You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सुलभा असं कसं वागू शकते? सुलभाला काय गरज होती? सुलभाचं वागणं भारतीय संस्कृतीला शोभणारं होतं का?
असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. जवळपास 40 वर्षे होऊन गेली, पण आजही आपल्या समाजाला हे प्रश्न पडू शकतात जेव्हा एखादी स्त्री सगळं सोडून घराचा 'उंबरठा' ओलांडेल.
कदाचित म्हणूनच 1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती. स्मिता यांच्या एका दुर्मिळ मुलाखतीचा समावेश या लेखात आहे. त्यामध्ये स्वतः स्मिता यांनीच ही भूमिका आणि हा सिनेमा का महत्त्वाचा होता हे सांगितलं.
उंबरठाचं डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन केलं होतं, तर पटकथा लिहिली होती ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी. हाच चित्रपट 'सुबह' नावाने हिंदीतही चित्रित आणि प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निर्मितीची कथा नाट्यमय वळणांनी भरलेली अशी होती. म्हणजे हे आधी नाटक होणार होतं.
त्याची गोष्ट अशी की, अभिनेते रमेश देव यांनी शांता निसाळ यांची बेघर कादंबरी वाचल्यावर त्यावर नाटक करण्याविषयी जब्बार पटेल यांना सुचवलं. यावर जब्बार यांचं म्हणणं होतं की, 'या कादंबरीतली मांडणी ही या नाटकासाठी योग्य नाही'.
मग कादंबरीचं कथानक तेंडुलकरांना आवडलं आणि त्याचा चित्रपटाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
चित्रपटात सुलभा महाजन हिच्या भोवती कथानक फिरतं. चित्रपटात प्रोटोगनिस्ट म्हणजेच मुख्य पात्र 'स्त्री' नसण्याचा तो काळ होता.
थोडक्यात कथानक असं- सुलभा महाजन (स्मिता पाटील) एका उच्चभ्रू कुटंबातील विवाहित तरुणी आहे. पती नामांकीत वकील सुभाष महाजन (गिरीश कर्नाड), इंग्रजी माध्यमातील शाळेत जाणारी मुलगी, सासूबाई मात्तबर समाजसेविका, दीर प्रतिष्ठित डॉक्टर (श्रीकांत मोघे) आणि गृहकृतदक्ष वहिनी (आशालता) असा तिचा परिवार.
लग्नानंतर मुलगी जरा मोठी झाल्यावर सुलभा मास्टर ऑफ सोशल वर्कचं (एमएसडब्ल्यू) शिक्षण घेते. घरी परतल्यावर आपल्या शिक्षणाला साजेसं आपण काही काम करत नाही याचं शल्य तिला आहे, आपण सामाजिक क्षेत्रात काही करावं या उर्मीने महिला सुधारगृहाची सुपरिटेण्डंट म्हणून आलेली ऑफर स्वीकारायची ठरवते. तिच्या सासूबाई खरंतर तिला स्वतःच्या संस्थेत लक्ष घालायला सांगत असतात, पण ही आयती संधी ती नाकारते.
समजुतदार कुटुंबाची 'परवानगी' घेत सामाजिक व्यवस्थेने नाकारलेल्या, गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या महिलांच्या आश्रमात दाखल होते. सामाजिक, महिलांच्या प्रश्नांबद्दल सहवेदना असणाऱ्या सुलभाच्या हातात आश्रमाची जबाबदारी येते आणि ऑथोरिटीने पार पाडत असते.
आश्रमाचं शुटींग पुण्याच्या येरवडा भागात झालंय.
आश्रमाच्या चेअरमन बाई (दया डोंगरे) वर्चस्ववादी व्यक्तिमत्व असलेल्या बाई आहेत. त्यांना आश्रमाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात हवा आहे. राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात, त्यामुळे त्यांची मर्जी आतापर्यंत सगळे अधिकारी सांभाळत आलेले असतात. नव्याने पदावर रुजू झालेली सुलभा मात्र मर्जी सांभाळत नाही तर आश्रमात शिस्त आणते. तिथे आलेल्या महिलांना समजून घेते. त्यांचं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करते.
