'AI वर पूर्णपणे विसंबून राहू नका, त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका'; असं सुंदर पिचाई का म्हणाले?

    • Author, फैजल इस्लाम
    • Role, इकॉनॉमिक्स एडिटर
    • Author, रेचल क्लन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'AI टूल्स सांगतील त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये', असं गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

पिचाई यांनी बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "एआय मॉडेल्सकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे लोकांनी AI बरोबर इतर टुल्सचाही वापर करावा."

ते म्हणाले, "AI तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून राहाण्याऐवजी माहितीचा समृद्ध साठा असण्याची आवश्यकता आहे."

"त्यामुळेच लोक गुगल सर्चचाही वापर करतात. आमचे प्रॉडक्ट्स अचूक माहिती देण्यासाठी अधिक स्थिर-सक्षम आहेत."

"AI टुल्सचा वापर करुन एखादं लेखन अधिक सर्जनशीलरीत्या करता येऊ शकतं. पण हे टुल्स कोणत्या बाबतीत जास्त मदत करू शकतात हे जाणून घेतलं पाहिजे. उगंच ते सांगतील त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये", असं पिचाई यांनी सांगितलं.

ते बीबीसीला म्हणाले, "शक्य तितकी जास्त अचूक माहिती देण्याचा आम्ही अभिमान बाळगतो. परंतु सध्याच्या अत्याधुनिक AI तंत्रज्ञानात चुका होण्याची शक्यता आहे."

नवा टप्पा

तंत्रज्ञान जगतातले लोक गुगलच्या कन्झुमर एआय मॉडेलचं जेमिनी 3.0 ची वाट पाहात होते. आता त्यानं चॅटजिपीटीमुळे गेलेला बाजारातला हिस्सा परत मिळवण्यासाठी सुरुवात केली आहे.

"यावर्षी मे महिन्यापासून गुगलने सर्चमध्ये एआय मोड देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये जेमिनी चॅटबॉटचा समावेश केला असून गुगल वापरणाऱ्यांना आपण एखाद्या तज्ज्ञाशी बोलत आहोत, असा अनुभव देण्याचा त्याचा उद्देश आहे."

पिचाई म्हणाले, "जेमिनी आणि सर्च यांचं असं एकत्रीकरण AI प्लॅटफॉर्मचा नवा टप्पा आहे."

ऑनलाइन सर्चच्या क्षेत्रात गुगला आव्हान ठरलेल्या ChatGPT सारख्या AI सेवांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी गुगलनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे.

बीबीसीने यावर्षी एक संशोधन प्रसिद्ध केलं होतं. त्यात AI चॅटबॉट्स बातम्यांचा चुकीचा सारांश करुन देतात असं निरीक्षण नोंदवलं होतं. पिचाई यांच्या या वक्तव्यामुळे या निरीक्षणाला त्यांचं अनुमोदनच मिळालं आहे, असं म्हणता येईल.

ओपन एआयचं चॅटजिपीटी, मायक्रोसॉफ्टचं को-पायलट, गुगलचं जेमिनी, परप्लेक्सिटी AI यांना बीबीसीच्या संकेतस्थळावरील माहिती दिली होती आणि त्याबद्दल प्रश्न विचारले होते. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरांत लक्षणीय चुका होत्या असं निरीक्षणात दिसून आलं.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पिचाई म्हणाले, "ज्यावेगानं तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याच्यातून होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मेळ घातला जात नाहीये."

"अल्फाबेटचा (गुगलची पॅरेंट कंपनी) विचार करता आम्ही एकाचवेळी धाडसी गोष्टी करणं आणि जबाबदारही राहाणं अशा दोन्ही गोष्टींचा मेळ घालतोय", असं पिचाई म्हणाले.

"त्यामुळे या क्षणी आम्ही अत्यंत वेगानं पुढे जात आहोत आणि माझ्या मते आमच्या ग्राहकांचीही तिच मागणी आहे, असं ते म्हणाले.

"एआयमधील गुंतवणुकीच्या तुलनेत एआय सिक्युरिटीमधील गुंतवणूक वाढवली जाईल", असंही पिचाई म्हणाले

याबद्दल बोलताना ते पुढे सांगतात, "उदाहरणार्थ, आम्ही असं तंत्रज्ञान ओपन-सोर्स करत आहोत ज्यामुळे तुम्हाला एखादी प्रतिमा AI ने तयार केली आहे का हे ओळखता येईल."

इलॉन मस्क यांनी ओपनएआयच्या प्रमुखांना गुगलचं डीपमाईंड एआयमध्ये एकाधिकारशाही तयार करू शकते का असं विचारलं होतं. त्यावर पिचाई यांनी " AIसारखं शक्तिशाली तंत्रज्ञान एकाच कंपनीच्या मालकीचं असू नये", असं उत्तर दिलं.

आज AI जगतात अनेक कंपन्या आहेत याचा उल्लेख पिचाई यांनी केला.

ते म्हणाले, "फक्त एकच कंपनी AI तंत्रज्ञान विकसित करत असती आणि सर्वांना तेच वापरावं लागत असतं मलाही त्याची काळजीच वाटली असती. पण सध्या तरी अशा स्थितीपासून आपण फार दूर आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)