स्मिता पाटील : 'तिचे वडील मंत्री होते, पण तिच्या वागण्या-बोलण्यात साधेपणा होता'

    • Author, श्याम बेनेगल
    • Role, चित्रपट दिग्दर्शक-निर्माते

अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त आठवणींना उजाळा देणारा ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी लिहिलेला लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

स्मिता पाटीलची चित्रपटांमधील अभिनयाची कारकीर्दच माझ्या चित्रपटांपासून झाली. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असताना तिने एक शॉर्ट-फिल्म तयार केली होती. त्यानंतर तिने माझ्या चित्रपटात काम केलं.

खुद्द कॅमेराच स्मिता पाटीलच्या प्रेमात होता, हा एक तिचा विलक्षण गुण म्हणावा लागेल. आपण अनेकदा काही लोकांसाठी 'फोटोजेनिक' असा शब्द वापरतो, तर स्मिता पाटील कमालीची 'फोटोजेनिक' होती. शिवाय, ती भावना अतिशय अलवार रितीने सादर करायची.

मी तिला 'चरणदास चोर' चित्रपटात घेतलं होतं. तिचा तो पहिलाच चित्रपट होता. तेव्हा ती बरीच अवघडलेली होती. त्यापूर्वी कधी ती घराबाहेर फारशी पडली नव्हती. आम्ही शूटिंग करायचो तेव्हा ती कोणाशी जास्त काही बोलायची नाही.

ती बरीच लाजरीबुजरी होती. खोलीत परतल्यावर ती तिच्या आईला पत्र लिहायची. बहुतेकदा गप्प असायची. पण तिचं खरं व्यक्तिमत्व असं नव्हतं. लोक ओळखत नव्हते तेव्हा ती अशी होती, इतकंच.

पण हळूहळू लोकांशी तिची ओळखपाळख झाल्यावर आमच्या सर्व मैफिलींमध्ये तिच्यामुळेच चैतन्य यायला लागलं. ती फिल्म-युनिटचा भागच होऊन जायची. एखाद्या सिनेतारखेप्रमाणे किंवा नायिकेप्रमाणे तिचं वागणं नसायचं, ती युनिटची सदस्य होऊन वावरायची. तिचे डोळे विलक्षण होते.

मैफिलींमध्ये चैतन्य आणणारी स्मिता

अगदी हलकीशी भावनाही तिच्या डोळ्यांमधून व्यक्त व्हायची. स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्यात कटुता होती, असं लोक म्हणतात. पण हे काही खरं नाही. माझ्या पहिल्या चित्रपटात शबाना होती आणि तिच्या पहिल्याच चित्रपटामध्ये तिने प्रमुख नायिकेची भूमिका केली होती. त्या दोघींमध्ये तीव्र स्पर्धा असल्याच्या बातम्या येत असत, पण वास्तवात तसं काही नव्हतं. केवळ माध्यमांनीच हा विषय वाढवलेला होता.

शबाना प्रशिक्षित अभिनेत्री होती, तर स्मिला पाटील मात्र स्वतःला अनुभवी अभिनेत्री मानत नव्हती, असं मला वाटतं. स्मिता नैसर्गिक स्वरूपाची अभिनेत्री होती. तिने कोणतंच प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यामुळे ती शबानाइतकी सक्षम नाही, असं तिला सतत वाटत असावं. पण असं काही नव्हतं. दोघीही कमालीच्या अभिनेत्री होत्या.

'मंडी' या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केलं आणि तो एक बहारदार अनुभव होऊन गेला. यात स्मिताची भूमिका जबरदस्त होती. चित्रपटात शबानाचं पात्र स्मिताने रंगवलेल्या पात्राच्या संरक्षक छायेखाली राहताना दाखवलेलं आहे. वास्तवातही असंच होतं. मी एका पुस्तकातून प्रेरणा घेऊन हा चित्रपट केला होता. चित्रपटात स्मिताने रंगवलेलं पात्र एका मराठी स्त्रीचं होतं. स्मिता स्वतः मराठी होती, त्यामुळे या भूमिकेत तिने जीव ओतला.

स्मिता-शबाना यांच्यात संघर्ष?

'मंथन' चित्रपटाचा अनुभवदेखील असाच बहारदार होता. राजकोटजवळच्या एका गावात आम्ही शूटिंग करत होतो. अगदी खेडेगाव होतं ते. या चित्रपटात काम करत असतानाच्या काळात खुर्चीवर न बसता गावातल्या मुलींप्रमाणे जमिनीवर बसावं, असं मी स्मिताला सांगितलं होतं.

शूटिंग बघायला आलेले लोक नायिका कुठेय असं विचारायचे. नायिका समोर बसलेली असायची, पण कोणी तिला ओळखू शकायचं नाही. स्मिता अशी विलक्षण अभिनेत्री होती.

या चित्रपटामुळे ती प्रसिद्ध झाली. तिने या जगाचा निरोप घेतला तेव्हा तिचं वय फारसं नव्हतं. आपण जास्त जगू शकणार नाही याचा अंदाज तिला होता, असं काही लोक म्हणतात. यात कितपत तथ्य आहे हे मला माहीत नाही, पण तिला एकंदरच घाई होती. कमी वेळात बरंच काही करायचं असल्यासारखं तिचं वागणं होतं.

तिचा मृत्यू प्रचंड वेदनादायी होता. मुलाला जन्म देताना अडचणी उद्भवल्याने काही दिवसांनी ती मरण पावली. ती अभिनेत्री होती, पण अगदी साधेपणाने राहायची. आपण काहीतरी खास आहोत, असं तिच्या आई-वडिलांनीही जाणवू दिलं नाही.

तिचे वडील महाराष्ट्रात मंत्री होते, पण तरीही तिचं वागणं-बोलणं अगदी साधेपणाचं होतं. तिची आई सामाजिक कार्यकर्ती होती. परंतु, त्या दोघांनीही कधी तिला खास वेगळेपणाने वागवलं नाही.

स्मितासाठी 'भूमिका' हा चित्रपट सर्वांत महत्त्वाचा होता, कारण त्यात तिने वेगवेगळ्या वयोगटातली पात्रं रंगवली होती. यातला अभिनय बराच गुंतागुंतीचा होता. जगभरात तिचं कौतुक झालं. यानंतर फ्रान्सच्या कोणत्यातरी दिग्दर्शकानेही तिला एक भूमिका देऊ केली होती.

अखेरच्या दिवसांमध्येही मी तिच्या सोबत होतो, कारण ती ज्या रुग्णालयात दाखल होती ते माझ्या घरापासून जवळच होतं. ती खूप लवकर निघून गेली, असं मला वाटतं. ती आणखी काही वर्षं जगली असती, तर आणखी अनेक उत्तमोत्तम चित्रपट तिच्या खात्यावर जमा झाले असते.

(बीबीसी हिंदीच्या इंदू पांडे यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)