पुढे आश्रमात घडलेल्या दुर्घटनेनंतर अनेक आरोपांना निर्भिडपणे तोंड देत राजीनामा देते आणि पुन्हा घरी परत येते. इथे सिनेमा संपेल असं वाटतं पण तसं होत नाही. सुलभाला अनेक गोष्टी बदलल्याचं जाणवतं. नातेसंबंधही बदलल्याचं जास्त ठळकपणे जाणवतं. ती नव्हती त्या काळात महिला सहकारीसोबत शाररिक संबंध असल्याचं सुभाष सुलभाला सांगतो. हे कळल्यावर ती नवऱ्यापासून मनाने कित्येक कोस दूर जाते. या घराला आपली खरंच गरज उरली आहे का... या विचारावर येत इथे ती आपलं घरासोबतचं नातं मागे ठेवून उंबरठा ओलांडते.
घरात-आश्रमात परखड, कडक शिस्तीची, संवेदनशील आणि संयत स्वभावाची सुलभा महाजन साकारताना स्मिता पाटील यांनी कमालीचं काम केलंय.
तर नायिका दिप्ती नवल असती…
पण 'उंबरठा'ची पटकथा लिहिताना तेंडुलकरांच्या डोळ्यासमोर स्मिता पाटील नव्हत्या. तर दीप्ती नवल होत्या.
जब्बार पटेल साधना साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगतात- "माझ्या डोक्यामध्ये उंबरठामधील मुख्य पात्रासाठी एक आंतरिक शक्ती असणारी, जिचा चेहरा बोलका आणि देहबोलीचं भान ठेवणारी अशी फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे, स्मिता पाटील"
"जेव्हा मी तिला कथा सांगितली तेव्हा सगळं ऐकून झाल्यावर तिने डोळ्यातलं पाणी पुसलं..."
"कुणीही हा रोल माझ्याकडून हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तर मी ते होऊ देणार नाही, अगदी तेंडुलकरसुद्धा! माझं रोल मॉडेल माझी आई आहे. तिचं सामाजिक काम तुम्हाला माहित आहेच आणि सुलभा महाजनच्या व्यक्तिरेखेत मला माझ्या आईची देहबोली स्पष्ट दिसते, तुम्ही हे तेंडुलकरांपर्यंत पोहचवा."
स्मिता पाटील यांची आई विद्याताई पाटील या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या होत्या.
स्मिता यांनीही एका मुलाखतीत निवडीचा तो प्रसंग सांगितला होता-
"जब्बारनी उंबरठ्याचा रोल ऑफर केला आणि मी म्हटलं तो रोल माझ्याशिवाय कोणी करूच शकत नाही. म्हणजे मला पूर्ण आत्मविश्वास होता आणि तेच जब्बारनी हेरलं होतं. ती भूमिका माझ्या विचारांशी साधर्म्य दाखवणारी होती. कदाचित त्या सुलभासारखी मी घरदार मूल सोडूही शकणार नाही. पण स्त्रीचं स्वातंत्र्य, विचार, डिग्निटी याविषयी मी तडजोड करू शकत नाही. हे सर्व योग जुळून आले."
पुण्यात खडकीजवळ बंगल्यामध्ये चित्रपटाचं शुटींग सुरू झालं तरी तेंडुलकरांना सुलभाच्या निवडीबद्दलचा निर्णय पटला नव्हता. चित्रित झालेल्या फिल्मचे रशेस तेंडुलकरांनी पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपण चुकीचा विचार करत होतो असं त्यांनी जब्बारांकडे मान्य केलं.
"तो क्षण फारच विलक्षण होता. तेंडुलकर तिला म्हणाले, "स्मिता तू हरवलंस मला." ती म्हणाली, "कसं काय?" तेंडुलकर म्हणाले, "मी ज्या सुलभा महाजनची कल्पना केली, ती तू जवळजवळ साक्षात जगली आहेस." हे ऐकल्यावर स्मिताचा बांध फुटला. मला अजून आठवतंय, ती अक्षरशः त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मोठ्याने रडायला लागली!"
