You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्ही इंटरनेटवर पोस्ट केलेले फोटो, व्हीडिओ डिलीट केल्यानंतरही तिथंच राहतात का?
- Author, तनिषा चौहान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
समुद्रकिनाऱ्यावर किंवा बागेत फेरफटका मारत असताना वाळूवर किंवा मातीत तुमच्या पावलांच्या खुणा उमटत असतात. त्या तुम्ही कधी पाहिल्या आहेत का? कधीकधी तुम्ही घरात मातीने माखलेल्या बुटांनी आल्यानंतर घरात बुटांचे ठसे उमटले असतील. हे पावलांचे ठसे तर पुसले जातात.
मात्र, तुम्हाला हे माहित आहे का, की जेव्हा तुम्ही ऑनलाइन म्हणजे इंटरनेटवर कोणतीही गोष्ट शेअर करता, तेव्हा त्यातून एकप्रकारच्या डिजिटल पाऊलखुणा कशा तयार होतात?
या डिजिटल पाऊलखुणा किंवा ठसे काय असतात? त्या कशा तयार होतात आणि त्यांना इंटरनेटवरून कायमचं काढून टाकता येतं का? या लेखात याबद्दल जाणून घेऊया.
डिजिटल फूटप्रिंट काय असतात?
जेव्हा तुम्हा कॉम्प्युटरचा किंवा एखाद्या डिजिटल उपकरणाचा वापर करता, तेव्हा एक डिजिटल फूटप्रिंट किंवा डिजिटल ठसा तयार होत असतो, हे तुम्हाला माहित आहे का?
बीबीसी बाइटसाईझनुसार, जेव्हा तुम्ही इंटरनेटवर कोणतीही कृती करता, तेव्हा तिथे त्याची एक हिस्ट्री तयार होते किंवा त्यांचा एक माग तयार होतो. म्हणजेच त्या कृतीची एक नोंद होते, त्यालाच 'डिजिटल फूटप्रिंट' किंवा 'डिजिटल ठसा' असं म्हणतात.
जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाण्यासाठी त्याच्या यूआरएल (युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर) वर क्लिक करता, व्हीडिओ पाहता, ऑनलाइन गेम खेळता किंवा एखादं ॲप ओपन करता, तेव्हा एक डिजिटल ठसा तयार होतो.
वाळूवर किंवा जमिनीवर उमटलेले आपल्या पावलांचे ठसे कालांतरानं हळूहळू पुसले जाऊ शकतात. मात्र एकदा का डिजिटल ठसे तयार झाले की, ते आपोआप नष्ट होत नाहीत. तसंच कधीकधी ते दिसत नसले तरीदेखील तिथे असतात.
प्रत्येक जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटवर जातो, ॲप डाउनलोड करतो किंवा वेब ब्राउझरवर काही माहिती शोधतो, तेव्हा आपल्या वेब हिस्ट्रीमध्ये एक डिजिटल फूटप्रिंट किंवा डिजिटल ठसा जोडला जात असतो. म्हणजे आपण केलेल्या कृतीची नोंद ठेवली जात असते.
याचे काही फायदेदेखील आहेत. यामुळे तुम्ही एखादा व्हीडिओ अर्धवट पाहिला असेल तर तो व्हीडिओ पुन्हा तिथून पाहतो येतो. हिस्ट्रीमध्ये जाऊन वेबवरील एखादा लेख शोधतो येतो आणि ऑनलाइन शॉपिंगचं पेज किंवा ऑनलाइन गेम जिथे अर्धवट सोडला असेल, तिथून पुन्हा सुरू करता येतो.
याव्यतिरिक्त, ब्राउझरमध्ये जाऊन, फेव्हरेट किंवा बुकमार्क्समध्ये जाऊन तुम्ही वारंवार पाहिलेल्या वेबसाईटवर लगेच जाऊ शकता.
कुकीजचा धोका आणि त्यामुळे तयार होणारे डिजिटल फूटप्रिंट
तुम्हाला जर कुकीज आवडत नसतील, तरीदेखील तुम्ही त्या टाळू शकत नाही. मात्र डिजिटल विश्वात तुम्ही त्यांच्याशिवाय जगूदेखील शकत नाही. अर्थात, या कुकीज वेगळ्या प्रकारच्या असतात.
इंटरनेटवर जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाता, तेव्हा ती वेबसाईट तुम्हाला कुकीजबद्दल विचारणा करते. काही वेबसाईट तुम्हाला 'ऑल कुकीज', 'रिक्वायर्ड कुकीज' किंवा 'नॉट ॲट ऑल' असे वेगवेगळे पर्याय देतात.
यातील अनेक कुकीज हानिकारक नसतात. ते तुमच्याबद्दलची सर्वसाधारण माहिती साठवून ठेवतात, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दाखवता येतात किंवा तुम्हाला ऑनलाइन खरेदी करता येते.
ऑनलाइन शॉपिंग किंवा गेमिंगसाठी आपण आपलं एक अकाउंट किंवा प्रोफाईल तयार करतो. याचा अर्थ, त्यात आपण आपलं नाव, ठिकाण, जन्मतारीख, बँक खात्याचे तपशील किंवा यूपीआय आयडी यासारखे तपशील देतो.
