You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'शिंदे आले काय दाभाडे आले काय, तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे?' एखाद्याने समकालीन राजकारण पाहून नुकतंच केलेलं वक्तव्य वाटणारं हा संवाद खरं तर 45 वर्षांपूर्वीच्या एका चित्रपटातला आहे.
एक राज्य, मुख्यमंत्री, त्यांची सत्ता पाडण्यासाठी सत्तेत त्यांच्याच बरोबर असलेल्या इतर डोक्यांची सुरू असलेली कारस्थानं आणि या सगळ्याचं निरीक्षण करणारा पत्रकार...
हे सगळं अगदी आपल्या सभोवतालीच घडत आहे, असं वाटतं. पण ही 45 वर्षांपूर्वीच्या एका सिनेमाची गोष्ट आहे. हा चित्रपट म्हणजे पडद्यामागच्या राजकारणाचा चेहरा समोर सर्वांसमोर आणणारा 'सिंहासन'.
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आलेल्या एका फोननं सुरू झालेला सस्पेन्स, त्यानंतर येनकेन प्रकारे 'सिंहासन' मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यातून समोर येणारा राजकारणातील क्रूरपणा थक्क करून सोडणारा आहे.
मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या काही खास चित्रपटांपैकी एक असलेल्या 'सिंहासन'विषयी आज जाणून घेऊया.
राजकारणाचा मुखवट्यामागचा चेहरा दाखवणारा चित्रपट
'सामना'सारखा राजकीय चित्रपट केल्यानंतर जब्बार पटेलांनी 'जैत रे जैत'सारखा सामाजिक विषय असलेला चित्रपट केला.
पण त्यानंतर पुन्हा राजकारणासारख्या विषयाला हात घालत त्यांनी तेवढ्याच ताकदीनं 'सिंहासन'चं शिवधनुष्य पेललं आणि खऱ्या अर्थानं मराठीतला एक अप्रतिम असा मल्टीस्टारर आणि कालातीत असा चित्रपट तयार केला.
सत्ता मिळवण्यासाठी अगदी हसत हसत टोकाच्या भूमिका घेणारे राजकारणी दाखवतानाच इतर पात्रांच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे अनेक पदरही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झालेला दिसतो आणि त्यामुळंच आजही हा चित्रपट पाहताना कुठंही जुना वाटत नाही.
चित्रपटात ज्या पद्धतीनं राजकारणी, त्यांचं शह-काटशहचं राजकारण, गुन्हेगारी, गरिबी, विशिष्ट जातींतील लोकांचं आणि महिलांचं शोषण हे सगळं दाखवण्यात आलं आहे.
ते पाहून सगळं असंच असतं किंबहुना जरा आणखी जास्त क्रूर असेल, यावर प्रेक्षकाचा विश्वास बसल्याशिवाय राहत नाही.
45 वर्षांपूर्वी जेव्हा लोकांना वृत्तपत्रांशिवाय इतर माध्यमांचे फारसे पर्याय नव्हते, त्यावेळी समोर येणाऱ्या बातम्यांच्या शिवाय पडद्यामागं नेमकं काय सुरू असतं, हे दाखवत राजकारणाचा खरा चेहरा या चित्रपटानं एकप्रकारे लोकांसमोर आणला होता.
दिग्गज साहित्यिकांची छाप
या चित्रपटाची कथा ही साहित्यिक, पत्रकार अरुण साधूंनी लिहिलेल्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन कादंबऱ्यांवर बेतलेली आहे.
या दोन कादंबऱ्या वाचल्यानंतर दिग्दर्शक जब्बार पटेल यांना त्यात चित्रपटाचा विषय असल्याचं जाणवलं आणि त्यांनी यावर चित्रपट बनवायचा विचार केला. त्यासाठी ते विजय तेंडुलकरांकडे गेले आणि या दोन्हींवरून एक पटकथा त्यांनी लिहायला सांगितली आणि त्यातून हा चित्रपट तयार झाला.
