिसली नव्हती.
हा मुद्दा मेटासमोर मांडण्यात आला असता, त्यांनी सांगितलं की "ते ग्राहकांचा अभिप्राय आणि संशोधनाच्या आधारे एआय ग्लासेस अधिक चांगले करण्यासाठीच्या सर्व गोष्टींचा तपास करतील."
'स्मार्ट ग्लासेस उपयुक्त असतात'
सार्वजनिक ठिकाणी लोकांचा व्हीडिओ काढणं बेकायदेशीर नाही, जोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक बाबींचा त्यात समावेश नसतो. मात्र, एखाद्याच्या वैयक्तिक बाबींचं त्याच्या संमतीशिवाय चित्रीकरण करणं छळ आणि पाठलागसारख्या प्रकरणांतील कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र ठरू शकतं.
केंट विद्यापीठातील सायबर सुरक्षा विभागाचे डॉ. जेसन नर्स म्हणतात, "एक मोठी अडचण म्हणजे कायदे तंत्रज्ञानाच्या तुलनेत मागे पडले आहेत. मला निश्चितपणे वाटतं की स्मार्ट चष्मे उपयुक्त आहेत. परंतु त्यांचा गैरवापर थांबवणंही तितकंच महत्वाचं आहे. गुन्हेगारांना हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की त्यांनी नुकसान केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल."
डॉ. जेसन यांच्या मते, दैनंदिन कामांसाठी मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी स्मार्ट चष्मे उपयुक्त ठरू शकतात. त्यांचा वापर पर्यटन आणि सार्वजनिक हितासाठी देखील केला जाऊ शकतो.
मात्र स्मार्ट तंत्रज्ञानामुळे कोण स्मार्ट चष्मा वापरत आहे हे ओळखणं अधिक कठीण होत चाललं आहे. "याचा अर्थ असा की लोक जितके सावध असले पाहिजेत तितके ते काळजी घेत नाहीत." असं ते म्हणाले.
मेटाने सांगितलं की इतर कोणत्याही रेकॉर्डिंग डिव्हाइस वापरणाऱ्यांनी, स्मार्ट चष्मा वापरणाऱ्यांनीही अशा कृती टाळल्या पाहिजेत ज्या "छळ करणाऱ्या आहेत किंवा गोपनीयतेच्या हक्कांचा भंग करतात किंवा संवेदनशील माहिती रेकॉर्ड करतात."
ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं, "महिलांवरील आणि मुलींवरील हिंसाचार ही एक राष्ट्रीय आणीबाणी आहे. स्मार्ट उपकरणांसह तंत्रज्ञानामुळे पीडितांना कसं नुकसान पोहोचू शकतं, याचा आम्ही विचार करत आहोत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला आळा घालणं हा आमच्या धोरणाचा भाग असेल. यामुळे पीडितांचं संरक्षण आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यात मदत होईल."
बीबीसीने प्रतिक्रिया मागितली असता, गूगलने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.