You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उंटाच्या दुधाला 'पांढरे सोने' का म्हटले जाते, या दुधामध्ये असे काय आहे जे गाय किंवा म्हशीच्या दुधात नाही?
- Author, अपूर्व अमीन
- Role, बीबीसी गुजराती
उंटाचे दूध 'पांढरे सोने' म्हणून ओळखले जाते, त्याचे कारण म्हणजे गुजरातमधील कच्छचा उंट विविध प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती खातो.
उंटाचे दूध अत्यंत आरोग्यदायी मानले जाते आणि यामुळे अनेक जटिल आजार बरे होऊ शकतात असा दावा केला जातो, त्याशिवाय तज्ज्ञांचे मत आहे की हे दूध 'एक परिपूर्ण आहार' आहे.
बीबीसीने उंटाच्या दुधाबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यातून मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती समोर आली आहे.
भारतातील 90 टक्के उंट गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळतात. मात्र, उंटांच्या संख्येतील घसरण ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत उंटाचा वापर वाहतूक आणि मालवाहतुकीसाठी केला जात होता. पण, आता उंटाच्या दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे.
जगातील अनेक भागांत, विशेषतः शुष्क आणि निम-शुष्क प्रदेशांत उंटाचे दूध हा मुख्य आहार आहे.
'स्क्रोल' या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारत वार्षिक सुमारे 7,000 टन उंटाच्या दुधाचे उत्पादन करतो, जे जागतिक उत्पादनाच्या 0.2% पेक्षाही कमी आहे. भारताने 1984 मध्ये उंटांवर राष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना केली होती.
अहवालानुसार, ऑक्टोबर 2019 मध्ये जाहीर झालेल्या 20 व्या पशुगणनेच्या आकडेवारीनुसार, 1970 च्या दशकातील अंदाजे 11 लाखांवरून, भारतातील उंटांची संख्या चार दशकांत 75% नी घटून केवळ 2.5 लाख झाली आहे. फक्त 2012 ते 2019 दरम्यान उंटांच्या संख्येत 37% घट झाली.
उंटाच्या दुधाचे फायदे आणि त्यातील पोषक तत्त्वे
'सौदी जर्नल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, उंटांचे दोन प्रकार आहेत: दोन वशिंड असलेला बॅक्ट्रियन उंट (कॅमेलस बॅक्ट्रियनस) आणि अरबी किंवा एक वशिंड असलेला ड्रोमेडरी उंट (कॅमेलस ड्रोमेडॅरिअस).
या संशोधनानुसार, उंटाच्या दुधात व्हिटॅमिन सी चे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा 3 ते 5 पटीने जास्त असते. या दुधाचा pH 6.2 ते 6.5 च्या दरम्यान असतो, जो गाईच्या दुधाच्या (6.5 - 6.7) तुलनेत थोडा कमी असतो.
याशिवाय गाय आणि म्हशीच्या दुधात असलेले बी-लॅक्टोग्लोब्युलिन हे एक असे प्रोटीन आहे, जे अनेक लोकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये ॲलर्जी निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत मानले जाते.
आईच्या दुधातही बी-लॅक्टोग्लोब्युलिन प्रोटीन नसते. उंटाच्या दुधाची प्रोटीनची रचना गाईच्या दुधापेक्षा मानवी दुधाशी जास्त साधर्म्य दर्शवते.
बी-लॅक्टोग्लोब्युलिनच्या अभावामुळे उंटाचे दूध पचायला हलके असते. ज्या लोकांना दूध प्यायल्यानंतर गॅस, ॲसिडिटी किंवा पोट जड होण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी उंटाचे दूध एक उत्तम पर्याय ठरते. यामध्ये गाय किंवा म्हशीच्या दुधापेक्षा फॅटचे प्रमाण खूप कमी असते.