पत्रकारिता करत असताना अरुण साधूंनी राजकारण जवळून अनुभवलं होतं. अनेक बडे नेते आणि राजकारणातील सत्ताकेंद्रांशी संबंधितांशी कामाच्या निमित्ताने त्यांचा संबंध आला होता.
त्यामुळं त्याचा संपूर्ण अर्क त्यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्यांमध्ये उतरलेला पाहायला मिळतो.
त्यात या कथेची पटकथा आणि संवाद लिहिले ते साक्षात विजय तेंडुलकरांनी. जब्बार पटेलांबरोबरचा त्यांचा पहिला 'सामना' हा चित्रपट खास होता.
त्यात तर एकाहून एक वरचढ संवादांचा खजिना होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिंहासनच्या निमित्ताने त्यांना राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची संधी मिळाली.
विजय तेंडुलकरांनी या दोन कादंबरींचा मिलाफ करून रचलेली पटकथा आणि चित्रपटातले मोजके पण प्रभावी संवाद हे पुन्हा हुकुमाचा एक्का ठरले आणि त्यातून या चित्रपटात या दिग्गजांची छाप पाहायला मिळाली.
पण एका लेखकाच्या कलाकृतीवरून दुसरी कलाकृती तयार करताना दुसऱ्याला जराही असुरक्षितता नसल्याचंही दिसतं. कारण चित्रपटामध्येच सिंहासन कादंबरीचा उल्लेख करून त्याचं कौतुक करण्यात आलेलं पाहायला मिळतं.
मुख्यमंत्री त्यांच्या एका सहकाऱ्याला काय नवं वाचताय, असं विचारतात, तेव्हा ते सिंहासन कादंबरी वाचतो असं सांगतात. तसंच, राजकारणी सत्तेला चटवून कसे नादान होतात याचं वर्णन, असल्याचं ते सांगतात.
यापेक्षा आणखी काय मोठेपणा असणार?
खऱ्या अर्थानं मल्टिस्टारर चित्रपट
सिंहासन हा खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला मल्टिस्टारर चित्रपट होता, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. निळू फुले (पत्रकार - दिगू टिपणीस), अरुण सरनाईक (मुख्यमंत्री - जिवाजीराव शिंदे), श्रीराम लागू (अर्थमंत्री - विश्वासराव दाभाडे), रिमा लागू (विश्वासरावांची सून - कमल), सतीष दुभाषी (कामगार नेता- सबास्टियन डिकास्टा) यासह मंत्र्यांच्या भूमिकेत मोहन आगाशे, दत्ता भट, श्रीकांत मोघे हे होते.
तर नाना पाटेकर, जयवंत हर्डीकर, उषा नाडकर्णी, लालन सारंग असे अनेक एकाहून एक सरस कलाकार या चित्रपटात दिसले.
या चित्रपटातलं कास्टिंगही विचारपूर्वक केलेलं होतं. वसंत सरनाईक यांची प्रतिमा पूर्वी तमाशापटातील अभिनेत्याची होती. पण त्यांच्या नाटकांतल्या भूमिका पाहिलेल्या असल्यानं त्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका देण्यात आली. ती त्यांनी अत्यंत उत्तमपणे साकारली, असं जब्बार पटेलांनी सांगितलंय.
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांना आलेला निनावी फोन त्यांची सत्ता पाडण्यासाठी त्यांचेच सहकारी कट करत असल्याची माहिती देतो.
जिवाजीराव विरुद्ध इतरांचं एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीचं राजकारण आणि त्यात घसरत जाणारी राजकारणाची पातळी असा सगळा खेळ सुरू असतो.
त्याचवेळी गुन्हेगारी, कामगारांच्या समस्या, भ्रष्टाचार, आपलं काम करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून होणारं ब्लॅकमेलिंग, त्यांच्या सत्तेतीलच विरोधकांकडून इतरांना दिली जाणारी आमिषं हेही सुरुच असतं.