या सर्व तपशीलांमधूनच तुमचा 'डिजिटल ठसा' तयार होतो. फक्त कुकीज नाही, तर तुम्ही जी माहिती देता, ऑनलाइन संदेश पाठवता, मित्रांच्या फोटोवर कॉमेंट करता इत्यादी, सर्व गोष्टींमधून तुमच्या 'डिजिटल पाऊलखुणा' उमटतात.
डिजिटल ठसा काढून टाकता येतो का?
आपण आपला ऑनलाइन कृतींचा डिजिटल ठसा किंवा त्याच्या डिजिटल पाऊलखुणा काढून टाकू शकतो का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का.
डॉ. पवन दुग्गल, सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत. ते म्हणतात, "तुम्ही ऑनलाइन जे करता किंवा पोस्ट टाकता, ते पूर्णपणे काढून टाकणं अशक्य आहे. त्यामुळेच तुम्ही इंटरनेटवर जे करता त्याबाबत सावध असलं पाहिजे आणि पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे."
लोकांना इंटरनेट हा एक खेळ आहे, असं वाटतं. मात्र ते खूपच गांभीर्यानं घ्यायचं माध्यम आहे.
या मुद्द्याबद्दल डॉ. दुग्गल म्हणतात, "तुम्ही जरी तुमच्या कॉम्प्युटरमधून कंटेंट डीलीट केलं तरीदेखील ते इंटरनेटवर दीर्घकाळासाठी तसंच राहतं. नेमका कोणता डेटा साठवण्यात आला आणि कोणता डीलीट करण्यात आला आहे, हे समजणं खूपच कठीण असतं."
"तुमचा हा डेटा सर्व्हिस प्रोव्हायर, कंपन्या आणि सरकारांना जवळपास कायमचाच उपलब्ध असतो."
तुम्ही ज्या वेबसाईट किंवा ॲपला डेटा दिला आहे, तो जर 'थर्ड पार्टी'ला मिळाला, तर तो डेटा काढून टाकणं निव्वळ अशक्य आहे.
संशोधक आणि तंत्रज्ञ रोहिणी लक्षणे म्हणतात, "तुमचा काही डेटा हटवला जाऊ शकतो. मात्र सर्व डेटा हटवणं किंवा काढून टाकणं अशक्य आहे. जरी तुम्ही तुमची पोस्ट डीलीट केली किंवा अकाउंट डीलीट केलं, तरी त्या माहितीचा घेतलेला कोणताही बॅकअप, लॉग, आर्काइव्ह किंवा स्क्रीनशॉट डीलीट केले जाऊ शकत नाही."
सार्वजनिक डेटाबेसवरून तुमची माहिती किंवा डेटा हटवण्यासाठी तुम्हाला डेटा ब्रोकर्स किंवा वेबसाईट्स मदत घ्यावी लागू शकते.
रोहिणी लक्षणे म्हणतात की डेटा काढून टाकण्याची सेवा घेण्यासाठी तुम्ही 'डीलीट-मी' सारख्या वेबसाईटचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला विशिष्ट शुल्क भरावं लागतं.
याव्यतिरिक्त, काही कंपन्यादेखील आहेत, ज्या डेटा मॅनेजमेंट सर्व्हिस पुरवतात. या कंपन्या कुठेही असलेला तुमचा डेटा हटवण्यास किंवा काढून टाकण्यास तुमची मदत करू शकतात.
"आपले डिजिटल फूटप्रिंट किती काळ राहतात?", या प्रश्नाला उत्तर देताना रोहिणी लक्षणे म्हणतात की बहुतांश प्लॅटफॉर्मवर डेटा काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी ठेवला जातो.मात्र काही ठिकाणी तो कित्येक वर्षे राहतो.
थर्ट पार्टी वेबसाईट, आर्काइव्ह किंवा सिस्टम बॅकअपमध्ये तुमचा डेटा प्रदीर्घ काळ साठवला जाऊ शकतो.
तिथे कोणत्या प्रकारचा डेटा असतो?
विराग गुप्ता, सायबर तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत.
ते म्हणतात, "डिजिटल विश्वात प्रवेश करणं सोप आहे. मात्र त्यातून बाहेर पडणं कठीण आहे."
विराग गुप्ता म्हणतात की आपण कोणता डेटा डीलीट करू शकतो आणि कोणता डेटा डीलीट करू शकत नाही, याची माहिती असणं महत्त्वाचं आहे.
आपण सोशल मीडियावर अकाउंट सुरू करतो आणि त्यात आपला स्वत:चा डेटा टाकतो.
विराग गुप्ता म्हणतात, "सोशल मीडियावर असणारा आपला कोणताही डेटा किंवा कंटेंट पूर्णपणे काढून टाकणं, अकाउंट डीलीट करणं इत्यादी बाबी आपल्या हातात आहेत."