तेंडुलकरांनी सुलभाच्या मनाची अवस्था सांगणारे काही चपखल प्रसंग लिहिले आहेत. कुटुंबातले सगळे रात्री गप्पा मारत असतात. सुभाष गाजत असलेल्या एका केसबद्दल सांगत असतो. एका डॉक्टराने महिला पेशंटवर बलात्कार केलेला असतो आणि त्याचीच केस सुभाष कोर्टात लढत असतो.
आपल्या डॉक्टर अशीलाला वाचवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायची तयारी करत असतो. त्या पेशंट महिलेचं चारित्र्यच कसं वाईट आहे आणि तिने पैशांच्या हव्यासापोटी कसा बोभाटा केला हे सिद्ध करणार असतो. त्याचं हे आर्ग्युमेंट कसं कौतुकास्पद आहे असाच सूर आई, भाऊ आणि वहिनीकडून येतो. पण सुलभाला हे पटत नसतं. ती तिथून तडकपणे उठून निघून जाते.
हवं ते प्रत्यक्षात करणं आणि त्यासाठी स्वतःचा मुद्दा नवऱ्याकडे लावून धरणं हे ती हट्टाने अनेक प्रसंगात करते. हा निग्रह सुलभाच्या चेहऱ्यावर दिसतो, त्याला गाण्याचीही चांगली जोड मिळाली आहे.
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!
कवी सुरेश भटांचं हे गीत निढळ्या आवाजातल्या रवींद्र साठेंनी गायलंय. सुलभा आश्रमाकडे टांग्यातून जात असताना हे गाणं चित्रित केलंय, पाहताना तिच्या मनात चाललेले विचारच जणू शब्दबद्ध झालेयत असं वाटू लागतं.
'सुन्या सुन्या मैफलीत'ची गोष्ट
या चित्रपटातील संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली चार गाणी आजही लोकप्रिय आहेत. कवी वसंत बापट यांची लता मंगेशकर यांनी गायलेली 'गगन सदन तेजोमय' ही प्रार्थना आश्रमातल्या शिस्तीच्या संदर्भात येते. या मराठी गाण्याचाच तोडीचं हिंदी 'सुबह'मधलं प्रार्थनागीतही जमून आलंय. 'तुम आशा विश्वास हमारे, तुम धरती आकाश हमारे' हे 'गगन सदन'च्या आशयाचं गीत पंडीत नरेंद्र शर्मांनी लिहिलंय.
तसंच चैत्रगौरीच्या उत्सवाचं वसंत बापट यांचं 'चांद मातला मातला, त्याला कशी आवरू' या गाण्याची जादू आजही कायम आहे. ही सगळी गाणी लतादिदींनी गायलेली आहेत.
पण गाजलेल्या 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या' या गाण्याची कहाणी खूप रंजक आहे. मुळात हे गाणं योगायोगाने या चित्रपटाचा भाग झालं. हृदयनाथ मंगेशकरांनी ही कहाणी अनेकदा आपल्या कार्यक्रमात सांगितली आहे.
" वि.स.खांडेकर यांच्या कादंबरीवर अमृतवेल नावाचा चित्रपट येणार होता. चित्रपटाच्या निर्मात्या जयश्री गडकर होत्या. सुरेश भट या चित्रपटाची गाणी लिहित होते. त्यासाठी ते मुंबईत मुक्कामी होते, पण पंधरा दिवस झाले तरी त्यांना काही सुचत नव्हतं. सुरेश भटांना वाईट वाटत होतं की हॉटेलचं बील वाढतंय, पण काही काम झालं नाही. पण तिथून निघाल्यावर भटांना गाण्याच्या ओळी सुचू लागल्या- 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या... तुझेच मी गीत गात आहे'. जयश्री गडकर आणि त्यांचे पती बाळ धुरी या ओळींनी भारावून गेले. पण काही कारणाने अमृतवेल होऊ शकला नाही."
जब्बार पटेल उंबरठासाठी चपखल बसेल असं गीत शोधत होते. त्यांना मंगेशकरांनी या तयार गीताबद्दल सांगितलं आणि बाळ धुरींच्या परवानगीनंतर 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या' उंबरठा चित्रपटात सामील झालं. मूळ गीतात बदल करुन 'तुझे हसू आरशात आहे' हे शब्द शांताबाई शेळके यांनी सुचवले आहेत.
