सुशांत सिंह राजपूत वरील मुकेश भट्ट यांचं वक्तव्य का सापडलं वादात?

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना मुकेश भट्ट यांनी म्हटलं होतं की, सुशांत असं काही तरी करेल याचा त्यांना पहिल्यापासूनच अंदाज होता.

आशिकी - 2 आणि सडक -2 या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सुशांत माझ्या ऑफिसमध्ये आला होता. पण, पुढे काही होऊ शकलं नाही.

मुकेश भट्ट यांनी म्हटलं, "मी सडक-2 बनवायचा विचार करत होतो तेव्हा आलिया आणि महेश भट्ट यांनी म्हटलं की सुशांतला काम करण्याची इच्छा आहे. त्यानंतर सुशांत पुन्हा एकदा ऑफिसला आला आणि मग त्याच्याशी चित्रपट आणि जीवनविषयक इतर बाबींविषयी चर्चा करता आली. त्या चर्चेदरम्यान सुशांत मला अस्थिर असल्याचं जाणवलं."

मुकेश भट्ट यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ रिट्वीट करत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं, "मुकेश भट्ट तुमची ही गोष्ट ऐकून मी व्यथित झालोय. तुम्ही मित्र आहात, पण इतक्या सहजतेनं हे तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्हाला माहिती होतं आणि तुम्हाला त्याबद्दल काही वाटलं नाही. तुम्ही सडक- 2 आणि आशिकी -2 मध्ये कदाचित व्यावसायिक कारणांमुळे सुशांतला संधी दिली नसेल, तरीसुद्धा हे दुखद आहे की, त्याच्या वडिलांसारखे असतानाही तुम्ही त्याला मदत केली नाही."

हेयरस्टायलिस्ट सपना भवनानी यांनी ट्वीटरवर सुशांत, महेंद्रसिंग धोनी आणि स्वत:चा फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, सुशांत काहीतरी अडचणीत होता. सपना यांनी लिहिलंय, "गेल्या काही वर्षांपासून सुशांत अडचणीत होता, हे काही लपून राहिलेलं नाही. कुणीच त्याला मदत केली नाही. आज सगळेच जण दु:ख व्यक्त करत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टी किती भंपक आहे, हे दिसून येतं. इथं कुणीच तुमचा मित्र नाही."

अमिताभ बच्चन यांनी केली प्रशंसा

अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरा सुशांत सिंहविषयी पोस्ट केली. त्यांनी लिहिलं, "सुशांत तू तुझं जीवन का संपवलं? तुझं कौशल्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता कायमची थांबली. काहीच न बोलता, काहीच न सांगता, असं का केलं?"

त्यांचं ट्वीट बरंच मोठं आहे, त्यांनी पुढे लिहिलंय, "सुशांतचं काम चांगलं होतं आणि बुद्धी एकदम कुशाग्र होती. अनेकदा त्यानी गंभीर भूमिका उत्तमरीत्या केल्या. मी धोनी चित्रपटात त्याचं काम पाहिलं. अनेक ठिकाणी त्यानी उल्लेखनीय काम केलंय."

"माझी त्याच्याशी भेट झाली तेव्हा तू धोनीसारखा षटकार मारायचा शॉट इतक्या सहजपणे कसा केला. तेव्हा त्यानं उत्तर दिलं की, धोनीचा व्हीडिओ मी शंभरदा बघितला होता. आपल्या व्यवसायाशी त्याची इतकी बांधिलकी होती."

कोणत्या प्रकारचा विचार एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करतो, हे कधीही न समजता येणारं गुपित आहे. एका यशस्वी आयुष्याला अशापद्धतीनं संपवायला नको, असंही ते म्हणालेत.

मनोज वाजपेयींची खंत

मनोज वाजपेयी यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. द हिंदू या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, "मी सुशांत सोबत सोनचिडिया या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटदरम्यान आम्ही एकमेकांना जाणून घेतलं. मी सुशांतविषयी नीरज पांडे कडून ऐकलं होतं.