उंटाच्या दुधात जीवनसत्व B1, B2 आणि C सारखी जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. गाईच्या दुधापेक्षा यात जीवनसत्व C हे 3 ते 5 पटीने जास्त असते, ज्यामुळे शुष्क प्रदेशांतील आहारात याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
मेडिकल कन्सल्टंट डॉ. प्रशांत पनारा बीबीसीशी बोलताना सांगतात की, "उंटाचे दूध हे मानवी दुधाच्या सर्वात जवळ जाणारे आहे. उंटाच्या दुधात जीवनसत्व B12, झिंक, कॅल्शियम सोबतच प्रथिने आणि सॅच्युरेटेड प्रथिने देखील पुरेशा प्रमाणात आढळतात. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याशिवाय उंटाचे दूध मधुमेहावरही प्रभावी ठरत आहे."
"विशिष्ट गुणधर्मांमुळे, ज्यांना लॅक्टोज इनटॉलरन्सचा म्हणजे दूध न पचण्याचा त्रास त्रास आहे अशा लोकांसाठीही हे फायदेशीर ठरू शकते. हे दूध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते."
गुजरातमध्ये उंटाच्या दुधाचा व्यवसाय कोण करतं?
गुजरातमध्ये प्रामुख्याने उंटांच्या दोन जाती आढळतात - खराई आणि कच्छी. संपूर्ण भारतात उंटांच्या एकूण 9 जाती आढळतात.
कच्छ उंट संवर्धन संघटनेचे अध्यक्ष आशाभाई रबारी म्हणतात, "कच्छमध्ये सुमारे 350 कुटुंबे उंटपालन करतात. एक मादी उंट दररोज 4 ते 5 लिटर दूध देते."
उंट आणि त्यांच्या पालकांसाठी कार्यरत असलेल्या 'सहजीवन' संस्थेशी संबंधित महेशभाई गरवा सांगतात की, "केवळ कच्छ सोडून इतर जिल्ह्यांमध्ये 100 कुटुंबे आहेत जी उंटपालन करतात."
गुजरातमध्ये, कच्छमधून सर्व दूध संकलित करून 'सरहद डेअरी' मध्ये दिले जाते.
उंट फक्त रुई (आकडा) सोडून इतर अनेक वनस्पतींचा अन्नात वापर करतो. यामध्ये खारी जार, मिठी जार, देशी बाभळ, दुधी वल, चेरिया, भूमीगत चेरिया, केरडो, उइन, कुंधेर, गांगणी, निवडुंग, बोर, खैर, कडू लिंब, खारियो, खेजरी (खीजडो), फाग, फुटी वल, फोगवेल, रतिवल, लई, लाणो, लियार, विकडो, धामुर, वडाचे झाड आणि टंकारो यांसारख्या विविध वनस्पतींचा समावेश होतो. त्यामुळे उंटाच्या दुधाची गुणवत्ता उच्च दर्जाची असते आणि त्याचे पोषणमूल्य देखील जास्त असल्याचे मानले जाते.
गरवा पुढे सांगतात, "गुजरातमध्ये उंटपालनाशी प्रामुख्याने 'फकिराणी जत' आणि 'रबारी' समुदाय जोडलेले आहेत. याव्यतिरिक्त कच्छच्या खावडा भागात 'समा' समुदाय देखील उंटपालनाचे काम करतो."
गुजरातमध्ये आढळणाऱ्या 'खराई' उंटाच्या जातीला भारतात आढळणाऱ्या नऊ जातींपैकी एक म्हणून मान्यता मिळाली आहे.
उंटाच्या दुधाची चव आणि किमतीतील फरक
महेशभाई म्हणतात की, "उंटाच्या दुधापासून बनवलेल्या विविध वस्तू आता बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये कॅमल मिल्क चॉकलेट, रॉ (कच्चे) दूध, केशर फ्लेवरचे दूध आणि दुधाची पावडर मुख्य आहे. ही उत्पादने सध्या ऑनलाईन वेबसाईटवरही सहज उपलब्ध आहेत."ॉ
वेबसाईटवर उंटाच्या दुधाची किंमत प्रति लीटर 200 रुपये पासून सुरू होते आहे. तर काही वेबसाइटवर तर उंटाचे दूध 900 किंवा त्याहून अधिक देखील आहे.