चित्रपटात पहिल्यांदाच लेस्बियन संबंधाविषयी दाखवण्यात आलं. अशा संबंधांकडे मनोविकृती म्हणून आणि डॉक्टरांकडून बरं करता येईल या दृष्टीने पाहिलं गेलं. हे गैरसमजावर आधारित असलं तरी त्याकाळी हा विषय हाताळण्याचं धाडस दुर्लभ होतं, असं म्हटलं जातं.
चित्रपटात एका सीनवरुन लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात घमासान चर्चा झाली.
तेंडुलकरांची सुलभा घर नाही सोडत
आश्रमातल्या दुर्घटना आणि बिघडलेली परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका सुलभावर ठेवण्यात येतो. सच्चेपणावर विश्वास असणारी सुलभा महाजन चौकशीला सामोरी जाते, त्यातून निर्दोष सुटते आणि राजीनामा देऊन घरी निघते असं मूळ कथेत होतं. जब्बारांना मात्र हे मान्य नव्हतं.
सुलभाने स्पष्टीकरण देणं याची गरज नाही, असं तेंडुलकर म्हणत होते. पण ते देणं गरजेचं आहे, यावर जब्बार ठाम होते. अखेर तेंडुलकरांनी तो भाग लिहिला.
स्पष्टीकरण देताना सुलभा म्हणते-
"हे सगळं सुधारायचं मी ठरवलं. मग माझ्या लक्षात येत गेलं की हे सुधारणं शक्य नाही. कारण आश्रमाच्या या जगाचे धागेदोरे बाहेरच्या मोठ्या जगाशी गुंतलेले आहेत.
आणि ते बाहेरचं मोठं जग माझ्या संपूर्ण कक्षेबाहेरचं आहे. उदाहरणार्थ या आश्रमाची मॅनेजिंग कमिटी. या आश्रमातल्या बायकांची बाहेरची जगं, आश्रमावर दबाव आणणाऱ्या लहान-मोठ्या शक्ती, या सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने हा आश्रम केवळ बंदीशाळा राहणं जरुरी आहे.
ज्यांना बाहेर थारा नाही त्यांना इथे भरा. ज्यांची बाहेर अडचण होते त्यांना इथे कोंडा. जे प्रश्न बाहेर नकोत ते इथे टाका. जणूकाही बाहेरच्या प्रतिष्ठित समाजाचा उकिरडा. या उकिरड्यावरची घाण वहायला लागली की ती उचलून अजून कुठेतरी फेका.
यालाच बहुधा इथल्या माणसांचं पुनर्वसन म्हणतात."
आता या चित्रपटाच्या शेवटावरुन घमासान चर्चा प्रेक्षकांमध्येही झाली.
तेंडुलकरांची सुलभा घर सोडून जात नाही.
बेघर कादंबरीत शांता निसळांची शांताबाई परत घरात येते. त्यांचा संसार फार चांगला होतो. पण जब्बार यांचा अट्टाहास होता की तिने घर सोडून गेलं पाहिजे.
स्मिताची दुर्मिळ मुलाखत
स्मिता पाटील यांनी 1984 साली एका नियतकालिकाला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत जब्बार यांचा अट्टाहास मनापासून पटला असं म्हटलंय.
स्मिता म्हणतात, "घर सोडून जाणं जी वृत्ती आहे ती फार कमी लोकांमध्ये असते. ती जर पुरुषामध्ये असली तर त्याच्या मागे त्याची पत्नी जाते, मुलं जातात. सुलभा महाजनच्या मागे कोणीही जात नाही कारण ती स्त्री आहे.
आता मी फ्रान्सला जाऊन आले. तिथे 'उंबरठा' दाखवला ना, तर उंबरठ्यातल्या बाईबद्दल तिकडच्या बायकांच्या काय प्रचंड प्रतिक्रिया! म्हणतात इथे एखादी बाई जर मुलगा आणि नवरा सोडून गेली तर तिलासुद्धा वाईटच बाई म्हणतात आणि तिथल्या बायकांचे सुद्धा असेच प्रश्न आहेत.