'दिगू'च्या नजरेतून सामन्यांचा दृष्टीकोन
या चित्रपटामध्ये निळू फुले यांनी साकारलेली दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका ही अत्यंत खास आणि वेगळ्या प्रकारची ठरली.
या चित्रपटाच्या आधीपर्यंत निळू फुलेंनी गावच्या सरपंचांपासून ते सामनातल्या सहकारसम्राटापर्यंत राजकारण्यांच्या अनेक भूमिका केल्या होत्या. त्यामुळं एवढे नेते असलेल्या या चित्रपटातही त्यांनी एखाद्या नेत्यांची भूमिका सहजपणे साकारली असती.
पण निळू फुलेंनी स्वतःचं त्यांना आता राजकीय नेत्याचं काम नको. ते करून कंटाळला आला असल्याचं जब्बार पटेलांना सांगितलं होतं.
त्यामुळं त्यांना संपूर्ण चित्रपटात निरीक्षकाच्या भूमिकेत वावरणाऱ्या पत्रकाराची भूमिका दिल्याचं पटेल म्हणाले होते.
पहिल्याच फ्रेममध्ये मुंबईच्या गर्दीत दिसणाऱ्या पत्रकारापासून होणारी सुरुवात ते अखेरीस उद्विग्न झालेल्या त्याच पत्रकारावर होणारा शेवट, असं पहिलं आणि शेवटचं दोन्ही दृश्य निळू फुलेंवरच चित्रित आहेत.
शिवाय, संपूर्ण चित्रपटात एकप्रकारे दोन्ही बाजूंमधील मध्यस्थ वाटावा किंवा चित्रपटाचा सूत्रधार भासावा, अशी भूमिका या निमित्ताने निळूभाऊंच्या वाट्याला आली. त्यात त्यांनी केलेली कमालही काही औरच आहे.
सत्तेबद्दल असणारी चीडही ही हसण्यामागं लपवत राहत आपलं काम करत राहायचं, ही मध्यमवर्गीय मानसिकता या भूमिकेतून दिसते.
त्याचवेळी सत्तेतील दोन्ही केंद्रांकडून आपला वापर होण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अगदी चलाखीनं त्यापासून दूर राहण्याचं कसबही हा दिगू साधत असतो.
राजकारण्यांबरोबर वावरतानाची हुशारी आणि त्याचवेळी वेश्याव्यवसायातून अंथरुणाला खिळलेल्या प्रेयसीवरील जीव आणि शेवटी सत्तेच्या खेळातून आलेली उद्विग्नता, अशा पत्रकाराची भूमिका करताना निळूभाऊंनी अभिनयाचा कस लावलेला पाहायला मिळतो.
दृश्य अन् संवादांची पर्वणी
विजय तेंडुलकर आणि जब्बार पटेल यांच्या जोडीचा करिश्मा सिंहासनमध्येही दिसतो. दमदार डायलॉग आणि काही ठिकाणी अगदी मोजके शब्द असलेल्या दृश्यांमधून जे सांगायचं ते अगदी सजहपणे पण तेवढंच प्रभावीपणे सांगण्याची जब्बार पटेलांची हातोटी या चित्रपटात चांगलीच पाहायला मिळाली.
चित्रपटात मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे आणि त्यांची सून यांच्यातले या चित्रपटातले जे सीन आहेत, ते अशाचप्रकारे बरंच काही सांगून जातात. सुनेशी असलेली गरजेपेक्षा जास्त जवळीक राजकारणात त्याच सुनेचा दाभाडे कसा वापर करतात ते पाहायला मिळतं.
श्रीराम लागू आणि रिमा लागू हे या सासरा आणि सूनेच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच बॅडमिंटन खेळल्यानंतर, "सून बाई दॅट इज अ लव्हली गेम यू प्लेड", असं म्हणत दाभाडे सुनेचं कौतुक करतात. पण त्याचवेळी तिथं बसलेल्या त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव या संवादापलिकडचं बरंच काही बोलतात.
