You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महेंद्र सिंह धोनी : सुशांत सिंह राजपूतनं 'माही' बनण्यासाठी कशी केली होती तयारी?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
त्याची मातृभूमी पाटणा. दुसऱ्याची रांची. झारखंड पूर्वी बिहार राज्याचाच भाग होतं त्यामुळे संस्कृती बऱ्यापैकी मिळतीजुळती आहे.
भारतातल्या सेकंड टायर सिटीजमध्ये दोन्ही शहरांचा समावेश होतो. पाटण्याचा 'तो' दिसायला छान, उंचीही चांगली, व्यक्तिमत्व कोणालाही आकर्षून घेईल असं. इंजिनियरिंगचं शिक्षण घेता घेता त्याने अभियनाची वाट पकडली. टीव्ही सीरियल्समुळे हिंदीभाषिक घराघरात त्याचा चेहरा पोहोचला. आता तो मोठ्या पडद्याच्या मुशाफिरीकडे वळला.
दुसरीकडे रांचीचा 'तो' खेळू लागला. फुटबॉलच्या गोलकीपरचं क्रिकेटच्या विकेटकीपरमध्ये रुपांतर झालं. त्याच्या बॅटचे तडाखे मिळालेले बॉलर वाढू लागले. लांब केस वाढवलेला, बाईक्सची आवड असलेला देसी स्वॅगवाला तो देशातल्या सगळ्यांत मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या खरगपूरला टीसी म्हणून काम करू लागला. बिहारची रणजी टीम, इंडिया ए अशी मजल दरमजल करत तो टीम इंडियासाठी खेळू लागला.
सातव्या मॅचमध्ये मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं आणि क्रिकेटच्या पटलावर त्याचं नाव झळकलं. तेव्हापासून अगदी आतापर्यंत रांचीच्या या राजकुमाराचं नाव क्रिकेटरसिकांच्या मुखी आहे- महेंद्र सिंह धोनी. टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक, वनडे तसंच ट्वेन्टी-20 क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक, तडाखेबंद बॅट्समन आणि चलाख कर्णधार.
प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही अलिप्त होणाऱ्या आणि राहणाऱ्या क्रिकेटरसिकांच्या लाडक्या माहीची कहाणी पडद्यावर साकारण्याची जबाबदारी मिळाली अभिनेता सुशांत सिंह राजपूतला. धोनीच्या चेहऱ्याशी, शरीरयष्टीशी जराही साधर्म्य नसणाऱ्या सुशांतने हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेतली.
क्रिकेटपटू धोनी होण्यासाठी सुशांतने वर्षभराहून जास्त काळ माजी खेळाडू किरण मोरे आणि व्हीडिओ अॅनालिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. विकेटकीपर कसा विचार करतो, त्याच्या हालचाली कशा होतात, तो बॉलरला कशी मदत करतो, तो फिटनेस कसा राखतो हे सगळं किरण मोरे यांनी सुशांतला शिकवलं. व्हीडिओ अॅनालिस्ट धोनीचे फटके फ्रेम बाय फ्रेम उलगडून दाखवत असे. जेणेकरून सुशांतला आपण कसं खेळणार याचा अंदाज येत असे.
धोनीच्या बॅटची होणारी हालचाल, बॉटम हँडचा वापर, धावताना तसंच मोठे फटके खेळतानाचं पदलालित्य, कुठल्या पायावर जोर द्यायचा, क्रीझमध्ये राहून कसं खेळायचं, क्रीझच्या बाहेर निघत दणादण फटके कसे खेळायचे हे समजून घेण्यासाठी अॅनालिस्ट मदत करत असे.
धोनीचा ठेवणीतला हेलिकॉप्टर शॉट सहा फ्रेम्समध्ये सुशांतला दाखवण्यात येई. त्यानंतर बॉलिंग मशीनमधून सुशांतवर वेगाने बॉलचं आक्रमण होई. दिवसातून तीनशेवेळा सुशांत हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस करत असे. जेणेकरून शूटिंगच्या वेळेस सुशांतच्या खेळण्यात कृत्रिमता वाटू नये.
किरण मोरे आणि अॅनालिस्ट यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यापूर्वी सुशांतने जुहूतल्या गौतम मंगेला यांच्याकडून क्रिकेटचं बेसिक प्रशिक्षण घेतलं. गौतम गेल्या 25 वर्षांपासून जुहूमध्ये अकादमी चालवतात. आपल्या मुलांच्या साथीने ते युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतात.
धोनीला समजून घेताना...
धोनी होण्यासाठी सुशांत सिंह राजपूत वर्षभराच्या तयारीच्या काळात तीनवेळा धोनीला भेटला. पहिल्या भेटीत सुशांतने धोनीकडून स्वत:चा आतापर्यंतचा प्रवास ऐकला. दुसऱ्या भेटीवेळी सुशांत धोनीला भेटला तेव्हा त्याने प्रश्नांची सरबत्ती केली.
किती प्रश्न विचारतोस या धोनीच्या म्हणण्यावर सुशांत म्हणाला, "चाहते माझ्यात तुला शोधणार आहेत, त्यामुळे मला तुला समजून घ्यावंच लागेल."
तिसऱ्या भेटीवेळी सुशांतने धोनीला ठराविक परिस्थितीविषयी प्रश्न विचारले.