रमेशभाई भाटी पुढे सांगतात की, "उंटाच्या दुधापासून सध्या खीर, आईस्क्रीम आणि चॉकलेट सारखे विविध खाद्यपदार्थ देखील बनवले जात आहेत."
उंटाच्या दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या 'सरहद डेअरी'चे संस्थापक अध्यक्ष वलमजी हुंबल बीबीसीशी बोलताना सांगतात की, "उंटाचे दूध पूर्वी छोट्या हॉटेल्सवर 20 ते 25 रुपये प्रति लिटर दराने विकले जात असे. सुरुवातीला आम्ही 300 लिटरपासून दूध संकलन सुरू केले होते, जो आता दररोज 5,000 लिटरपर्यंत पोहोचले आहे. कच्छमधील 70% दूध सरहद डेअरी संकलित करते."
वलमजी हुंबल सांगतात की, कच्छमध्ये पाच वर्षांपूर्वी तरुण या व्यवसायापासून दूर होऊन इतर व्यवसायांकडे वळले होते.
2019 मध्ये उंटाच्या दुधाला खाद्यपदार्थ म्हणून भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची मान्यता मिळाली.
ते म्हणतात की, "आता उंटाच्या दुधाची पावडर बनवून देशाबाहेरही व्यापारासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तरुण आता पुन्हा या व्यवसायाकडे वळत आहेत. उंट विकण्याऐवजी आता लोक ते खरेदी करत आहेत."
'सहजीवन' संस्थेचे कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी रमेशभाई भाटी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगतात की, "गुजरातमध्ये कच्छ व्यतिरिक्त प्रामुख्याने जामनगर, द्वारका, भरूच, भावनगर तसेच बनासकांठा येथील डीसा आणि पालनपूरमध्ये उंट पालन करणारे लोक राहतात."
उंटांमध्ये आढळणारे आजार
पश्चिम बंगालमधील सुंदरबननंतर कच्छमध्ये खारफुटीची (चोर/मॅन्ग्रोव्हज) सर्वाधिक जंगले आहेत आणि खराई उंट या जंगलांवर अवलंबून असतात.
गुजरातमध्ये आढळणाऱ्या 'खराई' उंटाच्या वैशिष्ट्यपूर्ण जातीची विशेष बाब म्हणजे हे उंट समुद्राच्या पाण्यात पोहू शकतात. मात्र, कच्छमध्ये खराई उंटांची संख्या खूप कमी आहे. रमेशभाई भाटी स्पष्ट करतात की, उंटाच्या दुधाची चव ही उंटाने घेतलेल्या आहारावर अवलंबून असते.
खराई उंट आठवड्यातून किमान एकदा तरी खाऱ्या प्रदेशात चरण्यासाठी जातोच. ते सांगतात की, "उंटाला आपल्या आहाराच्या गरजेनुसार आठवड्यातून एक दिवस अनिवार्यपणे खाऱ्या भागात चरायला जावे लागते. ही त्यांची खारे पदार्थ खाण्याची नैसर्गिक गरज आहे, ज्यामुळे त्यांच्या दुधाची चव थोडी खारट लागते."
कच्छ जिल्हा पशुसंवर्धन विभाग अधिकारी डॉ. राजेश पटेल सांगतात की, उंटांमध्ये प्रामुख्याने दोन आजार जास्त प्रमाणात आढळतात.
सरा (Surra) हा आजार 'ट्रायपॅनोसोमियासिस' म्हणून ओळखला जातो, ज्याला मेंदूज्वर किंवा मेंदूचा ताप असं ही म्हणतात. ज्याप्रमाणे माणसाला मलेरिया होतो, त्याचप्रमाणे हा आजार होतो. यामध्ये उंटाला चक्कर येते, शरीर सुकत जाते आणि अनेकदा उंटाचा मृत्यूही होतो. या आजाराच्या उपचारांसाठी लागणारी इंजेक्शन सरकार मोफत उपलब्ध करून देते.
दुसरा आजार म्हणजे खस किंवा खाजी (Mange). हा त्वचेचा संसर्गजन्य रोग असून उंटांमध्ये तो अत्यंत सामान्यपणे आढळतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.