लालन सारंग यांचे चित्रपटात मिसेस चंद्रापुरेंच्या भूमिकेतील मोजके दोन सीन आहेत. पण राजकारणी आणि उद्योजकांमध्ये कसं नातं असतं आणि उद्योजकही कसे सगळ्याच राजकारण्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात हे काही मिनिटांत दाखवून दिलं आहे.
पत्रकार दिगूला गाडीतून सोडताना मिसेस चंद्रापुरेंचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी त्यांचा ढळणारा पदर या काही सेकंदांच्या दृश्यातूनही लेखक-दिग्दर्शकांनी त्यांना हवं ते साधलंय.
याशिवाय एका दृश्यात एका आमदाराकडे गावातील 'सोन्या महार' तक्रार घेऊन येतो. आपल्या मुलानं त्याच्या मुलीवर अत्याचार केले आणि त्यातून तिला बाळ झाल्याचं माहिती असूनही, त्या आमदाराकडं त्याला भेटायला वेळ नसतो, हा सीनही हवा तो संदेश देऊन जातो.
संवादाचं म्हणायचं झालं तर अनेक संवाद खास आहे. पण काही संवाद अगदीच भिडणारे आहेत. पत्रकार दिगूची शेजारीन वहिणी त्याला सहज बोलताना ऐकवत म्हणते की,"पुढारी मंत्री भांडत बसणार त्यांच्या बातम्या छापा, पण आम्हा पाण्यासाठी तडफडणाऱ्यांची चौकशी कोण करणार?"
डिकास्टा या कामगार नेत्याची मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आणि अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे यांच्याशी जुगलबंदी दाखवली आहेत. दाभाडे मुख्यमंत्री बनण्यासाठी मदत मागताना डिकास्टा काही अटी ठेवतात. "पण अटी पूर्ण झाल्या नाही तर, नव्या मुख्यमंत्र्यांना मंत्रालयासमोर जोड्याने मारेन," असं डिकास्टा म्हणतात. अशा संवादाद्वारे त्या पात्राचा धाडसीपणा प्रेक्षकांच्या मनात रुजला जातो.
तसंच मुख्यमंत्र्यांशी बोलताना त्यांना तोंडावर, "तुम्ही सत्तेला चिकटलेले मुंगळे ज्यादिवशी जाल त्या दिवशी या देशाला पुन्हा भवितव्य येईल," या टोमण्याला मुख्यमंत्र्यांचं, "पुन्हा नवे मुंगळे येतील" हे सांगणंही राजकारणाची व्याख्या करण्यासाठी चपखलपणे मांडलंय.
'उष:काल होता होता...'
राजकारणावरच्या अडीच तासांहून अधिक मोठ्या असलेल्या या चित्रपटात फक्त एक गाणं आहे आणि तेही चित्रपट पुढे नेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात वापरण्यात आलं आहे.
सुरेश भटांनी लिहिलेल्या या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेली चाल आणि आशा भोसलेंच्या स्वरांनी फुललेलं हे गाणं आजही तेवढंच ताजं आणि आजच्या काळातलं वाटल्याशिवाय राहत नाही.
आजूबाजूला असलेली प्रचंड नकारात्मकता आणि शोषणाचं दुःख मांडतानाच, 'अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली...' असं म्हणत पेटून उठण्याचं आव्हान देणारं हे गीत आजही तेच स्फुरण देतं.
पटेलांनी या गाण्याचे शब्द आणि दृश्याचा मिलाफही सुंदरपणे केला आहे. सोन्या महार पोरीसहं निराश होऊन परतत असताना मागे या गाण्याच्या, 'उभा देश झाला आता एक बंदीशाला, जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला' या ओळी पाहणाऱ्याला मोठा व्यापक विचार करायला भाग पाडतात.
ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं समाजाचं रुप समोर मांडण्यासाठी जब्बार पटेल यांनी हे गाणं वापरलं आहे.
यशवंतराव म्हणाले, 'विधीमंडळाचा मान राखा'
या चित्रपटाला 44 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात जब्बार पटेल यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले होते. मुख्य सचिवांनी नकार देऊनही शरद पवारांनी त्यांना विधीमंडळ परिसरात शुटिंगसाठी कशी मदत केली हे त्यांनी सांगितलं होतं.
यशवंतराव चव्हाण तेव्हा उपपंतप्रधान होते. ते मुंबईला आले तेव्हा जब्बार पटेलांची त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणाले होते की, "सिंहासन कादंबरीत काय आहे? ती शुष्क आहे. त्यावर कसा चित्रपट बनणार?"
पण त्यांना मुंबई दिनांकचाही त्यात काही भाह असेल हे सांगितलं तेव्हा शाबासकी देत त्यांनी पाठीवर थाप दिली होती, असं जब्बार पटेल म्हणाले. यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सभागृहाचा मान कमी होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांना दिला होता.
नाना पाटेकर आणि जयराम हर्डीकर या चित्रपटात तस्करीचं काम करणारे गुन्हेगार असतात. चित्रपटात शेवटी नाना पाटेकर जयराम हर्डीकरचा खून करतो असं दाखवलं आहे.
पण चित्रपटानंतर खरंच जयराम हर्डीकर यांचा अपघात झाला आणि अपघातात गेले. त्यावेळी हर्डीकरांच्या पत्नी अनेक वर्ष नाना पाटेकरांशी बोलत नव्हत्या. चित्रपटात मारल्याने अपशकुन झाला म्हणून नवरा गेला, असं त्यांचं तेव्हा मत झालं होतं, अशी आठवण नानांनी यावेळी सांगितली.
चित्रपटाचं शुटिंग संपलं तेव्हा जनता पक्षाच्या सरकारचा कार्यकाळ संपत आला होता. इंदिरा गांधी पुन्हा निवडून येणार अशी दाट शक्यता होती.
नव्या सरकारमध्ये चित्रपटाला सेन्सॉर होऊ दिलं जाणार नाही, अशी भीती होती, त्यामुळं या सरकारच्या कार्यकाळात त्यांना सेन्सॉर करून घ्यायचा होता. तेव्हा 10 स्टुडिओत एका रात्रीत तो एडिट करून चित्रपट सेन्सॉर करून घेतला. पण तो रिलीजही करावा लागणार, असं वकिलानं सांगितलं.
तेव्हा 29 डिसेंबरला हिंदमाताला रात्रीचा एक शो करायचं ठरवलं. त्यासाठी वृत्तपत्रात एकच जाहिरातही दिली होती. तेव्हाही ती जाहिरात वाचून 200-300 लोकं आली होती, आणि तो एक शो केला होता.
नंतर डेक्कन जिमखान्यावर डेक्कन नावाच्या थिएटरमध्ये हा चित्रपट लावला. तिथं प्रिमियर शोला शरद पवार गेले होते. नंतर पहिल्याच दिवशी आठवड्याभराचे 28 शो बूक झालेले होते. 44 आठवडे हा चित्रपट तिथं चालला होता.
एकूणच मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही राजकारणावर किंवा राजकीय विषयांवर भाष्य करणारे अगदी मोजके असे काही चित्रपट तयार झाले आहे. त्या यादीत जब्बार पटेलांच्या सामना आणि सिंहासनचं नाव अगदी वर आहे.
पण सामना हा एका मर्यादित भागातील राज्यकर्त्यावरचा चित्रपट होता. पण सिंहासनमध्ये मात्र जब्बार पटेलांनी राजकारण आणि त्याभोवती असलेली संपूर्ण व्यवस्था कशा प्रकारे चालते, हे दाखवून दिलं आणि लोकांनाही ते तेवढंच भावलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)