नीरज एम एस धोनी या चित्रपटात सुशांतला मुख्य अभिनेता म्हणून घेतलं होतं. तो आपल्या भूमिकेशी बांधील होता. त्यानं कधी क्रिकेट खेळलं नाही, पण धोनी चित्रपटात ते खेळून दाखवलं. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो किरण मोरेसोबत सरावासाठी जात असे. धोनी चित्रपटातील त्याची भूमिका उल्लेखनीय होती."

"त्याला नेहमीच नवीन बाबींचं कुतूहल असायचं. तसंच खूप शिकलेला होता. मला आठवतं तो चित्रपटाच्या सेटवर क्वांटम फिजिक्सची पुस्तकं घेऊन यायचा. यासोबतच एक महागडी दुर्बीन सोबत ठेवायचा. तिच्यातून आकाशाकडे पाहायचा. चंबळचं आकाश तो आम्हालाही दाखवायचा. या चित्रपटादरम्यान मी मटन बनवलं होतं, ते त्याला खूप आवडलं होतं. मी त्यालाही घरीही जेवायला बोलावलं होतं. पण, वेळेअभावी तो येऊ शकला नाही, याचं मला वैषम्य वाटतं.

डिटेक्टिव व्योमकेश बख्शीमध्ये सुशांतला मुख्य भूमिका देणारे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी म्हटलं, "मी हतबल झालोय. मला आतून भीती वाटतेय, का ते मला माहिती नाही. मीडियाच्या हिंसेपासून त्याच्या कुटुंबीयाला वाचवलं जाईल याची मला आशा आहे. मी काहीतर मदत करू शकलो असतो, पण आता पूर्णपणे असमर्थ आहे. असं नको व्हायला होतं. मी त्याच्या संपर्कात राहायला हवं होतं. तो खूपच भावनिक होता."

ते त्यांचं कर्म, तुझं नाही - शेखर कपूर

प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की गेल्या सहा महिन्यांपासून आपण दूर होतो. जे तुझ्याबाबतीत घडलं त्यात तुझा दोष नाही.

"सुशांत तुझ्या वेदना मी समजू शकतो ज्यांनी तुला निराश केलं त्या लोकांबाबत मला माहीत आहे. त्याबद्दल सांगताना तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत होतास. गेल्या सहा महिन्यात मी तुझ्याबरोबर असायला हवा होतो. मला वाटतं तू माझ्याशी बोलायला हवं होतं. तुझ्यासोबत जे काही घडलं ते त्यांचं कर्म आहे तुझं नाही," असं शेखर कपूर यांनी म्हटलं आहे.

आऊडसाईडरला त्रास दिला जातो - कंगणा रनौत

अभिनेत्री कंगणा रनौतच्या टीमनंही याविषयी एक व्हीडिओ ट्वीट करत चित्रपट सृष्टीतल्या काही गोष्टींवर टीका केली आहे. या व्हीडिओमध्ये कंगना म्हणत आहे की, "ज्यांची बुद्धी कमकुवत असते ते डिप्रेशनमध्ये येतात आणि आत्महत्या करतात, असं काही जण म्हणत आहेत. पण, स्टॅनफोर्ड विद्यापाठीची स्कॉलरशिप मिळवणाऱ्या माणसाची बुद्धी कमकुवत कशी असू शकते?

"माझे चित्रपट पाहा, नाहीतर मी बाहेर पडेल. माझा कुणीच गॉडफादर नाहीये, अशी जाहीर याचना सुशांत त्याच्या व्हीडिओतून करत होता. आम्ही आऊडसाईडर जे करतो, निदान त्याचं क्रेडिट तरी आम्हाला द्या.

काही जण मला मेसेज करून असं काही करू नको म्हणत आहेत, पण मी असं का करेल. सुशांतची आत्महत्या नसून ती नियोजित हत्या आहे. तू काही करू शकत नाही, हे त्या लोकांचं म्हणणं सुशातनं ऐकलं आणि इथंच त्याचं चुकलं. आपल्याला त्यांचं ऐकायचं नाहीये, आपल्याला आपला इतिहास स्वत:च लिहायचा आहे." असं कंगणाने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)