सुशांतला मार्गदर्शन केलेल्या किरण मोरे यांनी सुशांतची धोनी होण्याची वाटचाल जवळून पाहिली. "सुशांत एक अभिनेता होता, क्रिकेटपटू नाही. परंतु त्याने खेळातले सगळे बारकावे समजून घेतले. मेहनत करण्याची त्याची तयारी होती. त्याने फास्ट बॉलर्सचा, बॉलिंग मशीनचा सामना केला. तो मागे हटला नाही. धोनीचा खास हेलिकॉप्टर शॉट शिकण्यासाठी सुशांतला दीड महिन्यांचा कालावधी लागला. तो दररोज नेट्समध्ये 300 ते 400 चेंडूंचा सराव करत असे."
बॅटिंग करताना बॅटचा आधार असतो परंतु कीपिंग करताना बॉल थेट तुमच्याकडे येतो. सरावादरम्यान सुशांतच्या चेहऱ्याला, बोटांना, छातीला दुखापत झाली. सरावादरम्यान एकदा त्याच्या बरगड्यांना लागलं. यामुळे त्याला दहा दिवस विश्रांती घ्यावी लागली.
अंधेरीतल्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल ग्राऊंड इथे चंद्रकांत पंडित अकादमीत तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी इथल्या संकुलात सुशांतने सराव केल्याचं मोरे सांगतात. सकाळी ठीक सात वाजता सुशांतला सरावासाठी पोहोचावं लागत असे, मात्र त्याने कधीही उशीर केला नाही असं ते आवर्जून सांगतात.
कशी झाली सुशांतची धोनीच्या भूमिकेसाठी निवड?
धोनीचे व्यावसायिक सहकारी, मित्र आणि धोनीवरील चित्रपटाचे निर्माते अरुण पांडे यांनी सुशांतच्या निवडीमागचा किस्सा सांगितला. धोनीच्या टीमने या भूमिकेसाठी काही नावं निवडली होती. यामध्ये सुशांतचं नाव होतं. काय पो छे चित्रपटात सुशांतने क्रिकेट कोचचं काम केलं होतं. त्यावेळी त्याने क्रिकेट समजून खेळलेला असावा असं वाटलं. त्याला धोनीची भूमिका करण्यात स्वारस्य होतं.
धोनीलाही याबाबत विचारलं तर त्याने काय पो छे चित्रपट पाहिला होता. सुशांतचं काम पाहिलं होतं. त्यामुळे चित्रपटाचा दिग्दर्शक ठरण्याआधीच धोनीची भूमिका सुशांत करणार हे पक्कं झालं होतं.
भूमिकेच्या तयारीसाठी सुशांतने धोनीला सातत्याने पाहिलं. स्टँडमध्ये बसून त्याने मॅचेस पाहिल्या. हॉटेलच्या लॉबीत बसून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला. तो संघातल्या सहकाऱ्यांशी कसं बोलतो, चाहत्यांशी कसं बोलतो, अनोळखी व्यक्तींशी कसा वागतो याचा अभ्यास सुशांतने केला. त्याच्या लकबी काय आहेत, देहबोली कशी आहे असे सगळे तपशील सुशांत टिपत असे.
धोनीच्या भूमिकेसाठी फिटनेसवर प्रचंड मेहनत
जगातल्या फिट क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतला प्रचंड मेहनत करावी लागली. पहिल्या टप्प्यात शारीरिक कणखरतेची परीक्षा पाहणाऱ्या हाय इंटेन्सिटी फंक्शनल ट्रेनिंगला तो सामोरा गेला.
व्यायाम, बॉक्सिंग, अडथळ्यांची शर्यत, डोंगर चढणे अशा वीसहून अधिक अॅक्टिव्हिटीजचा यात समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सुशांतने बॅले डान्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. तिसऱ्या टप्प्यात व्यायामशाळेत मशीन्सच्या माध्यमातून सुशांतने घाम गाळला. याव्यतिरिक्त सायकलिंग, फुटबॉल खेळणं हेही त्याने केलं.
एम. एस. धोनी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाच्यावेळेस बीबीसीने सुशांत सिंह राजपूतशी संवाद साधला होता. त्यावेळेस सुशांतने धोनी आणि आपलं आयुष्य एकसारखंच असल्याची भावना व्यक्त केली होती.
तो म्हणाला होता, "माझं आणि धोनीचं आयुष्य यामध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. त्यामुळे धोनीची भूमिका साकारायला मदत झाली. त्याच्या जीवनप्रवासामध्ये मी माझा जीवनप्रवास पाहात होतो त्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं होतं."
"आमचं क्षेत्र वेगवेगळं असलं तरी जीवनाचा पॅटर्न एक आहे. प्रत्येक आघाडीवर आम्ही जोखिम घेतली आहे आणि यश मिळवलं आहे. लोक धोनीला इतकं नीट ओळखतात की पडद्यावर त्याला साकारताना लहानशी चूक झाली तरी ती मोठी चूक दिसेल."
सुशांत धोनीच्या भूमिकेत असलेला हा चित्रपट MS Dhoni: The Untold Story 30 सप्टेंबर 2016 रोजी रिलीज झाला. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाला क्रिकेटप्रेमी आणि चित्रपटरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगूमध्ये डब करण्यात आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)