तिथे आर्थिक प्रश्न एवढा नाहीये किंवा गरीबी वगैरे तेवढं नसलं तरी मूलभूत स्त्री-पुरुष नात्यामध्ये जी एक्सप्लॉयटेशन्स आहेत किंवा ज्या गुंतागुंती आहेत त्या सगळीकडेच सारख्या आहेत. सगळीकडे बाईची तीच अवस्था आहे. कमीजास्त प्रमाणात असेल पण मूलतः अवस्था तीच.
पण आपल्याकडे गेले दहा-पंधरा वर्षं काही स्त्रिया खूप प्रयत्न करताहेत. मनातल्या मनात झगडताहेत आणि म्हणून त्यांना या काळात चांगल्या फिल्म्स तयार होणं किंवा स्त्रियांची जी एक प्रतिमा हिंदी फिल्म्समध्ये बनवली गेलेली आहे ती तोडणं किंवा साहित्यामधनं अशा स्त्रिया उभ्या करणं याची गरज आहे."
'उंबरठा ही माझी फिल्म वाटते', असंही त्या म्हणत.
स्मिता पाटील यांच्या सात सिनेमांचा महोत्सव फ्रान्स मध्ये भरवला गेला होता. त्यात त्यांचा सर्वात आवडता सिनेमा होता- उंबरठा.
बहिणाई-1984 दिवाळी अंकासाठी वसंत पाटील यांनी स्मिताची मुलाखत घेतली होती. यात स्मिता यांनी सांगितलं होतं, "माझी आवडती फिल्म उंबरठा आहे, आणि ती राहील. कारण मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राचे राजकारण खूपच प्रगत आहे- आज खूप हाल आहेत ही गोष्ट वेगळी.
उंबरठा देशात महाराष्ट्राइतका कुठे चालला नाही, त्याचे कारण आमच्या पुरुषवर्गाची स्त्रियांच्या संबंधात असलेली परंपरावादी मनोभूमिका!
नवरा आणि मूल सोडून घरातून जाणारी बायको म्हणजे हैवान- ती स्त्रीच नव्हे, अशी आजही आमची धारणा आहे.
ही धारणा महाराष्ट्रात नाही असं नाही. परंतु तरीही महाराष्ट्रीय प्रेक्षकांनी उंबरठ्याला उत्कृष्ठ कलेचा नमुना म्हणून उचलून धरला. बी.आर.चोप्रा एकदा म्हणाले होते. 'स्मिता, तुम्हारी फिल्म उंबरठा देखी! बहुत अच्छी लगी! तुम्हारा काम भी अच्छा है! मगर एक बात कहूँ, हिंदुस्थानी फिल्ममें ट्रेडिशनल (परंपरावादी) औरतही चलती है!'
आणि दुसरं कारण म्हणजे उंबरठ्यातील माझी भूमिका मला माझ्या आईच्या खूप जवळची वाटली, घर सोडून जाणे हा भाग वगळता माझ्या आईनेही संपूर्ण संसार सांभाळून सर्व जीवन सामाजिक कार्यात व्यतीत करुन दिलं आहे म्हणून मला उंबरठा ही माझी फिल्म वाटते."
उंबरठ्याचा शेवट अनेकांना आवडला नाही त्यावर स्मिता यांचं म्हणणं होतं- "सर्वसामान्यांचं जे असतं ते स्पष्ट असतं, तसं विचारवंतांचं नसतं. त्यांना उंबरठ्याचा शेवट कुठपर्यंत आवडेल? जोपर्यंत त्यांची स्वतःची बायको उंबरठा ओलांडून जात नाही तोपर्यंतच!
पण तरीही मला वाटते अशा फिल्म्स चालो न चालो, त्या प्रबोधनासाठी निघणे आवश्यक आहेत. उंबरठा आज नाही पण उद्या, 10 वर्षांनी स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला स्फूर्ती देईल. अशी फिल्म्स समाजाला, स्त्रियांना आशा देतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)