"मात्र जेव्हा आपण तोच डेटा इतरांसोबत शेअर करतो, तेव्हा तो डीलीट करता येत नाही. उदाहरणार्थ आपण मित्रांबरोबर शेअर केलेले फोटो काढता येत नाहीत."
"त्याचबरोबर, तुम्ही ॲप किंवा वेबसाईटला दिलेला डेटा तुम्ही डीलीट करू शकता. मात्र त्यातील काही डेटा कंपनीकडे राहतो आणि ते त्याचा वापर करू शकतात."
विराग गुप्ता पुढे म्हणतात, "तुम्हाला जरी हा डेटा संवेदनशील वाटत नसेल किंवा त्यातून कोणताही धोका नसल्याचं वाटत असलं, तरीदेखील तुमचा तो डेटा कंपनीकडे असतोच."
विराग गुप्ता म्हणाले, "या गोष्टीचा एक पैलू मृत्यूनंतर गोळा केलेल्या डेटाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, काहीजण त्यांच्या 'डिजिटल वारशा'बाबत मृत्यूपत्र तयार करतात. यात त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरून त्यांचा डेटा काढून टाकण्यास सांगण्यात आलेलं असतं."
विराग गुप्ता म्हणतात की हा डेटा थर्ड पार्टीकडेदेखील असू शकतो, त्यामुळे तो काढून टाकणं खूपच कठीण होतं. अशाप्रकारचं मृत्यूपत्र असूनदेखील कंपन्या तो डेटा काढून टाकण्यास तयार न होण्याची शक्यता असते. अशावेळेस तुम्ही उच्च न्यायालय किंवा संबंधित यंत्रणेकडे दाद मागू शकता.
विराग गुप्ता म्हणतात की तिसरं कारण म्हणजे 'विसरलं जाण्याचा अधिकार'. एखाद्या व्यक्तीला सर्व प्लॅटफॉर्मवर असलेला त्याचा डेटा पूर्णपणे काढून टाकायची इच्छा असू शकते.
विराग गुप्ता यासाठी एक उदाहरण देतात. समजा एखादी व्यक्ती बलात्कार किंवा हत्येच्या प्रकरणातील आरोपी असेल, तर त्या व्यक्तीविषयी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिण्यात आलेले असू शकतात. त्याच्याविषयी टीव्ही किंवा डिजिटल विश्वात व्हीडिओ असू शकतात, लिखाण केलेलं असू शकतं. अनेक वर्षांनी त्या आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता होऊ शकते.
"ती व्यक्ती 'सन्मानानं जगण्याच्या अधिकारा'चा दावा करून त्याच्या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकाशित माहिती डीलीट करण्याची विनंती करू शकते. जरी न्यायालयानं अशाप्रकारचा आदेश दिला, तरीदेखील त्या व्यक्तीशी संबंधित सर्व डेटा हटवणं शक्य होणार नाही. तो डेटा कुठेतरी, कोणत्या तरी स्वरुपात उपलब्ध राहिलच."
कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे?
- अँटी-व्हायरसची डेटा सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका असते.
- व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून तुम्ही तुमचं लोकेशन लपवू शकता.
- तुम्ही वापर नसलेले अकाउंट डीलीट करा.
- तुम्हाला नको असलेले सबस्क्रिप्शन, तुमची वैयक्तिक माहिती, पेमेंट इत्यादी तपशील डीलीट करत रहा.
- तुमचे खासगी फोटो, व्हीडिओ आणि कॉमेंट हे कोणी पाहावेत यासाठी तुम्ही बदल करू शकता.
- तुमचे सोशल मीडिया अकाउंट 'लॉक्ड' ठेवा, जेणेकरून तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे, असेच लोक तुमची ऑनलाइन ॲक्टिव्हिटी पाहू शकतील.
- तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती वेगवेगळी ठेवा. जेणेकरून तुम्हाला जेवढी वैयक्तिक माहिती दाखवायची असेल, तितकी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध होईल.
- प्रायव्हेट सर्च इंजिन, व्हीपीएन आणि ट्रॅकर्स ब्लॉक करणारे ब्राउझर एक्सटेंशन वापरून तुमच्या प्रायव्हसीची खातरजमा करा.
- तुमची ब्राउझिंग हिस्ट्री, कुकीज आणि कॅशे फाईल्स वेळोवेळी काढून टाकत जा.
- वेगवेगळ्या ॲपला तुम्ही दिलेल्या परवानग्यांचा (लोकेशन, मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट आणि फोटो यासाठीच्या) वेळोवेळी आढावा घ्या.
- प्रत्येक वेबसाईटसाठी वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे पासवर्ड वापरा.
- ॲपसाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.
- सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.
- लिंकवर सावधपणे क्लिक करा.
- एनक्रिप्टेड चॅट ॲपचा वापर करा.
- तुमचा डेटा लीक झाला आहे किंवा चोरीला गेला आहे असं वाटत असेल, तेव्हा के1930 या वेबसाईटवर तुम्ही सायबर गुन्ह्याबाबत तक्रार करू शकता. जर शंका येत असेल, तर तक्रार दाखल करा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)